त्याचं आणि तिचं प्रेम जितकं सहज असतं तितकंच त्याचं त्याच्याशी असलेलं आणि तिचं तिच्याशी असलेलं प्रेम त्या अनेक परीकथांसारखं सहज व्यक्त होऊ शकतं? त्यांच्या प्रेमाची गोष्ट आजूबाजूचा समाजही तितक्या गोडीने ऐकेल, स्वीकारेल?

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, अशी सुरुवात करायची म्हटली तरी प्रेमाची गोष्ट आजच्या काळातही त्याच फॉम्र्युल्यांवरून धावतेय. त्याच्या मनातली ‘ती’ आणि तिच्या  मनातला ‘तो’ भेटायचा योग जुळून आला की तिच्या आजूबाजूला वाऱ्याची झुळूक इकडून तिकडे वाहू लागते, तिच्या केसांच्या बटांशी खेळत राहते. तो मंदिरात देवासमोर हात जोडून उभा असेल तर नेमकी त्याच वेळी देवासमोरची घंटा वाजते, त्याच्या बाजूला ती हात जोडून डोळे मिटून प्रार्थना करत उभी असते. वगैरे वगैरै असे अनेक योगायोग कित्येकदा व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने घडवले जातात. मात्र त्याचं आणि तिचं प्रेम जितकं सहज असतं तितकंच त्याचं त्याच्याशी असलेलं आणि तिचं तिच्याशी असलेलं प्रेम त्या अनेक परीकथांसारखं सहज व्यक्त होऊ शकतं? त्यांच्या प्रेमाची गोष्ट आजूबाजूचा समाजही तितक्या गोडीने ऐकेल, स्वीकारेल? जात, धर्म, प्रांत, वर्ण यापलीकडे जाणाऱ्या या तिसऱ्या प्रेमाची गोष्ट समाजात स्वत:ला वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या अशाच दोघांशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’ने केला..

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.. ही भावना सच्ची असली तरी समलिंगींसाठी आपला जोडीदार मिळवणं, त्याच्याप्रति असलेलं प्रेम साजरं करणं अजूनही तितकंसं सहजसोपं झालेलं नाही. ‘मी मिनाझुद्दीन काझी. पत्रकारितेचं शिक्षण घेणारा मी स्वत:ला गर्वाने एक क्वीर म्हणवतो,’ असे थेट सांगणारा मिनाझुद्दीन आपली प्रेमाची संकल्पनाही तितक्याच ठामपणे मांडतो. ‘मुळात प्रेम हा शब्द आणि त्याभोवती असणाऱ्या सर्व गोष्टी संवेदनशील आहेत. पण, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हे म्हणतात ना, ते अगदी खरंच आहे. सध्याच्या काळात मी स्वच्छंदपणे वावरतोय पण त्याच अर्थाने एक क्वीर म्हणून प्रेमाविषयी बोलताना दडपण आणि संकोचलेपण येणं या गोष्टी स्वाभाविक आहेत. किंबहुना समलिंगींच्या बाबतीत प्रेमाचा विचार करताना या नात्यातील गुंतागुंत समजून घेणं आणि त्याबद्दलच्या नकारी भावनांना तोंड देणं हेच आव्हान असतं,’ असं तो म्हणतो. प्रेमाची भावना त्यांच्या मनातही इतरांसारखीच रुंजी घालत असली तरी मुळात समलैंगिकतेला आपल्या देशात कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नसल्याने त्याबद्दल बरेच समज-गैरसमज जोडले गेले आहेत. आणि याच कारणाने ‘एलजीबीटीक्यू’चा एक भाग म्हणून कोणत्याही एखाद्या गोष्टीविषयी, व्यक्तीविषयी आपल्या भावना व्यक्त करताना आम्हाला काही अडचणी येतात, असं मिनाझुद्दीन म्हणतो.

‘देशात समलैंगिकता बेकायदेशीर असल्याने समाजाकडूनही या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिलं जातं. अशा वेळी जर लोकांच्या बुरसटलेल्या विचारसरणीला लढा देण्याची ताकद तुमच्यात नसेल तर तुम्हाला तुमची खरी ओळख लपवावीच लागते. मुळात समाजात काही गोष्टींना आणि नव्या बदलांना सामोरं जाताना सर्वकाही सुरळीत सुरू राहील अशी अपेक्षाच आपण करता कामा नये. कारण समाजातील काही वर्ग आजही काही गोष्टींच्या विरोधात आहेतच’, असे म्हणणारा मिनाझुद्दीन मुंबईसारख्या शहरात एकटं आणि स्वावलंबीपणे राहणं ही खूप महत्त्वाची आणि सोपी गोष्ट झाली आहे हेही मान्य करतो. मुळात दहा वर्षांपूर्वीची परिस्थिती फारच वेगळी होती. पण, आता हे चित्रं बदललं आहे. त्यामुळे आपण नक्कीच एका सकारात्मक बदलाकडे वाटचाल करतोय असं म्हणावं लागेल, हे त्याचं म्हणणं आहे. मात्र आपण समलिंगी आहोत हे कळायलाच अजूनही वेळ लागतो आणि मग पहिली प्रतिक्रिया ही अजूनही हेटाळणीचीच असते, असं आणखी एका समलिंगी मित्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.

‘मी कॉलेजमध्ये गेल्यावर मला ‘गे’ म्हणजे काय असतं याविषयी जास्त माहिती मिळाली आणि हो, मीसुद्धा यांचाच एक भाग आहे, हे कळायला मला क्षणाचाही विचार करावा लागला नाही. मी ‘गे’ असल्याचं ज्या वेळी सर्व मित्रांना सांगितलं तेव्हा माझ्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मला खटकला. किंबहुना त्यांच्या नजरेने माझ्या मनावर आघात झाले होते,’ असं तो सांगतो. समाजाने नाकारलं असलं तरी प्रेमाने मात्र जिंकलं आहे हे दोघंही मनमोकळेपणाने सांगतात. समलिंगी मित्राने तर त्याच्या पार्टनरच्या भेटीचा प्रेमभरा किस्साही सांगितला. ‘मित्रांनी वाळीत टाकल्यामुळे मी दु:खी होतो. त्यातून सावरण्यासाठी मला एकाची साथ मिळाली. गे मित्रमंडळींच्या उठण्या-बसण्यातच आमची ओळख झाली. मुळात त्याने मला स्वीकारणंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण एक वेळ अशी आली होती, जेव्हा माझ्या भावना, दु:ख वाटून घेण्यासाठी माझ्यासोबत कोणीच नव्हतं. त्या वेळी मी एकटाच पडलो होतो. काही पर्यायच नव्हता माझ्याकडे. पण, त्याची साथ मिळाली आणि परिस्थिती बदलली. आमचं नातं थोडं वेगळं होतं. रोमॅन्टिसिझम, इंटिमसी वगैरे या सर्व गोष्टींच्या पुढे जाऊन आम्ही भावनिकरीत्या एकमेकांशी जास्त जोडले गेलो होतो. मुळात शरीराने एकरूप होण्यापेक्षा आम्ही मनाने फारच जवळ आलो आणि तेच मला जास्त बळ देऊन गेलं. मला नाही माहीत तो माझी कुठवर साथ देईल. कारण, कुठलेही नियम आणि अटी एकमेकांवर न लादता आमचं हे नातं टिकलंय. आम्ही एकमेकांची साथ देतोय कारण, आम्हाला ते आवडतंय,’ असं सांगणारा तो समाजाने, मित्रांनी आपल्याला (वाळीत) टाकलं असलं तरीही त्याचा आपल्याला फायदाच झाल्याचं सांगत अशा सगळ्या नकारी गोष्टींना ‘लेट गो’ म्हणत मी आणि माझा पार्टनर यंदा आमचा दुसरा व्हॅलेंटाइन्स डे साजरा करतोय, असं आनंदाने म्हणतो.

मिनाझुद्दीनही व्हॅलेंटाइन्स डे आपल्यासाठी खास असून त्याचं महत्त्वं खूप जास्त आहे असं नमूद करतो. ‘प्रेमाची उधळण आणि त्या अनोख्या शब्दाचा कधीही न संपणारा उत्साह साजरा करण्याचा एक दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन्स डे. प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून हा दिवस ओळखला जातो. माझ्या आईने लहानपणापासूनच या दिवसाची एक वेगळी व्याख्या माझ्या मनात कोरली होती. व्हॅलेंटाइन्स डे म्हणजे प्रेमासाठी असणारा प्रेमाचाच दिवस, त्यात रोमॅन्टिसिझम नसला तरीही हरकत नाही. पण, प्रेम असणं तितकंच गरजेचं आहे,’ असं तो म्हणतो. त्याच्या मते माणूस, मग तो स्त्री-पुरुष असो किंवा समलिंगी, तृतीयपंथी असो.. तो सामाजिक प्राणी आहे. त्यांना एकमेकांशी बोलल्याशिवाय, नातं जोडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि इथेच प्रेमाची मात्र महत्त्वाची ठरते. म्हणूनच मानवी जीव, भावभावना आणि त्या व्यक्त करण्यासाठी मिळालेला व्हॅलेंटाइन्स डेसारखा प्रेमाचा दिवस या एकाच त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत, असं मिनाझुद्दीन सांगतो तेव्हा त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रेमभावनेलाही तितकीच मनापासून दाद दिल्याशिवाय राहवत नाही!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com