scorecardresearch

विष्णूज् मेन्यू कार्ड : देशी-विदेशी दिवाळी

दिवाळी आता अक्षरश: जगभर साजरी होते. भारतीयांनी आपल्याबरोबर हा सणही बाहेर नेलाय. परप्रांतात दिवाळीनिमित्त केल्या जाणाऱ्या काही वेगळ्या रेसिपीज आजच्या मेन्यू कार्डमध्ये घेऊन आलोय.

दिवाळी आता अक्षरश: जगभर साजरी होते. भारतीयांनी आपल्याबरोबर हा सणही बाहेर नेलाय. परप्रांतात दिवाळीनिमित्त केल्या जाणाऱ्या काही वेगळ्या रेसिपीज आजच्या मेन्यू कार्डमध्ये घेऊन आलोय. यात नूडल्स, केकपासून, लाडू- बर्फीपर्यंत व्हरायटी आहे.
जगाच्या विविध भागांत जेथे भारतीय किंवा िहदू लोक आहेत तिथे दिवाळी साजरी केली जाते. यामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फिजी, लुयाना, इंडोनेशिया, जपान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, नेपाळ, न्यूझीलंड, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा समावेश आहे. आजकाल भारतीयांचं परदेशात जाणं वाढल्यामुळे जिथे-जिथे भारतीय गेले तिथे-तिथे भारतीयांबरोबर त्या-त्या देशाचे लोकसुद्धा दिवाळी साजरी करायला लागले आहेत. मात्र तिथे आपल्या पारंपरिक दिवाळीपेक्षा थोडेफार बदल झालेले आहेत. नेपाळमध्ये दिवाळीला ‘स्वांती’ असे म्हणतात. इथे पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. इथेसुद्धा दिवाळी ऑक्टोबर/नोव्हेंबर या कालावधीत मनवली जाते.
इथली दिवाळी साजरी करायची परंपरा भारतीयांपेक्षा वेगळी आहे. पहिला दिवस -काग तिहाड म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कावळ्यांची दिव्य दूताच्या स्वरूपात पूजा केली जाते. दुसरा दिवस -कुकुर तिहाड म्हणून मनवतात, या दिवशी कुत्र्यांची त्याच्या इमानदारीसाठी पूजा केली आहे. तिसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजा आणि गाईची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी आपल्याप्रमाणे वही, खाते, लक्ष्मी इत्यादींची पूजा केली जाते. पाचव्या दिवसाला भाई-टिका असे म्हणतात. म्हणजे आपल्या येथील भाऊबीज.
दिवाळीच्या दिवसात नेपाळी लोक द्विसी आणि भाईलो या नृत्य नाटकाचा प्रकार करतात. काही लोक असे नृत्य करत गावातल्या मोठय़ा घरातून फिरतात व ज्यांचा आशीर्वाद घेतात, ज्या लोकांकडे आशीर्वाद घ्यायला जातात ते लोक धान्य, फळ, मिठाई व पशाच्या रूपात त्यांना आशीर्वाद देतात. या वेळी ओळखीचे लोक एकत्र येऊन नाच-गाणी करून दिवाळी मनवतात. भारतापेक्षा फटाक्यांचा वापर येथे कमी असतो. काही गावांमध्ये गावाच्या बाहेर दिवाळी नगर उभारतात. इथे वेगवेगळया प्रकारची फटाक्यांची आतषबाजी, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, पारंपरिक पूजा व थोडक्यात एक छान जत्रेचं स्वरूप असतं. याबरोबरच खाण्या-पिण्याचीही चंगळ असते.
ज्याप्रमाणे आपल्या इथे फराळाचे विविध पदार्थ बनवितात त्याप्रमाणे तिथेसुद्धा केक, पेस्ट्रीबरोबरच नूडल्सपासून तयार केलेले गोड पदार्थ असतात. त्यापकी काही पदार्थाची आपण इथे ओळख करून घेऊया.

कॅरामल नूडल्स
साहित्य : नूडल्स २ वाटय़ा, भाजलेला अक्रोडचा चुरा अर्धी वाटी, साखर १ वाटी
कृती : सर्व प्रथम नूडल्स उकळून डीप फ्राय करावे. नंतर कॅरामल तयार करण्याकरीता साखर एका पॅनमध्ये घेऊन पाणी न टाकता वितळवावी. जास्त ब्राउन करू नये. पिक्कट पिवळ्या रगाचा साखरेचा पाक तयार झाल्यावर त्यात डीप फ्राय केलेले नूडल्स बुडवावे व वरून भाजलेला अक्रोडचा चुरा लावावा. व आइस्क्रीमबरोबर सव्‍‌र्ह करावे.

दूध बर्फी
साहित्य : दूध पावडर २ वाटी, इनो अर्धा चमचा, केशर पाव चमचा, वेलची पावडर १ चमचा, पिठीसाखर १ चमचा
कृती : मिल्क पावडरमध्ये केशर, इनो व विलायची पावडर घालून थोडे पाणी घालून ढोकळ्याच्या पिठापेक्षा थोडं घट्ट भिजवावं. ताटलीला तूप लावून त्यावर हे मिश्रण पसरवून पाच ते सात मिनिटे वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर वडय़ा पाडून वरून पिठीसाखर भुरभुरावी.

दहीत्री
साहित्य : कणीक १ वाटी, मदा १ वाटी, आरारोट २ चमचे, दही २ चमचे, तूप तळायला, साखरेचा पाक २ वाटी
कृती : मदा, कणीक व आरारोट एकत्र करून गरम पाण्यात २ चमचे दही घालूनभिजवून घ्या. हे पीठ कमीतकमी सहा तास भिजवत ठेवा. नंतर दोन वाटय़ा साखरेचा पाक तयार करून ठेवा. त्यात आवडीप्रमाणे केशर किंवा गुलाबजल घाला. त्यानंतर तूप गरम करून एका पळीने हे तयार पीठ भज्याप्रमाणे तुपात सोडा. चांगले फुगून वर आल्यावर साखरेच्या पाकात घाला. बदाम, पिस्त्याने सजवून खायला द्या.

मनुकांचे लाडू
साहित्य : मनुका १ वाटी, काजू किंवा दाणे भरडलेले अर्धी वाटी, मिल्क पावडर २ चमचे, फाइन शुगर (दाणेदार बारीक साखर) २ चमचे
कृती : मनुका स्वच्छ धुऊन पुसून त्याला मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर त्यात काजूचा किंवा दाण्याचा भरडा व मिल्क पावडर टाकून याचे लाडू वळावे.

पायनॅपल पेस्ट्री
साहित्य : मदा १ कप, बेकिंग पावडर १ चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, अमूल बटर पाव कप, पायनापल इसेन्स पाव चमचा, कंडेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, पिठी साखर १ मोठा चमचा
सजावटीचे साहित्य : साखरेचे पाणी (पाक) पाऊण कप, फेटलेले क्रीम २०० ग्रॅम, पायनापल पिसेस १ कप, चेरी ८ ते १०
कृती : मदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे तिन्ही साहित्य एकत्र करून तीनदा चाळून घेणे. एका बाऊलमध्ये बटर, पिठीसाखर आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र करून कमीतकमी दहा मिनिटे फेटावे, हे मिश्रण हलके आणि फुगेस्तोवर फेटावे. या मिश्रणात चाळलेला मदा घालून हे मिश्रण परत एकदा १५ ते २० मिनिटांपर्यंत फेटावे. एकजीव होईपर्यंत वरील मिश्रणात सोडावॉटर आणि पायनॅपल इसेन्स घालून परत एकदा एक ते दीड मिनीट फेटून घ्यावे. हे मिश्रण ताबडतोब बटर लावून सावरलेला प्लास्टिक केकच्या साच्यामध्ये ओतून मायक्रोव्हेवमध्ये न झाकता उच्च दाबावर, तापमानावर  (900 ह/टं७/100%) ४ ते ५ मिनिटे ठेवावे. केक थंड झाल्यावर साच्यातून बाहेर काढून आडवा कापून घ्यावा.
एका भांडय़ात एक कप पाणी घेऊन या पाण्यात १ चमचा साखर घेऊन मायक्रोव्हेवमध्ये ३ ते ४ मिनिटे उच्च दाबावर  (900 W/Max/100%) ठेवून साखरेचे पाणी तयार करून घेणे. मायक्रोव्हेवमधे हे भांडे झाकण न लावत ठेवावे. आडवा कापून घेतलेल्या केकचा खालचा भाग जो आहे त्या भागावर साखरेचे पाणी िशपडावे. केकचा भाग ओला होईस्तोवर या केकवर फेटलेलं क्रीम पसरवून त्यावर अननसाचे तुकडे ठेवून त्यावर परत एकदा क्रीम पसरवून कापलेल्या केकचा दुसरा भाग त्यावर ठेवावा. पण केकवर साखरेचे पाणी िशपडावे. या केकवर पण क्रीम घालून सर्व बाजूने एकसारखे करून घ्यावे.
या केकला अननसाच्या तुकडय़ांनी आणि चेरीने छान सजवनू घ्या.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-11-2013 at 01:04 IST

संबंधित बातम्या