विनय जोशी

जगभरातील संदेशवहन क्षेत्रासाठीचे नियमन करण्यासाठी १७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून जगभर हा दिवस ‘जागतिक दूरसंचार दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला जातो. रेडिओ, टीव्ही, मोबाइल, इंटरनेट, जीपीएस यांच्याशिवाय आज जगण्याची कल्पनादेखील होऊ शकत नाही. संदेशवहनाच्या क्षेत्रात उपग्रहांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइट्सनी आपल्या  जीवनात नवीन क्रांती घडवून आणली आहे.

indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके

इसपू ४९० मॅरेथॉनच्या युद्धात पर्शियन सैन्याविरुद्ध मिळविलेल्या विजयाची माहिती देण्यासाठी फिडिप्पिडिस नावाचा सैनिक धावत धावत मॅरेथॉन गावापासून अथेन्सला पोहोचला. ४० किमी सलग धावल्यामुळे ‘आपण जिंकलो’ इतका संदेश देऊन तो कोसळला. एका ठिकाणाहून काही अंतरावरच्या दुसऱ्या ठिकाणी एखादा संदेश वाहून नेणे म्हणजे दूरसंचार. यासाठी पूर्वीच्या काळी कोणी माणसे पाठवत, तर कोणी कबुतरे उडवत असत. तंत्रज्ञानाचा विकास होऊन टपाल, टेलिग्राफ, टेलिफोन, रेडिओ, फॅक्स अशी अनेक नवी साधने विकसित झाली. उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणानंतर दूरसंचारासाठीही उपग्रहांचा उपयोग होऊ शकतो हे लक्षात आले आणि आज संदेशवाहक उपग्रह आपल्या दूरसंचार प्रणालीचा अविभाज्य भाग आहेत. रेडिओ, टीव्ही, मोबाइल, इंटरनेट, जीपीएस यांच्याशिवाय आज  जगण्याची कल्पनादेखील होऊ शकत नाही.  ही सगळी कम्युनिकेशन सॅटेलाइट्सची किमया!!

चंद्र हा आपल्या पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. अशीच एखादी वस्तू पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवली तर तीसुद्धा चंद्राप्रमाणे पृथ्वीभोवती फिरत राहील असा प्राथमिक विचार न्यूटन यांच्या प्रसिद्ध तोफगोळय़ाच्या काल्पनिक प्रयोगात आढळतो. ही कल्पना सत्यात यायला तीन शतके लागली. स्पेसरेसमध्ये बाजी मारण्यासाठी सोव्हिएत रशियाने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी स्पुटनिक – १ पृथ्वीच्या कक्षेत सोडला आणि पृथ्वीला पहिला कृत्रिम उपग्रह मिळाला. यानंतर पृथ्वीभोवती घिरटय़ा घालणाऱ्या उपग्रहांची संख्या वर्षांगणिक वाढतच चालली आहे. हे उपग्रह पृथ्वीभोवती एकाच कक्षेत फिरत नाहीत. त्यांच्या कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची, तिचा विषुववृत्ताशी कोन या सर्व गोष्टी उपग्रहाच्या कार्यानुसार ठरतात. भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रहाला उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते. त्यानंतर त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने विशिष्ट वेग दिला जातो. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो. हवामानाचा अंदाज, वैज्ञानिक प्रयोग, पृथ्वीचे निरीक्षण, नेव्हिगेशन, हेरगिरी अशा अनेक कारणांसाठी कृत्रिम उपग्रहांचा उपयोग होतो; पण इंटरनेट, मोबाइल फोन अशा संदेशवहनाच्या क्षेत्रात उपग्रहांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइट्सनी आपल्या जीवनात नवीन क्रांती घडवून आणली आहे.

१ ते १०० गिगॅहट्र्झदरम्यान फ्रीक्वेन्सी असणारे सूक्ष्म तरंग – मायक्रोवेव्ह आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. ध्वनी, व्हिडीओ, डेटा अशा कुठल्याही स्वरूपाचा संदेश मायक्रोवेव्हवर स्वार करून दूर अंतरावर पोहोचवता येतो. यासाठी सुरुवातीच्या काळात ठरावीक अंतरावर उंच टॉवर्स उभारून संदेशवहन होत असे, पण या पद्धतीला काही मर्यादा आहेत. उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणानंतर दूरसंचारासाठीही उपग्रहांचा उपयोग होऊ शकतो हे लक्षात आले. आकाशात उंच ठिकाणी असणारा उपग्रह जणू प्रचंड उंच टॉवर्सप्रमाणे खूप मोठय़ा प्रदेशात संदेशवहन करू शकतो. स्कोर, इको, कुरिअर, ऑस्कर अशा काही प्राथमिक दूरसंचार उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतर १९६२ मध्ये पहिला खऱ्या अर्थाने दूरसंचार उपग्रह टेलस्टार – १ नासा आणि बेल लॅबद्वारे कक्षेत प्रक्षेपित करण्यात आला. याद्वारे अमेरिकेतील टीव्ही प्रोग्रॅम्स अ‍ॅटलांटिक महासागरापलीकडे युरोपात प्रसारित करण्यात आले. टेलस्टारद्वारे अमेरिकेचे उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि एटीअँडटीचे अध्यक्ष फ्रेडरिक कॅपे यांच्यात पहिला सॅटेलाइट टेलिफोन कॉलदेखील झाला.

पण हे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) फिरत असल्याने त्यांचे दूरसंचार क्षेत्र कमी होते. केप्लरच्या तिसऱ्या नियमानुसार पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहाचे पृथ्वीपासून अंतर वाढवले, तर त्याचा पृथ्वीभोवती फिरण्याचा काळ वाढतो. भूपृष्ठापासून ३६,००० किलोमीटर उंचीवर उपग्रह फिरत ठेवला, तर त्याचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याच्या वेगाइतकाच होतो. असा उपग्रह पृथ्वीवरून आकाशात एकाच ठिकाणी स्थिर आहे असे वाटते. याला भूस्थिर उपग्रह (जिओसिंक्रोनस सॅटेलाइट्स) म्हणतात. या उपग्रहाचे आकाशातील स्थान स्थिर असल्याने जमिनीवरील केंद्रातील डिश अँटेना याच्याकडे कायम रोखून  ठेवता येतो. म्हणून असा उपग्रह दूरसंचार तंत्रज्ञानासाठी उत्तम असतो.

१९६४ मध्ये सिंकॉम-३ हा पहिला भूस्थिर दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित केला गेला. याने टोकियो इथे चाललेल्या ऑलिम्पिक स्पर्धाचे अमेरिकेत प्रक्षेपण केले. भूस्थिर कक्षेतील उपग्रह पृथ्वीच्या एकतृतीयांश क्षेत्रफळाशी संपर्क ठेवू शकतो. विषुववृत्ताच्या पातळीत असे तीन उपग्रह परस्परांपासून १२० अंश अंतरावर  फिरत ठेवले, तर जगातील कोणत्याही ठिकाणापर्यंत संदेशवहन करणे शक्य होईल. प्रसिद्ध ब्रिटिश विज्ञान लेखक आर्थर सी. क्लार्क यांनी १९४५ मध्ये मांडलेली ही संकल्पना आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानाचा पाया ठरली आहे.

१९६३ मध्ये दूरसंचार उपग्रहांच्या नियमनासाठी अनेक देशांच्या सहभागातून ‘इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स कन्सॉर्टिअम’ (INTELSAT) या नावाची आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण करण्यात आली. याद्वारे १९६५ मध्ये इंटेलसेंट- १ किंवा ‘अर्ली बर्ड’ नावाचा पहिला व्यावसायिक दूरसंचार उपग्रह सोडला गेला. १९६७ मध्ये इंटेलसॅट-२ मालिकेद्वारे पॅसिफिक महासागर आणि १९६९ मध्ये इंटेलसॅट-३ मालिकेद्वारे हिंदू महासागरावर भूस्थिर उपग्रह ठेवून संपूर्ण पृथ्वीवर संदेशवहनाचे नेटवर्क प्रस्थापित झाले. या इंटेलसॅट उपग्रहांच्या जागतिक नेटवर्कद्वारे जुलै १९६९ मध्ये मानवाचे चंद्रावर पडलेले पहिले पाऊल जगभरातील ६० कोटी लोकांनी घरबसल्या पाहिले!

उपग्रहाच्या साहाय्याने व्हॉइस, इमेज, व्हिडीओ किंवा डेटा अशा प्रकारचा कोणताही संदेश एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अगदी त्वरित पाठवणे शक्य होते. पृथ्वीवरच्या अर्थ स्टेशनमधून संदेश संदेशवाहक उपग्रहाला पाठवला जातो. दूरचा प्रवास वेगाने करण्यासाठी जसे आपण विमानात बसून जातो तसे भूपृष्ठापासून ३६ हजार किलोमीटर दूर असणाऱ्या उपग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी संदेश मायक्रोवेव्हजवर ‘स्वार’ करावा लागतो. उपग्रहातील रिसिव्हर अँटेना हा संदेश ग्रहण करतात. ट्रान्सपॉन्डर उपग्रहांचा एक महत्त्वाचा घटक आहे. उपग्रहातील प्रत्येक ट्रान्सपॉन्डरची बँडविड्थ, फ्रीक्वेन्सी आणि ऊर्जा पातळी वेगवेगळी असते. ट्रान्सपॉन्डर आलेल्या सिग्नलला अँप्लिफाय करून ट्रान्समीटर अँटिनाद्वारे पृथ्वीकडे परत पाठवतो आणि अशा प्रकारे आपण व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेला फोटो क्षणार्धात अमेरिकेतील मित्राला  मिळतो!

इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनद्वारा उपग्रह संदेशवहनाच्या सेवांचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले गेले आहे. टेलिफोन फॅक्स यांसारख्या सेवा फिक्सड सॅटेलाइट सव्‍‌र्हिस (FSS) या प्रकारात, तर हवाई, सागरी किंवा जमीन वाहतुकीदरम्यानचे संदेशवहन मोबाइल सॅटेलाइट सव्‍‌र्हिस (MSS) या प्रकारात येते. डीटीएचसारख्या सेवा ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट सव्‍‌र्हिस (BSS) मध्ये मोडतात.

 जगभरातील संदेशवहन क्षेत्रासाठीचे नियमन करण्यासाठी १७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची (इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन- ITU) स्थापना झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ १९७३ पासून हा दिवस ‘जागतिक दूरसंचार दिन’ म्हणून साजरा केला जातो. २००६ साली संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस ‘जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज  दिन’ म्हणून घोषित केला. आपल्या दैनंदिन जीवनात दळणवळण, तंत्रज्ञान आणि माहितीचे महत्त्व अधोरेखित  करणे तसेच या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन बदलांविषयी सामाजिक जागरूकता निर्माण करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. दर वर्षी आयटीयूकडून या दिवसासाठी एखादी मध्यवर्ती संकल्पना जाहीर केली जाते. ‘माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाद्वारे अल्प विकसित देशांचे  सक्षमीकरण’ ही या वर्षीची थीम आहे. फक्त करमणूक आणि संपर्कासाठी माध्यम इतकीच उपग्रहीय दूरसंचार क्षेत्राची व्याप्ती नाही. दुर्गम भागात शिक्षण आणि आरोग्यविषयक माहिती पुरवणे, नैसर्गिक आपत्तीत बचावास मदत करणे अशा कार्यातदेखील संदेशवाहक उपग्रह कार्यरत आहेत. संदेशवाहक उपग्रहांमुळे जग आज एक ‘वैश्विक खेडे’ बनले आहे! उपग्रहांच्या देणगीचा लाभ घेताना जबाबदारीचेदेखील भान असावे, या जागतिक दूरसंचार दिनाच्या शुभेच्छा!!