युनिक, थोडीशी हटके, आजूबाजूच्या लोकांच्या क्षणभर नजरा खिळवून ठेवणारी छत्री कोणाला आवडणार नाही? अशी स्वत:ची स्वत:ला हवी तशी छत्री तयार करता आली तर.. अम्ब्रेला पेंटिंगच्या साहाय्याने सध्या अनेक तरुण हीच कला आजमावत आहेत. अ‍ॅक्रेलिक कलर्सच्या माध्यमातून छत्रीवर कॅलिग्राफी, टायपोग्राफी, स्प्रे पेंटिंग, स्टेनसिल पेंटिंग, अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, वारली पेंटिंग, डूडल्स, कार्टून्स, भौमितिक रचना, डिझाइन्स असे आपल्याला हवे ते रंगवण्याचे स्वातंत्र्य असते.
पावसाळा सर्वच कलाप्रेमींना हवाहवासा वाटणारा ऋतू! पावसाच्या किमयागार स्पर्शाने संपूर्ण पृथ्वी न्हाऊन निघते आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते. आकाशाचा करडा, पाण्याचा निळसर, चिखलाचा तांबूस तपकिरी, इंद्रधनुष्याचे सप्तरंग आणि हिरवागार निसर्ग यामुळे वातावरण रंगीबेरंगी होते. पाऊस येतोच जणू रंगांची बरसात करायला आणि चिंब भिजवायला. प्रत्येक जण आपापल्या परीने पावसाचा मनमुराद आनंद लुटत असतो.
अशा या पावसाचे प्रतीक मानली जाते ती म्हणजे छत्री..! कुणाची हरवलेली, भरपावसात उलटी होऊन दगा देणारी, वाऱ्यासोबत उडून गेलेली, त्या हळव्या क्षणी दोघांना आडोसा देणारी, मदत म्हणून पुढे केलेली आणि पुन्हा परत न मिळालेली अशी किंवा याहून वेगळ्या अशा किती तरी आठवणी छत्रीभोवती एकवटलेल्या असतात. पाऊस म्हटला की छत्री इज मस्ट! आजोबांच्या काठीसारखी लांब छत्री सध्या हिट आहे. वाइल्ड पिंट्र, पोल्का डॉट, रेनबो कलर, फ्रील असलेल्या छत्र्या डिमांडमध्ये आहेत. इझी टू कॅरी म्हणून फोल्डिंगची छत्रीसुद्धा सोयीच्या दृष्टीने घेतली जाते. पॅगोडा स्टाइल छत्री वापरणारेही काही जण दिसतात.
युनिक, थोडीशी हटके, आजूबाजूच्या लोकांच्या क्षणभर नजरा खिळवून ठेवणारी छत्री कोणाला आवडणार नाही? अशी स्वत:ची हटके छत्री करता येते अम्ब्रेला पेंटिंगच्या साहाय्याने! स्वत: रंगवलेली छत्री वापरणे केव्हाही ट्रेण्डी आणि फॅन्सीच वाटेल. सध्या अनेक तरुण अम्ब्रेला पेंटिंगच्या या कलेकडे वळले आहेत. हल्ली अनेक संस्था अम्ब्रेला पेंटिंगच्या कार्यशाळा घेतात.
अम्ब्रेला पेंटिंग करणारे अ‍ॅक्रेलिक रंगाच्या साहाय्याने पर्मनण्टली छत्री रंगवतात. अ‍ॅक्रेलिक कलर्सच्या माध्यमातून छत्रीवर कॅलिग्राफी, टायपोग्राफी, स्प्रे पेंटिंग, स्टेनसिल पेंटिंग, अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, वारली पेंटिंग, डूडल्स, कार्टून्स, भौमितिक रचना, डिझाइन्स असे आपल्याला हवे ते रंगवण्याचे स्वातंत्र्य असते. कॅलिग्राफी ही कलाच मुळात स्वत:ला आत्मीय आनंद देणारी आहे. या कलेतून स्वत:ची एक नवी ओळख होते. स्वत्वाचा शोध आणि नवनिर्मितीची प्रेरणा यातून मिळते. अशी कॅलिग्राफी जेव्हा रंगांच्या माध्यमातून छत्रीवर उमटते तेव्हा या रंगीत अक्षरधाराच जणू छत्रीवर बरसतात. रंगात खेळण्याची आवड असणाऱ्यांना अम्ब्रेला पेंटिंगची कार्यशाळा पर्वणीच ठरते.
‘क्रिआर्टिव’तर्फे अशीच एक कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळेबद्दल सांगताना क्रिआर्टिवचा तरुण क्रिएटिव्ह आर्टस्टि सागर खवणेकर म्हणाला की, ‘आजकाल प्रत्येकाला आपली वस्तू कस्टमाइज आणि पर्सन्लाइज्ड असलेली आवडते. त्यात छत्र्याही मागे नाहीत. या विचाराने कार्यशाळा आयोजित केली. प्रत्येकाने आवडीनुसार काम केले. स्वत:च्या कस्टमाइज्ड छत्रीसाठी मुलामुलींची उत्सुकता अगदी टोकाची होती, त्यामुळे कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला.’ या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांपकी मानसी सावंत म्हणाली, ‘‘अम्ब्रेला पेंटिंगचा अनुभव खूपच चांगला होता. मला स्वत:ला छत्रीच्या माध्यमातून व्यक्त करायचे होते. आता मला खूप छान वाटते की, माझ्याजवळ माझी अशी छत्री आहे, जी मला डिफाईन करते.’ एकता िशदे म्हणाली, ‘अम्ब्रेला पेंटिंग एक प्रकारे स्पष्टीकरणात्मक कला आहे, असं मला वाटतं. छत्री कशी रंगवायची याची आयडिया या कार्यशाळेतून मिळाली. पहिली छत्री रंगवल्यावरच मला आता आणखी काही क्रिएटिव्ह आयडिया सुचू लागल्यात. माझ्यासाठी हे सगळं खूप नवीन होतं, पण यातून शिकायला मिळालं आणि खूप मज्जा आली.’
अम्ब्रेला पेंटिंग म्हणजे कल्पना आणि कलाकृती यांची छत्रीवर घातली जाणारी सांगड असे म्हणता येईल. रंगणारे हात आणि कपडे याच्या मोबदल्यात स्वत:ची अशी ओळख सांगणारी छत्री इट्स डिफरन्ट असा फील देऊन जाते. पावसाआधीच्या तयारीत अम्ब्रेला पेंटिंगचा सुद्धा आता समावेश होतोय. अम्ब्रेला पेंटिंग केल्यावर ‘‘ये रे ये रे पावसा..’’ असे म्हणायला काही हरकत नाही.