हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

काही ब्रॅण्डस् म्हणजे कल्पना असतात. ते कल्पना विकतात. अमुक गोष्ट वापरल्याने तुम्ही निरोगी रहाल अशी कल्पना किंवा अमुक ब्रॅण्डमुळे तुम्ही ताकदवान व्हाल अशी कल्पना! अशा वर्गातला १४५ र्वष जुना ब्रॅण्ड म्हणजे हॉर्लिक्स. दुधात वापरण्याची सात्त्विक पावडर, टॅबलेट, बिस्कीट या रूपात हा ब्रॅण्ड उपलब्ध आहे. या आबालवृद्धप्रिय ब्रॅण्डची ही कहाणी!

इंग्लंडमधील ब्रिटिशबंधू विल्यम हॉर्लिक्स आणि जेम्स हॉर्लिक्स यांच्या कल्पनेतून या ब्रॅण्डचा जन्म झाला. जेम्स रसायनतज्ज्ञ होता. ड्राय बेबी फूड विकणाऱ्या एका कंपनीत तो काम करत असे. १८६९ मध्ये विल्यम अमेरिकेतील शिकागो येथे कामानिमित्त गेला. कालांतराने जेम्सचंही तिथं जाणं झालं. दोघांनी मिळून १८७३ मध्ये स्वत:ची जे अ‍ॅण्ड डब्ल्यू हॉर्लिक्स अशी कंपनी स्थापन केली. तिथे ते माल्टेड मिल्क िड्रक विकत. माल्टेड मिल्क म्हणजे सातू हे धान्य भिजवून वाळवून त्याचे केलेले सत्त्व. या पेयाची जाहिरात करताना त्यांनी म्हटलं होतं.. हॉर्लिक्स- नवजात बालक आणि आजारी मंडळींचा आहार. वास्तविक लहान बाळांच्या आहारात विविध धान्यांचं सत्त्व ही नवी गोष्ट नाही. पण रेडीमेडच्या येऊ घातलेल्या युगात हॉर्लिक्सचं स्वागत होणं स्वाभाविक होतं.

दोन्ही भावांनी १९०८ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंड येथे फॅक्टरी टाकण्याइतपत हॉर्लिक्सला मिळणारा प्रतिसाद वाढला होता. लहान बाळांचं अन्न ही ओळख विस्तारत वयस्कर आणि प्रवासी मंडळींसाठीही उपकारक खाद्य अशी नवी ओळख हॉर्लिक्सनं निर्माण केली. अतिशय उत्तम कॅलरीज, दीर्घकाळ टिकणारं आणि वजनाला हलकं हॉर्लिक्स उत्तर व दक्षिण ध्रुवावर जाणाऱ्या संशोधकांनी वापरल्याचं हॉर्लिक्सकर्त्यांनी आपल्या जाहिरातींमध्ये आनंदाने अधोरेखित केलं. पहिल्या महायुद्धाच्या काळात हॉर्लिक्सला अधिक प्रसिद्धी मिळाली, तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सनिकांना ऊर्जावर्धक म्हणून हॉर्लिक्स कॅण्डी देण्यात आल्या. महायुद्धकाळातील वायुदलाने तर हॉर्लिक्सच्या गोळ्यांना चक्क आपत्कालीन सुरक्षा पेटीमध्ये स्थान दिले. जे निश्चितच महत्त्वाचं होतं. लंडनमध्ये १९४८ साली झालेल्या ऑलिम्पिकमुळे तर हॉर्लिक्सला विशेष फायदा झाला. स्पर्धकांना ‘बेडटाइम िड्रक’ म्हणून हॉर्लिक्स दिलं जायचं.

साधारण १९८५-८६ दरम्यान लहान मुलांमध्ये हॉर्लिक्सची आवड वाढण्याचं कारण ठरला स्वादातील बदल. हॉर्लिक्सला चॉकलेट स्वादाची जोड मिळाली. गहू, सातूचं सत्त्व, दुधाचे घटक, साखर, व्हिटॅमिन, प्रोटीन या हॉर्लिक्सच्या मूळ घटकांत वेळोवेळी नव्या स्वादाची भर पडत गेली. त्यातसुद्धा देशांप्रमाणे त्यांनी स्वाद बदलते ठेवले.

भारतात ब्रिटिश आर्मीसोबत हॉर्लिक्स भारतात आलं. १९४०-५० पर्यंत ते संपूर्ण कुटुंबाचं पेय बनलं. उच्चवर्गीयांमध्ये हॉर्लिक्स पिणं हा प्रतिष्ठेचा भाग होता आणि त्यामुळे उच्चवर्गीयांचं अनुकरण करणाऱ्या मध्यमवर्गीय मंडळींनी हॉर्लिक्स आपलंसं केलं. भारतीयांसाठी हॉर्लिक्सने केलेला बदल म्हणजे गाईऐवजी म्हशीच्या दुधाचे घटक इथे वापरण्यात येतात. खास भारतीय आवडनिवड लक्षात घेऊन २००३ मध्ये हॉर्लिक्सने व्हॅनिला, टॉफी, मध, वेलची आणि केशर बदाम असे नवे स्वाद आणले.

भारतात बाटलीबंद पाण्याखालोखाल बंद स्वरूपात विकल्या जाणाऱ्या पदार्थात हॉर्लिक्सचं स्थान खूप वरचं आहे. शिवाय ‘आहार अभियान’ किंवा ‘हॉर्लिक्स विझ किडस्’ अशा उपक्रमातून विशेषकरून बच्चेकंपनीला हॉर्लिक्सनं आपलंसं केलं आहे. भारतात ‘ग्लॅक्सोस्मिथक्लाईन’कडून हॉर्लिक्सचं उत्पादन होतं. जगभरातील विविध देशांत हॉर्लिक्स पोहोचलं असलं तरी हॉर्लिक्सची सर्वात मोठी बाजारपेठ भारतच आहे.

काळानुसार त्यांच्या टॅगलाइन बदलत आलेल्या दिसतात. त्यातून कधी ‘टॉलर, स्ट्राँगर, शार्पर’ बनण्याची तर कधी ‘एव्हरी डे ग्रोथ एव्हरी डे हॉर्लिक्स’ अशी ग्वाही असते. ‘द ग्रेट फॅमिली नरिशर’ असं बिरुद हॉर्लिक्स मिरवतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या १४५ वष्रे जुन्या ब्रॅण्डला मिळालेलं यश निश्चितच दखल घेण्याजोगं आहे. एक-दोन चमच्यांच्या हॉर्लिक्सने खरंच ताकद वाढते का? आपण निरोगी होतो का? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. मग हॉर्लिक्सला मिळालेल्या यशाचं काय? त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रोज सकाळी दूध पिणं हा लहानांपासून मोठय़ांपर्यंत अनेकांसाठी कंटाळवाणा असणारा नित्यक्रम हॉर्लिक्सने सुसह्य़  केला. त्यातल्या स्वादामुळे दुधाचे पेले पटापट रिचवले गेले. शिवाय आपण आपल्या मुलाला काहीतरी सकस देत आहोत हा अनेक आयांना मिळणारा दिलासा ही हॉर्लिक्सची सदिच्छा कमाई. त्यामुळेच इतकी र्वष हॉर्लिक्स टिकून आहे. सोबतचे अनेक लोकप्रिय प्रतिस्पर्धी हॉर्लिक्सने मागे टाकले. त्यामुळे प्रत्यक्षात हॉर्लिक्समुळे ताकद वाढो न वाढो; हेल्थ िड्रक वर्गात इतर ब्रॅण्डस्च्या तुलनेत हॉर्लिक्स ब्रॅण्ड शक्तिमान ठरलेला दिसतो हे मात्र खरे.

viva@expressindia.com