|| गायत्री हसबनीस

‘आयटीएम इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईन अ‍ॅण्ड मीडिया’ या डिझाईन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘स्पार्क प्लॅग २०१९’ या फेस्टिवलमधून इंटिरिअर डिझायनिंग, फॅ शनडिझायनिंग आणि व्हिज्युअल कम्युनिकेशन या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण बुद्धिचातुर्यातून एक वेगळा प्रयोग आणि प्रयत्न नुकत्याच पार पाडलेल्या वार्षिक उपक्रमातून केला.

फॅशनच्या बाबतीत रंग, कापड, नक्षी आणि शैली या चौघांची योग्य सांगड जमून आली तर त्यातून निर्माण होणारा प्रभाव समोरच्या व्यक्तीला भारावून टाकतो. फॅ शनमधून काही तरी मांडायचं असेल तर ही सांगड अधिकच प्रभावी ठरते. तंत्र आणि कौशल्य यांच्या मदतीने फॅ शनमध्ये काय काय आविष्कार करता येतात याची झलक दाखवण्याचा प्रयत्न ‘आयटीएम इन्टिटय़ूट ऑफ डिझाईन अ‍ॅण्ड मीडिया’ या डिझाईन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला. दरवर्षी त्यांचा ‘स्पार्क प्लग’ नावाने वार्षिक उत्सव साजरा होतो. या वर्षी त्यांनी विविध फॅ ब्रिक्सचा वापर करून, रंगांची सरमिसळ करून एक वेगळा प्रयोग केला आहे. भन्नाट कल्पनांच्या आधारे विविध समस्यांनादेखील या विद्यार्थ्यांनी आपल्या कपडय़ांच्या शैलीतून आविष्कारित केले आहे.

जास्तीत जास्त रंगांचा वापर यंदा विद्यार्थ्यांना करायचा असल्याने त्या प्रकारच्या फॅ ब्रिक्सचा वापर आणि तशाच अनोख्या पद्धतीचे डिझाईन्स करण्यावर त्यांनी दिलेला भर सहज लक्षात येतो. यंदा फॅ शन डिझायनिंगच्या नऊ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. ‘कनस्टुगी’, ‘पॅन्डोराज बॉक्स’, ‘सुफीझम’, ‘फिझालिस अल्काकेन्गी’, ‘ग्लास’, ‘ड्रॅग’, ‘कर्मा’, ‘मायग्रेटेड सिंधीज’ आणि ‘अ‍ॅलिस इन वंडरलॅन्ड’ अशा एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असलेल्या नऊ नावीन्यपूर्ण कल्पना या विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. ‘कनस्टुगी’ची कल्पना अशी होती की, विटिलिगो या स्किन डिसॉर्डरमुळे त्वचेवर जे वर्ण उठतात त्यातून तुटलेल्या मातीच्या मडक्याचे चित्र तयार होते. ‘कनस्टुगी’ ही एक जपानी पद्धत आहे, ज्यात मातीच्या मडक्यांचे तुकडे जोडले जातात. त्यात गोल्ड, सिल्व्हर आणि प्लॅटिनमचा वापर केला जातो. त्यामुळे ते कपडय़ांतून उत्तम दिसावेत यासाठी क्रेप, ओरंगॅन्जा, मोडल सॅटिन असे फॅब्रिक्स वापरले गेले. ‘पॅन्डोराज बॉक्स’ ही एक ग्रीक मायथॉलॉजी आहे ज्यातून थोडी ग्रे शेड दिसते. मानवी स्वभावाची ग्रे शेड कपडय़ांतून व्यक्त करताना टेक्स्चर आणि एम्बलिशमेंटमध्ये शिमरचा वापर जास्त करण्यात आला आहे. वाइन, बरगंडी, ग्रे, मरून, रेड अशा डार्क रंगाचा वापर या क लाकृतीसाठी अनुज ए बाबेल या विद्यार्थ्यांने केला होता. यातही तिने ओरंगॅन्जा, सॅटिन आणि नेट हे फॅब्रिक्स वापरले. लॉन्ग गाऊन्सना तिने एक वेगळा प्रिन्सेस लुक दिला. जूही सिंग या विद्यार्थिनीने ‘सुफिझम’ या कल्पनेतून साकारलेल्या आऊटफिट्सना पिंक शेड्स दिल्या होत्या. यात तिने डाइंगचा वापर केला. जास्तीत जास्त आपण आपल्या आजूबाजूला पाहू तसं आपल्याला बरंच काही दिसत असतं. त्यामुळे आपण आणखी काही तरी खोलात जाऊन शोधत राहतो. हा विचार कपडय़ावर मांडताना तिने एकच मन या अर्थाने गुलाबी रंगातून विविध स्ट्रक्चर आणि पॅटर्न्‍स तयार केले होते, जे अत्यंत सुंदररीत्या कपडय़ावर उतरले होते.

साधारणपणे एका युनिक संकल्पनेपासून प्रेरणा घेत काही नव्याच प्रिंट्स आणत ‘फिझालिस अल्काकेन्गी’नामक कलाकृ तीत एक वेगळाच डिझाईन फॉर्मेट तयार केलेला पाहायला मिळाला. बाहेरील सौंदर्य आपल्याला नेहमीच आकर्षित करतं, पण आतलं सौंदर्य जास्त खुणावतं, प्रेमात पाडतं. अंतर्बाह्य़ सौंदर्याचा हा अनुभव फुलांमधून मिळतो. ‘फिझालिस अल्काकेन्गी’ हेसुद्धा असंच एक फूल आहे ज्यात आत एक फळ असतं आणि बाहेरून असलेल्या त्याच्या पाकळ्या आपल्याला जास्त मोहीत करतात. माणूसही बऱ्याच अंशी बाह्य़ सौंदर्याला जास्त लवकर भुलतो. मात्र त्याच्या आतील सौंदर्य जेव्हा त्याला अनुभवायला मिळतं तेव्हा ते फक्त सौंदर्य राहत नाही. त्यातलं पावित्र्य, चांगुलपणा आपल्याला त्याकडे खेचून घेतो, ही संकल्पना मांडताना बोल्ड प्रिंट आणि एम्ब्रॉयडरीचा वापर करत स्कर्ट, टॉप्स, ड्रेस, केप्स आणि गाऊन्स दर्शिता वायंगणकरने डिझाईन केले होते. ‘ग्लास’ आणि ‘ड्रॅग’ या दोन तशा सामान्य वाटणाऱ्या कल्पनाही त्यांनी फार वेगळ्या विचाराने मांडल्या होत्या. ग्लासकडे पाहिल्यानंतर पहिल्यांदा त्याची पारदर्शकता आणि चमकदार कोटिंग नजरेत भरते. त्यामुळे त्यातून अगदी सिम्पल, चेक्सचे, फ्लोई आणि लेस एम्बलिशमेंट असलेले आऊ टफिट्स हे जास्त वेगळे ठरले. ड्रॅग हा एक आर्ट फॉर्म आहे जो मेन्सवेअर आणि वूमन्सवेअरमध्ये वापरला गेला, तर ‘कर्मा’ आणि ‘मायग्रेटेड सिंधीज’मध्ये रॉयल लुक आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘अ‍ॅलिस इन वंडरलॅन्ड’चे कलेक्शन खऱ्या अर्थाने सर्वाना आक र्षून घेणारे ठरले. यात मुस्कान सिंगने अनेक कॉन्ट्रास्ट शेड्स वापरल्या होत्या. ज्यात गुलाबी, निळा, जांभळा, हिरवा, पांढरा असे रंग चातुर्याने वापरले होते.

सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून ही सर्व डिझाईन्स आखली आणि त्यासाठी त्यांनी त्याच्या रिसर्च वर्कपासून ते सर्व मटेरियल आणण्यापर्यंत सगळी मेहनत घेतली. यासाठी प्रथम डिझाईन प्रोजेक्ट तयार केले आणि त्यानंतर ते डिस्प्ले केले. शेवटी या विद्यार्थ्यांंची सर्व कलेक्शन्स रॅम्पवर सादरही झाली. कॅनडिस पॅन्टो, सुचेता शर्मा, शहानवाज आणि सनी शिमा या प्रख्यात मॉडेल्स शो स्टॉपर म्हणून यात सहभागी झाल्या होत्या.

समस्यातून नवा उपक्रम

याच डिझाईन स्कूलच्या ‘व्हिज्युअल कम्युनिकेशनच्या’ मुलांनी कचऱ्यावरील समस्या निवारण्यासाठी अ‍ॅप डिझाईन केले आहे ज्यात सुका कचरा, ओला कचरा, इंडस्ट्रीतून बाहेर पडणारा कचरा, केमिकल्स यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याने या अ‍ॅपद्वारे त्यांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने होऊ  शकते हे दाखवणारे डिझाईन सादर केले. या अ‍ॅपच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी जर ओला कचरा असेल तर त्या ठिकाणचा फोटो काढून तो अ‍ॅपवर डाऊनलोड केला जातो. त्यानंतर त्या अ‍ॅपमध्ये असलेल्या तीन सेक्शन्स म्हणजे ओला कचरा, सुका कचरा आणि केमिकल कचरा यांपैकी ओला कचरा या सेक्शनमध्ये गेल्यावर अ‍ॅपमध्ये लॉग इन केलेल्या इतर सदस्यांपर्यंत तो पोहोचतो आणि त्यातून इतर सदस्य त्याची विल्हेवाट कशी करावी याचे सल्ले आणि उपाय सुचवू शकतात. त्यामुळे हे अ‍ॅप अगदी सहज आणि सोप्या भाषेत या विद्यार्थ्यांनी डिझाईन केले होते. एरव्ही अवघड वाटणाऱ्या समस्या, संकल्पनांना कलेच्या माध्यमातून तेही फॅ शनच्या माध्यमातून सहजसोप्या आणि तितक्याच सुंदर पद्धतीने सादर करण्याच्या मुलांच्या या प्रयत्नांना दाद द्यावी तेवढी थोडीच!

viva@expressindia.com