श्रावण महिना सणांची नांदी घेऊन येतो. परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक असणारे एकाहून एक सण या महिन्यात साजरे केले जातात आणि हळूहळू चाहूल लागते ती भाद्रपदात येणाऱ्या गणेशोत्सवाची. गणपती या देवतेला चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती मानले जाते. अशा या अधिपतीच्या उत्सव काळात विविध कलांचाही सोहळा साजरा केला जातो. मग अगदी गणपतीची आरास, रांगोळी, गणेशमूर्तींना आकर्षक साज चढविणे ते ढोल-ताशा पथके, गायन, नृत्य अशा कितीतरी कलांमधून हा उत्सव साजरा करताना मन ‘गणराज रंगी’ होऊन जातं. आजची तरुणाई आपल्या स्वप्नांच्या मागे किंवा नोकरीच्या व्यस्ततेत असली तरीही अशा दिवसात मात्र आपल्या दिनक्रमाचा समतोल साधत ‘गणरायाच्या सेवेसी’ रुजू होते. यात वेळेची तमा नाही की इतर प्लॅन्स मागे पडतात याची काळजी नाही. कलेच्या माध्यमातून गणरायासाठी कार्य करत असताना अशा वेळी असते ती ‘तल्लीनता’…ती गाताना असते, वस्त्रसेवा करताना असते, मिरवणुकीत ढोल वाजवताना असते किंवा अगदी घरातील परंपरेचा भाग म्हणून गणेशाची मूर्ती घडवतानाही असते.कधीतरी कलेचा वारसा घरातूनच लाभतो. हा वारसा अगदी सहज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो.

आधीच्या पिढीतील कलाकाराला नव्या पिढीकडे तो सुपूर्द करताना जसा आनंद होतो, तसाच आनंद अनेकदा नव्या पिढीला तो स्वीकारताना होत असतो. पुण्यात राहणाऱ्या प्रतीक वेदपाठक याच्या घरातच मूर्तिकलेची परंपरा चालत आली आहे. त्याचं कुटुंब गेली अनेक वर्षे पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन गणपतीचे रंगकाम करत आहेत. प्रतीकचे आजोबा म्हणजे आईचे वडील शंकरराव पालकर हे १९५२ सालापासून हे काम करत होते. त्यांच्यानंतर प्रतीकच्या आई संगीता वेदपाठक गणपतीचे रंगकाम करू लागल्या. सध्या प्रतीक आपल्या वडिलांच्या साथीने शारदा गजानन गणपतीचे रंगकाम दरवर्षी करत असून हा वारसा पुढे नेत आहे. प्रतीक म्हणतो, ‘हा वारसा पुढे नेताना आनंद होतो. त्यामुळे गणपतीच्या दिवसात मी खास माझ्या कामांमधून वेळ काढतो. ही बाप्पाची सेवा आहे अशीच माझी भावना आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा म्हणजेच सिद्धिविनायक आहे. श्री शारदा गजानन समक्ष बसले आहेत, इतके भाविकांना नैसर्गिक वाटावे असे रंगकाम व इतर सजावट करण्याचा माझा प्रयत्न असतो’. आणि ही बाप्पाची सेवा आहे, असंच तो मानतो.पुण्यातील गणेशोत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथली ढोल-ताशा पथकं. गणपती मंडळांच्या मिरवणुकांमध्ये मुख्य आकर्षण असतं ते पथकांचं होणारं शिस्तबद्ध आणि तालबद्ध वादन. त्यासाठी कितीतरी महिने आधी तालीम सुरू होते. पुण्यातील गौरव नऱ्हे गेल्या चौदा वर्षांपासून नू.म.वि.वाद्य पथकाच्या माध्यमातून वादन करतो आहे. या दिवसातील उत्साह हा वेगळाच असतो, असं त्याचं मत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात तो आणि पथकातील इतर सदस्य विशेष नियोजन करून आपली नोकरी सांभाळून वादनाची कला जपण्याचा प्रयत्न करत असतात. तो म्हणतो, ‘पथकाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्यही करत असतो. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना बाप्पाविषयीच्या श्रद्धेसोबत सामाजिक भानही असतं’. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात एक वेगळीच ऊर्जा असते असंही तो म्हणाला.वसईच्या जूचंद्र गावाला कलेचा मोठा वारसा लाभला आहे. इथे अनेक रांगोळी कलाकार, चित्रकार आणि मूर्तिकार आहेत. विविध महोत्सवांतून या गावातील कलाकार आपली कला सादर करत असतात. शिक्षिका असणारी इथली हिमांशी पाटील आपली नोकरी सांभाळून गणेशमूर्तींना साज चढविण्याचे काम करते. तिच्या वडिलांनी तिला मूर्तिकला शिकविली आहे. मूर्तींना साज चढविण्याचे काम ती अगदी शाळेत असल्यापासून करते आहे. अगदी जागरण झालं तरीही मूर्तींचे रंगकाम करताना, साज चढविताना एक वेगळाच आनंद मिळतो. याचसाठी ती वर्षभर गणेशोत्सवाची वाट पाहते, असं तिने सांगितले. हल्ली गणेशोत्सव काळात विविध मराठमोळ्या पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. घरगुती गणेशोत्सवाचं शतक महोत्सव असो किंवा मंडळांचे खास कार्यक्रम असो अशा पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम किंवा स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामुळे पारंपरिक नृत्यप्रकारांना प्रोत्साहन मिळतं, असं नृत्यदिग्दर्शिका ऐश्वर्या ठाकूर सांगते. ती नोकरी सांभाळून गणेशोत्सव काळात पारंपरिक नृत्यांचे दिग्दर्शन करते. ती म्हणते, ‘मुळात मला गणशोत्सव फार आवडतो. इतर वेळी नृत्यदिग्दर्शन तर मी करतेच, पण गणशोत्सवासाठी नृत्यदिग्दर्शन करणं मला खास वाटतं. यात सगळ्या वयोगटांतील महिलांना पारंपरिक नृत्य शिकवताना धमाल येते. गणशोत्सवासाठी त्यांचा असणारा उत्साह पाहून नोकरी सांभाळून आपण हे काम करतोय याचा आनंद वाटतो’.

गणेशोत्सव काळात विविध रंग आणि आकार यांनी सजलेली रांगोळीदेखील गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत असते. मुंबई, पुणे, कोल्हापूर यांसह अनेक मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांवरील भव्य आणि आकर्षक रांगोळ्या गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा अधिक रंगतदार करतात. पुण्यातील अभिनव कला भारतीकडून अनेक मंडळांसाठी अशा रांगोळ्या रेखाटल्या जातात. तसेच सामाजिक कार्यसाठीही पुढाकार घेतला जातो. यासाठी तरुण कलाकारांची एक मोठी टीमच काम करत असते. यातील अनेकजण शिक्षण आणि नोकरी सांभाळून गणेशोत्सवसाठी म्हणून हे काम करत असतात. अभिनव कला भारतीचा चेतन धरपाळे हा स्वतः गणेशोत्सव काळात नोकरी सांभाळून रांगोळी काढतो. ‘यामागे केवळ गणपतीसाठी असलेला सेवाभाव असतो, कारण संस्थेतील रांगोळी कलाकार कोणतेही मानधन घेत नाही. गणरायासाठी कलेच्या आणि संस्थेच्या माध्यमातून ही सेवा करता येते याचा आनंद अवर्णनीय आहे’, असंही त्याने सांगितलं. अशा वेळी गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचा आणि कलांचाही उत्सव आहे हे जाणवतं. कुठे श्रद्धेसोबत वारसा आहे तर कुठे सामाजिक भान तर कुठे निव्वळ सेवाभाव… प्रसन्नतेचं वरदान देणाऱ्या या कलांमधून ‘गणराज रंगी’ असाच नाचू देत हीच प्रार्थना!