तमाम क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला सध्या उधाण आलंय. धोनी, कोहली, रैनाचे पंखे सगळीकडे भिरभिरताना दिसताहेत सध्या. सगळे जण कांगारूंच्या देशाकडे डोळे लावून बसलेत. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला गेल्याच आठवडय़ात सुरुवात झालीय आणि हा क्रिकेट फीवर ऐन भरात आलाय. त्याचे पडसाद बाजारपेठेवर दिसले नाहीत तरच नवल. हल्ली तर र्मचडायझिंगचा जमाना आहे. वर्ल्ड कपचं ऑफिशिअल र्मचडायझिंग केलं जातंय. त्यामुळे रस्त्यावरच्या दुकानांपासून ते बडय़ा मॉल्सपर्यंत सगळीकडे वर्ल्ड कपचे टीशर्ट, इंडियन टीमचा लोगो असलेली कॅप, मग, जार असं सामान भरलेलं दिसतंय. भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातल्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष आहे. वीकएण्डला एकत्र बसून मॅच बघायचे प्लॅन बनताहेत. मग अशा स्पोर्ट्स पार्टीला जाताना जय्यत तयारी नको का? म्हणूनच आपल्या टीमला सपोर्ट करणारे टीशर्ट आणि कॅप, रिस्ट बँड्स, शूज अशा अॅक्सेसरीज घ्यायला तरुणाई सरसावली आहे. ‘आयसीसी’ने यंदा ऑफिशिअली र्मचडायझिंग केलंय.
हायपरसिटीसारखी रिटेल स्टोअर्स आणि अॅमेझॉनसारखी ऑनलाइन स्टोअर्स आयसीसी वर्ल्ड कपचे ऑफिशिअल र्मचडायझिंग विकत आहेत. ६०० रुपयांपासून हे टीशर्ट उपलब्ध आहेत. टीशर्टखेरीज वॉटर बॉटल्स, फ्लिपफ्लॉप चप्पल्स, गॉगल, मग अशा गोष्टींवरही विश्व करंडकाची मोहोर उमटवलेली आहे.
इको-फ्रेंडली जर्सी
भारतीय खेळाडूंची वर्ल्ड कपसाठीची जर्सी जानेवारी महिन्यातच ठरवली गेली. नाइके या कंपनीने टीम इंडियाची जर्सी प्रायोजित केली आहे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवली आहे. नाइकेने खेळाडूंसाठी बनवलेल्या या जर्सी आणि पँटला पर्यावरणस्नेहाचा गंध आहे, कारण ३३ प्लॅस्टिकच्या बाटल्या रिसायकल करून यासाठी वापरण्यात आल्या आहेत. वजनाला अगदी हलक्या आणि घाम शोषून घेणाऱ्या या कापडामध्ये खरोखर अशा प्रकारे रिसायकल्ड प्लॅस्टिकचा वापर करण्यात आल्याची माहिती नाइकेतर्फे देण्यात आली. जर्सीसाठी वापरलेल्या कापडामध्ये लेसर व्हेंटिलेशन होल्स आणि वेगळ्या प्रकारची वीण यामुळे खेळाडूंना घामाचा त्रास होणार नाही. प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणनं या जर्सीसह खास फोटो सेशनही केलं. ख्यातनाम छायाचित्रकार भारत सिक्का यांनी दीपिकाचा काढलेला फोटो सोशल नेटवर्क्सवर झपाटय़ाने लोकप्रिय झाला होता. मुळात बॅडमिंटनपटू असलेल्या दीपिकाने लगेच आपलं क्रिकेटप्रेमही यानिमित्ताने जाहीर करून टाकलं. ‘‘कुठल्याही क्रिकेटचाहत्याप्रमाणे मीसुद्धा पहिल्यांदा ही नॅशनल टीमची जर्सी घातली तेव्हा माझं ऊर अभिमानानं भरून आलं. भारतात क्रिकेटचा खेळच सर्वात लोकप्रिय आहे आणि यासाठीची पॅशन वादातीत आहे,’ असं सांगून तिनं भारतीय टीमला शुभेच्छा दिल्यात. या टीम इंडियाच्या किटही (जर्सी आणि बॉटम्स) ‘नाइके’नं मोजक्या आऊटलेट्समध्ये विकायला ठेवल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2015 रोजी प्रकाशित
क्रिकेट फीवर
तमाम क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला सध्या उधाण आलंय. धोनी, कोहली, रैनाचे पंखे सगळीकडे भिरभिरताना दिसताहेत सध्या. सगळे जण कांगारूंच्या देशाकडे डोळे लावून बसलेत.

First published on: 20-02-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket fever