माणसाला बुद्धीचे, भाषेचे आणि कलेचे वरदान आहे. अशी कुठलीच कला नाही जी माणूस शिकू शकत नाही. भारतीय परंपरेत तर कलेला दैवी महत्त्व आहे. आपल्याला जी काही कला मिळाली आहे, ती दैवी शक्ती समजून त्या कलेची साधना कलाकार करत असतो. आधुनिक काळात कला ही छंद, आवड आणि व्यवसाय या तिन्ही स्वरूपांत आपल्याला पाहायला मिळते. जागतिकीकरण, खासगीकरण, तंत्रज्ञान या सगळ्यामुळे तरुण वर्गासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने त्यांच्या छंदाशी, कलागुणांशी मेळ साधणारे अनेक पर्याय खुले झाले आहेत. अशाच काही ऑफबिट आणि तरुणांमध्ये प्रचलित असलेल्या करिअर पर्यायांचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.

नृत्यकला

नवरसातल्या शृंगाररसाला न्याय देणारी कला म्हणजे नृत्यकला. नृत्यकलेची पाळंमुळं अगदी युगानुयुगे रुजलेली आहेत. कुठल्याही कलेत पारंपरिक आणि नावीन्याचा संगम कसा असावा याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे नृत्यकला. प्राचीन काळातील नृत्यकला विविध सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांशी जोडलेली होती. या नृत्यांमध्ये धार्मिक विधि, उत्सव आणि कथा सांगणे यांसारखे विविध उद्देश समाविष्ट होते. आज हीच नृत्यकला करिअरचे क्षेत्र म्हणून तरुणांच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. नृत्य हा पूर्णवेळ व्यवसाय किंवा करिअर असू शकतो, हा दृष्टिकोनच आधी नव्हता. हे क्षेत्र पूर्णत: कौशल्यावर आधारित आहे. नृत्यक्षेत्रात अदबीने घेतले जाणारे नाव म्हणजे पंडिता रोहिणीताई भाटे. त्यांनी साधारण १९४७ मध्ये स्वत:ची नृत्य संस्था- नृत्यभारती; थोडासा समाजाचा रोष पत्करून उभी केली.

कालांतराने नृत्य हे कला म्हणून कसं बदलत गेलं, याबद्दल रोहिणीताई यांच्या स्नुषा आणि शिष्या, ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरू शमा भाटे सांगतात, ‘आताच्या काळात खूप माध्यमं उपलब्ध आहेत, तरुण पिढी शिक्षण आणि कलाक्षेत्रांबद्दल जागरूक आहे, त्यांना करिअर काउन्सिलिंगही उपलब्ध आहे, मुली स्वत: खूप लहान वयात स्वावलंबी झाल्या आहेत. तसंच, नृत्य क्षेत्रातही खूप नावीन्यपूर्ण बदल झाले आहेत, अमाप संधी उपलब्ध असल्याने नृत्य या कलेचा प्रचंड विस्तार झाला आहे.’ आता नृत्य क्षेत्रात पदवी, पदविका, अगदी पीएचडीसुद्धा संपादन करता येते.

आज मुंबई विद्यापीठ असेल, ललितकला केंद्र असेल, प्रायव्हेट क्लासेस असतील, व्यावसायिक दृष्टीने नृत्य शिकण्यासाठी अगणित पर्याय उपलब्ध आहेत. इतक्या चांगल्या पद्धतीने झालेले व्यावसायिकीकरण हा नृत्य क्षेत्रातील खूप मोठा बदल आहे. ते झाल्यामुळे नृत्याला जोड करिअरचे पर्यायही भरपूर उपलब्ध झाले आहेत. मेकअप आर्टिस्ट, कॉस्च्युम डिझायनर, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर आणि सगळ्यात मोठा, नावीन्यपूर्ण, थेट नृत्याशी जोडलेला करिअरचा पर्याय म्हणजे कोरिओग्राफर; अशा अनेक संधी वाढल्या आहेत.

ग्रामीण पर्यटन

ग्रामीण पर्यटनाला सध्याच्या भाषेत रुरल टुरिझम किंवा इको-टुरिझम म्हणतात. पर्यटनाच्या क्षेत्रात होम-स्टे आणि निसर्गाच्या सान्निध्यातले रिसॉर्ट्स यांची चलती आहे. कमी गुंतवणुकीत स्वत:चा छोटा का होईना, पण व्यवसाय सुरू करण्याची संधी हे यामागचं मोठं आकर्षण आहे. नुकतेच या व्यवसायात उतरलेले विजय आणि सागर बेंद्रे यांनी हॉर्नबिल फॉरेस्ट कॅम्पिंग अशी कॅम्पसाइट सुरू केली आहे. या क्षेत्रातील आपल्या अनुभवाविषयी विजय सांगतो, ‘आपलं ज्ञान, कौशल्य, आवड, भांडवल या सगळ्याचा अगदी योग्य तो फायदा करून घेण्यासाठी हा प्रयोग आम्ही करायचं ठरवलं. आमच्या कॅम्प साइटची थीम आहे – ‘डू नथिंग’. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्याजवळ कोचरे गावात ही कॅम्पसाइट आहे. आपण आजूबाजूला ज्या कॅम्पसाइट बघतो, त्या लाऊड म्युझिक आणि धांगडधिंगा, पार्टी प्रकारच्या आहेत. आम्हाला असं काहीतरी उभारायचं होतं, जिथे लोकांना खरंच शांतता मिळेल, स्वत:ला वेळ देता येईल, स्वत:च्या आवडी जपता येतील. इथे येऊन तुम्ही योगा करू शकता, पुस्तकं वाचू शकता, कुटुंबासोबत निसर्गाच्या सान्निध्यात रमू शकता’.

होम स्टे किंवा रिसॉर्ट्सारख्या व्यवसायांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गाव सोडून शहरात जाऊन नोकरी करण्याची गरज उरत नाही; घरातच रोजगार उपलब्ध होतो आणि त्यात घरातील इतर सदस्यही सहभागी होऊ शकतात. विशेषत: महिलांसाठी ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची उत्तम संधी आहे. पर्यटकांना स्थानिक संस्कृती, परंपरा, लोककला, गावातील खाद्यासंस्कृती, शेतीचा अनुभव अशा गोष्टींचं आकर्षण असतं, त्यामुळे आपल्या संस्कृतीचं जतनही होतं आणि त्यातून अर्थप्राप्तीही होते. तरुणांना अशा प्रकारच्या पर्यटन संधी घेणे शक्य आहे, मात्र त्यासाठी त्यांनी थोडी जोखीम घेऊन प्रयत्न केले पाहिजेत, असं विजय सांगतो. ‘तरुणांनी अशा पद्धतीचे व्यवसाय करावेत, यासाठी सरकारकडूनही काही योजना, कर्ज उपलब्धी अशा पद्धतीचं सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण आर्थिक बळ हीच यातली मुख्य अडचण आहे’ असं तो म्हणतो. मात्र कल्पक तरुणाईसाठी पर्यटन क्षेत्र हे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचंच क्षेत्र आहे, याबद्दल दुमत नाही.

पुरातत्त्वशास्त्र

हल्लीची तरुण पिढी ऑफबिट आणि अर्थपूर्ण करिअरकडे वळताना दिसते, त्यात ‘पुरातत्त्वशास्त्र’ (Archaeology) हे एक महत्त्वाचं तरीही तुलनेने दुर्लक्षित क्षेत्र आहे. ऐतिहासिक वारसा, प्राचीन संस्कृती, वास्तू आणि अवशेषांचा अभ्यास करणं ही फक्त पुस्तकापुरती गोष्ट न राहता आता एक गंभीर आणि रोजगारक्षम करिअरचा पर्याय ठरते आहे. पुरातत्त्वशास्त्रात काम करताना फक्त खाणकामच नाही, तर संशोधन, म्युझियम क्युरेशन, हेरिटेज टूर गाईडिंग, अर्कायव्हल डॉक्युमेंटेशन, कन्झर्वेशन स्पेशलिस्ट अशी विविध क्षेत्रं खुली होतात.

आज भारतात – विशेषत: महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान अशा राज्यांमध्ये हजारो ऐतिहासिक स्थळं आहेत, ज्यांचं संवर्धन, अभ्यास आणि प्रचार करणं अत्यावश्यक बनलं आहे. अशा कामासाठी प्रशिक्षित पुरातत्त्वतज्ज्ञांची मागणी वाढते आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ( अरक), संग्रहालये, पर्यटन विभाग आणि विद्यापीठे यामधून शासकीय नोकरीची संधीही उपलब्ध असते. खासगी पातळीवरही म्युझियम्स, रिसर्च इन्स्टिट्यूट्स, आर्ट गॅलरी, कन्सल्टन्सी फर्म्समध्ये चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळते. याशिवाय, याच क्षेत्राशी निगडित असलेलं ‘हेरिटेज टुरिझम’ हे अजून एक वेगळं व्यावसायिक क्षेत्र विकसित होत आहे. तिथे तरुण आर्किओलॉजिस्ट्सना स्थानिक गाइड्स, लेखक, संशोधक, यूट्यूबर्स, किंवा इव्हेन्ट क्युरेटर्स म्हणूनही काम करता येतं.

इतिहास, साहित्य, भाषा आणि तांत्रिक संशोधन यांचा संगम या क्षेत्रात असतो, त्यामुळे या क्षेत्रात करिअर करताना व्यक्तिमत्त्व समृद्ध होतं, देशाच्या वारशाशी जवळीक निर्माण होते आणि पुढील पिढीसाठी ठोस काहीतरी जपता येतं. आजचं युग हे कंटेंट आणि अनुभव विक्रीचं युग आहे, त्यामुळे पुरातत्त्वशास्त्रात करिअर करताना मिळणारा अनुभव ब्लॉग, पॉडकास्ट, हेरिटेज वॉक किंवा ऑनलाइन कोर्सेसच्या माध्यमातून शेअर करता येतो आणि त्यातूनदेखील उत्पन्न मिळवता येतं. म्हणूनच, केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आणि समाजासाठी काही वेगळं करून दाखवण्यासाठी पुरातत्त्वशास्त्र हे एक समृद्ध, अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण क्षेत्र ठरतं आहे.

चित्रकला

सर्जनशीलतेला महत्त्व देणाऱ्या आजच्या तरुणाईसाठी चित्रकला (फाइन आर्ट्स) हे केवळ छंदाचं माध्यम राहिलेलं नाही, तर स्वत:चं करिअर आणि व्यावसायिक ओळख निर्माण करण्याचं प्रभावी साधन ठरलं आहे. चित्रकला क्षेत्रात काम करण्यासाठी पारंपरिक शिक्षणाशिवाय स्वत:चा दृष्टिकोन, सातत्य आणि कलात्मक संवेदनशीलता आवश्यक असते. अलीकडच्या काळात डिजिटल आर्ट, ग्राफिक डिझाइन, इल्युस्ट्रेशन, अॅनिमेशन, कॅलिग्राफी, वॉल आर्ट, स्ट्रीट आर्ट, एनएफटी आर्ट आणि कमर्शियल पेंटिंग्स यांसारख्या उपशाखांमुळे या क्षेत्रात संधीही वाढल्या आहेत. एक कलाकार स्वतंत्ररीत्या चित्रे विकून कमाई करू शकतो, ऑनलाइन आर्ट क्लास घेऊ शकतो, यूट्यूब, इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर करून जागतिक पातळीवर पोहोचू शकतो.

विविध आर्ट गॅलरी, डिझाइन स्टुडिओ, पब्लिशिंग हाऊसेस, अॅनिमेशन कंपन्या आणि जाहिरात एजन्सीजमध्येदेखील प्रशिक्षित कलाकारांना चांगली संधी मिळते. शासकीय आणि खासगी शाळांमध्ये आर्ट टीचर म्हणून काम करता येतं, तर हेरिटेज टुरिझम, कलेवर आधारित रिसर्च किंवा क्युरेटर म्हणूनही कामाची संधी असते. भारतामध्ये अनेक दिग्गज चित्रकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रकलेला नवा आयाम दिला आहे. रविवर्मा, अमृता शेरगिल, एम. एफ. हुसेन, एस. एच. रझा हे सगळे नावाजलेले चित्रकार आहेत, ज्यांनी भारतीय पारंपरिकतेला आधुनिक अभिव्यक्तीची जोड दिली. महाराष्ट्रात पाहायला गेलं तर प्रभाकर बर्वे, प्रभाकर कोलते, मिलिंद मुळीक असे अनेक दिग्गज चित्रकार आहेत. नुकतेच वयाची शंभरी गाठलेले अत्यंत सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ मराठी साहित्यात आणि पत्रकारितेत आपल्या चित्रांनी प्रभाव टाकला. आजच्या डिजिटल युगातही एक चित्रकार केवळ ब्रश आणि कॅनव्हासपुरता मर्यादित राहत नाही, तो लेखक, शिक्षक, ब्रँड, यूट्यूबर, आर्ट थेरपिस्ट किंवा आंत्रप्रेन्युअरही बनू शकतो.

काउन्सिलिंग

सध्या जीवनशैली अतिशय वेगवान, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण झाली आहे. बहुतांश प्रमाणात घरातील दोन्ही व्यक्ती लाखोंमध्ये कमावणाऱ्या असतात. प्रत्येकजण आपल्या करिअरबद्दल महत्त्वाकांक्षी असतो. अशा वेळेस स्वत:चं मानसिक स्वास्थ्य पणाला लागलेलं असतं. याच पार्श्वभूमीवर काउन्सिलिंग हे क्षेत्र उभारी घेतं आहे. आपण रोजची धावपळ, दगदग थांबवू शकत नाही आणि हे सगळं करूनही मानसिक तोल सांभाळायचा आहे. मॅरेज काउन्सिलर्स, क्लिनिकल सायकॅालॉजिस्ट, मेंटल थेरेपिस्ट, कॉर्पोरेट काउन्सिलर्स असे अनेक पर्यायी प्रोफेशन त्यामुळेच सध्या प्रचलित झाले आहेत.

यासाठी मूलभूत शिक्षण म्हणजे सायकॉलॉजी या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणे. तुम्हाला सायकॉलॉजीमध्ये ज्या विषयात स्पेशलायझेशन करायचं आहे ते तुम्ही अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला निवडू शकता. हल्ली अनेक डिस्टन्स डिप्लोमा कोर्सेससुद्धा विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. काउन्सिलिंगची पदवी घेतल्यावर शाळा, महाविद्यालयं, कॉर्पोरेट कंपनी, सरकारी विभाग, हॉस्पिटल्स, सामाजिक संस्था, स्वत:चे क्लिनिक असे अनेक नोकरी, व्यवसायाचे पर्याय उपलब्ध होतात.

अर्थार्जनाची साधनं आणि करिअरचे मार्ग हे आजच्या तरुणाईसाठी केवळ पदव्यांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. पर्यटन, पुरातत्त्वशास्त्र, नृत्यकला, चित्रकला, काउन्सिलिंग यांच्याबरोबरीने इतरही अनेक ऑफबिट क्षेत्रं आहेत, ज्यात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणं शक्य आहे. अर्थात, त्यासाठी द्रष्टेपणा, चिकाटी आणि आत्मविश्वास गरजेचा असतो. या क्षेत्रांमध्ये केवळ पैशाचं नव्हे तर आत्मिक समाधान, सामाजिक भान आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास हे सगळं एकत्रित साधता येतं, मात्र त्यासाठी तरुणांनी आपल्या मनात दडलेल्या स्वप्नांना नवीन दिशा द्यायला हवी. कारण आज थोड्या वेगळ्या वाटेने जाण्याचं धाडस केलं तर उद्याचं ठोस भवितव्य त्याच वाटांवरून पुढे जात घडणार आहे. त्यामुळे तरुणांनी स्वत:च्या आवडीनुसार नव्या क्षेत्रांकडे धाडसाने आणि जाणिवेने वळायला हवं. खरी प्रगती ही कुठल्याही ठरावीक साच्यात न बसता, आपली वाट स्वत: तयार करण्यातच असते.

viva@expressindia.com