फिरणं हा छंद खरा.. पण या छंदापायी नोकरी-व्यवसाय सोडून पूर्ण वेळ भटकंतीत रमायचं आणि जगण्याबरोबरच अर्थार्जनाच्या नव्या वाटा धुंडाळायच्या हे धाडस सध्या तरुणाई करताना दिसते आहे. हे धाडस करणाऱ्या अनोख्या फिरस्त्यांशी बोलून त्यांना सापडलेल्या भटकंतीच्या नव्या अर्थाविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

सकाळचा गजर झाल्यानंतर इच्छा नसतानाही अंथरुणातून उठतेवेळी नेहमीच्या सवयीप्रमाणे आपला हात उशाशी असणाऱ्या मोबाइलकडे जातो. लगेचच इंटरनेट सुरू करून इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर काही अपडेट आहे का, कोणाचा मेसेज आहे का, हे पाहण्यासाठीच जणू दिवस उजाडलेला असतो. स्क्रोल.. स्क्रोल.. करत असतानाच काही असे फोटो नजरेत येतात आणि मग अरे.. राव आपण काय करतोय इथे.. संपूर्ण जग भटकतंय.. अशा भावनेने आपण पूर्णपणे एका वेगळ्याच दुनियेत जातो. मग तो गजर वाजून वाजून त्याचा आवाज बसला तरीही चालेल. आपण, मात्र त्या फिरस्तीच्या दुनियेतून काही केल्या बाहेर पडत नाही. फिरणं हा छंद खरा.. पण या छंदापायी नोकरी-व्यवसाय सोडून पूर्ण वेळ भटकंतीत रमायचं आणि जगण्याबरोबरच अर्थार्जनाच्या नव्या वाटा धुंडाळायच्या हे धाडस सध्या तरुणाई करताना दिसते आहे. हे धाडस करणाऱ्या अनोख्या फिरस्त्यांशी बोलून त्यांना सापडलेल्या भटकंतीच्या नव्या अर्थाविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

सोशल मीडियावर सध्या ज्या रोमांचक प्रवासाची चर्चा आहे तो प्रवास सुरू केला आहे प्रियांका म्हात्रे आणि प्रदीप राणा या दोन प्रतिष्ठित कंपनीत काम करणाऱ्यांनी.. क न्टेन्ट प्रोडय़ुसर म्हणून ‘रिलायन्स जिओ’मध्ये काम करणाऱ्या या दोघांनीही त्यांच्या फिरण्याच्या आवडीचा एकंदर अंदाज घेत असा निर्णय घेतला, जो कदाचित तुम्ही-आम्ही घेताना निदान चारदा तरी विचार केलाच असता. नोकरीवर पाणी सोडत या दोघांनीही भारत-भ्रमणाचा निर्णय घेत एका अनोख्या प्रवासाला सुरुवात करण्याचा बेत आखला. आयुष्यातील महत्त्वाच्या अशा भटकंतीसाठी त्यांनी सलग शंभर दिवस प्रवास करण्याचं ठरवलं. ज्यामध्ये शक्य तितका भारत एका वेगळ्याच नजरेने पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. एखादी गोष्ट ज्या वेळी माणसाच्या मनात बसते तेव्हा ती मिळवण्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करतेच. पण त्यासोबतच नशीबही अशी काही खेळी खेळतं की अदृश्य शक्ती वगैरे न मानणाऱ्यांनासुद्धा एका वेगळ्याच अस्तित्वाची अनुभूती होते. अशा या शंभरीच्या रोमांचक प्रवासाविषयी प्रियांका आणि प्रदीप या दोघांनीही ‘लोकसत्ता व्हिवा’शी गप्पा मारल्या.

जवळपास सात महिने आधीपासूनच भारतात प्रवास करण्याचा बेत या दोघांनी आखला. सुरुवातीलाच त्यांनी सर्व नकारात्मक विचार दूर सारले. वाईट होऊ न होऊ न काय होईल, कोणीही या प्रवासाची प्रशंसा करणार नाही, आपण पोस्ट करत असलेले व्हिडीओ पाहणार नाही, फोटो पाहणार नाही, कोणी आपली दखल घेणार नाही. याहून वाईट काय होणार? आपण मुळात हा प्रवास इतरांसाठी नव्हे तर एका अद्भुत अनुभवासाठी करत आहोत हे पक्कं ठरवत नकारी विचारांचा हा कागदी बोळा त्यांनी दूर फेकून दिला. सर्व गोष्टींची नीट आखणी करत अखेर २०१७ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ या फिरस्तीच्या नव्या जगात प्रवेश केला. या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी दोघांनीही रीतसरपणे आपापल्या कुटुंबांची परवानगी घेतली. आपल्या मुलांवर विश्वास असल्यामुळे आणि त्यांची आतापर्यंतची वाटचाल पाहता प्रियांका आणि प्रदीप या दोघांच्याही घरातल्या मंडळींनी त्यांच्या या भारत-भ्रमणाच्या निर्णयावर आक्षेप घेतला नाही. घरातल्यांची ही भूमिका पाहून त्यांना आम्ही धक्का देण्याऐवजी त्यांनीच आम्हाला धक्का दिला होता, असं प्रियांकाने सांगितलं.

प्रियांका आणि प्रदीप यांच्या प्रवासाचं नामकरणही ‘रोमांचक’ झालं. या नावामागचं गुपित उलगडताना प्रियांकाने सांगितलं, ‘प्रवासाची सुरुवात करत असते वेळी काही तरी आकर्षक आणि मनाला भिडणाऱ्या पण प्रवासाशी निगडितच अशा नावाची निवड करण्याचा आमचा अट्टहास होता. बरेच दिवस नावासाठीचा हा खटाटोप सुरू होता. अखेर प्रदीपने मला ‘रोमांचक’ हे नाव सुचवलं. इथे ‘रोम’चा अर्थ फिरणे असा होतो, ज्यामुळे आमच्या या नावाला एक चांगलाच अर्थही मिळाला होता’.

फेब्रुवारी महिन्यापासून या दोघांनी त्यांच्या अफलातून प्रवासाला सुरुवात केली. ‘कांधे पे मेरा बस्ता.. ले चला मुझे रस्ता’ असं म्हणत ही भटकी जोडी देशाच्या उत्तर-पूर्व भागात जाऊ न पोहोचली. सहसा प्रवाशांच्या नजरेपासून डावलल्या जाणाऱ्या या पट्टय़ापासूनच त्यांना प्रवासाची सुरुवात करायची होती आणि त्यांनी ती केलीसुद्धा. त्याच भागात असतेवेळी त्यांनी भारताची सीमासुद्धा ओलांडली. उत्तर पूर्व भारतात पाहण्याजोग्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्या सौंदर्याने आपण भारावून जातो, असं प्रियांकाने आवर्जून सांगितलं. मणिपूर, नागालॅण्ड, आसाम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, तेलंगणा असं करत करत आता हे ‘रोमांचक’ प्रवासी येऊ न पोहोचले आहेत केरळमध्ये. इथून त्यांचा प्रवास भारताच्या उत्तरेकडील राज्यांच्या दिशेने सुरू होईल आणि त्यानंतर अखेर मुंबईतच त्यांच्या प्रवासाचा शेवट होईल. पण हा प्रवासाचा शेवट नसेल असं प्रियांका म्हणते. कारण प्रत्येक गोष्टीच्याशेवटामध्येही एक सुरुवात दडलेली असते. त्यामुळे हा प्रवास संपतेवेळी आणखी एका रंजक प्रवासाची कुठे तरी सुरुवात झाली असेल, असं तिचं म्हणणं आहे.

प्रियांका आणि प्रदीप हे दोघंही फिरण्यासाठी उत्साही असल्यामुळे प्रत्येक राज्यातील सार्वजनिक दळणवळणाच्या सोयीसुविधांचा त्यांनी वापर केला आणि यापुढच्या प्रवासातही ते याच मार्गाचा अवलंब करत आहेत. टेम्पो म्हणू नका किंवा राज्य परिवहन, नगर निगमच्या बस म्हणू नका. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फिरता कसं येईल हाच त्यांचा मुख्य हेतू आहे. याविषयीच सांगताना प्रदीप म्हणाला, ‘या प्रवासात आम्हाला स्थानिकांची बरीच मदत होते आहे. शंभर दिवसांचं सामान, सोबत कॅमेरे आणि इतर सामानाच्या बॅगा आणि गडगंज भरलेली उत्साहाची रांजणं घेऊ न आम्ही पुढे जातोय. यामध्ये काही ठिकाणी आम्हाला भाषेची अडचण आली. कित्येकदा तर आम्ही हातवाऱ्यांच्या भाषेत आमचं म्हणणं समोरच्यांना पटवून सांगितलं. पण या सगळ्यातून आम्हाला खूप काही शिकता आलं’.

प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जातो. त्याचप्रमाणे खूप काही देऊ नसुद्धा जातो. या प्रवासातील एक अफलातून ठिकाण कोणतं, असा प्रश्न विचारला असता प्रदीपने मणिपूरमधील ‘लोकताक लेक’चा उल्लेख केला. स्वित्झर्लंडमध्ये असतेवेळी त्याने अशा पद्धतीचा लेक (तलाव) पाहिला होता. त्या वेळी ही परदेशातली ठिकाणं काय सुरेख असतात ना, असाच विचार त्यांच्या मनात घर करून गेला. पण परदेशाची भुरळ असलेल्या याच प्रदीपने जेव्हा ‘लोकताक लेक’ पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्याचं पारणं फिटलं. एखाद्या तलावावर वर्तुळाकारामध्ये हजारो लहान लहान बेटं तयार झालेली पाहून निसर्गाची ही किमया त्याला अविश्वसनीय वाटली.

निसर्गाच्या या अनोख्या रूपांचं दर्शन घेत पावलोपावली काही तरी नवा अनुभव आपल्या साथीने घेणाऱ्या या दोन्ही प्रवासवेडय़ांनी पुढे जाऊ न त्याच साचेबद्ध नोकरीकडे न वळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी फिरण्याच्याच क्षेत्रात काही तरी नवं करण्याची, प्रवासवेडय़ा तरुण-तरुणींसाठी आपला देश आणि इतर दुर्गम भागात असणाऱ्या पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी त्यांनी ‘रोमांचक’ हाच ब्रँड पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

शंभर दिवसांच्या या प्रवासात राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी पैसे लागतातच, पण याच पैशांची आखणी करण्यासाठी आणि संपूर्ण प्रवासादरम्यान आर्थिक गणित बिघडू नये यासाठी त्या दोघांनी बरंच आधीपासून नियोजन केलं होतं. पार्टी वगैरे करणं बंद केलं होतं. काही सवयी बदलल्या होत्या. ज्या प्रवासासाठी या दोघांनीही त्यांच्या नोकरीचा त्याग केला त्याच प्रवासाने आज प्रियांका आणि प्रदीपला खूप गोष्टी देऊ  केल्या आहेत. आपल्या मनाचं ऐका, ते तुम्हाला कधीही चुकीचा निर्णय घ्यायला लावत नाही. अर्थात, अनेकदा मनाला दूर सारत आपल्याला वास्तवाचा स्वीकार करावा लागतो हे जरी खरं असलं तरीही काही निर्णय असे असतात, जे तुम्हाला कधीच पश्चात्तापाला सामोरं जाऊ  देत नाहीत. त्यामुळे जस्ट गो विथ द फ्लो अँड फॉलो युवर हार्ट हा महत्त्वाचा मंत्र प्रदीपने दिला. तर सध्या सुरू असणाऱ्या सर्व घटना आणि मुख्य म्हणजे एक मुलगी म्हणून प्रवासासाठी निघालेल्या प्रियांकाचंही आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करत कोणत्याही अडचणींवर तुम्ही मात करू शकता, असंच सगळ्यांना सांगणं आहे.

‘रोमांचक’ या नावाने प्रियांका आणि प्रदीपने सुरू केलेला प्रवास सोशल मीडियावरही याच नावाने अनेकांचं लक्ष वेधतो आहे. या प्रवासातील काही धमाल क्षण आणि अनुभवांचे व्हिडीओही त्यांनी पोस्ट केले आहेत, त्यामुळे प्रवासवेडय़ा मित्रमंडळींसाठी हा एक वेगळाच ठेवा आहे, असं म्हणायला हरकत नाही. अवघ्या दोन व्यक्तींनी मोठय़ा उत्साहात सुरू केलेला हा प्रवास आज इतक्या ठिकाणच्या वाटांवरून पुढे गेला आहे की, त्यांचा परिवारही मोठा झाला आहे. वाटेत भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दोघांनीही आपल्या ‘रोमांचक’ कुटुंबातील साथीदार केलं आहे. त्या प्रत्येक चेहऱ्याने आपल्याला खूप काही दिलं, आठवणींचा खजिना दिला आणि मुख्य म्हणजे आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला, असं ते दोघंही न विसरता सांगतात. अध्र्यावर आलेला त्यांचा हा प्रवास आता इतक्या रंजक वळणावर आहे की जर तुम्हीही या प्रवासात त्यांची साथ देऊ इच्छिता तर तुमचं स्वागतच आहे, असं म्हणत हे प्रवासी तुमच्या साथीनेही प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत.. तेव्हा मग काही बेत होतोय का या भटक्या मित्रांसोबतच अविस्मरणीय सफरीवर जाण्याचा?

मनाने फिरण्याचा कौल दिला आणि..

साचेबद्ध आयुष्य हा हल्लीच्या तरुणाईचा शत्रूच झाला आहे. ठरावीक वेळेत नोकरी करून आठवडय़ाच्या शेवटी मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असं म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्याच गर्दीमध्ये असणारा एक भटका मित्र म्हणजे सबिजीत कुमार. कोटक महिंद्रा बँकेत की अकाऊं ट्स मॅनेजर या पदावर नोकरी करणाऱ्या सबिजीतने करिअरमध्ये काही तरी वेगळं करण्याच्या उद्देशाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामध्ये कुटुंबीयांचीही साथ लाभली. तुला अमुक एकाच गोष्टीत पुढे जायचं आहे का, हा एकच प्रश्न घरातल्या मंडळींनी त्याला केला आणि त्यांच्याच सहमतीने सबिजीतने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली.

महाविद्यालयीन दिवसांपासून असणाऱ्या मित्रांच्या साथीने त्यांनी एक स्टार्टअप सुरू केला. ज्यामध्ये बॅकपॅकिंग टूर्सचं नियोजन करण्यासोबतच ट्रेकिंग आणि सायकलिंगचं आयोजन करण्यावरही त्यांनी भर दिला. ही कल्पना फार आधीपासूनच सबिजीत आणि त्याच्या मित्रांच्या मनात घर करून होती. पण प्रत्येक जण महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरीच्या व्यापात इतका गुंतून गेला की या गोष्टीकडे पूर्णवेळ लक्ष देणं अशक्य होत होतं. अखेर सबिजीतने नोकरी सोडून या फिरस्तीच्या नव्या जगातच आपला पुढचा वेळ व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.

विविध ठिकाणी फिरणं ही केवळ आवड नसून या एका गोष्टीने मनात असं काही घर केलं होतं की त्याच आपल्या आवडीच्याच गोष्टीमध्ये काही तरी उल्लेखनीय काम करून आनंद मिळवण्याचा त्याने निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्याने आपली आवड इतरांपर्यंत पोहोचवण्याचंही महत्त्वाचं काम केलं. आयुष्यात काही गोष्टींची संधी एकदा हुकली की ती परत सहसा तुमच्या वाटय़ाला येत नाही याच एका मताच्या सबिजीतने जो होगा देखा जाएगा, असं म्हणत या क्षेत्रात उडी मारली. आतापर्यंत तो बऱ्याच ठिकाणी फिरला आहे. सरपासच्या ट्रेकने मला निसर्गाच्या सुरेख रूपाचं दर्शन घडवलं तर मित्रांच्या साथीने केलेल्या रोड ट्रीपदरम्यान बिघडलेल्या कारच्या त्या अनुभवानेही मला एक वेगळी शिकवण दिली, असं सबिजीत आवर्जून सांगतो. प्रवास म्हणजे काय, तर प्रवास म्हणजे नव्या लोकांना भेटण्यासोबतच त्यांच्याशी एकरूप होणं, त्यांच्या संस्कृतीला अधिक जवळून न्याहाळणं आणि अनपेक्षित पण तितक्याच हव्याहव्याशा क्षणांचा साक्षीदार होणं ही सरळ आणि सोपी व्याख्या सबिजीतच्या बोलण्यातून उलगडली.

viva@expressindia.com