vv08नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

मागच्या आठवडय़ात उल्लेख केलेल्या ‘अय्या’च्या पाश्र्वसंगीताची नशा अजूनही उतरली नाहीय.. केवळ त्या सनईच्या धूनसाठी ‘अय्या’ ४-५ वेळा पाहून झाला तरीही! तसे आताशा पाश्र्वसंगीतासाठी पूर्ण चित्रपट पाहायची गरज असतेच असे नाही; पूर्वी ती असायची. जुन्या ‘डॉन’ची थीम (कल्याणजी-आनंदजी) आठवतेय? ‘शोले’ची थीम (आर डी बर्मन) ऐकण्यासाठी म्हणे लोक सिनेमागृहांत गर्दी करत असत; पण आजच्या काळात चित्रपटांचे पाश्र्वसंगीत किंवा बॅकग्राउंड थीम्स अथवा बॅकग्राउंड म्युझिक (BGM) आणि ओरिजिनल साउंड ट्रॅक्स (OST) ही गाण्यांबरोबरच प्रदíशत करायची पद्धत हिंदीमध्ये चांगलीच रुजू झाली आहे. अशाच बॅकग्राउंड थीम्सची प्ले लिस्ट..
पाश्र्वसंगीत देणाऱ्यांमध्ये अग्रगण्य अशा नावांपकी एक म्हणजे संदीप चौटा. पन्नासहून अधिक चित्रपटांना पाश्र्वसंगीत दिलेल्या संदीप चौटांची राम गोपाल वर्माबरोबर खास गट्टी जमलेली दिसते. ‘कंपनी’, ‘कौन’ ‘सत्या’ अशा अनेक फिल्म्सना संदीप चौटाचे पाश्र्वसंगीत आहे. ‘कौन’ या भयपटाची बातच निराळी! चित्रपटात गाण्याची गरज असतेच असे नाही हे दाखवून देण्यासाठीच जणू हा सिनेमा काढला गेला आणि केवळ थरारक पाश्र्वसंगीताच्या जोरावर संदीप चौटाने तो यशस्वी केला. तसेच ‘कंपनी’चे. यात गाणी होती दोन-चार, पण लक्षात राहिले ते बॅकग्राउंड म्युझिकच! आणि ‘सत्या’चे बॅकग्राउंड म्युझिक तर जागतिक दर्जाचे वाटावे असे आहे. एक स्वाभिमानी, धूर्त, निर्दयी सत्या आणि एक शेजारणीवर मनापासून प्रेम करणारा सत्या अशी स्वभावातील दोन टोके दोन वेगवेगळ्या सांगीतिक ‘थीम्स’नी परिणामकारकरीत्या दाखवण्यात आली आहेत.
गाण्यांपेक्षा जास्त लक्ष इॅट कडेच देणाऱ्या ‘आरजीव्ही’कडे अमर मोहिले यांनीसुद्धा काम केले आहे. ‘आरजीव्ही’च्या अनेक चित्रपटांसाठी पाश्र्वसंगीत दिले आहे. त्यातील लक्षवेधक चित्रपट म्हणजे ‘सरकार’ आणि ‘सरकार-राज’. ‘गोिवदा-गोिवदा-गोविंदा..’ या थीमचा अमर मोहिले यांनी फार सुंदर वापर करून भययुक्त आदर असणाऱ्या ‘गॉडफादर’चे अर्थात सरकारचे चरित्र आपल्यासमोर उलगडले आहे.
राम गोपालांच्या ‘फॅक्टरी’मध्ये काम केलेले आणि उत्तमोत्तम पाश्र्वसंगीतासाठी जाणले जाणारे असे अजून एक नाव, खरे तर दोन नावे- सलीम-सुलेमान. राम गोपाल वर्माच्या ‘अब तक छप्पन’पासून नागेश कुकुनूरच्या ‘डोर’पर्यंत किंवा ‘धूम’पासून ते मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’पर्यंत अनेक चित्रपट सलीम सुलेमान या जोडीने आपल्या बहुरंगी पाश्र्वसंगीताने सजवले आहेत. त्यातले मला सर्वात आवडतात ते ‘डोर’ आणि ‘अब तक छप्पन’. ‘डोर’ची थीम ऐकताना तर प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो!
राम गोपाल वर्माबरोबर रेहमान या कॉम्बिनेशनचा ‘रंगीला’. ‘प्यार ये जाने कैसा है..’ गाण्याचा या चित्रपटात एका दु:खाच्या प्रसंगी केलेला वापर फारच सुंदर आहे. आपल्याच गाण्यांचा पाश्र्वसंगीतासाठी सुंदर वापर करणे हीच तर रेहमानची खासियत आहे आणि म्हणूनच ‘ज्या चित्रपटांमध्ये माझी गाणी असतील, त्याचे पाश्र्वसंगीतही माझेच असेल’, अशी रेहमानची अटच असते. पण रेहमान BGM साठी केवळ गाणीच वापरतो असेही नाही, ‘बॉम्बे थीम’, ‘वॉल्ट्स फॉर रोमान्स’ (लगान), ‘मौसम अँड एस्केप’, ‘लतिका’ज थीम’, ‘ओ साया’, ‘रायट्स’ (स्लमडॉग मिलिअ‍ॅनर), ब्लू थीम (ब्लू) अशा पाश्र्वसंगीताच्या अनेक थीम्स त्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. या थीम्सबरोबरच ‘रंग दे बसंती’च्या इॅट चा मी दीवाना आहे. त्यात चंद्रशेखर आझाद जेव्हा रावण-दहनाच्या वेळी पोलिसांच्या हातून निसटतात तो सीन, किंवा सगळे गच्चीवर उभे राहून संरक्षणमंत्र्याच्या हत्येचा कट रचत असतानाचा सीन केवळ आणि केवळ अफाट. ‘युवा’ चित्रपटसुद्धा मी केवळ BGM साठी परत परत पाहत असतो. त्यातले ‘डोल डोल ना पाप्पे’ हे ‘लल्लन’ची धंद्यातील प्रगती दाखवताना वापरले गेलेले म्युझिक फारच भारी. विशेष करून त्यातल्या त्या बाईच्या आवाजात केलेल्या करामती!
शंकर एहसान लॉय यांनीसुद्धा ‘दिल चाहता है’ आणि ‘तारे जमीं पर’च्या पाश्र्वसंगीतात कमाल केली आहे. विशाल-शेखरची ‘ब्लफमास्टर’ची थीम माझ्या फेव्हरेट्समध्ये आहे. ‘बर्फी’चे सिंफनीयुक्त पाश्र्वसंगीतसुद्धा (संगीतकार- प्रीतम) उल्लेखनीय आहे.
माँटी शर्मा या पाश्र्वसंगीतकाराने संजय लीला भन्साळीच्या सर्वच चित्रपटांमध्ये सिंफनीचा उत्तम वापर सुंदररीत्या केला आहे. विशेषत: ‘ब्लॅक’ची थीम. या चित्रपटाचा लुक हॉलीवूडपटासारखाच असून म्युझिकसुद्धा त्याला साजेसे आहे. पुढची प्ले लिस्ट हॉलीवूडमधल्या पाश्र्वसंगीताविषयी..पण  जाता जाता एका हॉलीवूडपटाचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. तो चौकटीत वाचा.

हे  ऐकाच..
vn08‘स्लमडॉग मिलिअनर’द्वारे रेहमानने अटकेपार नाही तर सातासमुद्रापार झेंडा रोवला, हे तर सर्वश्रुत आहेच. याचा दिग्दर्शक डॅनी बॉयल आणि रेहमान जोडीचा मध्ये अजून एक चित्रपट येऊन गेला. तो म्हणजे 127 अवर्स. खाचखाळग्यांतून धाडसी यात्रा करताना एका खडकाखाली हात अडकून १२७ तास एकाच ठिकाणी अडकलेल्या आणि शेवटी आपणच आपला हात कापून सुटका करून घेतलेल्या एका साहसी तरुणाची ही कथा खऱ्या घडलेल्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचा थरार तर प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा आहेच, पण या थरारात आणि उत्सुकतेत भर घालणारे याचे पाश्र्वसंगीतही (विशेष करून ‘इफ आय राइज’ हा साउंड-ट्रॅक) एकदा तरी अनुभवावे असेच आहे.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com