सिद्धार्थ म्हात्रे
एके काळी भरगच्च फ्रेंडशिप बॅण्ड हातावर बांधलेले असले म्हणजे मैत्रीची श्रीमंती मानण्यात येई. अशा वेळी मित्रमैत्रिणींनी बांधलेल्या बॅण्ड्सनी काहींचे संपूर्ण हात भरत असत. मग टीशर्टवर मैत्री संदेश लिहिणं असाही ट्रेंड आला. बॅण्ड्स आणि रिंग अजूनही घातल्या जातात. आता मात्र समाजमाध्यमांवर मैत्र साजरं करणं ते एआयच्या मदतीने भले मोठे संदेश लिहिणं असेही ट्रेण्ड आहेत. साजरं करणं बदलत असलं तरीही ‘मैत्री’ या शब्दाची जादू आणि मैत्रीची ओढ मात्र कायम राहत असते. आजच्या तरुणाईचं प्रातिनिधिक मैत्रबिंब.
मैत्री साजरी करायला लावणारा मैत्री दिन! शुभेच्छा, बॅण्ड्स, भेटवस्तू, एकत्र भेटणं ते थेट ग्रुप कॉल, स्टोरी पोस्ट करणं तर कधी मनापासून एक भला मोठा संदेश लिहून कृतज्ञता व्यक्त करणं अशा कितीतरी प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. कारण मैत्र हे जिवाला आनंद देत असतं, जगण्याला बळ देत असतं. अशी सोबत या खास दिवशी अधोरेखित होते. अर्थात, याच दिवशी मैत्रीच्या भावना व्यक्त केल्या जातात असे नाही. मात्र, तरीही सध्याच्या धावपळीच्या जगात हे एक निमित्तही आपल्याला संवादासाठी पुरेसं असतं हे खरंच. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे ‘यस्य मित्रेण सम्भाषा, यस्य मित्रेण संस्थितिः। यस्य मित्रेण संलापस्ततो नास्तीह पुण्यवान् ॥’ अर्थात ज्याचं मित्राशी बोलणं आहे, सहवास आहे आणि खरंतर आत्मीय संवाद आहे त्याच्यासारखा दुसरा भाग्यवान कुणी नाही.

मैत्री या शब्दाची ओळख तशी बालपणीच होते. अर्थही माहिती नसलेल्या त्या वयात सहज कुणाशीही मैत्र जुळतं. म्हणूनच तर बालमित्र किंवा बालमैत्रीण या शब्दात आठवणी सहज डोकावतात. नंतर शाळा, महाविद्यालयात आपल्याला मैत्र लाभतं आणि त्या शब्दाच्या अनेक छटा उलगडायला लागतात. महाविद्यालयात गेलं तरीही शाळेतल्या त्या शिस्तीच्या दिवसात साजरे केलेले मैत्री दिन अनेकांना आठवतात. महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी म्हणजे मोबाइलमध्ये डोकं खुपसून असलेली पिढी…, असं जरी आपण त्यांचं वर्णन करत असलो तरीही कधी कधी ही कूल असणारी तरुणाई जरा विचारी होते. मग त्यांच्या भाषेत मैत्री दिनाबाबत बिनधास्त व्यक्त होते आणि या तरुणाईचं ‘मैत्रबिंब’ नकळत दिसू लागतं.

महाविद्यालयात शिकणाऱ्या इराने मजा म्हणून एका बुक क्लबमध्ये जायला सुरुवात केली. आणि बघता बघता तिला तिच्यासारखेच वाचणारे मित्रमैत्रिणी मिळाले. खरंतर, दर रविवारी घराजवळच्या बागेत किंवा वाचनालयात भेटून पुस्तकं वाचायची, त्यावर चर्चा करायची या उद्देशाने एका संस्थेने हा उपक्रम सुरू केला होता. आता या ग्रुपने मैत्री दिनाला दिवसभर भेटून पुस्तकांच्या मैत्रीसोबत आपलंही मैत्र साजरं करण्याचं ठरवलं आहे. मैत्री ही अशी सहज भावना आहे. आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आपल्याला कुठले दोस्त येऊन भेटतील हे सांगता येत नाही. इरासारखा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी आलेला असतो.

अगदी सहजतेजे झालेली ओळख किंवा मैत्री पुढे अगदी घट्ट होत जाते आणि एक हक्काचं मैत्र आपल्याला लाभतं. मग पुढे जरी वेळेअभावी किंवा इतर कारणाने मैत्रीत अंतर आलं तरी निदान मैत्री दिनाच्या निमित्ताने भेटणं होत असतं. महाविद्यालयात कला शाखेत शिकणाऱ्या जश्वीलाही अगदी असंच वाटतं. ती म्हणते, ‘मैत्री दिनामुळे खरंतर भरपूर गप्पा मारण्याचं आणि भेटण्याचं एक निमित्त मिळतं. शाळेत असताना आम्ही स्वतःहून तयार केलेलं शुभेच्छापत्र आणि फ्रेंडशिप बॅण्ड्स एकमेकांना द्यायचो. नंतर कॉलनीतल्या मित्र-मैत्रिणींसोबत दिवसभर खेळायचं आणि धमाल करायची हाच प्लॅन असायचा. पण आताही या दिवशी आम्ही जुने मित्र घराजवळच्या पार्कात एकत्र भेटतो आणि मनसोक्त गप्पा मारत दिवस आनंदात घालवतो’.

समाजमाध्यमांमुळे खरंतर संवाद साधणं फार सोप्पं झालं आहे. शुभेच्छा देणं किंवा अगदी मित्रमैत्रिणींपाशी व्यक्त होणं हे सहज जमण्यासारखं असतं असं अनेकांना वाटतं. मैत्री दिन म्हटला की समाजमाध्यमांवर व्यक्त होणं आलंच. स्टोरी, मेसेज, रील, पोस्ट आणखीही बरंच काही. हेही व्यक्त होण्याचं सुरेख माध्यमच! काहींना मात्र यासोबतच मैत्री दिनाला प्रत्यक्ष भेटणं किंवा अगदी मेसेज करण्यापेक्षा एक फोन करून शुभेच्छा देणं महत्त्वाचं वाटतं. इशिका म्हणते की मैत्री दिन खास असतो. आपण कसे घट्ट बंध निर्माण करत मैत्रीची नाती जपतो आहोत हे विसरता कामा नये. म्हणून या दिवशी स्टोरी वगैरे ठीक आहे, पण खरंतर आपण आवर्जून मित्र-मैत्रिणींना फोन करून शुभेच्छा द्यायला हव्यात. काव्याला तर असे भरमसाट मेसेज समाजमाध्यमांवर करणं म्हणजे जणू एक परफॉर्मन्स आहे असं वाटतं. ती म्हणते, मैत्री दिन म्हटला की बॅण्ड्स आणि रिंग वगैरे सगळं आठवतं. कॉलेजमध्ये हे सगळं थोडं बदलतं. कधी कधी फक्त ‘मैत्री दिनाच्या शुभेच्छा’ असा मेसेज येतो. मला स्टोरी पोस्ट करणं म्हणजे फ्रेंड-ऑर्मन्स म्हणजेच मैत्रीसाठी केला जाणारा एक परफॉर्मन्स आहे असंच वाटतं.

शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात येईपर्यंत बरेच बदल झालेले असतात. शिस्तीतून थोडी मोकळीक मिळते. शाळेत शिस्तीच्या वातावरणातही मॉनिटरची किंवा अगदी शिक्षकांची नजर चुकवून मैत्री दिन साजरे केले जातात. आपल्या प्रत्येकाच्याच शालेय जीवनातील अशा आठवणी असतातच. चिन्मयीने या वर्षीच्या मैत्री दिनाला दोस्तांसोबत निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत आखले आहेतच. पण तिला शाळेच्या दिवसातले मैत्री दिन खास वाटतात. ती म्हणते, ‘शाळेत मॉनिटरपासून लपूनछपून मित्रमैत्रिणींना बॅण्ड्स बांधायला मजा यायची. त्या बॅण्ड्समध्ये ही वैविध्य म्हणजे अगदी साधे बॅण्ड्स आणि खास दोस्तांसाठी मात्र ‘बेस्ट फ्रेंड’ लिहिलेली रिंग असायची. ते शिस्तीचे दिवस होते. आता हातात मोबाइल आहेत. सहज ब्रॉडकास्ट लिस्ट करून मेसेज पाठवता येतात, मात्र प्रत्यक्ष भेटण्यातच खरी धमाल येते.

आम्ही मित्रमैत्रिणी या वर्षीही भेटून धमाल करणार आहोत, भरपूर फोटो काढणार आहोत असं चिन्मयीने सांगितलं. मैत्री दिनाच्या निमित्ताने दोस्तांना आनंद देता येतो आणि त्यामुळे मैत्रीचं नातं अधिक घट्ट होतं. निक म्हणतो, ‘आपण ज्यांना खरंतर रोज भेटतो, मग ते कुणीही असो हा मैत्री दिन त्यांच्यासाठीही असतोच. मी अशा सर्वांना या दिवशी शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा तरी किती सहज देता येतात. एखादं हसू, हॅन्ड शेक किंवा एक मिठी कोणतीही कृती शुभेच्छा म्हणून पुरेशी असते. मी या दिवशी आवर्जून माझ्या ग्रुपला भेटतो. खाणं, नाचणं, गप्पा याने धमाल येते. यामुळे आपण दोस्तांना आनंद देत असतो’.

हल्ली एआयच्या किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अगदी भलीमोठी शुभेच्छापत्रं सहज लिहून मिळतात. मैत्री दिनालाही एआयचा ट्रेण्ड पाहायला मिळतो. कृत्रिम बुद्धिमत्तेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, असं असलं तरीही भावना व्यक्त करायला हे माध्यम मदत करतं असं अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या सोहमला वाटतं. तो मैत्री दिनाच्या शुभेच्छा लिहायला एआयची मदत घेतो. आपल्याला हवा असलेला प्रॉम्प्ट टाकला की एक छान शुभेच्छापत्र आपल्याला लिहून मिळतं, असं तो म्हणतो. तर नुर्वीला अगदी याउलट वाटतं. ती म्हणते, ‘एआयच्या शुभेच्छांपेक्षा स्वतःहून शुभेच्छापत्र तयार करण्यात मजा आहे, कारण त्या आपल्या भाषेत लिहिल्या जातात आणि नंतर केव्हातरी त्या पुन्हा वाचताना गंमत वाटते’.

समाजमाध्यमांवर बिनधास्त व्यक्त होणारी ही तरुणाई तिथल्या स्टोरीजना महत्त्व देतेच, पण भेटणं आणि त्यातही या दिवशी काहीतरी खास बेत करणं, आपल्या दोस्तांसोबत वेळ घालवणं हेही महत्त्वाचं मानते. मैत्रीचा मथितार्थ असा कितीतरी प्रकारे, कोणत्याही बंधनाविना फुलत राहतो आणि आपल्या सगळ्यांचच जगणं समृद्ध करत राहतो.