अमृता अरुण

लॉकडाऊननंतर दोन वर्षांनी पुन्हा नव्या जोमात, नव्या जल्लोषात सणांचे स्वागत करायला सर्वच उत्सुक आहेत. भारतीय सण-उत्सव हे मुळात परंपरा आणि नाती जपण्याच्या उद्देशानेच साजरे केले जातात. त्यानिमित्ताने नातेवाईक, मित्रमैत्रिणी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने हे सण साजरे करतात. मग अशा वेळी प्रश्न पडतो ते आपल्या खास आप्तेष्टांच्या भेटीसाठी, सणावाराच्या दिवशी आपण चारचौघात उठून दिसण्यासाठी या वर्षी काय बरं परिधान करावं? यंदा तर करोनानंतर लोकांची लाइफस्टाइलदेखील बदलली आहे. पण त्याचबरोबर दोन वर्ष एकंदरीतच फॅशनेबल कपडे या विषयाला कपाटात आराम दिल्यानंतर आता मात्र खरेदीला अगदीच उधाण आलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

    श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच यंदा फेस्टिव्ह फीव्हर जाणवायला लागला. दहीहंडीची सुरुवात तर दणक्यात झालीच आणि मग तोच उत्साह गणेशोत्सवातही दिसून आला. गौरी- गणपतीचे पाच-सात दिवस पारंपरिक साडय़ा, लेहंगा चोली, कुर्ती प्लाझो आणि मेन्सवेअरसाठी कुत्र्यांपासून फॉर्मल शर्ट्सपर्यंत दरदिवशी नवं काही याप्रमाणे कपडेही परिधान करून झाले. अगदी घरातल्या प्रत्येकाने पारंपरिक कपडय़ांचा हट्ट धरला असला तरी गौराईला मात्र पेस्टल रंगातील इंग्लिश गाऊनने सजवण्याचा मोहही आवरता आला नाही. इतके या फेस्टिव्ह फीव्हरचे विविध रंग गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले आहेत. मात्र सण म्हणजे फक्त पारंपरिक कपडे किंवा पॅटर्नचा हट्ट हे समीकरण मागे पडत चाललं आहे हे जावणल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे एकाअर्थी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेला हा फेस्टिव्ह फीव्हर पार दिवाळीपर्यंत उत्तरोत्तर रंगत जाणार आहे यात शंका नाही. 

सध्या येणाऱ्या प्रत्येक सणाची आखणी लोक आधीच करत असल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे गणपतीला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देतानाच फॅशनप्रेमींच्या मनात नवरात्री आणि दिवाळीच्या कपडय़ांची तयारी सुरू झाली आहे. त्यात सध्या फ्लिपकार्ट, मिंत्रा, मीशो, शॉप्सी अशा जवळपास प्रत्येक छोटय़ा- मोठय़ा ई कॉमर्स साईट्सनी नवनवे कलेक्शन्स आणि मेगा सेल्स जाहीर केले असल्याने फेस्टिव्ह फॅशन खरेदीला रंग चढतो आहे. करोनामुळे एकंदरीतच प्रत्येकाच्या ड्रेसिंग सेन्सवर परिणाम झालेला दिसून येतो. पारंपरिक हवंच पण त्याला नव्याचाही साज हवा हा आग्रह हल्ली वाढत चालला आहे. त्यामुळे एकीकडे खणाच्या साडय़ांना मागणी वाढते असेल तर दुसरीकडे खणाच्या साडीचा वा अन्य सिल्क साडय़ांचे वनपीस अथवा कुर्ती- प्लाझो अशा नव्या रुपात ड्रेसेस परिधान करण्याकडे कल वाढतो आहे. कधी पारंपरिक फॅब्रिक आणि नवी डिझाइन्स, सिल्वेट्स हवे असतात, तर कधी अगदी पारंपरिक प्रकारातील साडय़ांना जास्त मागणी असते. नवे-जुने फॅब्रिक्स, डिझाइन्स आणि रंगसंगती हे सगळं मिसमॅच करत आपलं कलेक्शन निवडण्याचा प्रकार सध्या फेस्टिव्ह सीझनमध्ये अधिक जोर धरतो आहे. 

सुटसुटीत, पेस्टल शेडचे, वजनाने हलके कपडे घालण्याकडे लोकांचा अधिक कल दिसून येतोय, पण असं असलं तरी सर्वाहून निराळं काहीतरी हवं म्हणून डिझाईनर वेअर्सला जास्त डिमांड आहे. आपल्याकडचा ड्रेस वन अ‍ॅण्ड ओन्ली पीस असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि हल्ली असे सिंगल पीस सर्वसामान्यांच्या खिशाला परवडू शकतील अशा दरात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या फेस्टिव्ह सीझन्सना आपल्या आवडीचे, आपल्या कम्फर्ट झोनचे आणि सिंगल पीस असणारे कपडे ट्राय करायला काहीच हरकत नाही. कारण बेस्ट फेस्टिव्हल आऊटफिट तोच असतो जो तुम्हाला आतून खूश करतो. तुमची शरीररचना, तुमचा रंग कसाही असो जे कपडे घालून तुम्ही समाधानी आहात तो बेस्ट आऊटफिट ठरतो. आणि असे कपडे घातल्यावर आपल्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्सही आपसूकच वाढतो. त्यामुळे सणांचा आनंद घ्यायला किंवा आपल्या भाषेत सांगायचं तर चारचौघात मिरवायला आपण सज्ज होतो.

नाही म्हटलं तरी सणांसाठी अजूनही बहुतेक जण अगदी तरुणाईही ट्रॅडिशनल आऊटफिट घालणं जास्त पसंत करते. या ट्रॅडिशनल आऊटफिट्समध्येही आता बोहोमियन ड्रेसेस, स्ट्रेट पॅन्ट कुर्ती, प्लाझो, चिकनकारी, लखनवी किंवा हॅण्ड एम्ब्रॉयडरी असलेले कपडे बाजारात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ग्राहक त्याला जास्त पसंती दर्शवताना दिसतात.  याशिवाय साडी ही कधीही न संपणारी फॅशन जी सणावाराला सर्वात जास्त भाव खाऊन जाते. अशी साडीही आता क्रेप, सॅटीन, शिफॉन अशा विविध फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहे. पेशवाई, महाराणी, मस्तानी अशा विविध पॅटर्नमध्ये स्टीच केलेल्या साडय़ाही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने साडी नेसणं हा प्रकार जाऊन साडीही ड्रेससारखीच सहज परिधान करता येणार आहे. एरव्ही देवीचा उत्सव म्हटला की पारंपरिक सिल्क साडय़ांची मागणी जास्त वाढते. मात्र हल्ली सॅटीन फॅब्रिकच्या वा बॉलीवूड स्पेशल म्हणवल्या जाणाऱ्या चकचकीत साडय़ा आणि त्यावर वेगवेगळय़ा नेकलाइनचे, शिमिरग फॅब्रिकचे ब्लाऊज पेअर करत हलक्या पण आकर्षक असा साडय़ा नेसण्याचा प्रकार ट्रेण्डमध्ये आहे. मिंत्रा, न्यायका अशा विविध साइट्सवर या ट्रेण्डी साडय़ा उपलब्ध आहेत. बॉलीवूड अभिनेत्रींनीही या साडय़ांना प्राधान्य दिले असल्याने त्यांचा ट्रेण्ड वाढत चालला आहे. 

पारंपरिक साडय़ांवरचे प्रेम कमी होणारे नाही हे लक्षात घेत खास पारंपरिक फॅब्रिक आणि कलेक्शन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ‘जयपोर’ या ब्रॅण्डने अग्रीमा आणि राबीबा असे दोन नवे कलेक्शन्स बाजारात आणले आहेत. अग्रीमा कलेक्शनमध्ये विविध रंगाच्या तेलंगणा शहरात तयार झालेल्या नारायण पेठ साडय़ांचे कलेक्शन आहे. या साडय़ा चौकटीच्या प्रिंट असलेल्या, विणकाम केलेल्या वा जरीकाठाच्या अशा विविध प्रकारात उपलब्ध आहेत. तर सिल्कचे उभे धागे आणि सुतीचे आडवे धागे गुंफून विणण्यात आलेल्या महेश्वरी साडय़ांचे कलेक्शनही ‘जयपोर राबीबा’ नावाने उपलब्ध आहे. यात हिरा, रुईचे फुल, काजवा अशा विविध नक्षीकाम असलेल्या साडय़ा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पारंपरिक साडय़ांप्रमाणेच डब्ल्यू या ब्रॅण्डने वनपीस म्हणून परिधान करता येईल अशा इन्स्टा साडीचे कलेक्शन बाजारात आणले आहे. पारंपरिक साडय़ा ड्रेससारख्या स्टीच करून हा नवा सुटसुटीत साज त्यांना चढवण्यात आला आहे. बिबा, डब्ल्यू, ऑरेलिया, हाऊस ऑफ पतौडी या काही एथनिक वेअरसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रॅण्डसनीही पारंपरिक ड्रेस आणि फ्युजन स्टाईलमधील कलेक्शन बाजारात आणले आहेत. ‘डब्ल्यू’ने उपलब्ध केलेल्या ‘डय़ुओ ड्रेस’ प्रकारात ड्रेस त्यावर लेअर्ड जॅकेट किंवा टॉपला अटॅच्ड जॅकेट, किमोनो जम्पसूट असे फ्युजन ड्रेस आणले आहेत. फ्युजन प्रकारात प्रिंटेड लेहंगा आणि त्यावर शिमर ब्लाऊज वा ब्रालेट पद्धतीचे टॉप असलेले कलेक्शनही बाजारात उपलब्ध आहे. या दोन्हीला सिल्क वा अन्य फॅब्रिक दुपट्टयाची जोड देत हा एथनिक फ्युजन लूक पूर्ण करता येतो. लेहेंग्याला पर्याय म्हणून प्लाझो पॅन्ट्स वा स्कर्टचीही जोड दिली जाऊ शकते. एथनिक को ऑर्ड सेट्सही सध्या प्रचंड ट्रेण्डमध्ये आहेत. लांबलचक पिंट्रेड वा प्लेन श्रग्स, पायघोळ पॅन्ट्स, ब्रालेट किंवा क्रॉप टॉप्स असे तीन प्रकार एकत्र करून साधलेला हा लूक. यात विविध प्रिंट आणि फॅब्रिकचे कपडे पेअर करता येऊ शकतात. तरुणाईमध्ये हा प्रकार सध्या जास्त लोकप्रिय ठरतो आहे. एथनिक वा अशा फ्युजन ड्रेसेसवर ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी, झुमक्याचे विविध पॅटर्न असलेली, डायमंड-बीड्सची ज्वेलरी पेअर करता येते. पारंपरिक साडय़ांसाठी एक ना अनेक नथी, साज, ठुशी, बांगडय़ा इत्यादी दागदागिन्यांची रेलचेल सध्या बाजारात सुरू झाली आहे. याशिवाय, ऑक्सिडाईज्ड ज्वेलरीही परिधान करता येईल. मेन्सवेअरसाठी हाऊस ऑफ पतौडीसारख्या ब्रॅण्डसने एथनिक कुत्र्यांबरोबरच शर्ट्सही उपलब्ध करून दिले आहेत. तर मान्यवरसारख्या ब्रॅण्डसनेही काही एथनिक कलेक्शन आणण्याची तयारी सुरू केली आहे.

सध्या ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजार एथनिक, फ्युजन अशा फेस्टिव्ह कलेक्शन्सनी फुललेला आहे. ई-कॉमर्स आणि अ‍ॅपरल साइट्सनी तर मेगा- मेगा सेलच्या घोषणाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे या वर्षी जुनी सगळी मरगळ झटकून, करोना फीव्हरला लांब ठेऊयात आणि स्वत:ची काळजी घेत फेस्टिव्ह फीव्हरमध्ये दंग होऊ या!