उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या खाबू मोशायला भेजा मसाला, कबाब, पावभाजी अशा ज्वलंत पदार्थाचा दिदारही नकोसा वाटू लागला. रेगिस्तानच्या तापलेल्या वाळूत एखादा काफिला पाण्याच्या शोधात निघावा, तसा खाबू मोशाय थंडाव्याच्या शोधात निघाला आणि मुंबईतल्या हाजी अली दग्र्याच्या पायाशी गेला. या भागातील हाजीअली ज्युस सेंटरमध्ये मिळणारा फ्रुट क्रीम हा पदार्थ खाऊन खाबू मोशायच्या दिलाला थोडीशी तसल्ली मिळाली..
गर्मीचे दिवस सुरू झाले आणि खाबू मोशाय पाण्याबाहेर काढलेल्या मछलीसारखा तडफडायला लागला. अस्मानात आफताब अगदीच तपळत्या शमशेरीसारखा तळपतोय म्हटल्यावर खाबू मोशायचा जीव कासावीस झाला. गर्मीच्या दिवसांत बटेर लोकांचे जे हाल होतात, तीच परेशानी खाबू मोशायला पण छळू लागली. आलू बुखार वगैरे फळं कुठे मिळतात का, त्याचा शोधही खाबू मोशाय घ्यायला लागला. पण व्यर्थ!
मुंबईच्या गल्लोगल्लीत फिरताना खाबू मोशायला थंडाईची गरज होती. समोर तळलेले कबाब दिसत होते, तव्यावर फडफडणारे भेजे दिसत होते, कुठे बटरमध्ये लोळणारी पावभाजी पुकारा देत होती, तर कुठे टोस्टरमध्ये तयार झालेलं सँडविच बोलवत होतं.. पण खाबू मोशायला या कोणत्याही पदार्थाचा स्वादही घ्यावासा वाटे ना! अखेर खाबू मोशायने कुछ अलग ट्राय करनेंका सोचा. त्यासाठी वाट्टेल ती पायपीट करण्याची तयारीही खाबू मोशायने ठेवली. अखेर एका संध्याकाळी खाबू मोशायला एका वेगळ्याच आणि ठंडय़ा पदार्थाची माहिती मिळाली. हा पदार्थ म्हणजे फ्रुट क्रीम. बोले तो फल और मलई!
वरळीहून नेहरू सेंटरच्या पुढे आलं की, हाजीअली जंक्शनपर्यंतचा सगळा रस्ता समुद्राच्या संगतीने आहे. या हाजीअली जंक्शनला लागल्यानंतर समोर हिरा-पन्ना मार्केट दिसतं. हिरा-पन्नाकडे पाठ करून उभं राहिलं की, समुद्राच्या बाजूलाच हाजीअली ज्युस सेंटर नावाचं एक ज्युस सेंटर आहे. मुंबईतल्या कच्च्याबच्च्यांनाही या ज्युस सेंटरची माहिती आहे. कारण समुद्रातल्या हाजी अली दग्र्याला एकदा तरी भेट दिलेली असते. त्या दग्र्यापर्यंत पायपीट करून झाली की, बाहेर येऊन हाजीअली ज्युस सेंटरवर किमानपक्षी ज्युस प्यायला असतोच! या ज्यूस सेंटरमध्येच फ्रुट क्रीम हा अद्भुत पदार्थ मिळतो.
एका मोठय़ा बाऊलमध्ये तुम्हाला आवडतील त्या फळांच्या फोडी, त्याच्यावर भरपूर सारं क्रीम असा हा पदार्थ तयार होतो. एका अर्थी हे फ्रुट सॅलड म्हटलं, तरी चालेल. पण तो या डिशचा अपमानच ठरेल. कारण फ्रुट क्रीममध्ये फळांचं अस्तित्व न पुसता ते वाढवून त्याला क्रीमचा मुलामा दिला जातो. इथलं वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक मोसमात पिकणाऱ्या फळांची फ्रुट क्रीम्स इथे विकली जातात. खाबू मोशायची वैयक्तिक आवड म्हणजे सीताफळ क्रीम, मँगो क्रीम आणि ब्लु बेरी क्रीम! त्याशिवाय इथे ड्रायफ्रूट क्रीम, मिक्स फ्रुट क्रीम, पपया क्रीम, अॅपल क्रीम, स्ट्रॉबेरी क्रीम अशा डीशही मिळतात.खाबू मोशायने तुम्हाला आतापर्यंत सुचवलेल्या पदार्थापेक्षा हा पदार्थ थोडासा महागडा आहे खरा, पण दिलाला सुकून देणारा आहे. १८० ते २४० रुपयांच्या दरम्यान ही वेगवेगळी फ्रुट क्रीम्स तुम्हाला चाखता येतील. अधिक फ्रुट क्रीम्सची लज्जत घ्यायची असेल, तर मोठा ग्रुप किंवा भरपूर पैसे घेऊन जायला हवं.
कसे जाल?
हाजीअली ज्युस सेंटरला जाण्यासाठी भायखळा, ग्रँट रोड किंवा मुंबई सेंट्रल ही तीन स्टेशन्स जवळ आहेत. या तीन स्टेशन्सवर उतरून टॅक्सी किंवा बसने तुम्ही हाजीअली जंक्शनपर्यंत येऊ शकता. हाजीअली जंक्शनला अगदी समुद्राला लागूनच हाजीअली ज्युस सेंटर आहे. गाडी असेल, तर वरळी किंवा पेडर रोडमार्गेही तुम्ही इथे येऊ शकता.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
खाबुगिरी : कुछ ठंडा हो जाए..
उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या खाबू मोशायला भेजा मसाला, कबाब, पावभाजी अशा ज्वलंत पदार्थाचा दिदारही नकोसा वाटू लागला.

First published on: 16-05-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lets have something cold