राहुल बामणे

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

आपल्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य अनुभवणे. मला असं वाटतं की आपण सगळेच त्यासाठी झटत असतो, पण आपल्याला ते मिळत नाही. मग आपल्याला ते कसे मिळेल हे आपण शिकतो. मी हे नेहमीच मानतो की प्रत्येक माणूस हा मुक्त आहे आणि मुक्ततेतच तो विवेकाने वागतो. काहीसा असाच अर्थ सांगणारी ही ओळ मला खूप जवळची आहे. प्रसिद्ध लेखक निकोलस स्पार्क यांची गाजलेली कादंबरी ‘द नोटबुक’.  या कादंबरीतील ही ओळ आहे ज्यातून मी खूप शिकलो. मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने त्यांच्या मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवं. ज्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत किंवा ते पुढे करू पाहतायेत त्याबद्दल पालकांनी अतिकाळजी करू नये. मला नेहमीच सुंदर ठिकाणं पहायची, फिरायची आवड आहे पण मला कधीच माझे आईवडील घराबाहेर जाऊ  देणार नाहीत. त्यांना माझी काळजी आहे हे खरं. पण काळजी आहे म्हणजे न जाऊ  देणं हे योग्य वाटत नाही.

मी स्वत: प्लॅन केला आणि मनाली, जयपूर, भोपाळ पाहायला गेलो. वीस दिवस मी वेगळ्या वातावरणात व वेगळ्या माणसांमध्ये होतो. मी स्वत:ला इतकं मुक्त कधीच अनुभवलं नव्हतं. माझे आईवडील माझ्यावर नाराज होते. मला असं वाटतं की आपल्याला आयुष्यभर किंवा एकदातरी आयुष्यात मुक्तपणे वावरायचं असेल तर आपल्या प्रियजनांना थोडं दुखावल्यास काहीच हरकत नाही. तुम्ही काही या जगात सर्वानाच आनंदी ठेवू शकत नाही. त्यांनी तुमच्यावर प्रेम केलंय तर ते नक्कीच तुम्हाला समजून घेतील, कारण संधी एकदाच येते आणि परत येते तेव्हा फार उशीर झालेला असतो. त्यामुळे काळजी करून कधीच आपल्या मुलांची भीती जात नाही. त्यांना मुक्त सोडलं की त्यांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळतो. पालकांच्या काळजीतच राहून मुलं पारतंत्र्यात जातात, कधीच स्वतंत्र होत नाहीत. कारण बाहेर पडल्यावरच इतर लोकांशी आपली ओळख वाढते, नाती बनतात, संवाद होतो. त्यामुळे मुक्त राहणं हा प्रत्येकाचा अधिकार नाही तर कर्तव्यच आहे.