स्त्रीवाद म्हणजे पुरुषविरोध किंवा फेमिनिझम म्हणजे स्त्री विरुद्ध पुरुष असा गैरसमज घेऊन अनेक जण जगत असतात; पण समाजातल्या तिच्यासाठी तोदेखील उभा राहतो, मुलांना या सगळ्याविषयी काय वाटतं हे विचारलं. त्यातील निवडक प्रतिक्रिया..

जो औरत का एक सच्चा साथी है, असली दोस्त है, हमदर्द है.. सच तो यह है, वही मर्द है ! एका कार्यक्रमात फरहान अख्तर याने सादर केलेल्या कवितेतल्या या काही ओळी. पुरुषांनी फेमिनिस्ट व्हायला हवं, असं तो नेहमी सांगतो. ‘ही फॉर शी’ या कॅम्पेनच्या वेळी मुलाखतीत त्यानं हाच मुद्दा उचलून धरला होता. ‘मेन अगेन्स्ट रेप अँड डिस्क्रिमिनेशन’ अर्थात मर्द ही मोहिम फरहान अख्तरने सुरू केली आहे. स्त्रीवाद म्हणजे काही तरी स्त्रियांसाठी चांगलं आणि पुरुषांच्या विरोधी असा गैरसमज अनेकांना असतो. स्त्रीवाद म्हणजे पितृसत्ताक पद्धतीकडून मातृसत्ताक पद्धतीकडे जाणे किंवा स्त्रियांना पुरुषापेक्षा श्रेष्ठ ठरवणे असा नसून समानतेसाठी केलेली चळवळ आहे. याबद्दल विचारले असता मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थी सागर मोहन म्हणाला, ‘‘काही जण पितृसत्ताक पद्धतीला मातृसत्ताक पद्धत ही पर्याय म्हणून मानतात; पण माझ्या मते समता आणि कौटुंबिक लोकशाही समाजासाठी चांगली आहे. जो समाज स्त्रियांचा आदर करत नाही तो नैतिकदृष्टय़ा भ्रष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करतो.’’

कौस्तुभ हिले या तरुण कलाकाराने ‘सीझ्ड’ या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. या लघुपटाला महाराष्ट्र इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०१६ मध्ये नामांकन मिळालं होतं. या लघुपटात मुलींचा प्रॅक्टिकल अ‍ॅप्रोच, पूर्वग्रहविरहित दृष्टिकोनातून मांडला होता. कुणाचीही वाट न पाहता स्वत:चे निर्णय स्वत: घेणाऱ्या एका मुलीचं पात्र आपल्याला यात दिसतं. एकटीने लढण्याची वृत्ती दाखवण्यासाठी त्यातली स्त्री भूमिका अत्यंत प्रभावीपणे लघुपटात मांडली आहे. फेमिनिझमबद्दल कौस्तुभ म्हणतो, ‘‘फेमिनिझम म्हणजे स्त्री व पुरुषांना समान हक्क असणं; पण स्त्रीवाद म्हणजे पुरुषविरोधी किंवा पुरुषांना कमी लेखणं असा चुकीचा समज लोकांना असतो. मी ज्या वेळी शॉर्ट फिल्म बनवतो तेव्हा मुद्दाम ठरवून काही करत नाही; पण माझ्या कथेतलं स्त्री पात्र हे एक सक्षम पात्र म्हणूनच दिसतं. जे मी अनुभवतो ते माझ्या कलाकृतीमध्ये येतं आणि स्त्रिया कुठेही कमी नाहीत असं मला वाटतं.’’

संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचा विद्यार्थी गणेश जाधव म्हणतो, ‘‘स्त्रियांनादेखील पुरुषांसारखेच समान हक्क मिळायला हवेत. महाराष्ट्रात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं कमी प्रमाण बरंच काही सांगतं. स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार तोपर्यंत थांबणार नाहीत जोपर्यंत यावर लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून आपण त्यांना स्वीकारत नाही. आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय पातळीवर जोपर्यंत स्त्रियांना समान हक्क मिळत नाहीत तोपर्यंत स्त्री-पुरुष समानता येणार नाही. त्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे.’’

अन्याय करणारा हा बऱ्याचदा पुरुष असतो असा समज आहे. तसेच स्त्रीवादासाठी केवळ महिलाच पुढाकार घेतात असंही नाही. काही पुरुषदेखील विविध माध्यमांतून याविषयी व्यक्त होताना दिसतात. त्यामुळे स्त्रीवादाचा पुरस्कार करणारी व्यक्ती पुरुषांचा तिरस्कार करते असा याचा अर्थ नाही हे स्पष्ट होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva.loksatta@gmail.com