|| निलेश अडसूळ
एरव्ही परीक्षेच्या भीतीने पोटात येणारा गोळा आता विद्यार्थ्यांच्या आसपासही फिरकत नाही. किंबहुना, परीक्षेबाबत होणारे निर्णय हा पोरांच्या चर्चेचा आणि थट्टेचा विषय झाला आहे. उद्या परीक्षा होईल असे वाटत असतानाच नवीन निर्णय जाहीर होतो. त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे वाटत असतानाच परीक्षा रद्द होते. त्याचा आनंदोत्सव साजरा करत असतानाच दिल्लीहून परीक्षा सक्तीचा फतवा निघतो. त्यातून सावरतानाच कळते, परीक्षा पुढे गेल्या. अर्थात, करोनामुळे होणारे हे बदल कुणाच्याही हातात नाही. आरोग्य महत्त्वाचे असल्याने शासनाचीही द्विधा मनस्थिती होते आहे, पण यात विद्यार्थ्यांची स्थिती मात्र ‘राम भरोसे’ झाली आहे. नेमके काय करायचे हे अखेरचे ठरले की मगच तयारीला लागू, अशा भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत. काहींनी तर परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी देवही पाण्यात ठेवल्याचे समजते. ‘करोना’ परीक्षेवर कुठल्या जन्माचे वैर काढतो आहे माहिती नाही, पण त्याचा जुलूम विद्यार्थीवर्गावर होत आहे हे मात्र नक्की…
गेली अनेक वर्षे विद्यार्थीवर्गाची परीक्षा पाहणारी ‘परीक्षा’ करोनामुळे स्वत:च परीक्षेला सामोरी जाते आहे. एखाद्या बॅटने चेंडू हजारदा भिरकावावा किंवा या पायातून त्या पायात फुटबॉलने घरंगळत जावं तसे या परीक्षेचे हाल हाल झाले आहे. तिला जर बोलता येत असते तर किमान तिला नेमके कोणत्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या वाट्याला यायचे आहे ते तरी ठरवता आले असते. पण सद्यस्थितीत ती बिचारी बापुडी जे होईल ते सहन करते आहे. कदाचित अनेक परीक्षा नापास झालेल्या, नापास झाल्याने घरात चोप मिळालेल्या, नोकऱ्या हुकलेल्या अनंत जीवांचा शाप किंवा तळतळाट तिला लागला असावा. हा गमतीचा भाग झाला तरी, परीक्षांचे बदलणारे निर्णय ऐकून सुरुवातीला आनंद, मग कंटाळा, मग राग आणि आता तर हसू झाले आहे. त्यामुळे परीक्षा ही काहीतरी गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे याचाच विसर विद्यार्थ्यांना पडला आहे.
‘आज होणार परीक्षांबाबत निर्णय’ अशी बातमी झळकली की हातातले काम बाजूला सारून पालक आणि विद्यार्थी टीव्हीपुढे येऊन बसतात. काही विद्यार्थी तर आंघोळ अर्धवट सोडून निर्णय ऐकायला आले होते. निर्णय ऐकल्यानंतर ते जे आंघोळीसाठी गेले, ते आता परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच बाहेर येऊ, असा पण करून बसलेत. निर्णय ऐकताना एक आई नारळ खवत बसली होती, परीक्षा पुढे गेल्याच्या आनंदात तिने चार नारळ अधिकचे खवले. मुलाने विचारले, परीक्षा माझी पुढे गेलीय? तुला का इतका आनंद … त्यावर आई म्हणाली… तुझ्या परीक्षेमुळे पापडाचा बेत रद्द केला होता. आता तू घरी आहेस म्हटल्यावर पापड, कुरडया, सांडगे सगळंच करेन म्हणतेय. हे ऐकून मुलाने जे पुस्तकात डोके घातले ते काही अद्याप वर निघाले नाही.
एखादा सिनेमा किंवा हल्लीची वेबसिरीज जितकी उत्कंठावर्धक होणार नाही, तितका परीक्षांबाबत घडतो आहे. गेल्यावर्षी मार्चअखेर करोनाशेठ आपल्याकडे आले होते. तेव्हा किमान अभ्यासक्रम शिकवून झाला असल्याने केवळ वार्षिक परीक्षांचीच भ्रांत होती, यावर्षी तर सगळेच आलबेल आहे. वर्षभरात शाळा, महाविद्यालयाची पायरीही न चढलेले विद्यार्थी परीक्षेत जाऊन काय लिहिणार हे कुतूहलाचेच आहे. कारण ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवताना नेमके डोक्यात किती शिरले हा मुद्दा आहेच. कारण एकीकडे लेक्चर आणि दुसरीकडे तिच्या किंवा त्याच्या प्रेमाचे फुलणारे गुलाब या दोन्ही गोष्टी ‘मॅनेज’ करण्याएवढे आमचे विद्यार्थी नक्कीच तल्लख आहेत. त्यामुळे आता परीक्षा ऑनलाइन झाल्या तर बऱ्या, नाहीतर लेखी परीक्षेत लिखाणाची सवय मोडल्याने मुलांचे हात वळतील का इथून सुरुवात आहे.
‘काय बाई ग्रहणच लागलंय परीक्षेला…’ असा अंदाज महिलावर्गाकडून नोंदवला गेला आहे. ते ग्रहण कोणते यावर मात्र अद्याप संशोधन सुरू आहे. पोरांपेक्षा आईवर्गालाच परीक्षेची काळजी अधिक असल्याने ‘अरे दिवसरात्र लेक्चरच असतात का रे तुमचे, सारखं मोबाइलमध्ये डोकं, ही घे पुस्तकं यातलं काहीतरी वाच. कधी मेली ती परीक्षा होतेय देव जाणे’ असे मंत्रोच्चार घराघरांत सुरू आहेत. येत्या काळात आयाच परीक्षेला बसल्या तरी नवल वाटायला नको. हे होणे स्वाभाविकच आहे, कारण ऑनलाइन शिक्षणामुळे वह्या, पुस्तके, वर्ग, फळा, अभ्यास, शिक्षकांचा धाक ही महत्वाची फळीच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून निसटली आहे. त्यामुळे वर्षाखेरीस नैसर्गिकरीत्या येणारा परीक्षेचा ताण आता उरलेला नाही. किंबहुना, त्या होऊच नयेत असा सूर विद्यार्थी वर्गातून उमटतो आहे.
करोनामुळे हा बदल झालाय खरा. पण त्यांना आताच्या गदारोळात परीक्षा नकोशा झाल्या आहेत. अन्यथा ‘त्या’ परीक्षेच्या आठवणीत ते आजही तितकेच रमतात. परीक्षा म्हणजे… पोटात गोळा, देवाचा धावा, आईच्या पायावर डोके, कपाळाला अंगारा, शाळेबाहेरच्या किंवा आतल्या एखाद्या देवाला नमस्कार, अभ्यास नसेल झाला तर साकडे, एखादे कॉपीचे चिटोरे सोबत घेण्याचा प्रयत्न, या गोष्टी आता पुसट झाल्या आहेत. आदल्या दिवशी तयारीला लागायचे, याला त्याला फोन फिरवायचे, याचा अभ्यास किती, तिचा किती झाला हे विचारायचे. आपला अभ्यास झाला असला तरी ‘काहीच झाला नाही’ असे साभिनय पटवून सांगणे, हे सगळे उद्योग विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटतायेत. पेपर संपायला शेवटची दहा मिनिटे उरलेली असताना राहिलेले उत्तर ज्या वेगात विद्यार्थी लिहितात तो वेग आता हरवलाय हे नक्की…
काहीही झाले तरी मिम्स आणि व्हिडीओ बनवलेच पाहिजे असा ट्रेंडच आहे. त्यात ‘परीक्षा’ हा विषयदेखील मागे नाही. प्रहसन आणि विडंबन करण्यात आपला मराठी मेंदू जरा जास्तच विकसित असल्याने परीक्षेबाबत नाना विनोदी मिम्स सध्या समाजमाध्यमांवर झळकत आहेत. ‘नवस केला तरी तो फेडावा लागतो, नाहीतर हे असं होतं’, ‘आमच्या परीक्षेचा ताण आमच्यापेक्षा करोनालाच जास्त आहे, म्हणून एकदम योग्य वेळी त्याने पुन्हा प्रवेश केला’, असे मिम्स दिसतात. तर एक म्हणतो,
‘वाटलं नव्हतं शाळेतील लहानपणीचे निबंध खरे होतील..
परीक्षा नसत्या तर…
शाळा बंद झाल्या तर…
शिक्षणव्यवस्थेची दूरदृष्टी…
अजून काय…’
यात चित्रफितींचीही कमी नाही, अगदी शिक्षण मंत्र्यांचे भाषण, फोटो याचा वापर करून मुलांनी गाणे तयार केले आहे. जितके विनोदी तितकेच गंभीर विचारही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहेत. ‘शिक्षण ऑनलाइन केले तर परीक्षा लेखी पद्धतीने कशाला?,’ असा प्रश्न विद्यार्थ्यांनी प्रशासनाला विचारला आहे. आम्हालाही पास करून पुढे ढकला एवढीच स्पष्टोक्ती दहावी – बारावीचे विद्यार्थी करतात. ‘परीक्षा रद्द करा’ अशी मोहीमदेखील राबवण्यात येत आहे. ‘परीक्षा रद्द झाली तर आम्ही दिवाळी साजरी करू…’ असे म्हणणारेही विद्यार्थी आहेत.
करोनाने परीक्षांचेच नाही तर एकूणच शिक्षण क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अर्थात त्यावर फारसे कुठे बोलले गेले नसले तरी त्याचे गंभीर परिणाम पुढे दिसतीलच. कारण ऑनलाइन शिक्षण आपण स्वीकारले खरे, पण त्यात किती प्रामाणिकपणा आहे, हा ज्याचा त्याने जाणावा. म्हणजे लेक्चर सुरू असताना भजी, पापड, दाल्गोना कॉफीचे प्रयोग, कुकरमधले केक असे बरेच उद्योग झालेत. ज्या मुला- मुलींना चहाही करता येत नव्हता ते आज उत्तम ‘सुगरण’ झालेत. हे होणे गैर नाही, पण ते ज्या पद्धतीने झाले आहेत ते पाहता पेपरात नक्की काय लिहायचे हा संभ्रम विद्यार्थ्यांपुढे निर्माण होऊ शकतो. यात दोष कुणाचाही नाही. ही वेळच अशी आहे, ज्यामध्ये केवळ निरोगी आणि आनंदी राहणे हा एकमेव ध्यास प्रत्येकाच्या उरी असल्याने आधी आनंद आणि मग शिक्षण असेच हे वर्ष सरले. त्यामुळे ‘आरोग्य आणि शिक्षण’ याचा समतोल साधून परीक्षा घेणे हे शासनापुढे आव्हान आहे. हा, आता त्या निर्णयाने परीक्षेकडे किंवा परीक्षा रद्द होण्याकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मनासारखे होईलच असे नाही. फक्त त्या निर्णयाने विद्यार्थ्यांची ‘शैक्षणिक अवनती’ होता कामा नये एवढीच आशा. कारण ‘मनासारखे मिळण्यापेक्षा, योग्य ते मिळणे’ महत्त्वाचे…
viva@expressindia.com