लाखो वर्षांपूर्वीची गोष्ट. इतर ग्रहांवर जे घडू शकलं नाही ते पृथ्वीवर झालं. जीवन फुललं. प्राणी, पक्षी, मासे, झाडे अशी जीवसृष्टी इथं नांदू लागली. निसर्गाने प्रत्येकाला काहीतरी वरदान दिलं, कोणाला अवाढव्य शरीर, कोणाला विलक्षण शक्ती, कोणाला उडण्याचे पंख, तर कोणाला पाण्यात पोहण्यासाठी कल्ले… एक सजीव मात्र सगळ्यांपेक्षा फारच दुबळा होता. त्याला ना तीक्ष्ण दात, टोकदार शिंग, ना विष…स्वत:चा बचाव करण्याचं काही वरदान त्याच्याकडे नव्हतं. इतर प्राण्यांची शक्ती बघता हा खरंतर नामशेषच व्हायला हवा होता, पण उलटच झालं. आज तो जगावर राज्य करतो आहे…
कोण? माणूस! का? कारण त्याच्याकडे बुद्धी नावाचं एक अनोखं वरदान होतं. बुद्धीमुळे माणूस आज इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. या बुद्धीच्या जोरावर माणसाने अनेक शोध लावले, जीवन सुखकर केले. याच बुद्धीच्या जोरावर आज डिजिटल युगात आपण जगत आहोत. गंमत म्हणजे या बुद्धीच्या जोरावरच तयार झालेली स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया यांसारखी साधनं आता उलट आपल्या बुद्धीवरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव टाकू लागली आहेत.
मग प्रश्न असा पडतो की, बुद्धी म्हणजे नेमकं काय? अभ्यासातली हुशारी का व्यावसायिक यश? स्मरणशक्ती की कल्पकता? गणितातले जास्त मार्क्स म्हणजे बुद्धिमत्ता तर मग ए. आर. रहमानला काय म्हणायचं? पाठांतर ही कसोटी असेल तर मग सुनीता विल्यम्सचं काय?, अशा प्रश्नांनी प्रसिद्ध अमेरिकन मानसशास्त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर यांनाही सतावलं. त्यांच्या मेंदूवरील संशोधनातून त्यांनी दाखवलं की बुद्धी ही एकाच प्रकारची नसून बहुआयामी असते. १९८३ला आपल्या ‘फ्रेम्स ऑफ माइंड’ या पुस्तकातून त्यांनी हा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत (थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स) मांडला. त्यांच्या मते, प्रत्येकाच्या मेंदूत किमान आठ वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. मेंदूची रचना सगळ्यांची साधारण सारखी असली तरी, त्यातील पेशींच्या जुळणीतले सूक्ष्म फरक ठरवतात की कोणत्या व्यक्तीमध्ये कोणती बुद्धिमत्ता अधिक प्रबळ असेल. कुणी शब्दांशी खेळतं, छान लिहितं-बोलतं, कुणाला आकार, रंग, नकाशे छान समजतात, कुणाला गणितं-कोडी पटकन सुचतात. कुणी शरीराच्या हालचालींमध्ये तरबेज असतो तर कुणाला सूर, ताल यांची जाण असते. गार्डनर यांच्या मते बुद्धी ही भाषिक-वाचिक, गणितीय-तार्किक, दृश्य-अवकाशीय, शारीरिक-गतिक, सांगीतिक, आंतरव्यक्तिक, व्यक्तीअंतर्गत आणि निसर्गविषयक अशा आठ वेगवेगळ्या आयामांतून व्यक्त होत असते.
आपण रोजच्या जीवनात या बुद्धिमत्ता कमी-अधिक प्रमाणात वापरतो. या बुद्धिमत्ता जाणीवपूर्वक संवर्धित करता येऊ शकतात, तसंच योग्य काळजी न घेतल्यास त्या हळूहळू कमीही होऊ शकतात. म्हणून आपल्या डिजिटल कृतींचा या आयामावर होत असलेला सकारात्मक-नकारात्मक परिणाम बघणं महत्त्वाचं ठरतं. आपल्या मेंदूतील ‘ग्रे मॅटर’ हा घटक मेंदूच्या स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, एकाग्रता, भाषा विकसन, संवेदना आणि भावनांचे नियमन अशा कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. मोबाइलच्या अतिवापरामुळे, तासन् तास निरर्थक रील्स बघितल्यामुळे मेंदूतील ग्रे मॅटरमध्ये घट होते आहे, असे मॅक्वेरी विद्यापीठातील संशोधक मिशेल मोशेल यांनी २०२४ मध्ये केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. मोबाइलच्या अतिवापरातून होणाऱ्या ब्रेनरॉटमुळे अटेन्शन स्पॅन कमी होतो आहे हेही संशोधनातून आढळून आले आहे. डिजिटल माध्यमांचा आपल्या बुद्धिमत्तेवर होणारा हा प्रत्यक्ष परिणाम चिंतेचा विषय आहे. याच सोबत आपल्या बुद्धिमत्तेच्या विविध आयामांवर होणारे अप्रत्यक्ष परिणामदेखील तितकेच चिंताजनक आहेत.
शब्दांशी खेळण्याची, विचार स्पष्टपणे बोलून किंवा लिहून मांडण्याची ताकद म्हणजे भाषिक-वाचिक बुद्धिमत्ता (Linguistic/ Verbal Intelligence). आजच्या डिजिटल युगात ही बुद्धिमत्ता दोन्ही बाजूंनी प्रभावित होते आहे. वेगवेगळे ब्लॉग्स, ऑनलाइन लेख, ई-बुक्स यामुळे वाचनाचा मोठा खजिना आपल्याला उपलब्ध झाला आहे. ड्युओलिंगोसारख्या अॅप्समुळे इतर भाषा शिकणंही अगदी सोपं झालं आहे. सोशल मीडिया आणि ब्लॉगिंगमुळे लिहिण्याची सवय वाढली असून अनेक नवीन लेखकही घडत आहेत, पण त्याचबरोबर सतत स्क्रोलिंग, छोट्या मेसेजेस आणि अॅब्रिव्हेशन्सचा वाढता वापर मोठं काहीतरी वाचायचा कंटाळा निर्माण करतो. विचार किंवा भावना व्यक्त करण्यासाठी शब्द न सुचता इमोजींचा वापर वाढताना दिसतो. एखाद्याचं कौतुक करायला फक्त थम्ब अप ईमोजी दिला की काम भागतं. लेखनकौशल्यांसाठी एआयचा अतिवापर धोक्याची घंटा ठरू पाहतो आहे. त्यामुळे डिजिटल साधने योग्य पद्धतीने वापरली गेली तर भाषिक कौशल्य सुधारते, अन्यथा त्याचा उलट परिणाम होऊ शकतो.
एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं, तर्क लावणं, आकडेमोड करणं, गणित सोडवणं हे गणित आणि तार्किक बुद्धिमत्तेचा (मॅथेमॅटिकल / लॉजिकल इंटेलिजन्स) भाग आहे. मोबाइलवर मर्यादित वेळेसाठी सुडोकू, स्ट्रॅटेजी गेम्स यातून काही प्रमाणात बुद्धिमत्ता वाढीस मदत होऊ शकते. अनेक ई लर्निंग प्लॅटफॉर्ममुळे एखादा विषय, त्यातलं लॉजिक कळणं सोपं झालं आहे, पण बऱ्याचदा साधी आकडेमोड करायलासुद्धा मोबाइलमध्ये कॅल्क्युलेटर उघडावं लागतं. समजा ३२४ रुपयांची खरेदी केली आणि ५०० रुपयांची नोट दिली तर आपला मेंदू चटकन उरलेल्या रकमेचं गणित करू शकतो. पण सतत ऑनलाइन पेमेन्ट केल्याने मेंदूला काही आकडेमोड करायची गरजच उरत नाही. इंटरनेटवर होणाऱ्या माहितीच्या भडिमारातून एखाद्या घटनेमागचा कार्यकारणभाव न ओळखता येणं आणि मग जे समोर आले ते सत्य मानले जाऊ शकते. तसेच, एआय आणि स्मार्ट टूल्सच्या अतिवापराने स्वत: विचार करण्याची, तर्क लावण्याची संधी कमी होते आहे.
दृश्य- अवकाशीय बुद्धिमत्ता (Spatial/ Visual Intelligence) म्हणजे आकार, रंग, नकाशे, प्रतिमा आणि जागा यांचं आकलन करणे. एखादी वस्तू किंवा व्यक्ती आपल्यासमोर नसते किंवा एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडत नसते, तरीही त्याविषयी ऐकून, वाचून त्याचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं ते यामुळेच. आपल्या लहानपणी जेव्हा आपण गोष्ट ‘ऐकायचो’ तेव्हा त्यातली पात्रे, घटना आपल्या मनात उभ्या राहायच्या. गोष्ट एकच, पण प्रत्येकाचा राजकुमार वेगळा, प्रत्येकाचा राक्षस वेगळा. आज गोष्टींचे अॅनिमेशन व्हिडीओ पाहिले जातात. त्यामुळे स्वत:चं कल्पनारंजन कमी होतं. एखाद्या सनसेट पॉइंटला सूर्यास्त किंवा एखाद्या कड्यावरून कोसळणारा धबधबा निवांतपणे बघताना, त्याचं चित्र जणू स्मृतीत कोरलं जातं. पण, हल्ली बऱ्याचदा दृश्य बघण्यापेक्षा त्याचे फोटो घेण्यातच जास्त रस असतो. त्यामुळे मोबाइलची स्टोरेज मेमरी वाढते, पण आपली फोटोग्राफिक मेमरी मात्र कमी होते.
नृत्य, खेळ किंवा मार्शल आर्ट्समध्ये स्वत:च्या हालचालींवर उत्तम नियंत्रण असो किंवा शिल्पकला, शस्त्रक्रिया यांसाठी हात आणि बोटांच्या सूक्ष्म हालचालींचे कौशल्य असो… शारीरिक-गतिक बुद्धिमत्ता ( Bodily/ Kinesthetic Intelligence) गरजेची ठरते. यासोबतच स्नायूंची ताकद, लवचीकता, संतुलन हे शारीरिक पैलू महत्त्वाचे ठरतात. अनेक फिटनेस अॅप्स योगा, सायकलिंग आणि इतर शारीरिक व्यायामात मार्गदर्शन व प्रेरणा देऊ शकतात, पण दुसरीकडे तासन् तास मोबाइल बघण्याचे व्यसन, व्हिडीओ गेम्समध्ये गुंतून राहणे किंवा सतत बसून स्क्रीनसमोर वेळ घालवणे यामुळे हालचाली कमी होतात, निष्क्रियता वाढते. याचा स्नायूंची क्षमता, शरीराची लवचीकता यावर परिणाम होऊ शकतो. मुलांचे हात कातरकाम, बोटांचे रंगीत ठसे, मातीकाम याऐवजी जेव्हा मोबाइलच्या स्क्रीनवर गुंतून राहतात, तेव्हा याचा परिणाम सूक्ष्मकारक कौशल्यांचा (फाइन मोटर स्किल्स) विकसनावर होऊ शकतो.
इतरांशी संवाद साधणं, त्यांच्या भावना समजून घेणं, सहकार्य, टीमवर्क आणि नाती टिकवणं या सगळ्यांत आंतरव्यक्तिक बुद्धिमत्तेचा (इंटरपर्सनल इंटेलिजन्स) मोठा वाटा असतो. डिजिटल युगात व्हॉट्सअॅप, झूमसारख्या प्लॅटफॉर्म्समुळे संवाद साधणं खूप सोपं झालं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राममुळे जगभरातले मित्र, सहकारी एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत, पण त्याच वेळी सतत स्क्रीनवरच्या संवादामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी कमी होत आहेत. समोरासमोर बोलताना होणारा आवाजातील चढउतार, हावभाव, नजरभेट अशा नात्याला बळकटी देणाऱ्या गोष्टी डिजिटल संवादात काहीशा हरवतात.
आंतरव्यक्तिक बुद्धिमत्ता जशी जगाशी जोडायला मदत करते, तशी व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता (इंट्रा पर्सनल इंटेलिजन्स) स्वत:ला स्वत:शी जोडण्यासाठी महत्त्वाची ठरते. स्वत:च्या मनात डोकावणं, संवाद साधणं आणि यातून आपल्या भावना, उणिवा आणि क्षमता ओळखणं… यातून खरी आत्मजाणीव मिळते. आज विविध मेडिटेशन अॅप्स, जर्नलिंग अॅप्स, सेल्फ-हेल्प कंटेंट आणि पॉडकास्ट्समुळे आत्मपरीक्षणासाठी नवी साधनं उपलब्ध झाली आहेत. पण खऱ्या अर्थाने स्वत:च्या आत डोकवायचं असेल तर काहीही न करता शांत बसण्याची गरज असते. इथेच सतत हातात असणारा मोबाइल मोठा अडथळा ठरतो. त्यातही सोशल मीडियावर इतरांच्या लाइक्स आणि कमेंट्सच्या आधारावर स्वत:चं मोजमाप केलं जातं. अनेकदा बाहेरच्या जगाला खूश करण्याच्या धावपळीत स्वत:शी खरी प्रामाणिकता हरवते आणि त्यामुळे खऱ्या आत्मपरीक्षणाला वेळच मिळत नाही.
निसर्गविषयक बुद्धिमत्ता (नॅचरिलिस्टिक इंटेलिजन्स) म्हणजे निसर्गाशी संबंधित गोष्टी समजून घेण्याची, त्यांचे निरीक्षण व वर्गीकरण करण्याची आपली क्षमता. विविध वृक्ष, वनस्पती, झाडांची पाने, पक्षी, त्यांचे आवाज प्राणी, दगड-मातीचे वेगवेगळे प्रकार अशी निसर्गातील विविध गोष्टींची ओळख पटवणे, त्यांचे निरीक्षण करणे आणि त्यांच्यातील साम्य वा फरक लक्षात घेणे ही या बुद्धिमत्तेची खासियत. प्रत्यक्ष निसर्गाचा अनुभव न घेता केवळ स्क्रीनवरचं जग बघितल्याने ही बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने विकसित होत नाही.
सूर, ताल, लय अशा संगीताच्या विविध पैलूंची उत्तम जाण ही सांगीतिक बुद्धिमत्तेची (म्युझिकल इंटेलिजन्स) देणगी आहे. गाणं म्हणणं, वाद्या वाजवणं किंवा अगदी फक्त संगीत ऐकून त्यातील बारीकसारीक बदल जाणणं यातून ही बुद्धिमत्ता प्रकट होते. आजच्या डिजिटल युगात Spotify, YouTube, Gaana सारख्या अॅप्समुळे संगीत ऐकणं अधिक सुलभ झालं आहे. पण स्पॉटिफायच्या वापरकर्त्यांवर झालेल्या एका सर्व्हेतून असं दिसून आलं की, अल्गोरिदमनी सुचवलेली गाणी सतत ऐकल्यामुळे लोक एकाच प्रकारच्या संगीतापुरते मर्यादित होतात. त्यांच्या संगीत ऐकण्यातील वैविध्य कमी होतं.
याशिवाय अस्तित्वनिष्ठ बुद्धिमत्ता (एक्झिस्टेन्शिअल इंटेलिजन्स) हा नववा आयामदेखील सुचवण्यात आला आहे. मी कोण? या प्रश्नाच्या आंतरिक शोधातून तत्त्वज्ञान आणि विश्वाचं रहस्य जाणून घेण्याच्या ऊर्मीतून विज्ञान विकसित झालं ते याच बुद्धिमत्तेच्या प्रभावातून. निरर्थक रील्स बघण्यात किंवा एआयचे ट्रेंडिंग इमेजिस बनवण्यात डोकं गुंतून पडलं तर या बुद्धिमत्तेचा विकास तिथेच खुंटू शकतो.
अर्थात, या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत होत आहेत असं नाही, पण डिजिटल माध्यमांचा बुद्धिमत्तेवर होणारा परिणाम हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. मोबाइल, इंटरनेट, एआय, सोशल मीडियाचा योग्य तेवढाच आणि योग्य ठिकाणी वापर करणं हा यावरचा सोपा उपाय ठरतो. असं म्हणतात की उत्क्रांतीच्या प्रवासात माणसाने शेपटीचा वापर कमी केला आणि हळूहळू ती नाहीशी झाली. तसंच, डिजिटल क्रांतीमुळे आपल्या बुद्धीच्या वेगवेगळ्या आयामांचं अस्तित्वच कमी होऊ नये, याची काळजी आपणच घेतली पाहिजे.
नवरात्रीच्या प्रार्थनेत ‘‘या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता…’’ असं म्हणत बुद्धी, मेधा, स्मृती, चेतना या सर्व रूपांनी सर्वांमध्ये असलेल्या वैश्विक शक्तीला नमन करतो. हीच प्रार्थना खरी होण्यासाठी, आपल्या बुद्धीचे सर्व पैलू जपणं, त्यांचा समतोल वाढवणं आणि डिजिटल साधनांचा विचारपूर्वक वापर करणं ही शहाणीव गरजेची ठरते.
viva@expressindia.com