तेजश्री गायकवाड viva@expressindia.com
‘सायबर फॅशन मार्केट’ म्हणजे असं मार्केट जिथे तुम्ही कपडय़ांना हात लावू शकत नाही, प्रत्यक्ष हे कपडे घालू शकत नाही आणि तरीही हेच कपडे घातलेले तुमचे फोटो सोशल मीडियावर किंवा अन्य ठिकाणी पोस्ट करू शकता.
फॅशन इंडस्ट्रीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. कोविड -१९ मुळे झालेला लॉकडाऊन तर फॅशन इंडस्ट्रीच्या दृष्टीने नवनव्या कल्पनांना जन्म देता झाला आहे. गेल्या दीड वर्षांत फॅशनपासून दूर असलेल्या ग्राहकांना आंतरनियम पाळत पुन्हा आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी नवनव्या शक्कल लढवल्या जात आहेत आणि वेगाने सर्व स्तरावर त्या पुढेही जात आहेत. आपण जसं प्रत्येक गोष्टीमध्ये न्यू नॉर्मलसह जेवढं जमेल त्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत तसंच फॅशन इंडस्ट्रीमध्येही घडतं आहे. वेगवेगळ्या स्तरावरचे फॅशन शो असोत वा अन्य कार्यक्रम डिजिटल स्वरूपात होत आहेत.
फॅशन उद्योगात होणाऱ्या या डिजिटल प्रयोगांचा नवा अवतार म्हणजे ‘सायबर फॅशन मार्केट’.
‘सायबर फॅ शन मार्के ट’ म्हणजे असं मार्के ट जिथे तुम्ही कपडय़ांना हात लावू शकत नाही, प्रत्यक्ष हे कपडे घालू शकत नाही आणि तरीही हेच कपडे घातलेले तुमचे फोटो सोशल मीडियावर किंवा अन्य ठिकाणी पोस्ट करू शकता. आभासी कपडय़ांची ही कल्पना नवल वाटावी अशीच आहे, त्यामुळे अशा डिजिटल कपडय़ांसाठी मोजली जाणारी किं मतही अशीच नवल वाटायला लावणारी आहे. या कपडय़ांसाठी अगदी लाखभर रुपयेसुद्धा मोजले जात आहेत. काय आहे हे मार्केट? कसं काम करतं हे मार्केट? या मार्केटचं भविष्य काय? याबद्दलची माहितीही तितकीच रंजक आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांनी, फॅशन ब्रॅण्ड्सनी, फॅशन वीकच्या आयोजकांनी, फॅशन डिझायनर्सनी आपलं कलेक्शन डिजिटल स्वरूपात सादर करायला आणि विकायलाही सुरुवात केली. लॉकडाऊनच्या आधीही अशा पद्धतीने ऑनलाइन स्वरूपात कलेक्शन विकली जायची, परंतु त्याचं प्रमाण कमी होतं. बेसिक फोटोशूटसह कलेक्शन डिजिटली सादर होत असत. आता मात्र कलेक्शन्स वेगवेगळे व्हिडीओ आणि इनोव्हेटिव्ह आयडियांच्या आधारे ग्राहकांपर्यंत पोहोचवली जात आहेत. अशाच इनोव्हेवेशनचं पुढचं पाऊल म्हणजे सायबर फॅशन मार्केट. याच मार्केट अंतर्गत नुकतीच ‘गुची’ या नामांकित फॅशन ब्रॅण्डची हॅण्डबॅग ३ लाखापेक्षा जास्त किमतीत विकली गेली. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? कारण राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय मोठय़ा फॅशन ब्रॅण्डच्या प्रॉडक्ट्सच्या किमती काही हजारांपासून ते लाखांच्या घरात आहेत. त्यात ‘गुची’ या फॅशन ब्रॅण्डच्या प्रॉडक्ट्सची किंमत नेहमीच जास्त असते. परंतु, एरव्ही हे एवढे लाखो रुपये मोजून त्या वस्तू प्रत्यक्ष वापरासाठी विकत घेतल्या जातात. इथे मात्र ३ लाखांपेक्षा जास्त किमतीला विकली गेलेली हॅण्डबॅग ही डिजिटल स्वरूपातील आहे हे विशेष.
जागतिक स्तरावरील अनेक डिझायनर्स आणि फॅशन ब्रॅण्ड्सनी सायबर फॅशन मार्केटची ही संकल्पना उचलून घेतली आहे. या मार्के टमध्ये उतरण्यासाठी त्यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. हे डिजिटल कपडे किंवा अॅक्सेसरीज प्रत्यक्षात बनवल्या जात नाहीत तर फॅशन ब्रॅण्ड्स थ्रीडी सॉफ्टवेअरच्या मदतीने या वस्तूंचे आभासी रूप घडवतात. हे डिजिटल ड्रेस वा डिजिटल वस्तू अचूकपणे ग्राहकांच्या फोटोवर व्यवस्थित चढवले जातात. अनेक तासांच्या एडिटनंतर तयार झालेले हे फोटो बघितल्यावर समोर दिसणाऱ्या मॉडेलने डिजिटल ड्रेस घातलाय की खरोखरच ड्रेस घातला आहे हे ओळखणं कठीण जातं. अनेक ब्रॅण्ड्सने अशाप्रकारची डिझाइन्स विकण्यासाठी त्यांच्या सोशल साइटवर आणि वेबसाइटवर स्वतंत्र सेक्शनही सुरू केले आहेत. हे ड्रेस किंवा अॅक्सेसरीज ग्राहक फक्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यापुरतेच घेत आहेत असं नाही. तर याचा वापर ऑनलाइन गेम्समध्येही होताना दिसतो आहे. अनेक गेम्समध्ये आपल्याला कॅरेक्टरचे कपडे, अॅक्सेसरीज बदलता येतात. गेममध्ये आधीपासून उपलब्ध असलेले कपडे किंवा अॅक्सेसरीज सोडता अन्य पर्याय हवे असतील तर हे असे डिजिटल कपडे विकत घेता येतात. जागतिक स्तरावर ‘ट्रिब्यूट’ नामक कंपनी आहे जी डिजिटल कपडे विकण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध होते आहे. क्रोएशियाच्या या कंपनीच्या डिजिटल कपडय़ांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळतात. त्यांच्या वेबसाइटवर अनेक डिजिटल कपडय़ांचे पीस विकले गेले आहेत. ट्रिब्यूट कंपनीच्या वेबसाइटवर नमूद केल्यानुसार कंपनीला ठाम विश्वास आहे की डिजिटल फॅशन हे या उद्योगाचं भविष्य म्हणून स्वीकारलं जाईल. फिजिकली कपडे बनवायचे नसल्यामुळे कोणत्याही जेंडरसाठी, बॉडी टाइपसाठी हे कपडे सहज उपलब्ध करून देता येतात.
या प्रकारच्या फॅशनला सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि गेमिंग करणाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर सर्पोट मिळतो आहे. त्यांच्यापैकी अनेक जण असे डिजिटल कपडे वा अॅक्सेसरीज विकत घेताना दिसतात. या सायबर फॅशन मार्केटमुळे टेक्स्टाईल इंडस्ट्रीतील कचऱ्याचा प्रश्न कमी होऊ शकतो. नाही तर सातत्याने बदलत्या ‘फास्ट फॅशन’मुळे वेस्ट जाणारे कपडे, त्यांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या केमिकल्सची, कपडे डाय करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जास्त पाण्याची समस्या सोडवण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा फॅ शन उद्योजकांना वाटते आहे.परंतु भारतासारख्या देशात जिथे आपण कोणत्याही छोटय़ा – मोठय़ा ओकेजनसाठी नवीन कपडे घेणे पसंत करतो तिथे सायबर फॅशन मार्केटला कितपत प्रतिसाद मिळेल, याचीही चाचपणी सुरू आहे. आभासी फॅशनचा वास्तव आनंद घेण्याची मानसिकता इथे रुजली तर एक नवा फॅशन ट्रेण्ड पाहायला मिळेल यात शंका नाही.