तेजश्री गायकवाड, प्रियांका वाघुले

सोमवार, मंगळवार असे आठवडय़ाचे सात दिवस आणि नेहमीचेच बर्थ डे, व्हॅलेंटाइन डे, महाराष्ट्र डे असे काही सेलिब्रेशनचे डेज आपण दर वर्षी साजरे करतोच. याखेरीज इंटरनेटमुळे जवळ आलेल्या या जगात आजकाल आपण कधीही न ऐकलेले असंख्य दिवसही साजरे करू लागलो आहोत. कोणत्या दिवशी कोणता दिवस म्हणजे ‘डे’ आहे हेही समजणं आता सोप्पं झालं आहे असंच म्हणता येईल. मात्र सोशल मीडियावरच्या या अतिश्रद्धेपायी सध्या या राष्ट्रीय आणि विशेषत: आंतरराष्ट्रीय डेज साजरे करण्याबद्दलचा गोंधळ अंक ‘डेज’ बाय ‘डेज’ वाढतच चालला आहे.

आजकाल आपण सगळ्याच गोष्टी पटापट सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. मग त्या कधी चुकीच्याही असतात तर कधी बरोबरही. पण आपल्याला डोळे बंद करून जे सुरू आहे त्या प्रवाहामध्ये वाहत जायची सवय लागली आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्याच सोशल मीडियावर सहज दिसून येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच झालेला ‘मदर्स डे’ अर्थात ‘मातृदिन’. ८ मे रोजी जवळजवळ साठ टक्के लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्टरूपी आपल्या आईवरचं प्रेम दाखवलं. पण अर्धा दिवस संपायच्या आतच आज ‘मातृदिन’ नाहीच अशा पोस्टची गर्दी वाढली. आणि बघता बघता गुगलवरती ‘१३ मे रोजी मातृदिन’ अशा आशयाचा फोटो व्हायरल झाला. शेवटी गोंधळा-गोंधळातच तो ‘मदर्स डे’चा अंक पार पडला. बरं फक्त मदर्स डे, फादर्स डे, फ्रें ड्स डे, सिबलिंग डे असे आपल्या माहितीतलेच दिवस असतात असं नाही बरं का.. तर प्राणी-प्रेमींनी चालू केलेला पेट डे, अ‍ॅनिमल डे.. एकीकडे फॅशन इंडस्ट्रीने सुरू केलेले शॉर्ट्स डे, डेनिम डे असेही दिवस सेलिब्रेट केले जाऊ लागले आहेत.

या डेजच्या बाबतीत आपल्याला सोशल मीडियावर नेहमीच दोन ग्रुप दिसतात. ते म्हणजे, जे आहे त्याला फॉलो करणारे आणि त्या विषयीची पोस्ट टाकणारे. तर दुसरा ग्रुप म्हणजे जे आहे त्याच्या बरोबर उलट किंवा विरुद्ध आशयाचा मेसेज असणारे पोस्ट टाकणारे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘मदर्स डे’च्या निमित्ताने व्हायरल झालेला एक फोटो. ज्यात एका बाजूला मातृदिनी सगळे आईसोबत फोटो काढतायेत तर दुसऱ्या बाजूला बाकीच्या दिवशी ती एकटीच आहे, अशा दोन्ही बाजू यात दाखवल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे मातृदिन एक असला तरी काहींनी स्वत:चे आईसोबतचे फोटो टाकले होते. तर काहींनी हे वर सांगितलेले व्हायरल झालेले फोटो टाकले होते. या बद्दल सोशल मीडियावरती फारसा सक्रिय नसलेला एक तरुण मित्र अक्षय गायकवाड म्हणतो, ‘कोणत्याही डेजच्या दिवशी सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल पोस्ट टाकणे म्हणजेच सेलिब्रेट करणे असं होत नाही. आजकाल लोकांना असं वाटत की आपण सोशल मीडियावर पोस्ट टाकली नाही तर तो दिवस सेलिब्रेटच होत नाही. पण मला असं अजिबात वाटत नाही. फ्रेंडशिप डेच्या दिवशी मी मित्रांसोबत बाहेर गेलो, मजा मस्ती केली. पण त्याची एकही पोस्ट टाकली नाही. आता याचा अर्थ असा होत नाही की, मी एन्जॉय केलं नाही किंवा मला मित्र नाहीत. त्यामुळे अशा कोणत्याही दिवसांना पोस्ट केलीच पाहिजे असं अजिबात नाही’.

खरं तर जे मोजके दिवस आपण अनेक वर्षे साजरे करत आहोत त्यामागे काही कारणं आहेत. पण आजकालच्या या इंटरनेट आणि स्पर्धेच्या जगात आपल्याला हवे ते दिवस हवे त्यावेळी सेलिब्रेट करायचे असतात. याबद्दल तरुणाईची वेगवेगळी मतं आहेत. याच संदर्भात सतत सोशल मीडियावर पोस्ट करणारी आणि ‘शेअरिंग इज केअरिंग’ असं मानणारी स्वप्नाली राऊत सांगते, ‘मला नेहमीच मी ज्या गोष्टी करतेय त्या सगळ्या सोशल मीडियावर शेअर करायला आवडतात. त्यामागे काही खास आणि वेगळं कारण नाही. मला फक्त ते पोस्ट केल्याने त्यावरती मिळणाऱ्या कमेंट्स, लाइक्स यामुळे आनंद वाटतो. मी कुठे तरी एखादी प्रसिद्ध व्यक्ती असल्यासारखं वाटतं. म्हणूनच मी सगळे डेज अगदी न चुकता पोस्ट करते’. सोशल मीडियावर असलेल्या या दोन टोकाच्या भावनांमुळे डेज साजरा होण्यामागचा गोंधळही तितकाच वाढतो आहे हेही खरं आहे. डेज साजरे करताना जागतिक आणि राष्ट्रीय दिवस कोणते साजरे केले जातात, यातला साधा फरकही आपल्याला समजत नाही. एखाद वेळी निव्वळ दुसरा करतोय, मी मागे पडायला नको हे विचार बाजूला ठेवून जर आपण नीट समजून घ्यायचा, कोणता डे आहे त्याची खात्री करून घेऊन तो साजरा केला तर योग्य त्या तारखेला, योग्य ते दिवस साजरे करणं आपल्याला सहज शक्य आहे. मात्र सध्या तरी याबाबतीत फक्त अंधानुकरण करणाऱ्यांचंच प्रमाण जास्त असल्याचं दिसून येत आहे.

आपल्याकडे अजूनही लोकांना फक्त बाकीचे पोस्ट करतायेत म्हणूनच काही ना काही पोस्ट करायचं असतं आणि त्यामुळे कधी कधी आपण चुकीच्या गोष्टी पोस्ट करतो. अनेकदा दोन-तीन महिन्यांतून एकदा तरी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा, कविता दिनाच्या शुभेच्छा, भाषा दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट अचानक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पाहायला मिळतातच. असे अनेक वेगवेगळे दिवस साजरे करण्याचा ट्रेंड गेल्या तीन-चार वर्षांत जास्तच वाढत चालला आहे. आणि त्याला अनेक कारणंही आहेत. एक तर सोशल मीडियावर अशा कोणत्याच गोष्टींचं नियंत्रण ठेवणारी व्यवस्था नाही आहे. शिवाय, सध्या इंटरनेटवर फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, यूटय़ूब असे एक ना अनेक सोशल अ‍ॅप आणि त्यांचं माहात्म्य वाढलं आहे. याशिवाय, वाढते ब्लॉगर, व्लॉगरची संख्या. यामुळे या प्रत्येक ब्लॉग, व्लॉग आणि अ‍ॅप्सचा वापर हा आजकाल मोठे मोठे ब्रॅण्ड स्वत:चे प्रॉडक्ट विकण्यासाठी करतात. आपल्या कंपनीला किंवा उत्पादनाला साजेसा इव्हेंट कुठला हे हेरून त्याची सोशल मीडिरावर पेरणी केली जाते आणि मग याच मीडियाचे अंधानुकरण करणारी मंडळी त्यांच्या या योजना कळत-नकळत सुफळ संपूर्णत्वास नेतात. या कंपन्या किंवा तत्सम ग्रुप अनेकदा अशा वेगवेगळ्या डेची सुरुवात करतात. व्हॅलेंटाईन डेचंच उदाहरण घ्यायचं तर त्याच्याआधीसुद्धा अनेक डेज असतात. मग व्हॅलेंटाइन आणि हे डेज हेरून कित्येक दिवस आधी त्याला साजेसे प्रॉडक्ट बाजारात आणले जातात आणि सोशल मीडियावर त्याच्या जाहिरातींचा रतीब लावला जातो. या प्रकारे नवीन डेजची सुरुवात म्हणजे एक मार्केटिंग योजना असते. छोटे मोठे ब्रॅण्ड्स बॉलीवूड सेलिब्रिटींपेक्षा इंटरनेट सेलिब्रिटींना पसंती देतात. कारण याचा प्रमोशन्ससाठी जास्त उत्तम वापर होतो. त्यामुळे हल्ली अनेक वेगवेगळ्या दिवसांचाही जन्म होऊ लागला आहे. खरं तर असे डेज साजरे करण्याची अजिबात गरज नसते. मात्र तेही साजरे केले जातात यामुळे सोशल मीडियावरच्या या तथाकथित ‘डेज’चं कॅलेंडर फुगतच चाललं आहे. हा फुगा मध्येच फुटला तर काय गोंधळ उडेल याची छोटीशी झलक ‘मदर्स डे’च्या गोंधळामुळे आपण पाहिली आहे पण तरीही त्याकडे डोळेझाकपणा करत आपण हे डेज सेलिब्रेट करत राहिलो तर फसव्या मार्केटिंगच्या जाळ्यात आणि लाइक्सच्या वेडात आपण गुरफटत चाललो आहोत, याचं भानही उरणार नाही. त्यामुळे ‘डेज’बद्दलचा हा सावळा गोंधळ निदान आपण प्रत्येकाने आपल्या स्तरावर तरी विचारपूर्वक सोडवला पाहिजे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com