वैष्णवी वैद्य मराठे

पावसाळा सुरू झाला की निसर्गाचा मनमुराद आनंद घेत सगळय़ांनाच भटकंती करावीशी वाटते. काही वर्षांपासून पावसाळी भटकंतीचा हा ट्रेण्ड जोमाने रुजलेला पाहायला मिळतो आहे. करोना काळात लोकांच्या जीवनशैलीत बदल झाले, एकाच जागी कित्येक दिवस अडकलेल्या लोकांनी करोना संपल्यानंतर भटकंतीचं वेड लावून घेतले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्याच्या फास्ट लाइफमुळे दरवेळी मोठी सुट्टी घेऊन फिरणे शक्य नसते. त्यातूनच रोड ट्रिप्स, छोटय़ा पिकनिक, सोलो ट्रिप, स्टेकेशन असे विविध भटकंतीचे प्रकार तरुणांमध्ये प्रचलित झाले आहेत. सध्या तरुणांमध्ये पावसाच्या भटकंतीसाठी कुठल्या जागा आवडत्या आहेत ते बघूया.

Mumbai, Get Respite Sweltering, Mumbai Get Respite Heat, Temperatures Drop, 34 Degrees, mumbai summer, summer news, summer in mumbai, summer temperature in mumbai, mumbai heat, mumbai sweltering, mumbai Temperature, mumbai news, summer news,
मुंबईकरांची काहिली कमी होणार
Change in traffic route due to Rath Yatra after ram navami in nashik
नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

मुळशी

मुळशी हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पुण्याच्या पश्चिमेला अंदाजे ५० किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गरम्य वातावरणासोबतच मुळशी हे कृषी पर्यटनासाठीही ओळखले जाते. परिसरातील अनेक स्थानिक शेतकरी विविध भाज्यांची शेती, भाताची शेती, सेंद्रिय शेती समजून घेणे आणि ताज्या जेवणाचा आनंद घेणे यासारख्या गोष्टींमध्ये पर्यटकांना सहभागी करून घेतात. या परिसरातील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे मुळशी तलाव. मुळा नदीवर मुळशी धरणाने तयार केलेला हा तलाव मानवनिर्मित जलाशय आहे आणि सध्या पर्यटकांचे आवडते ठिकाण बनला आहे. याचा वापर सिंचन आणि वीजनिर्मितीसाठीसुद्धा केला जातो. शांत वातावरण आणि आजूबाजूच्या टेकडय़ांमुळे विश्रांती आणि नैसर्गिक सौंदर्य शोधणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. इथे सध्या अनेक रिसॉर्ट्स आणि होमस्टे बनले आहेत, परंतु तुम्हाला अस्सल जेवण, निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर इथल्या स्थानिक लोकांकडे राहण्याची सोय होत असेल तर त्याचा नक्की लाभ घ्या.

कर्जत/खोपोली

कर्जत आणि खोपोली ही रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य शहरे आहेत. नैसर्गिक सौंदर्य, हिरवेगार लँडस्केप आणि अ‍ॅडव्हेंचरसाठी ओळखली जाणारी ही दोन ठिकाणे हे वीकेंड पिकनिक आणि मोठय़ा सुट्टय़ांसाठी लोकप्रिय आहेत. ट्रेकिंग, रॅपलिंग, रॉक क्लाइिम्बग आणि रिव्हर राफ्टिंग यासारख्या साहसी गोष्टींसाठी हा प्रदेश ओळखला जातो. नवशिक्या आणि अनुभवी ट्रेकर्स सगळय़ांनाच अनुभवता येतील अशा नेचर ट्रेल्ससाठी इथे अनेक जागा आहेत. जवळपास पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या जागा म्हणजे इमॅजिका, कोंडाणा गुहा, कर्नाळा, झेनिथ धबधबा, उल्हास व्हॅली. कर्जत/खोपोलीचे वैशिष्टय़ म्हणजे मुंबई लोकलने इथे तुम्हाला अगदी दोन ते अडीच तासांत पोहोचता येते. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांना या जागा म्हणजे पर्वणी आहेत. इथेही अनेक छोटे छोटे रिसॉर्ट्स आहेत जे योग्य त्या दरात तुम्हाला पिकनिक आणि आउटिंगची योजना आखून देतात. तुमच्या बजेटप्रमाणे अगदी साध्या होमस्टेपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत विविध पर्याय इथे आहेत.

महाबळेश्वर / पाचगणी

दऱ्या-खोऱ्यांमध्ये वसलेले महाबळेश्वर आणि पाचगणी, शहरी जीवनाच्या गजबजाटातून एक शांत सुटका देतात. मुंबई-पुण्यापासून ४-५ तासांवर असलेली ही ठिकाणे पुन्हा तुम्हाला निसर्गाच्या कुशीत घेऊन जातात. या दोन जागा एकमेकांपासून बऱ्यापैकी कमी अंतरावर असल्याने अनेक पर्यटक एकाच ट्रिपमध्ये फिरून घेतात. वेण्णा तलाव, प्रतापगड, मॅप्रो गार्डन, स्ट्रॉबेरी गार्डन, सिडनी पॉइंट अशा बऱ्याच जागांमुळें इथे २-३ दिवस तुम्ही आरामात घालवू शकता. शिवाय तिथले वातारण इतर वेळीसुद्धा प्रसन्न आणि गार असते म्हणून उन्हाळय़ातही बरेच जण भटकंतीला इथे येतात. इथेही पॅराग्लायिडगसारखे साहसी उपक्रम काही ठिकाणी आहेत. पुणेकरांसाठी खास बाब म्हणजे पुणे-महाबळेश्वर बससेवा आहे, ज्याने तुम्ही ३-४ तासांत महाबळेश्वरला पोहोचू शकता, म्हणून पुण्यातून पर्यटकांची जास्त गर्दी असते. इथे तुम्हाला नक्की आवडेलअशी विशेष जागा म्हणजे पंचगंगा हे अद्वितीय मंदिर. कृष्णा, वेण्णा, सावित्री, कोयना आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर हे मंदिर बांधले आहे. मॅप्रो आणि स्ट्रॉबेरी गार्डन असल्याने चवीच्या पदार्थाची रेलचेलही इथे उपलब्ध आहे,  त्याचा मनमुराद आनंद नक्की घ्या.

नागाव, अलिबाग

नागाव हे रायगड जिल्ह्यात अलिबागजवळील एक किनारपट्टीचे गाव. येथील सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक आकर्षणे आणि आरामशीर वातावरण यासाठी प्रसिद्ध असलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सोनेरी वाळू आणि स्वच्छ पाणी असलेल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी नागाव प्रसिद्ध आहे. गोव्याला पर्याय म्हणून आता बीच लव्हर तरुणाईत हे लोकप्रिय आहे. इथले बीच स्वच्छ आणि बऱ्यापैकी शांत असतात. महाराष्ट्रातील निसर्गप्रिय कोकणाच्या अगदी किनाऱ्यावर असलेले नागाव, अलिबाग तुम्हाला बिझी आयुष्यातून निवांत वेळ किंवा आजकाल तरुण म्हणतात तसा ‘क्वॉलिटी टाइम’ देते. अलिबाग या छोटय़ा शहरालासुद्धा ऐतिहासिक महत्त्व आहे. इथे बीचव्यतिरिक्त अनेक पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत. कणकेश्वर मंदिर, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, अलिबाग मार्केट अशा अनेक जागा तुम्ही पाहू शकता, प्रत्येकालाच स्वत:चा इतिहास आहे. अलिबाग हे सीफूड आणि स्थानिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी असलेल्या असंख्य बीच- श्ॉक आणि रेस्टॉरंट्समध्ये स्वादिष्ट किनारी पदार्थाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. विशेष म्हणजे अलिबाग आता मुंबईच्या खूपच जवळ आले आहे. भाऊचा धक्का या मुंबई पोर्टवरून तुम्ही रो-रो फेरीने अलिबागला (मांडवा किनारा) अगदी तासाभरात पोहोचू शकता.

कोकण

निसर्गाची जिथे अमर्याद कृपादृष्टी आहे तो महाराष्ट्रातला अविस्मरणीय भाग म्हणजे कोकण. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक असा मिळून जवळपास ७००-८०० किमीची कोकण किनारपट्टी आपल्याला लाभली आहे. दापोली, हर्णे, आंजर्ले, सिंधुदुर्ग, मालवण, तारकर्ली अशा विविध भागांमध्ये पर्यटकांची मांदियाळी आपल्याला आता पाहायला मिळते. तिथे जाणे म्हणजे नो-नेटवर्क झोनमध्ये जाणे आहे असे तरुणांना वाटते. रिफ्रेश, रिस्टार्ट, रेझ्युम हे तुम्हाला अनुभवायचे असेल तर कोकणासारखा दुसरा पर्याय नाही. खाण्यापिण्याची, भटकण्याची कसलीच कमतरता तुम्हाला इथे भासणार नाही. तुम्ही इथे पावसाळय़ाव्यतिरिक्त गणपती, दिवाळी, होळी अशा सणांना गेलात तर वेगवेगळय़ा भागांतल्या वेगवेगळय़ा पद्धती पाहायला मिळतील. तसेच प्रत्येक प्रांताचे आपापले वैशिष्टय़ इथे आहे. अनेक गूढ जागा, मंदिर, त्यांच्या कथा अतिशय रोमांचकारी आहेत. इथे तुम्ही पटकन शॉर्ट ब्रेकचासुद्धा आनंद घेता येतो. तसेच वेळ काढून निवांतपणे निसर्गाच्या सान्निध्यात राहू शकता.

याव्यतिरिक्त अनेक लोकप्रिय जागा आहेत- लोणावळा, इगतपुरी, नाशिक इथेही तुम्हाला अनेक सुंदर जागा पाहायला मिळतील. या जागांचे वैशिष्टय़ म्हणजे इथे तुम्ही फक्त निवांतपणा अनुभवू शकता. वर म्हटलेल्या जागांसारखे फारशा अ‍ॅक्टिव्हिटीज इथे नसतील, पण या जागाही तरुणांच्या पावसाळी भटकंतीच्या लिस्टमध्ये असतात.

पावसाळी भटकंती करताना योग्य ती काळजीही घेतली पाहिजे

  •  फिरणे आणि ऋतूंचा आनंद घेणे वाईट नाही, परंतु आपण एक सुजाण नागरिक आहोत त्यामुळे जबाबदारीने वागणे हे गरजेचे आहे. आपण अनेक बऱ्यावाईट घटना या दिवसात घडताना पाहत असतो आणि ऐकत असतो याचे कारण अनेकदा आपण वाहवत जाणे हे असते.
  •  समुद्रकिनारे, धबधबे, गड -किल्ले फिरताना अनुभवी लोक बरोबर असावेत आणि नसतील तर अपरिचित, जोखमीच्या जागांवर जाणे टाळावे.
  •  धबधब्यांवर पाण्याच्या स्रोतांसह दगड, दरडसुद्धा कोसळू शकते.
  •  पावसाळय़ात प्रत्येक ठिकाणी पाणी, ओलावा, शेवाळे हे असणे साहजिक आहे.
  •  स्थानिक नागरिक, गिर्यारोहक, अनुभवी/जाणकार माणसे जी काळजी घ्यायला सांगतात त्या सूचना पाळाव्या.
  •  बातम्यांमध्ये हवामानाबद्दल जी माहिती येतेय ती बघून प्रवास करावा.
  •  पावसाळी भटकंती असली तरी अतिवृष्टीचा इशारा, रेड अ‍ॅलर्ट, ऑरेंज अ‍ॅलर्ट असताना फिरायला जाऊ नये.
  •  जिथे जाताय ती जागा पावसाळय़ात किती जोखमीची आहे याची चाचपणी करावी.
  •  घाटांमध्ये सावधतेने प्रवास करावा व पावसाळय़ात रात्रीचा प्रवास टाळावा.