विनय नारकर viva@expressindia.com

पासोडी हे महत्त्वाचे वस्त्र होते. थोरल्या शाहू महाराजांच्या काळात पासोडी ही दरबारात व प्रतिष्ठित लोकांत नजर करण्याचा रिवाज होता. अशा पासोडय़ा उंची असत. पासोडीसंबंधी काही प्रथाही होत्या.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

गेल्या काही लेखांमधून आपण शेला, उपरणे, घोंगडी अशा वस्त्रांविषयी जाणून घेतले. ही प्रामुख्याने पांघरण्याची वस्त्रे होत. पांघरण्याच्या वस्त्रांचे वर्गीकरण करायचे झाले तर ते तीन भागांत करता येईल. एक झोपताना पांघरण्याचे, दुसरे उबेकरता पांघरण्याचे आणि तिसरे सण – समारंभ अथवा विशेष प्रसंगी परिधान करण्याचे वस्त्र.  सर्वसामान्यांच्या पांघरण्याच्या वस्त्रांमध्ये प्रामुख्याने घोंगडी व पासोडी ही वस्त्रे असायची. घोंगडी अजूनही बनते, पण पासोडी पूर्णपणे नामशेष झाली.

घोंगडी हे लोकरीचे वस्त्र असते, तर पासोडी ही सुताची असायची. पासोडी हे अखंड वस्त्र नव्हते. पासोडी बनवण्यासाठी खादी वस्त्राच्या दोन किंवा चार पट्टय़ा एकत्र शिवल्या जायच्या. या खादीच्या किंवा सुताच्या पट्टय़ांना आटपळी, पाटकें किंवा पाटगी म्हटले जात असे. या पट्टय़ा एकत्र शिवण्याचे कारण पासोडीची जाडी वाढवणे हे होते. अभिजन थंडीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी मऊ रजया, दुलया वापरत असत. सामान्यजनांसाठी असायची गोधडी किंवा पासोडी. सुती असल्यामुळे थंडीपासून संरक्षणासाठी पासोडी जाड असणे गरजेचे होते. पांघरण्याच्या पासोडीस ‘वलकट’ असेही म्हटले जाते.

पासोडी हे महत्त्वाचे वस्त्र होते. थोरल्या शाहू महाराजांच्या काळात पासोडी ही दरबारात व प्रतिष्ठित लोकांत नजर करण्याचा रिवाज होता. अशा पासोडय़ा उंची असत. पासोडी संबंधी काही प्रथाही होत्या. गावच्या पाटलांस दरवर्षी गावातील बलुतेदारांकडून काही वस्तू मिळण्याचा हक्क असे. त्यात विणकरांकडून एक पासोडी मिळण्याचा हक्कही होता. यास ‘इनाम पासोडी’ असे म्हणत. हे इनाम सरकारांतून न घेता परभारे (परस्पर) गावाकडून वसूल करण्यात येत असे, म्हणून यास ‘परभारा पासोडी’ असेही म्हटले जात असे. फक्त पांघरण्यासाठीच नव्हे तर बिछायतीसाठीही पासोडी वापरात येत असे. यास ‘जाजम जीम’असेही म्हटले जात असे. बिछायतीसाठी छापील पासोडी वापरण्यात येत असे. पासोडी ही सहसा  पांढरीच असे. रंगीत पासोडीस ‘पासोडा’ म्हणत असत.

‘मंडपी पासोडा पाटावरी घातला ।

तेथे एक वीरू बैसला ॥

असा उल्लेख ‘कालिका पुराणात’ आहे.

पातळ पासोडीस ‘चोफाळ’ म्हणत, तर दुप्पट मोठय़ा पासोडीस ‘दुटी’ म्हणत. बौद्ध भिक्षूंमध्ये एक चाल होती. ते आपले पांघरूण चिंध्या शिवून बनवत असत. त्यास ‘पांसरूड’ किंवा ‘पांसूड’ म्हणत. ‘पासोडी’ वरून एक म्हणही प्रचलित होती. ‘एके पासोडीची पाटगीं’. ‘एका माळेचे मणी’ या अर्थाची ही म्हण आहे. पुण्यात बुधवार पेठेत एक प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे. त्याचे नाव ‘पासोडय़ा विठोबा’ असे आहे. या मंदिराच्या परिसरांत पासोडय़ा विकणारी बरीच मंडळी येत असत. यावरूनच हे नाव या मंदिरास पडले आहे.

सतराव्या शतकातील अंबेजोगाई येथील संत कवी दासो दिगंबर देशपांडे यांनी त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथाने पासोडीला अजरामर केले आहे. तो प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे ‘दासोपंतांची पासोडी’. हा ग्रंथ दासोपंतांनी पातळ पासोडीवर खळीचे लेप देऊन, सुकवून, कवडय़ांनी घासून गुळगुळीत करून त्यावर लिहिला आहे. ही पासोडी ४० फूट लांब व ४ फूट रुंद आहे. यावर सुमारे १६०० ओव्या अंकित आहेत. दासोपंतांनी पासोडीवर फक्त ओव्या लिहिल्याच नाहीत तर त्या निरनिराळ्या आकृतिबंधांमधून त्या चित्रितदेखील केल्या आहेत. ज्याला ‘ग्राफोलॉजिकल पोएट्री’ म्हणतात, त्या प्रकारचे हे चित्रीकरण आहे. अशा प्रकारे लिहिलेला हा एकमेवाद्वितीय ग्रंथ आहे. ज्येष्ठ संशोधक मोरवंचीकर यांनी त्यांच्या एका लेखात अमरावती व बीड येथे पासोडी साडय़ा बनत असा उल्लेख केला आहे, परंतु पासोडी नावाच्या किंवा पासोडीपासून साडय़ा बनत याबाबत दुजोरा मिळेल असा काहीही दुवा मला अजून तरी सापडला नाही.

आणखी एक अखंड वस्त्र आहे, जे महाराष्ट्रातील सामान्यजनांच्या भरभरून कामी येते. म्हटले तर ते पांघरण्यासाठी किंवा अन्य बऱ्याच कामांसाठी उपयोगी होते, किंबहुना अजूनही होते. ते अखंड सुती वस्त्र म्हणजे ‘पंचा’. कोकणातील राजापूर हे गाव पंचांकरिता प्रसिद्ध होते. पंचाची महतीच तशी आहे. अंगावर पांघरण्यापासून, नेसणे, अंग पुसणे अशा अनेक कार्यासाठी पंचाचा वापर होतो. अशा बहुपयोगी, बहुगुणी पंचाला आपण मात्र महाराष्ट्रातून हद्दपार केले आहे. आता राजापूरलाच काय अन्य ठिकाणीही महाराष्ट्रात पंचे विणले जात नाहीत. ‘गिरगाव पंचे’ हे मुंबईतील १९३० साली सुरू केलेले दुकान आजही अविरत सेवा  देत आहे. ‘गिरगाव पंचे’ या दुकानाचे मालक कुलकर्णी सांगतात की, सध्या त्यांच्या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध असणारे पंचे हे कर्नाटकातील हुबळी – धारवाड भागातून येतात. ते सांगतात की, त्यांच्याकडे तब्बल तेरा प्रकारचे पंचे मिळतात. म्हणजे अगदी रुमालापासून ते धोतरापर्यंत निरनिराळ्या आकारांचे पंचे इथे मिळतात. या पंचांचे निरनिराळे वापर ऐकून आपण थक्क होऊन जाऊ. सगळ्यात मोठा पंचा साधारण चार, पाच व सहा वारी असतो. ही पंचेजोडी असते. शेतकरी लोकांना शेतात काम करताना या पंचाचे धोतर नेसणे सोयीचे असते. यातही एक निरी किंवा दोन निरी असा सूक्ष्म फरक असतोच. या पंचाच्या घाटाला ‘दोरे काठी’ असे म्हणतात. हे पंचे पांढरे असून त्यास लाल रंगाचे दोरी काठ असतात. तर पंचामधला सर्वात लहान आकार असतो, १८ सेंमी ७ १८ सेंमी इतका. याचा रुमाल म्हणून वापर होतो. या दोन आकारांच्या मधल्या आकारांच्या पंचाचे अंग पुसणे, भात वेळणे, कडधान्यांस मोड आणणे, स्त्रियांचे केस बांधणे, पाणी गाळणे यापासून अंत्यविधीपर्यंत असे अनेको वापर होतात. यातील अंग पुसण्यासाठी जे पंचे वापरले जातात, त्यामध्ये पाणी लगेच टिकणे व लगेच सुकणे हे दोन्ही गुण आहेत. यातही लहान मुलांसाठी वेगळे पंचे मिळतात.

आधीच्या काळी सन्मान करताना किंवा आहेर करताना शेला किंवा शालजोडी दिली जात असे. कालांतराने ही जागा उपरण्याने घेतली. त्याही नंतर सहज परवडणारे पंचे या कामात उपयोगी पडू लागले. सध्या मात्र सामान्यजन पंचाच्या जागी ‘टॉवेल’ देताना दिसतात. हे मात्र अतिशय अशोभनीय वाटते. हातमागावर विणले जाणारे उत्तम दर्जाचे पंचे, तेही इतक्या कमी किमतीत उपलब्ध असताना ही परंपरा टिकवण्याचे आपण सर्वानी मनावर घ्यायला हवे.