विनय नारकर viva@expressindia.com
महाराष्ट्रातील वस्त्रासंबंधी संवेदना अभ्यासताना काळा आणि पोफळी रंगाबद्दल आपण सविस्तर जाणून घेतले. या रंगांशिवाय लाल किंवा तांबडा आणि हिरवा हेही रंग आपल्या वस्त्रांमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. लाल आणि हिरवा हे रंग त्यांच्या संकेतांमुळेही खूप महत्त्वाचे व तितकेच लोकप्रियही आहेत. हिरवा रंग हे सर्जनाचे व संपन्नतेचे प्रतीक मानले गेले आहे. गर्भार स्त्रीला ओटीभरणाच्या वेळी हिरवी साडी आणि हिरवी चोळी देण्याची प्रथा याचेच द्योतक आहे.
या प्रथेबद्दल एक सुंदर ओवी आहे,
हिरव्या चोळीवर।
राघू काढून पाहिला।
तोची दिवस राहिला॥
समस्त स्त्रीवर्गाची हिरव्या रंगाची हौस ही सार्वकालिक आहे. काही रंगांबाबत तात्कालिक लोकप्रयतेची लाट येते व जाते, पण हिरव्या रंगाचं महत्त्व आणि आवड हे कायमच अबाधित राहिले आहे.
हौस ग मला मोठी राघु रंगाच्या पैठणीची
ताईता माझा बंधू ग धुंडितो पेठ पैठणची
या ओवीमध्ये हिरव्या रंगाला ‘राघूरंग’ असं मोहक नाव आलं आहे. तशा हिरव्या रंगाच्या वस्त्रांबद्दलच्या अनेक ओव्या लिहिल्या गेल्या आहेत. हिरव्या रंगाचा साज करून लुभावणाऱ्या रूपसुंदरींची बरीच वर्णनं लावण्यांमध्येही पाहायला मिळतात.
पेंडे तन्मणि जिवलग गडणी
बुचडय़ामध्ये खोवुन मरवा
शालू नेसून आज हिरवा
ओटीभरणाच्या वेळी जसे हिरव्या रंगाचे महत्त्व आहे तशीच आणखी एक प्रथा आपल्या समाजात रूढ होती. मुलगी ऋतुमती झाली की तिला हिरवी साडी व हिरवा चुडा देण्याची रीत होती. ती सर्जनास समर्थ झाली आणि त्यामुळे सर्जनाचे प्रतीक असलेल्या हिरव्या रंगात तिला सजविले जाई. शाहीर परशरामाच्या एका साजऱ्या लावणीमधून हे व्यक्त झालं आहे,
वय नाही पण न्हाण आले तुज रंग गोरा भुरका।
अटकर बांधा लहान खुजी भुई वर शालूचा बुरखा॥
हिरवें पातळ भरजरी पदरिं जरि झोक।
तबकीं पानें गंगेरी विडय़ावर शोक॥
‘साज रंगेल करवा’ या लावणीमध्ये हिरव्या रंगाच्या साजाचे पूर्ण वर्णन आले आहे. त्याशिवाय संत एकनाथांच्या रंगांच्या गौळणीमध्येही हिरव्या रंगाचा साज ल्यालेली गवळण आहे. शाहीर होनाजी बाळा यांनी हिरव्या आणि लाल रंगांच्या साजाचं वर्णन करणाऱ्या विशेष लावण्या लिहिल्या आहेत. हिरव्या साज ल्यायलेल्या प्रेयसीचे उत्कट वर्णन त्यात केलं गेलं आहे.
हिरवी प्राणसख्ये बनलीस अरवा। खोउन वेणीमध्ये मरवा॥
हिरवा साज करूनिया प्रियकरणी। कटी नेसली पैठणी।
हिरवी तंग चोळी ल्यालीस गडणी। हिरवा दुपेटा वरूनी॥
हिरवा तीळ गालावर मृगनयनी। शोभतसे मैतरीणी।
हिरवा सरंजाम केला सर्वा।..
याशिवाय आणखी एका लावणीमध्ये होनाजी बाळा यांनी असाच हिरवा शृंगार वर्णिला आहे. या लावणीमध्ये वस्त्र, दागिने, बंगला, बिछायत, पडदे, पलंग, चांदवा, खिडक्यांच्या काचा, हौदातील रंग अशा साऱ्या गोष्टी हिरव्या रंगविल्या आहेत.
हिरवा शृंगार करून सर्वागे।
पाहून रूपाचा बहार जीव आमचा जाहला हिरवा गे।
हिरवा साज करून आली। हिरवा शालू जरी पदरी हिरवी कंचुकी ल्याली॥
तारुण्याचा बहर व्यक्त करण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर हा काव्यांमधून, विशेषत: लावण्यांमधून झाला आहे. समकालीन कवींमध्ये शांता शेळकेंनीही हिरव्या रंगाची लावणी लिहिली आहे.
हिरव्या रंगाचा छंद राया पुरवा
मला हिरव्या पालखीत मिरवा
हिरवी साडी हिरवी चोळी
हिरवे तीट कुंकवा खाली
शेल्या वरी हिरवा चौकडा
असा साज मजला करवा..
हिरवा साज देवतांनाही खूप प्रिय आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या देवींच्या शृंगारात हिरव्या रंगाच्या वस्त्रांचं महत्त्वाचं स्थान आहे. एका ओवीमध्ये म्हटलंय,
शेर सोनियाची अंबाबाईची कंबर
हिरव्या पैठणीची निरी पडली शंभर
तसेच एका गोंधळी गीतातही वर्णन येते,
तृतीयेचे दिवशी बाईने शृंगार मांडिला
हिरवे पातळ-चोळी गळां हार पुष्पमाळा
स्त्रियांच्या वस्त्रांमध्येच नाहीतर पुरुषांच्या वस्त्रांतही या हिरव्या व लाल रंगाची आवड दिसून येते. या ओवीत म्हटलं आहे की,
दुरूनी वळखीते साल्या मेव्हण्याची चाल
भाऊचा पटका लाल चुडय़ाची हिरवी शाल
तांबडा
सख्या हो घ्या रसरंग लालीचा।
लुटा लालीचा रंग वक्त आजी बहुत खुशालीचा॥
लाल तुम्ही श्रीमंत धनी माझे।
लाल अंगावर शाल लाल पोषाख तुम्हा साजे।
लाल आकृती प्राण माझा हास्यवदन गुणी लाल लाल मज लालडीचे राजे॥
होनाजी बाळा यांची ही लाल रंगात ओथंबलेली लावणी. महाराष्ट्रातील शाहिरांनी रंग संकेतांना समजून खऱ्या अर्थाने रंगोत्सव त्यांच्या रचनांमधून सादर केला. लाल रंग चैतन्याचा, उत्साहाचा आणि शृंगाराचा. या लाल रंगाच्या लावणीत पुरुषांच्या लाल वस्त्रांचं वर्णन आलं आहे. शाहिरांच्या काही परंपरा असायच्या. त्यांची ठरावीक निशाणे असायची. त्या त्या निशाणांचा ठरावीक रंग असायचा. ते रंग ठरण्यामागे निश्चित संकेतही असत. या रंगसंकेतांबद्दलचा एक गणही सापडतो,
गरराऽ शिरावर छत्र गणाच्या गरररा।
काळा, पिवळा, रंग पांढरा, आणि तांबडा, चमकतो हिरवा गरररा।
गररराऽ पांची तत्त्वाचे परमेश्वर।
कुठं झाला भगवा रंग, नका होऊं दंग, सभा परसंग, खररर।
म. वा. धोंड यांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की, काळा, पिवळा, पांढरा, तांबडा व हिरवा या रंगांच्याच लावण्या शाहिरांनी लिहिल्या आहेत, बाकीच्या रंगाच्या नाहीत. त्यामुळे या रंगांच्या लावण्यांचा शाहिरांच्या निशाणांच्या रंगाशी काही संबंध असावा. ‘साज रंगेल करवा’ या वीरक्षेत्री लावणीत लाल शृंगाराचे रसदार वर्णन आले आहे.
दुसरे दिवशी भडक शालू लाल
पैठणचा भर गोल
अंगावर गुलेनार घेइ शाल
लालि लाल माहाल
सुरतरंगात लाल रंग पहा बरवा
साज रंगेल करवा
लाल किंवा तांबडा रंगाने जे उत्सवी वातावरण तयार होते, तितके दुसऱ्या रंगाने होत नाही. महाराष्ट्रातील वस्त्रांमध्ये जो लाल रंग येतो, तो भडक नसतो, थोडा गडद असतो. या रंगास तांबडा असे मराठी नाव आहे. लाल हा शब्द बऱ्याच भाषांमध्ये येतो. पण तांबडा हे खास मराठी नाव आहे, आणि मराठी वस्त्रांमध्ये जी लाल रंगाची छटा अपेक्षित असते, ती तांबडा म्हटल्यानेच डोळ्यांसमोर येते. तांबडा या मराठी शब्दाची व्युत्पत्ती ‘ताम्र’ या संस्कृत शब्दापासून व ‘तंब’ या प्राकृत शब्दापासून मानली जाते. या दोन्ही शब्दांचे अर्थ तांबे हा धातू असा होतो. आपल्याकडे तांबडलाल नावाची एक रंगच्छटा असते, ही छटा म्हणजे भडक लाल रंग. काळ्या चंद्रकळेखालोखाल मराठी लोकसाहित्यात तांबडय़ा चंद्रकळेचा उल्लेख येतो. ‘गंगा जमनी चंद्रकळा’ असा चंद्रकळेचा प्रकारही होता. ही चंद्रकळा काळी असायची व हिचे एक काठ तांबडे व एक काठ हिरवे असायचे. भानुदास खडामकर लिखित, श्री जिव्हेश्वर चरित्रातील रंगवर्णन पाहाता काही रंगच्छटांबद्दल माहिती मिळते.
फाजगी अंजिरी सुंदर।
तांबडा हिरवा प्रियकर।
रंग तेजस्वी सुंदर तेजाकर।
मनोहर साजिरा॥
यात सांगितल्याप्रमाणे तांबडा आणि हिरवा रंगाचे मिश्रण असलेली अंजिरी नावाची रंगच्छटा प्रसिद्ध आहे. याच काव्यात मिराणी या विस्मृतीत गेलेल्या साडीबद्दलची माहिती मिळते. या साडीच्या विणकामात काळा आणि तांबडा या रंगांचे धागे विशिष्ट पद्धतीने विणलेले असतात.
काळा त्यात तांबडय़ाची मिळवणी।
त्याची केली मिराणी।
तेज तळपे सौदामिनी।
अति सुंदर चांगली॥
एका ओवीमध्येही मिराणी हा शब्द येतो. ‘मिराणी जाडीजुडी, रुतली माझ्या पोटी’. याशिवाय ‘तांबड फाजगी’ हा लाल आणि काळ्या रंगाच्या धाग्यांची विशिष्ट गुंफण असलेला साडीचा प्रकारही प्रचलित होता. याच रंगांच्या धाग्यांची निराळी गुंफण असलेला ‘तांबड सुरळी’ नावाचा साडीचा अन्य प्रकारही होता. ‘अल्पाक हिरवी’ हा एक साडीचा प्रकार प्रचलित होता. यामध्येही हिरवा व तांबडय़ा रंगाच्या धाग्यांची विशिष्ट वीण असायची. हा तांबडा रंग बनवण्यासाठी मुख्यत: मंजिष्ठा या वनस्पतीचा उपयोग होत असे. शेकडो वर्षांपासून हा वापर होत आला आहे. पूर्वी यावरूनच तांबडय़ा रंगाची वस्त्रे ओळखली जात. तांबडय़ा वस्त्रांना ‘माजिठे’ असे म्हटले जात असे. महानुभाव पंथाच्या श्री गोविंदप्रभू चरित्रात तांबडय़ा रंगाच्या वस्त्रांना माजिठे व लोहीवे अशी नावे योजिलेली दिसतात. जसे, ‘माजिठे साउलें, मांजठीय पासवडी’ किंवा ‘दों आसुचि दोनि वस्त्रें लोहवी, काळे पिवळे हिरवे लोहीवे’.
आणखी एक तांबडे वस्त्र होते, ज्याला, ज्या वनस्पतीपासून तांबडा रंग मिळायचा, त्याच वनस्पतीचे नाव मिळाले. ते वस्त्र म्हणजे ‘आलवण’. विकेशा विधवांनी नेसायचे वस्त्र आलवण.
‘आल’ या झाडाच्या सालीपासून व मुळ्यांपासून तांबडा रंग मिळवून वस्त्रांस रंगविले जात असे. यास ‘सुरंगी’ असेही म्हटले जाते. या झाडांची लागवड मुख्यत्त्वे विदर्भ व खानदेशात केली जात असे. या आल झाडापासून मिळवलेल्या तांबडय़ा रंगाने रंगविलेली वस्त्रे म्हणजे, आलवण. ही रंगच्छटा नेहमीच्या तांबडय़ा रंगापेक्षा अधिक गडद व किंचित काळसर असायची. ही तांबडी वस्त्रे नेसण्यावरून विधवांच्या समूहाला ‘तांबडे लष्कर’ असा उपहासात्मक वाक्प्रचार वापरला जात असे. एकीकडे लाल- तांबडी वस्त्रे शृंगाराचे, उत्सवाचे प्रतीक तर दुसरीकडे आलवणचा गडद तांबडा हा वैधव्य, उदासी याचे प्रतीक. रंगच्छटेतील बदलाने केवढा हा फरक..!
हिरवा आणि तांबडा, दोन्ही रंग मराठी वस्त्रपरंपरेतील सारखेच महत्त्वाचे व तितकेच लोकप्रिय रंग. दोन्ही रंगाचे संकेत महत्त्वाचे. हिरवा तारुण्याचे तर रक्तवर्ण जीवनाचे, हिरवा सृष्टीतील सर्जनाचे तर स्त्री रक्तवस्त्राचा म्हणून तांबडाही सर्जनाचे प्रतीक. तांबडय़ा रंगाला त्याचे नाव तांबे या धातुमुळे मिळाले तर तांब्यावरच्या हिरवट बुरशीचा उपयोग हिरवा रंग बनवण्यासाठी व्हायचा, हा एक चमत्कारिक योगायोग..