वेदवती चिपळूणकर, गायत्री हसबनीस viva@expressindia.com
‘मेंटल हेल्थ’ अर्थात मानसिक स्वास्थ्य हा विषय इतक्या काळात कधी चर्चिला गेला नसेल इतका गेल्या दीड वर्षांत प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी ऐकू आलाय. स्वत:च्याच घरात लॉकडाउन होण्यापासून ते नोकरी जाण्यापर्यंत आणि आवडत्या सेलेब्रिटींना करोना होण्यापासून ते जवळची माणसं गमावण्यापर्यंत अनेक अनुभवांनी अनेकांचं मानसिक संतुलन बिघडवलं. जगभरात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली आहे आणि आपापल्या पद्धतीने त्या तणावावर मात करण्याचा प्रयत्न करतो आहे. काहीजण त्या प्रयत्नांत सफल होतायेत तर काहीजण तणावाला जिंकू देतायेत. नुकत्याच समोर आलेल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने मानसिक स्वास्थ्य, ताणतणाव, मानसशास्त्र या सगळ्या विषयांच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. मात्र एक गोष्ट सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे, डिप्रेशनसारख्या विषयात तज्ज्ञ व्यक्तींचीच मदत घेणे गरजेचे आहे. मन मोकळे करण्यासाठी अनेक व्यक्ती आजूबाजूला असल्या तरीही ज्यावेळी त्या मानसिक तणावाचा परिणाम रोजच्या जगण्यावर व्हायला लागतो त्यावेळी शास्त्रशुद्ध मानसोपचार हा एकच पर्याय असतो.
विद्यार्थ्यांच्या मनावर असलेला तणाव हा कोणत्याही एका क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. स्पर्धा परीक्षा, त्याची अनिश्चितता, त्यासाठी खर्च करावी लागणारी आयुष्याची वर्ष सगळ्यांनाच परवडतात असे नाही. मात्र शेकडय़ांमध्ये असलेल्या जागांसाठी जेव्हा लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देतात तेव्हा आपल्या यशाची साधारण संभाव्यता अथवा प्रोबॅबिलिटी काय आहे त्याचे गणित प्रत्येकाने करायला हवं. स्पर्धा परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी प्लॅन बी किंवा बॅकअप प्लॅनबद्दल खूप कळकळीने बोलतात. आपल्याला आपल्या हुशारीची, मेहनतीची, तयारीची कितीही खात्री असली आणि कितीही आत्मविश्वास असला तरीही सगळ्या बाजू लक्षात घेऊन करिअरच्या इतर मार्गांचा विचार आणि तयारी करून ठेवणे हेच प्रॅक्टिकली शहाणपणाचे आहे. जी गोष्ट स्पर्धा परीक्षांची तीच कथा प्रवेश परीक्षांची. अगदी अकरावी, मेडिकल, इंजिनियरिंगपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्याच प्रवेश परीक्षा या काळात रखडलेल्या आहेत. अशावेळी वाट बघून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांंपैकी अनेकजण सांगतात की त्यांना अनिश्चित काळासाठी वाट बघणे या गोष्टीचा प्रचंड स्ट्रेस येतो, मात्र त्यातल्या काहींनी स्किल्स डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे कोर्सेस करणं, हॉबीजना वेळ देणे अशा गोष्टींनी आपला स्ट्रेस घालवला आहे. ही परिस्थिती अख्ख्या बॅचवरच आली आहे, जे व्हायचे आहे ते सगळ्यांचे सारखे होणार आहे आणि त्यामुळे आपण स्ट्रेस घ्यायची काही गरजच नाही असा काहींचा दृष्टिकोन कदाचित सर्वांनाच दिलासादायी वाटेल. ज्यांची डिग्री झाली आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश अडकले आहेत अशांची मात्र थोडी बिकट परिस्थिती आहे. नुसत्या डिग्रीला फारशी व्हॅल्यू नाही आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला अॅडमिशन इतक्यात मिळणार नाही. काहीशी अशीच गत सी. ए. सारख्या प्रोफेशनल कोर्सेसच्या परीक्षांचीही झाली आहे. या सगळ्याचा गोषवारा इतकाच की कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच ताणतणाव आणि मानसिक अस्वास्थ्याला सामोरे जावे लागतेय. मात्र प्रत्येकाने त्यातून सकारात्मक मार्ग निवडणे गरजेचे आहे.
सध्या विद्यार्थ्यांची मानसिक कोंडी कुठल्या कुठल्या कारणांवरून होते आहे आणि या परिस्थितीत त्यांनी नेमके काय के ले पाहिजे याविषयी ठाण्याच्या मानसतज्ज्ञ कवितागौरी जोशी सविस्तरपणे समजावून सांगतात. ‘सध्या आपल्यातला विद्यार्थीवर्ग वेगवेगळ्या कारणास्तव अडकल्यासारखा झालेला आहे. मित्रांसोबत ‘खऱ्या’ वर्गात मजामस्ती नाही, एकत्र अभ्यास नाही, धावपळ नाही, वर्गात किंवा कोचिंग क्लासमध्ये मित्राने / मैत्रिणीने खांद्यावर टाकलेल्या हाताचे, पाठीवरच्या थापांचे, मिठय़ांचे स्पर्श नाहीत. शाळा – कॉलेजच्या किंवा अगदी कोचिंग क्लासच्याही, परिसरात वावरताना आपल्या नकळत आपलं संपूर्ण शरीर वापरले जायचे आणि सगळी ज्ञानेंद्रिये वापरात यायची. तो अनुभव सर्वांगीण असल्याकारणाने ‘संपूर्ण’ असायचा. आता जवळजवळ सगळेच विद्यार्थी बराच काळ त्या सर्वांगीण समृद्धीपासून दुरावले आहेत. सगळी ‘प्रगती’ समोरच्या स्क्रीनच्या आयतातून साधून घ्यावी अशी अपेक्षा. आणि इतके च नाही, तर ती साधण्यात तितकाच रस वाटला पाहिजे हीही अपेक्षा. आपल्या शिक्षणव्यवस्थेत दहावी-बारावी सारखी मोक्याची वळणे, नोकरी-व्यवसायासाठीच्या प्रवेशपरीक्षा किंवा यूपीएससी- एमपीएससी आणि तत्सम स्पर्धा परीक्षा यांच्यावर भविष्याचा बराच मोठा भाग अवलंबून ठेवला जात असतो. साहजिकच या मैलाच्या दगडांसाठी थांबलेल्या विद्यार्थ्यांंना हतबलता जाणवत असणार! या सगळ्या अनिश्चिततेला तोंड देणे तर भाग आहे, कारण त्याव्यतिरिक्त बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नाही’, असे त्या सांगतात. मात्र हे ‘तोंड देणे’ त्यातल्या त्यात सहन करण्याजोगे होईल असे आपण नक्कीच बघू शकतो. त्यासाठी आपल्याला दोन हातोटय़ा किंवा कौशल्य विकसित करावी लागतील. एक म्हणजे आपल्या हातात काय आहे आणि काय नाहीये, हे डोळसपणे समजून घेण्याचे कौशल्य. जसे परीक्षेची तारीख ठरणे, मूल्यांकनाबाबतीत निर्णय घेतला जाणे, त्या बाबतीत शासनाने आपल्याला पूरक निर्णय घेणे, या गोष्टी आपल्या हातात नाहीयेत, कारण आपण त्यांच्यावर थेट कृती करूच शकत नाही. पण त्या बाबतीतल्या आपल्या त्राग्यावर आपण थेट कृती करू शकतो का? तर हो, कारण ती आपल्या मनातली घडामोड आहे आणि म्हणून आपल्या हातात आहे. मिळालेल्या वेळेचा वापर करून तब्येत सुधारण्यावर भर देणे; परीक्षेची तारीख कळेपर्यंत दिवसातला ठरावीक (आणि फक्त तेवढाच) वेळ अभ्यासाला देऊन बाकी वेळ हव्या त्या कामांसाठी वापरणे; आधी वेळ देता आला नाहीये अशा एखाद्या छंदाला वेळ देणे; या गोष्टी आपल्या हातात असू शकतात, कारण आपण त्यांच्यावर थेट कृती करू शकतो. आपल्या विश्वासातल्या व्यक्तीच्या मदतीने जर हातात असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी समजून घेता आल्या, तर अनिश्चिततेचा काळ नक्कीच सहन होण्याजोगा करता येईल, अशी खात्री त्या देतात.
आपण विकसित करायला हवे असे दुसरे कौशल्य म्हणजे या काळातील आपण काय शोधायचे, याची स्पष्टता मिळवली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण आनंद, समाधान, मनाजोगती प्रगती या गोष्टी आपण नको शोधूयात. कारण परिस्थिती संपूर्ण पूरक नसताना या गोष्टी मृगजळच ठरतील. हे म्हणजे ‘वातावरण कोरडे राहायला हवे’ असा हट्ट ऐन पावसाळ्यात धरणे. अतार्किक अपेक्षा आपल्याला निराश करतात. त्या ऐवजी सध्या आपण ‘तग धरून उभे राहण्याचे’ ध्येय फक्त डोळ्यांसमोर ठेवू. तसे उभे राहता आले, तरच परिस्थिती निवळल्यावर मोठय़ा ध्येयांवर काम करायला आपण शिल्लक उरणार आहोत, असेही त्यानी सांगितले.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वाणी कुल्हळी सांगतात, ‘या काळात तणावाला सामोरे जाण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित आहार, आराम, व्यायाम आणि विरंगुळा महत्त्वाचा आहे. परीक्षा आणि अभ्यास या दोघांचा जर विचार केला तर दोन भाग महत्त्वाचे असतात ते म्हणजे तयारी आणि स्पर्धा. अशा काळात तुमच्या परीक्षा रद्द होण्याच्या मार्गावर असतील तर परीक्षा रद्द होईपर्यंत तुमची अभ्यासाची पूर्ण तयारी करून ठेवावी. जोपर्यंत परीक्षा रद्द होत नाही तोपर्यंत तयारी नियमितपणे अपटूडेट ठेवा. स्पर्धेचा फार विचार करू नका. तुम्ही कुठेही असाल तरी करोना होणार नाही याची तत्परतेने काळजी घ्या’. करोना काळात मुले खबरदारी घेत नसल्यानेही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्या सांगतात. ‘आम्ही बघतो की मुले मास्क घालत नाहीत मग करोना होतो आणि तो झाला की थकवा तर येतोच, पण अभ्यासाचा वेळही वाया जातो कारण त्यामुळे शारिरीक ताकद कमी होते आणि खासकरून पालकांनी ही काळजी घेतली पाहिजे. मुलांची दिनचर्या सांभाळली पाहिजे. त्यांना कुठलीही माहिती हवी असेल तर दिली पाहिजे. त्यांच्यापासून काही लपवून ठेऊ नये’, अशा सूचना त्या देतात. मुलांकडून कुठल्याही परिस्थितीत काही अपेक्षित असल्यास त्यांना नीट समजावून सांगणे गरजेचे आहे. जर तुमचा पाल्य घरात आक्रमक झाला असेल किंवा सतत दु:खी होत असेल किंवा रडत असेल, त्याला काळजी वाटत असेल, झोप येत नसेल, जेवण जात नसेल तर त्याचा मानसिक तोल गेला आहे याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांकडे लक्ष ठेवा. पालकांच्या मानसिक स्वास्थ्यावरही मुलांचे स्वास्थ्य अवलंबून असते त्यामुळे अशी काही लक्षणं दिसली तर जरूर चांगल्या समुपदेशकाची मदत घ्या. हे केल्यास आपण सगळेच नक्की या कठीण काळातून बाहेर येऊ, असे त्या विश्वासाने सांगतात.