पर्यावरणाचा अभ्यास करत करत निसर्गात रमलेल्या संशोधकाची नाळ निसर्गाशी किती विविध पद्धतीने जोडली जाते याची प्रचीती प्रा. रेश्मा माने यांची आजवरची वाटचाल पाहताना लक्षात येते. अभ्यास- संशोधनापलीकडे निसर्गाशी आणि पर्यायाने पर्यावरण संवर्धनाशी असलेलं भावनिक नातं जपण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने सुरू ठेवला. त्यामुळे मधमाशीच्या पोळ्यांपासून ते माळरानावरील माळढोकपर्यंत आणि निसर्गाविषयी कुतूहल असलेल्या विद्यार्थ्यांपासून ते अजिंठा लेण्यांच्या अभ्यासापर्यंत किती तरी गोष्टीत त्या मनापासून रमल्या आहेत.
पर्यावरण रक्षणाच्या कार्याने झपाटलेल्या प्रा. रेश्मा माने यांचं बालपणही निसर्गाच्या सान्निध्यातलंच… बालाघाटच्या पायथ्याशी असलेल्या पांगरी या निसर्गसंपन्न गावी त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. वडिलांची आरोग्य खात्यातील नोकरी आणि समाजकार्याचा वारसा लाभल्याने लहानपणापासूनच समाजासाठी काही तरी करायचं या ध्येयाने त्या प्रेरित झाल्या. शालेय जीवनातच ‘अंनिस’सारख्या संस्थेशी त्या जोडल्या गेल्या. त्यामुळे अंधश्रद्धा नको, भवतालाकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि डोळस श्रद्धा यांचे संस्कार त्यांच्या मनात रुजले. सोलापूरमध्ये संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र या विषयांच्या अभ्यासाबरोबरच पर्यावरणाविषयी विशेष जिव्हाळा त्यांच्या मनात निर्माण झाला. माळरानावरच्या जैवविविधतेच्या अध्ययनातून माळढोकसारख्या दुर्मीळ पक्ष्यांचे निरीक्षण आणि त्यांच्या संवर्धनाच्या चळवळीत त्या सक्रिय सहभागी झाल्या. पुढे पर्यावरणशास्त्र, शिक्षणशास्त्र, मेडिकल एंटोमोलॉजी या विषयांत उच्च शिक्षण घेत असताना संशोधनाची आवडही मनात अधिक खोलवर रुजली.
२०१६ मध्ये सोलापूर येथे ‘युगंधर फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना रेश्मा यांनी केली. पर्यावरण रक्षण हे केवळ भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून घडले पाहिजे या विचारातून त्या प्राथमिक शाळांपासून ते महाविद्यालयांपर्यंत पर्यावरण जागृतीसाठी हजारो विद्यार्थ्यांना जोडून घेत विविध उपक्रम राबवत आहेत. विशेष म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षकांसाठी हवामान बदल आणि पर्यावरणज्ञान प्रशिक्षण, वॉटर-एनर्जी ऑडिट, टेरेस गार्डन, प्लास्टिकमुक्त शाळा, जैवविविधता सहली असे हजारो लहान-मोठे उपक्रम राबवत त्या महाराष्ट्रभर पोहोचल्या आहेत.
‘पर्यावरण संस्कृती’ हे मासिक सुरू करत त्यातून राज्यातील शाळांपर्यंत पर्यावरणाची जाणीव पोहोचवण्याचं कार्य त्या करत आहेत. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता, हवामान बदल यांसारख्या विषयांवर त्या सातत्याने लेखन करत आहेत. डासांपासून होणाऱ्या रोगांवर पीएचडी करत असताना कीटक जगतातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजेच मधमाशी हा नवा अध्याय माझ्या आयुष्यात सुरू झाला, असं त्या सांगतात. पुण्यातील ‘सीबीआरटीआय’मधून मधमाशी पालनाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि त्यानंतर प्रत्यक्ष मधमाशीच्या संवर्धन- संरक्षणासाठी त्या कार्यरत झाल्या. मधमाशी संवर्धनासाठी त्यांनी महाराष्ट्रभर सुमारे १५ हजार लोकांपर्यंत पोहोचून १३ युवकांना उद्योग उभारण्यासाठी प्रेरित केलं आहे. ‘मधमाशी पालन हा पर्यावरण रक्षणाचाच महत्त्वाचा भाग आहे’ असं त्या म्हणतात. ‘जून २०२५ मध्ये अजिंठा लेणी परिसरात मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली. या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांत प्रथमच अशा मधमाशी रेस्क्यूसाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. आमच्या युगंधर फाऊंडेशनच्या पथकाने वन विभागाच्या सहकार्याने अजिंठा लेण्यांमधील ११ आग्या मोहोळ मधमाशा सुरक्षितपणे स्थलांतरित केल्या. या कामाला संवेदनशीलता आणि कौशल्य दोन्हींची गरज होती. कारण जागतिक वारसा स्थळाला कोणताही धक्का लागू नये याचं भान आणि मधमाशांना वाचवण्याचं कार्य दोन्ही निभवायचं होतं. मात्र, या यशस्वी रेस्क्यूमुळे पर्यावरण रक्षणाचा अनोखा आणि महत्त्वाचा पैलू पुढे आला’, असं त्या सांगतात.
प्रा. रेश्मा माने यांना २०१२ मध्ये सोलापूर विद्यापीठाचा राजर्षी शाहू महाराज यांच्या नावे दिला जाणारा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला आहे. २०१५ मध्ये त्यांना संशोधनासाठी भारतीय संस्थेची फेलोशिप मंजूर झाली. महिला व बालकल्याण खात्याचा युवा प्रेरणा पुरस्कार त्यांना २०१६ मध्ये मिळाला. ‘लायन्स क्लब ऑफ सोलापूर’च्या माध्यमातून पर्यावरण रक्षक पुरस्कार, याच संस्थेकडून पर्यावरणविषयक कार्याबद्दल सन्मान, मराठवाडा सेवा संघाच्या माध्यमातून पर्यावरण नागरत्न पुरस्कार पुणे येथील ‘कर्वे इन्स्टिट्यूट’द्वारे त्यांना देण्यात आला. २०२१ मध्ये करोनादरम्यान केलेल्या कार्यासाठी कोल्हापूर येथील अक्षर संस्कार संस्थेमार्फत त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच २०२४ मध्ये बीआरटीआय पुण्याच्या माध्यमातून मास्टर ट्रेलर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. याचबरोबर २०२५ मध्ये सोलापूर विद्यापीठाच्या पर्यावरण संवर्धन समितीमध्ये प्रा. रश्मी माने यांची निवड करण्यात आली आहे.
मानसन्मान, पुरस्कारांनी त्यांचं काम थांबलेलं नाही. ‘युगंधर फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘निसर्ग यात्री : निसर्ग अभ्यास केंद्र’ उभारण्याचा संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना निसर्गाशी प्रत्यक्ष नातं जोडता यावं, सोलापूरमध्ये नवे पक्षी अभ्यासक घडावेत, म्हणून त्या आजही नियमित निसर्गफेऱ्या, पक्षी निरीक्षण शिबिरं घेत आहेत. ‘सातत्याने मेहनत करायची आणि पर्यावरण संवर्धनाचं काम कुठंही थांबू द्यायचं नाही, हा धडा मधमाशीच्या अभ्यासातून मिळाला आहे’ असं सांगणाऱ्या प्रा. रेश्मा माने प्रामाणिकपणे आणि उत्साहाने हा घेतला वसा जपण्यासाठी झपाटल्यागत पर्यावरण संवर्धनाचं काम करत आहेत.