तीआहे विविध नृत्यप्रकार साकारणारी, ते शिकवणारी आणि नृत्याला श्वास मानणारी. लयदार आयुष्यात मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर नृत्यकलेची साधना करणारी ही कलाकार आहे नृत्यनिपुण ऊर्जा देशपांडे नरवणकर.

‘इमॅजिनेशन इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन नॉलेज’, असं अल्बर्ट आइनस्टाइन यांनी म्हटलं आहे. त्याचा प्रत्यय नृत्यकला आणि कल्पनेची सांगड घालणाऱ्या नृत्यकलाकार आणि प्रशिक्षक ऊर्जा देशपांडे नरवणकरच्या नृत्यप्रवासाचा आलेख पाहिल्यावर येतो. गेली ११ र्वष ती नृत्य शिकवते आहे. तिचा नृत्यगुण लक्षात आल्यावर पालकांनी तिला नृत्यप्रशिक्षण द्यायचा निर्णय घेतला. पाचव्या वर्षी तिला तंजावूर नृत्यशाळेत घातलं. गुरू तेजस्विनी लेले आणि गुरू ग्रीष्मा लेले यांच्याकडे तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले. नृत्य शिकताच त्याचं सादरीकरणही केलं जात होतं. मात्र आजारपणामुळं तीन वर्ष नृत्य शिकण्यात आणि सरावात खंड पडला. तरीही ऊर्जा नेटानं पुन्हा शिकली आणि ‘श्रीवल्लभ संगीतालया’तून भरतनाट्यममध्ये विशारद झाली. काही कारणांमुळे तिला भरतनाट्यम पुढे नेता आलं नाही. ‘आपल्याला एकच नृत्यशैली येते आहे. नृत्यदिग्दर्शक होण्यासाठी अष्टपलू होण्याची आवश्यकता असून विविध नृत्यप्रकार यायला हवेत,’ असं ऊर्जाच्या लक्षात आलं. सहावीत तिने फराह खानची ‘छैय्या छैय्या’ची कोरिओग्राफी पाहिली होती. तेव्हा तिला प्रेरणा मिळाली आणि नृत्यदिग्दर्शक व्हायची खूणगाठ तिनं मनाशी बांधली. मग तिने शामक दावरच्या ‘इन्स्टिटय़ूट फॉर द परफॉर्मिग आर्टस’ मध्ये नृत्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याच्या ‘एसपीबी-स्पेशल पोटेंशिअल बॅचेस’ प्रसिद्ध आहेत. त्यातील लखनौच्या बॅचमध्ये सहभागी व्हायची संधी तिला मिळाली. तिथे ती जॅझ आणि हिपहॉप शिकली. शोज करणं सुरूच होतं.

‘श्ॉल वुई डान्स’ हा चित्रपट पाहिल्यावर तिला बॉलरूम डान्स शिकावासा वाटला. ती संदीप सोपारकरांच्या ‘बॉलरूम स्टुडिओ’मध्ये दोन र्वष साल्सा, क्लब डान्स आणि बॉलरूम नृत्यप्रकार शिकली. हे प्रशिक्षण संपतासंपताच अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ती नृत्य शिकवायला लागली आणि ‘डान्स विथ ऊर्जा’ हा ब्रॅण्ड तयार झाला. त्याअंतर्गत ती नृत्याच्या कार्यशाळा घेऊ लागली. त्यात तिनं सेमी क्लासिकल डान्स शिकवणं सुरू केलं. ती सांगते की, ‘महाविद्यालयीन मुली किंवा मध्यमवयीन स्त्रियांना क्लासिकल डान्स शिकायला तेवढा वेळ नसतो. तुलनेनं शालेय वर्षांत तो शिकता येतो. बॉलीवूडमधल्या काही नृत्यांमध्ये क्लासिकल डान्सचा अंतर्भाव असतो, त्यामुळे तेही शिकवता येतील. म्हणून सेमी क्लासिकल डान्स शिकवणं सुरू केलं. लावणीही शिकवू लागले’. त्यासुमारास जर्मनीतली प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बेली डान्सर झेयनाला इंडियन आणि बॉलीवूड डान्स स्टाइल शिकायची होती. तिला शिकवायची संधी ऊर्जाला मिळाली. दोन महिन्यांच्या फीऐवजी ऊर्जानं तिच्याकडून बेली डान्स शिकून घेतला. तिच्यामुळं ऊर्जाला बेली डान्स शिकवायची प्रेरणा मिळाली.

पुढे ऊर्जानं ‘अनुपम खेर अ‍ॅक्टर अ‍ॅकॅडमी’मध्ये महिन्याभराचं अभिनय प्रशिक्षण घेतलं. पण ती त्यात रमली नाही. तिनं अकादमीमध्येच काही महिने व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बॉलीवूड डान्स शिकवला. तो फार छान अनुभव होता. अनेकांचं मार्गदर्शन मिळालं त्या दरम्यान. ‘लगान’मधल्या ‘घनन घनन’ या गाण्याच्या कोरिओग्राफीचं तिथल्या इतर प्राध्यापकांनी कौतुक केलं. पुढे तिने नृत्यावर लक्ष केंद्रित केलं. आपल्या चित्रपटांतील गाण्यामध्ये अनेकदा कथ्थकचा बेस असतो. त्यामुळं कथ्थकचीही माहिती असावी, यासाठी तिनं राधिका फणसे यांच्या ‘नवरस आर्ट अकादमी’मध्ये कथ्थकचं प्रशिक्षणही घेतलं. लग्नानंतर तिनं स्वतचा ‘ऊर्जा आर्ट स्टुडिओ’ चालू केला. दरम्यान तिचा अपघात झाला, तरी ती नेटानं स्टुडिओत जात राहिली. दोन वर्षांनी ती बंगलोरला स्थलांतरित झाल्यानं स्टुडिओ बंद केला, पण ‘ऊर्जा आर्ट स्टुडिओ’ हा ब्रँण्ड कन्टिन्यू आहे. मुंबईला परतल्यावर तिनं पुन्हा क्लासेस घ्यायला सुरुवात केली असून सध्या फ्रीलान्सिंग करते आहे.

ती बेली डान्स, सेमी क्लासिकल, बॉलीवूड डान्स नियमितपणं शिकवते. वर्षांतून दोनदा क्लासमधल्या विद्यार्थ्यांचं सादरीकरण असणारा ‘द सेंटर स्टेज’ हा कार्यक्रम असतो. तिच्या विद्याíथनी ‘पुणे इंटरनॅशनल डान्स काँग्रेस’मध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘सिद्धिविनायक न्यासा’तर्फे होणाऱ्या दिवाळी पहाट आणि दिवाळी सांजमध्ये तिने विद्याíथनींसोबत परफॉर्म केलं आहे. तेव्हा तिला ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले आणि ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची दाद मिळाली होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयांतील स्पर्धासह राज्यस्तरीय नृत्यस्पर्धात लक्षणीय यश मिळवलं आहे. ऊर्जा सांगते की, ‘भारतात बेली डान्सर्स आणि बेली डान्स प्रशिक्षकांची संख्या लक्षणीयरित्या वाढते आहे. हे प्रमाण शहरी भागांत खूप असून त्यातही मुंबई आणि बंगलोरमध्ये सर्वात जास्त आहे. रेग्युलर क्लासेस, कार्यशाळा, बूटकॅम्प, वेडिंग कोरिओग्राफीज, इव्हेंट आदी माध्यमातून तिने आतापर्यंत सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षण दिलं आहे. कलाकार, सेलेब्रेटीज, प्रोफेशनल डान्सर्स, आर्टस्टिनाही ती शिकवते. तिचे आवडते कोरिओग्राफर्स आहेत फाराह खान आणि बोस्को-सीजर. मराठीत उमेश जाधव यांची कोरिओग्राफी आवडते. या सगळ्यांसोबत काम करायला तिला आवडेल, असं ती सांगते.

नृत्यदिग्दर्शकाच्या मनात नृत्य कसं साकारतं, याविषयी ती सांगते की, ‘अनेकदा म्युझिक ऐकून प्रेरणा मिळते. त्यामुळे माझ्या मनात संगीतकार, गायक, वादक, तंत्रज्ञ, संगीत संयोजक या मंडळींबद्दल अत्यंत आदर आहे. म्युझिक ऐकल्याशिवाय नृत्य करायची प्रेरणाच मिळणार नाही. मान डोलायला लागली, पायांनी ठेका धरला तर ते म्युझिक आवडायला लागलं आहे, हे कळतं. नकळत ते आवडायला लागतं. त्यानंतर काही रंगांची कल्पना डोक्यात येते. वेशभूषा कशी असेल, स्टेजची बॅकग्राऊंड कशी असेल ते दिसू लागतं. म्युझिकच्या मूडनुसार वेषभूषा ठरते. म्युझिक आवडल्यावर ते सलग रोज जवळपास पंचवीस-तीस वेळा ऐकते. माझ्या होम स्टुडिओत म्युझिक लावून आरशासमोर उभी राहाते. हळूहळू एकेक स्टेप आकारते. आरसा नसेल तर मी आरशासमोर आहे, अशी कल्पना करून त्या स्टेप्स लिहून काढते. प्रवासात असताना हा पर्याय अनेकदा अवलंबला जातो. लिहिलेलं चांगलं लक्षातही राहातं. अशी कोरिओग्राफी लिहिलेल्या काही वह्य़ांचा संग्रह माझ्याकडे झाला आहे’. नृत्य शिकवण्याच्या पद्धतीविषयी ती सांगते की, ‘बॅच सुरू झाल्यावर कोरिओग्राफी शिकवताना प्रत्येकाच्या नृत्याचं आकलन माझ्या लक्षात येतं. लहान मुलांचा मस्तीचा मूड थोपवावा लागतो, तर आजींना समजावलेलं लक्षात राहात नाही. त्यामुळे या दोन्ही वयोगटांना शिकवायला थोडा वेळ लागतो आणि पद्धत बरीचशी सारखी असते. मधला गट तुलनेने सोपा असतो. त्यांची आकलनक्षमता चांगली असल्याने त्या लवकर शिकतात. शिवाय कुणाला मुळात तालसुराची जाण असते तर काहींना त्याचा गंधही नसतो. विद्यार्थ्यांना म्युझिक सतत ऐका, सराव करा, असं मी सांगते.  नृत्यकला शिकल्याने लवचीकता वाढते. संगीतात गती येते. तालाचं भान येतं. तंदुरुस्तीसह आत्मविश्वाास वाढतो.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऊर्जा सांगते की, ‘गेल्या वर्षी बॉम्बे फेस्ट परफॉर्मन्समध्ये मी विद्याíथनींसह सहभागी झाले होते. आम्ही ‘दिल तो पागल हैं’मधला माधुरी दीक्षितचा कथ्थकच्या प्रसंगावर आधारित बेली-कथ्थक फ्युजन केलं होतं. त्याला प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर लॉनजीनस फर्नाडिस यांची दिलखुलास कौतुकाची पावती मिळाली. भारतभरातून तिथं बेलीडान्स परफॉर्मर्स आले होते. पायाला अपघात झाल्यानंतरचा हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. तेव्हा पायात रॉड होता. अपघातातून सावरायला माहेर-सासऱ्यांच्या सगळ्यांचीच मदत झाली, तरी सर्वाधिक प्रेरणा आणि धीर आईने दिला. ती सतत पाठीशी उभी होती. नवरा राजेशने कायम पाठिंबा दिला. मीही जिद्दीने उभी राहिले. नृत्यानेच मला ही ‘ऊर्जा’ दिली.  त्या कार्यक्रमातल्या रसिकांना ही गोष्ट जाणवलीही नाही. त्यांचं स्टॅण्डिंग ओव्हेशन मिळालं होतं..’.  तिला माधुरी दीक्षितसाठी कोरिओग्राफी करायची आहे. स्वतचा डान्स स्टुडिओ काढायचा असून तिथे सर्व नृत्यप्रकार शिकवायचे आहेत. ‘मी व्हर्सटाइल आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांनीही तसं व्हावं,’ असं तिला फार वाटतं. तिला चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन करायचं आहे. तिला स्वतला बॉलीवूड कोरिओग्राफी आणि बेली डान्स-कथ्थक फ्युजन फारच भावतं. ती नृत्य प्रशिक्षकांना प्रशिक्षणही देते. तिने सांताक्रुझच्या ‘द योगा इन्स्टिट्यूट’मध्ये योग प्रशिक्षक प्रशिक्षणही घेतलं आहे. ‘चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट’ हे तिचं लाडकं वाक्य, तिच्या नृत्य प्रवासाला तंतोतंत लागू पडतं. तिच्या ‘तालबद्ध’ कलाप्रवासासाठी शुभेच्छा!

viva@expressindia.com