दिनांक २१ मार्चच्या व्हिवामध्ये व्यक्त झालेली ‘माध्यमातली ‘ती’’विषयी मतं वाचून बरं वाटलं. स्त्रीबद्दल विचार करताना थोडा का होईना बदल होतोय याचं बरं वाटलं. मलाही राहावलं नाही म्हणून माझं मत मांडतोय. २१ व्या शतकात देखील लोकांची महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला असला तरी ‘ती’ मात्र त्याच रिंगणात फिरताना दिसते. ‘ती’ पुरुषांच्या बरोबरीनं काम करत असली ती स्त्री म्हणूनच ओळखली जाते, दुय्यमच ठरते. आज ‘ती’ कमावू लागली असली तरी ‘ती’ आई-वडील, भाऊ, नवरा या सगळ्या गुंत्यातच गुरफटलेली दिसते. आजही लग्नाच्या वेळी ‘ती’च्याकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवल्या जातात. ‘ती’ पहिली माणूस आहे. तिलाही तिची सुख-दुख आहेत हे एवढंच समजून घेतलं तरी तिच्या आणि त्याच्यामधलं नातं अधिक समृद्ध होईल आणि खऱ्या अर्थाने ते एकमेकांचे आयुष्याचे सोबती म्हणता येतील.
– राजेंद्र जाधव

स्त्रीचं अवास्तव चित्रण
‘व्हिवा’मधून आलेल्या माध्यमातल्या स्त्रीविषयीच्या लेखासंदर्भात माझं मत देत आहे. आजच्या जाहिराती आणि मालिकांमधली स्त्री वास्तवातल्या स्त्रीबरोबर रिलेट करताच येत नाही. जी स्त्री ती जाहिरात करते किंवा मालिकेत काम करते, तिच्या नाटय़मय प्रसंगांचा ठसा उमटतो पण तरीही जी मुलगी रोजच्या आयुष्यात स्ट्रगल करते तिचं कुठलंच प्रतिबिंब ह्य़ात दिसत नाही.
मालिकांमध्ये दाखवण्यात येणारी स्त्री तर नेहमीच मुळूमुळू रडणारी, सदसदविवेकबुद्धी गाठोडय़ात गुंडाळून ठेवलेली अशी दाखवतात. त्यामुळे समाजप्रबोधन तर दूरच उलट चुकीचाच संदेश समाजात जातो. खऱ्या आयुष्यात स्त्री अशी वागूच शकत नाही.
अनेक सुधारणा झाल्या असल्या तरी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन तसाच आहे. तो बदलत नाही, तोपर्यंत यात बदल होणार नाही. सध्या सुरू असणाऱ्या मराठी मालिकांमध्ये एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका त्या मानानं क्रांतीकारी वाटते. वेगळी वाटते. पण आता त्या लग्नाचीही वेगळी गोष्ट सांगायला हवी नाहीतर त्यातही पुन्हा तोचतोचपणा येईल.
– तृप्ती वैद्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@व्हिवा पोस्ट : व्हिवा पुरवणीतील सदरं कशी वाटतात, लेखातील विचार पटतात का, पुरवणी कशी वाटते, ते आम्हाला सांगा. त्याबरोबर या पुरवणीत आणखी काय वाचायला आवडेल तेही शेअर करा. आमच्या या मेल आयडीवर व्हिवा पोस्ट असं सब्जेक्ट लाइनमध्ये लिहून तुमच्या सजेशन्स पाठवा.  viva.loksatta@gmail.com