हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

माणसाच्या मुख्य गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. पैकी अन्न आणि निवारा तो सर्वत्र सोबत घेऊन फिरत नसला तरी वस्त्र त्याच्यासोबत सदैव असते. अनेकदा त्याची ओळख वस्त्रांमुळे निर्माण होते. त्यातही स्त्रियांसाठी कपडय़ांचे अगणित ब्रॅण्ड आहेत. तर पुरुषांच्या मर्यादित पण क्लासी ब्रॅण्डमध्ये परिपूर्णतेचा अनुभव देणारा ब्रॅण्ड म्हणजे रेमंड. लग्नखरेदी, भेटवस्तूंची देवाणघेवाण यात भरपूर पैसे खर्च करायची पूर्ण तयारी असल्यास नि:संशयपणे डोळे बंद करून विश्वास ठेवता येईल असा हा ब्रॅण्ड आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी.

लाला कमलपत सिंघानिया मूळचे राजस्थान शेखावती भागातील सिंघाणा या छोटय़ाशा भागातील व्यावसायिक. ते स्थायिक झाले, कानपूर येथे. १९२१ मध्ये ब्रिटिश आमदानीत फक्त भारतीय भांडवल, कामगार, कच्चा माल आणि व्यवस्थापन पद्धती वापरून लाला कमलापत यांनी जेके कॉटन कंपनी सुरू केली. एकप्रकारे स्वदेशी चळवळीला दिलेला तो पाठिंबा होता. जेके कॉटन कंपनी उत्कृष्ट मटेरियल सह गणवेशासाठीचे कापड तयार करत असे. १९२५ मध्ये विशेष करून सैनिकांच्या कपडय़ांची मागणी वाढली. यादरम्यान दूरदृष्टी राखत वाडिया नामक एका वृद्ध गृहस्थांनी मुंबईपासून जवळच वूल मिल सुरू केली होती. वयोमानानुसार ती सांभाळणं न जमल्याने वाडीया यांनी ती मिल डी.ससून कंपनीला विकली. त्या कंपनीने या वूल मिलचं नामकरण ‘रेमंड वुल मिल’ असं केलं. ससून कंपनीतील अत्यंत महत्त्वाचं नाव, अल्बर्ट रेमंड यांच्या नावावरून ते देण्यात आलं होतं. कालांतराने जेके कंपनीने ही वूल मिल विकत घेतली आणि सिंघानिया परिवारासह रेमंडचे धागे जुळले.

रेमंड कंपनीचा मुख्य कच्चा माल होता लोकर, जी ऑस्ट्रेलियाहून येत असे. पण लवकरच कंपनीने सुटासाठी लागणारं सर्वोत्तम मटेरियल बनवण्याकरिता आवश्यक लोकर स्पिनिंग, डायिंग, फिनिशिंगचं आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलं. १९५६ मध्ये रेमंड कंपनीला फिजी देशातून एक छोटीशी ऑर्डर मिळाली. तिथून रेमंड हे नाव जगभर पसरायला वेळ लागला नाही. फिजी नंतर स्वीडन असं करत करत हा नावाने इंग्रजी पण अस्सल भारतीय ब्रॅण्ड लोकप्रिय होऊ  लागला.

भारताचा विचार करता इथे सुटाबुटातलं वातावरण फारसं पूरक नसलं तरी एक असा विशिष्ट वर्ग निश्चित आहे जो केवळ सुटाबुटात वावरतो. त्यापलीकडे एक असा वर्ग आहे जो आयुष्यात एकदा का होईना सूट शिवतो. अथवा भारीतील सूटिंग शर्टिग मटेरियल वापरतो. त्यांच्यासाठी रेमंड हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला. या ब्रँडिंगमध्ये रेमंडच्या जाहिरातींचा वाटा मोठा आहे. इतर कोणत्याही सूटिंग शर्टिगच्या जाहिरातीपेक्षा रेमंडचा ‘द कम्प्लिट मॅन’ प्रभावी ठरला. जाहिरातीतल्या पुरुष मॉडेलला केवळ शोभेचा बाहुला न बनवता त्याला वडील, नवरा, मुलगा, बिझनेसमन अशा जबाबदार रूपात रेमंडने सादर केले. याच दर्जेदार जाहिरातींमुळे रेमंड म्हणजे दर्जा, रेमंड म्हणजे हाय क्लास हे समीकरण मनामनांवर कोरलं गेलं. उच्चपदावर असूनही शाळेतील शिक्षकांचा आदर करणारा, पत्नीची कामावर जातानाची अस्वस्थता समजून घरी बाळाला सांभाळणारा, परदेशी पोस्टिंग झाल्यावर आईला सोबत नेणारा आदर्श पुरुष या जाहिरातीत दिसला. त्यातून या ब्रॅण्डने एक विश्वास निर्माण केला.

आज ५५ देशांत ४०० शहरांतील ३०,००० दुकानांत हा ब्रॅण्ड विस्तारला आहे. दर वर्षी साधारणपणे ३३ लाख मीटर कापड रेमंड तयार करते. त्यात २०,००० विविध डिझाइन्स आणि वैविध्यपूर्ण रंगांचा समावेश आहे. सध्या भारतीय वातावरणास अनुसरून लिनन कपडय़ांचं उत्पादन रेमंडने सुरू केलं आहे. रेमंड अंतर्गत येणारे ब्रॅण्ड म्हणजे पार्क अ‍ॅव्हेन्यू, कलर प्लस आणि पार्क्‍स.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ब्रॅण्डला मोस्ट ट्रस्टेड ब्रॅण्ड, आऊटस्टॅण्डिंग एक्स्पोर्ट ब्रॅण्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या प्रवासात विजयपत सिंघानिया यांचं योगदान मोठं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा ब्रॅण्ड मोठा झाला. पण मध्यंतरी त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया याने वडिलांना दिलेली वागणूक हा चर्चेचा विषय ठरला होता. तरीही या चढ उतारांसह रेमंड ब्रॅण्ड निश्चितच एक अत्यंत मोठा आणि नामवंत ब्रॅण्ड ठरावा. कपडय़ांपलीकडे माणसांची ओळख असते हे मान्य केलं तरी काही वेळा कपडे किंवा एखादा विशिष्ट ब्रॅण्ड तुम्हाला एक आत्मविश्वास देत असतो. कपडय़ांमुळे कर्तृत्व सिद्ध होत नसलं तरी कपडे तुमचं कर्तृत्व काही वेळा अधोरेखित करतात. त्यादृष्टीने पुरुषवर्गाला पूर्णत्वाचा अनुभव देणारा कम्प्लिट मॅनचा कम्प्लिट ब्रॅण्ड म्हणजे रेमंड!

रश्मि वारंग viva@expressindia.com