ट्रेण्ड्स येतात आणि जातात. पण कपाटातील काही महत्त्वाच्या कपडय़ांचं स्थान कधीच कमी होत नाही. एरवी रोज रोज तेच कपडे घालायचा कंटाळा येतो, पण अडीअडचणीला मात्र हेच कपडे धावून येतात. याच बेसिक कपडय़ांची आज आठवण काढायचं कारण म्हणजे यंदाचा लेटेस्ट ट्रेण्ड जाणून घेण्याआधी हे कपडे तुमच्या कपाटात आहेत की नाहीत याची उजळणी पहिल्यांदा करून घ्या.
शाळेच्या पहिल्या दिवशी पाटीवर गिरवलेल्या बाराखडीची आठवण कोणी कधीच विसरत नाही. ‘क’ कमळाचा, ‘स’ सशाचाचं बोबडय़ा आवाजात पाठांतर करणाऱ्या चिमुरडय़ांच्या आवाजाने अख्खा वर्ग दुमदुमून जातो. पुढे आयुष्यात आपण मोठमोठे शब्द बोलायला, लिहायला शिकतो आणि बाराखडीचं पाठांतर मागे पडतं. पण अचानक कोणी तरी फोनवर बोलताना आपलं नाव चुकीचं उच्चारतो आणि ‘ण’ बाणातला, नळातला नाही, हे समजावून सांगताना त्या बाराखडीच्या सरावाची आठवण येते. अशी ही बाराखडी प्रत्येक क्षेत्रात असते. जेवण बनवायला शिकण्यापूर्वी पाणी कसं तापवायचं, भात कसा शिजवायचा, चपात्या गोल कशा लाटायच्या इथपासून सुरुवात केली जाते. प्रत्यक्षात वाहतुकीचे नियम पाळणं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न असला तरी गाडी चालवायला शिकवताना पहिल्यांदा हे नियम शिकवले जातात. दैनंदिन जीवनातील वर्तणुकीपासून ऑफिसमधील कामापर्यंत प्रत्येक बाबतीत नियम महत्त्वाचे असतात. त्यांचा आधार घेत पुढचं काम केलं जातं. कपडय़ांच्या बाबतीतसुद्धा तेच आहे. अगदी स्टायलिंग करायचं म्हटलं तरी पहिले मूळ नियम तुम्हाला ठाऊक आहेत की नाहीत, हे महत्त्वाचं असतं. त्यात कसे आणि किती बदल करावे हे प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. आज या फॅशनच्या बाराखडीबद्दल बोलायचं कारण म्हणजे तुमच्या कपाटात या बाराखडीतील किती कपडे आहेत याची उजळणी करायची आणि नसल्यास सगळ्यात आधी खांद्यावर पर्स मारून शॉपिंगला निघायची तयारी करायची. कारण यंदाच्या सीझनमध्ये तुमच्याकडे लेटेस्ट ट्रेण्डचे कपडे नसतील, तरी एक वेळ निभावून नेता येईल पण बेसिक लुक नसेल तर मात्र तुमची पंचाईत होऊ शकते.
जीन्स कितीही घ्या, पण एक ब्ल्यू जीन्स कपाटात हवीच. तुमचा फॉर्मल लुक कसाही असो पण एक काळी ट्राऊझर आणि सफेद शर्ट हे कपाटात हवेच. ए-लाइन स्कर्ट इज मस्ट. एक ब्लॅक हिल्सचे शूज असायलाच हवेत. लाल लिपस्टिक, वन पीस ड्रेस, सुंदर घडय़ाळ या आणि अशा कित्येक गोष्टी जेव्हा कधी फॅशन संदर्भातील लेख, व्हिडीओ पाहिले जातात त्यात आवर्जून यांचा उल्लेख केला जातो. एरवी आपल्याला याचं महत्त्व वाटत नाही. कारण आपल्या पसंतीचे असंख्य कपडे आपल्या कपाटात असतात. त्यात नवीन ट्रेण्ड, लुक यानुसार बदल होतच असतात. पण अशा वेळी अचानक इंटर्नशिपसाठी फोन येतो आणि आठवतं ‘अरेच्चा कॉलेज वॉर्डरोबमध्ये एकही फॉर्मल शर्ट नाही. जीन्स मुलाखतीला चालते का?’ मग ताई-दादाच्या कपाटावर नजर मारली जाते. अचानक पार्टीसाठी घेतलेले शू बाइट करायला लागतात तेव्हा कपाटात ठेवणीतील हिल्स नाहीत म्हणून नाराज होतो. ऑफिसमध्ये एखाद दिवशी साधासा लुक केल्यावर फक्त एका लाल लिपस्टिकने आलेला फ्रेशनेस जाणवतो. या आणि अशा असंख्य साध्या गोष्टी आपल्याला एरवी महत्त्वाच्या वाटत नाहीत. पण कित्येकदा आपल्या मदतीला धावून येतात. गेल्या काही महिन्यांपासून रेड कार्पेट, वेगवेगळ्या सोहळ्यांत कित्येक तारेतारका काही तरी वेगळे प्रयोग करण्याऐवजी सिम्पल लुक ठेवणं पसंत करतायेत. ‘बेसिक लुक’ हा सध्याच्या ट्रेण्डचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
फॅशन, लुक, स्टाइल यांची व्याख्या प्रत्येकानुसार बदलत जाते. एखाद्यासाठी ‘इन’ असलेला लुक कदाचित दुसऱ्याला आवडणार नाही. सध्या सोशल मीडिया, वृत्तपत्रे, मासिके यांच्यामध्ये फॅशनबद्दल इतकं बोललं जातं की नक्की काय घालावं, कोणता लुक ‘इन’ आणि कोणता ‘आउट’ याबद्दल असंख्य प्रश्न कित्येकांच्या मनात फिरत असतात. फक्त ते कोणी बोलून दाखवत नाहीत. कारण असे प्रश्न विचारणारा बावळट समजला जातो. त्यामुळे थोडक्यात वाऱ्याच्या दिशेने वाहण्याकडेच प्रत्येकाची पसंती असते. मुळात स्टायलिंग ही देखील एक कला आहे आणि ती अवगत करायची असेल तर त्याच्या बाराखडीला हात लावायला हवाच. मग ती सुरुवात वयाच्या साठाव्या वर्षी करा किंवा विसाव्या. पण फसगत न करता सहजतेने स्टायलिंगची वात धरायची असेल, तर कधी तरी बेसिक लुकची ओळख करून घ्यावी लागणारच. सध्या कित्येक जण हा विचार करीत काही तरी फॅ न्सी करण्यापेक्षा साधा, सुंदर लुक ठेवण्याला पसंती देत आहेत. बेसिक लुक साधासा असला, तरी त्यात फसण्याची शक्यता खूप कमी असते. आणि तुम्हाला तो साजेसा दिसेल, याची खात्री तर नक्कीच असते. त्यामुळे साहजिकच तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो. त्यामुळे पुढचे प्रयोग, ट्रेण्ड पाळायला तुम्हाला हुरूप मिळतो. पुन्हा एकदा तुम्हाला मुख्य नियम माहीत असले तर त्यात काय प्रयोग करता येतील याच्या कल्पनासुद्धा सुचतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, तर फॉर्मल लुकमध्ये पेस्टल शेड्स, क्रिस्प सूट आणि नीटनेटका लुक गरजेचा असतो, हे एकदा लक्षात आलं की ऑफिसमध्ये किती वेगवेगळे कपडे कसे घालता येऊ शकतात याचा विचार करता येतो. एखाद वेळी कपडय़ांचे नियम पाळून दागिन्यांची जोड देत नवीन प्रयोग करता येतील का, हेही करून पाहता येतं.
पण यासाठी मुळात बेसिक कपडे आणि लुक कोणते आणि ते कसे कॅरी करावेत हे ठाऊक असलं पाहिजे. ब्ल्यू जीन्स आणि सफेद शर्ट ही मूळ जोडी मानली जाते. कारण ती कोणत्याही प्रहरी, कोणत्याही कार्यक्रमाला घालता येते. फक्त त्याला काही अॅक्सेसरीजची जोड द्यावी लागते. उदाहरणार्थ, शर्टवर छोटंसं पेंडेंट घातल्यास ऑफिस लुक होईल. एखादा लांब श्रग आणि नेकपीस घातल्यास टी-पार्टीसाठी छान दिसेल. ब्राइट जॅकेट आणि हाय हिल्स रात्रीच्या पार्टीसाठी मदतीला येऊ शकतात. स्कार्फ घातल्यास छान ट्रिपचा लुक होईल. यात तुम्ही प्रयोग कराल तितके कमी आहेत. पण या सगळ्यांचं मूळ एक जीन्स आणि शर्ट असेल. हीच बाब वन पीस ड्रेसची. लेगिंग, श्रग, जीन्स अशा वेगवेगळा कपडय़ांसोबत तुम्ही तो घालू शकता. मॅक्सी ड्रेस, स्कर्टसोबतसुद्धा असे प्रयोग करता येतात. मुळात या बेसिक कपडय़ांमुळे तुम्हाला वेगवेगळे लुक करायची संधी मिळते आणि त्यामुळे शॉपिंगची कटकटसुद्धा खूप कमी होते. त्यामुळे यंदा कपाटात फॅशनच्या या बाराखडीला थोडी जागा नक्कीच करा.
मृणाल भगत viva@expressindia.com