मुंबईत एके काळी चारशेच्या आसपास इराणी हॉटेल्स होती अशी माहिती मिळते. त्यातील आता केवळ वीस-पंचवीस हॉटेल्सच शिल्लक आहेत. त्याच यादीतलं आजही अभिमानाने शड्डू ठोकून उभं असणारं नाव म्हणजे टिळक ब्रिजच्या कॉर्नरला असलेलं दादर टीटी सर्क लचं कॅफे कॉलनी स्टोर्स आणि रेस्टॉरंट’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इराण्याची हॉटेल्स ही मुंबईची एकेकाळची ओळख होती. दगडी बांधकाम असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणची इराणी हॉटेल्स म्हणजे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांचं भेटण्याचं हक्काचं ठिकाण. सकाळी कामावर जायला निघताना आणि संध्याकाळी कामावरून सुटल्यावर अनेकांचा पहिला चहा या इराण्याच्या हॉटेलमध्येच होत असे. चहा पिताना पेपर वाचणं आणि मित्रांसोबत गप्पा ठोकणं हा तर जणू दिनक्रमाचा भाग. काळ बदलला तसा इराणी हॉटेलही बंद झाली आणि मुंबईकरांची ही नाक्यावर भेटून चहा पिण्याची, गप्पा मारण्याची सवयही सुटली. अनेक इराणी हॉटेलच्या मालकांच्या पुढच्या पिढीने हॉटेलच्या जागा इतर व्यावसायिकांना विकल्या. तर काहींनी इतरांना हॉटेल चालवायला दिली, पण खेदाची बाब म्हणजे नवीन मालकांना त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देता आले नाही.  अशा परिस्थितीत ‘पारशी मालकाने मुहूर्तमेढ रोवलेला ‘कॅफे कॉलनी स्टोअर्स आणि रेस्टॉरंट’ तब्बल ८५ वर्षे जुना आहे.

चाळीसच्या दशकात त्याची मालकी एका इराणी व्यक्तीकडे होती. त्यानंतर अघा नझारियन आणि त्यांचं कुटुंब गेली साठ वर्षे हा कॅफे चालवत आहेत. नझारियन यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली बिबी सदत, बिबी फतेहमेह आणि मुलगा मिर्झा या कॅफेची धुरा यशस्वीपणे सांभाळतायेत. मिर्झाचे काका दारयुश झैनबोदी हेसुद्धा निवृत्तीनंतर गेली सहा-सात वर्षे सकाळच्या वेळेस कॅफेच्या गल्ल्यावर बसून पारसी टाइम्स वाचताना दिसतात. पहाटे सहा वाजता कॅफेचं टाळं उघडण्याचं कामही दारयुश यांचंच.कॅफे कॉलनी मुंबईतील असा एकमेव कॅफे असावा जिथे कॅफेसोबतच जनरल स्टोअरही आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत खुल्या असणाऱ्या कॅफेच्या स्टोर्समध्ये मीठ, टूथपेस्ट, तेल, साबण, ब्रश, चॉकलेट,  मसाले, बिस्किटं, सिगरेट अशा किराणाच्या दुकानात मिळणाऱ्या रोजच्या वापरातील सर्वच वस्तू मिळतात. त्यामुळे हिंदू कॉलनीतील लोकांसाठी कॅफे कॉलनी म्हणजे जीव की प्राण आहे. कॅफेमध्ये इतर सामानांसोबत काचेच्या कपाटामध्ये क्रॉकरीपण विकायला ठेवलेली पाहायला मिळेल. बाऊल, प्लेट, कप-बशा, चहाची किटली खास परदेशातून आयात केलेली आहे.

‘ओपन किचन’ ही संकल्पना हल्लीच्या तरुणांना नवीन वाटते. पण ‘कॅफे कॉलनी’ सुरू झाल्यापासून इथे ओपन किचनच आहे. याच किचनमध्ये चहा, सुलेमानी चहा, बन, ब्रून मस्का, ऑमलेट, अंडा भुर्जी हे पदार्थ आजही इराणी पद्धतीनेच तयार केले जातात. खिमा-पाव हा इथला सर्वात जास्त विकला जाणारा आणि लोकांच्या आवडीचा पदार्थ. सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत खिमा-पाव मिळतो. त्याच्या जोडीला मटण खिमा घोटाळा, खिमा फ्राय, खिमा पुलाव, एग पुलाव, मसाला ऑम्लेट आहेच. नेहमीच्या मेन्यूशिवाय चिकन करी (मंगळवार), आलू घोष, दाल घोष आणि मटण पाया (बुधवार), मटण आणि चिकन बिर्याणी (शुक्रवार) असे पदार्थही मिळतात. अबघोष हे इराणीयन स्टाईल सुपही इथल्या मेन्यूमध्ये दिसेल. ग्राहकांच्या आवडीप्रमाणे चिकन किंवा मटण अबघोष बनवलं जातं. इराणी लोक अबघोषमध्ये पाव बुडवून खातात. शिवाय चवीला थोडं तिखट आणि स्क्रॅम्बल्ड एगसारखा दिसणारा अकुरी या पदार्थाचा देखील मेनूमध्ये समावेश आहे.

मलाईवाला चहा इराणी हॉटेलमध्येच प्यावा. इतर रेस्टॉरंट किंवा नवीन कॅफेमध्येही तो मिळणं दुरापास्तच. पण इथे तुम्हाला मलाई चहा मिळेल. चहा संपेल पण मलाई संपणार नाही इतकी मलाई त्यामध्ये वरून घातली जाते. इराणी मावा केक ‘कॅफे कॉलनीची’ खास ओळख आहे. इतर ठिकाणी बसकट आणि गोलाकार मावा केक मिळतो. पण  कॅफे कॉलनीचा मावा केक वरून गोलाकार आणि खाली निमुळता होत जाणाऱ्या उभ्या दंडकासारखा आहे. इराण्यांमध्ये तो चहात बुडवून खाण्याची पद्धत आहे. सर्व बेकरीचे पदार्थ माहीमला असणाऱ्या इराणी बेकरीतून बनवून घेतले जातात. सकाळी एकदाच सर्व मागवून न ठेवता दिवसभरात विशिष्ट वेळेला ताजे पाव आणि ब्रेड येत असतात. शिवाय चिकन पफ, चिकन कटलेट, मटण कटलेट, चिकन आणि मटण सीख कबाबही मिळतात.

हिंदू कॉलनीतील राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईतील वास्तव्याचं ठिकाण. पन्नासच्या दशकात डॉ. आंबेडकर कधी कधी सकाळी न्याहारीसाठी कॅफे कॉलनीमध्ये येत असत. त्यानंतर त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या साखरपुडय़ाच्या वेळीही अघा नझारियन यांनी खास बिर्याणी बनवल्याची आठवण ते मोठय़ा अभिमानाने सांगतात.

दादर हे मुंबईच्या मध्यवर्ती भागात असल्याने ‘कॅफे कॉलनी’ हा आजदेखील अनेक ट्रेकर्ससाठी भेटण्याचं हक्काचं ठिकाण आहे. दर बुधवारी संध्याकाळी उशिरा भेटून शनिवार-रविवारच्या ट्रेकचं प्लॅनिंग येथे केलं जातं. रविवारी ट्रेक झाला की पुढचे दोन दिवस आराम आणि ट्रेकिंगच्या दिवशी काढलेले फोटो प्रोसेस करण्याचं काम चालतं. बुधवारी पुन्हा चहा आणि ब्रून-मस्काचा आस्वाद घेत पुढच्या ट्रेकचं प्लॅनिंग होत असे. एकामागोमाग एक चहा मागवा आणि गप्पा मारत बसा, तुम्हाला कोणीही इथून उठवणार नाही, अशी आठवण बिभास आमोणकर यांनी सांगितली.

रविवारी सकाळी तर आजही येथे खवय्यांची झुंबड उडालेली असते. रविवारचा ब्रंच म्हणजे ‘कॅफे कॉलनी’ हे अनेकांसाठी समीकरण झालेलं आहे. शिवाजी पार्कात खेळून झाल्यावर अनेक जण श्रमपरिहारासाठी कॅफेमध्ये येतात असं नझारियन सांगतात. नझारियन वयाच्या १५व्या वर्षांपासून कॅफेमध्ये पडेल ते काम करतायेत. आज त्यांचं वय सत्तरच्या पुढे आहे, तरीही गल्ला सोडून अधूनमधून बिर्याणी बनवण्यासाठी किचनचा ताबा घेतात. प्रत्येक टेबलवर जाऊन लोकांशी आपुलकीने गप्पा मारतात. कधी कोणी लांबचा प्रवास करून कॅफेमध्ये आलं असल्यास त्यांना स्वत:हून चॉकलेट देतात. कदाचित त्यामुळेच मुंबईबाहेर गेलेली मंडळी मुंबई भेटीवर आली की कॅफे कॉलनीला आवर्जून भेट देतात. इराणी चहाची चव जगावेगळी आहे. इथे आल्यावर कमी पैशात ताजं आणि भरपेट खायला मिळतं, घरासारखं वाटतं, असं ठाण्याहून मित्रमैत्रिणींसोबत आलेल्या प्रतिमा सहा यांनी गप्पा मारताना सांगितलं.

गेली अनेक र्वष इथल्या इंटेरिअरमध्येही फारसा बदल केलेला नाही. अगदी टेबल-खुच्र्यादेखील जुन्याच जमान्यातील आहेत. टेबलावरती मोठी काच आणि त्याच्याखाली मेनू असा टिपिकल इराणी थाट. कॅफेच्या आतमध्ये बसायला जागा नसेल तर लोक बाहेर उभं राहून चहा मागवतात आणि सिगरेटचे झुरके मारत उभ्यानेच गप्पांची मैफल जमते. पूर्वी कॅफेच्या समोरून ट्राम जात होती, अशी आठवण नझारियन सांगतात.

प्राध्यापक सुनील कवडी यांचं ‘नाक्यावरचा इराणी’ नावाचं एक छोटेखानी पुस्तक आहे. त्यामध्ये मुंबईतील इराणी कॅफे आणि त्यांचा आजवरचा प्रवास नमूद केलेला आहे. ‘कॅफे कॉलनी’वर त्यामध्ये भरभरून लिहिलेलं आहे. नाक्यावरचा इराणी ही संकल्पना गायब होत असताना कॅफे कॉलनी आजही दिमाखात उभा आहे. तो इतिहासजमा न होता तसाच राहावा हीच प्रार्थना.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on cafe colony stores restaurant irani cafe
First published on: 09-02-2018 at 00:31 IST