|| मितेश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढ सरत नाही तोवर मनाला ओढ लागते ती हिरव्यागार श्रावणाची. आपल्या देशातील बहुतांश सण हे ऋतुचक्रावर आधारलेले असतात. श्रावणातली शुद्ध पंचमी ही पूर्वापार नागपंचमी म्हणून या कृषीप्रधान देशात भक्तिभावाने साजरी केली जाते. या सणाच्या निमित्ताने सापांवर अभ्यास करणाऱ्या, काम करणाऱ्या सर्पमित्रांविषयी..

साप म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हे समाजमनात पक्कं बसलेलं भीतिदायक समीकरण आहे. मात्र या भीतीला दूर सारून आजची तरुणाई केवळ सर्पमित्र म्हणून नव्हे तर सापाच्या वेगवेगळ्या पैलूंचे अभ्यासक म्हणूनही काम करताना दिसते आहे. बारामतीचा अमोल अनिल जाधव हा इलेक्ट्रॉनिक आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनीअर. अमोलने ‘सर्पमित्र’ या नावाने फेब्रुवारी २०१७ मध्ये अ‍ॅप सुरू केलं. अमोलने सर्प जनजागृती कार्यक्रम करण्यास सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साप पकडण्यासाठी वारकरी शेतकरी फोन करू लागले. पण सर्पमित्रांचे नंबर लवकर उपलब्ध होत नसल्याने लोकांना मदत करणे अवघड होत होते. म्हणून हे अ‍ॅप तयार करण्याची कल्पना अमोलला सुचली आणि तो स्वत: सॉफ्टवेअर बेस इंजिनीअर असल्याने काम अधिक सुलभ झाले. सुरुवातीला हे अ‍ॅप फक्त इंग्रजी भाषेत होतं. आता मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून अ‍ॅपचं काम सुरू आहे. कालांतराने महाराष्ट्रापुरते मर्यादित असणारे हे अ‍ॅप संपूर्ण देशभरात कार्यान्वित झाले आहे.

आता या अ‍ॅपच्या माध्यमातून देशभरातील पाच हजारहून अधिक सर्पमित्र एकत्र काम करत आहेत. ५० हजारहून अधिक लोक हे अ‍ॅप वापरत आहेत. या अ‍ॅपमध्ये सर्पमित्रांच्या माहिती व्यतिरिक्त आपल्या परिसरातील सापांचीही माहिती मिळते, वनविभागाचे नंबर मिळतात, सर्पदंशानंतर प्राथमिक उपचारांची माहिती, साप पकडण्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा मागवता येते. अमोल सांगतो, ‘मी शेतकरी पट्टय़ात राहणारा मुलगा. सापाविषयी प्रबोधनाची शेतकरी वर्गाला खरी गरज आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हापासून मी सापांसाठी काम करू लागलो. प्राणिशास्त्राचे प्राध्यापक रवींद्र कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन ऑक्टोबर २००३ साली सर्पमित्र क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली’. २०१० मध्ये ‘ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन’ नावाची संस्था बारामतीमध्ये स्थापन करून त्याअंतर्गत ५० सर्पमित्र बारामती व तालुक्यात साप वाचवण्याचे तसेच जनजागृतीचे कार्य करत आहेत, अशी माहिती अमोलने दिली. भविष्यात सर्पमित्र फंड हा पर्याय अ‍ॅपमध्ये अ‍ॅड करण्याचा त्याचा मानस आहे. ज्यात लोक सर्पमित्रांसाठी आर्थिक मदत पाठवू शकतील, ज्याचा वापर भविष्यात कोणत्या सर्पमित्राला सर्पदंश झाल्यास करता येईल, या संदर्भात काम सुरू असल्याचे त्याने सांगितले.

पुण्यातील अजिंक्य उनावणे हा तरुण सापाच्या विषापासून औषधनिर्मिती कशी करता येईल, यावर संशोधन करतो आहे. लहानपणापासूनच अजिंक्यला सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी कुतूहल होतं. गावाकडे साप दिसला की एकीकडे नमस्कार केला जातो तर दुसरीकडे त्याला मारूनही टाकलं जातं. कुठेतरी हे चित्र बदलायला हवं म्हणून अजिंक्य या क्षेत्राकडे वळला. चौथीत असताना त्याने पहिला साप पकडला. दहावीनंतर अजिंक्यची गाडी सुसाट सुटली. मोबाइल हातात आल्याने साप आला की त्याचा फोन खणखणायचा व अजिंक्य साप पकडायला रवाना व्हायचा. त्याची ही विशेष आवड लक्षात घेता त्याने पुण्यात स्थलांतरित झाल्यावर एस.पी. कॉलेजमधून बी. एस्सी. झुलॉजी आणि त्यानंतर मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरमधून एम.एस्सी. या पदव्या मिळवल्या. शिक्षण पूर्ण करत असतानाच या क्षेत्रातील दिग्ग्ज मंडळींशी त्याची गाठभेट होत राहिली व त्याच्या करिअरला दिशा मिळाली. रिसर्च आणि साप अशी दोहोंची आवड असल्याने अजिंक्यने पीएचडीसाठी हा किचकट विषय निवडला आहे. त्याचं संशोधन नुकतंच सुरू झालं आहे. सापाचं विष हे आज किती तरी आजारांवर फायदेशीर ठरतं आहे. सापाच्या विषापासून बऱ्याच प्रकारची औषधे तयार होत आहेत. हृदयविकार, मधुमेह, सर्पदंश असे काही प्रमुख आजार आहेत ज्याच्यावर ते काम करतं, असं तो सांगतो.

अहमदनगर जिल्ह्यतील गनोरे या गावचा विवेक तुकाराम दातीर हा तरुण ग्रामीण आदिवासी भागात नोकरी सांभाळून सापाबद्दल जनजागृती करतो आहे. संगमनेर महाविद्यालयातून त्याने बी.एस्सी. पूर्ण केले आहे. खरं तर याआधी त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण एक वर्ष घेऊ न अर्धवट सोडले. अभियांत्रिकी सोडून बी.एस्सी.ला प्रवेश घेणे हा त्याच्या आयुष्यातला एक नवा रंजक अध्याय होता. एके दिवशी त्याच्या मित्राच्या तोंडून साप आणि कार्यशाळा असे शब्द ऐकले. विवेक सांगतो, साप हा शब्द कानी पडला आणि मनात कुतूहल जागे झाले. कारण आजपर्यंत गावाकडे लोकांना फक्त साप मारतानाच पाहिले होते, इथे कार्यशाळेत ते जवळून बघायला आणि अभ्यासायला मिळणार होते. अखेर विद्यापीठाअंतर्गत तीन दिवसांची ‘सर्प संवर्धन, संरक्षण आणि लोकशिक्षण’ कार्यशाळेला उपस्थित राहण्याची नामी संधी मिळाली. वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक म. वि. दिवेकर हे कार्यशाळेचे प्रतिनिधित्व करत होते. जवळपास पस्तीसहून अधिक वर्षे सरांनी संगमनेर आणि अकोले परिसरात सर्प संवर्धन, सर्पदंश आणि जनजागृतीचे कार्य अविरत सुरू ठेवले होते. त्यावेळी प्रत्यक्ष विषारी साप डोळ्यांनी बघायला मिळाले आणि बिनविषारी सापाला हात लावण्याची संधी मिळाली. त्यामुळे सापाबद्दलची भीती आणि अंधश्रद्धा दोन्ही दूर झाल्या, असे विवेक म्हणतो. कार्यशाळा संपली मात्र सापांचे खूळ जाम डोक्यात बसले होते. त्याच वेळी ‘साप’ हे निलीमकुमार खैरे यांचे पुस्तक हाताशी आले होते.  सुरुवातीला फक्त गावात आढळणाऱ्या विषारी-बिनविषारी अशी सापांची खात्रीशीर ओळख करून घेतली. हळूहळू मी गावाकडे साप पकडायला सुरुवात केली. कार्यशाळेनंतर वर्षभरानंतर मी पहिला विषारी साप पकडला, तो होता राजबिंडा नाग!, अशी आठवण सांगणाऱ्या विवेकला तेव्हापासून दिवसरात्र साप पकडण्यासाठी फोन येऊ लागले. विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्याने सापाचा अधिवास, प्रजनन आणि अन्नसाखळीतील स्थान याचा गाढा अभ्यास केला आहे. सध्या साप पकडण्याबरोबरच स्टंट करून फोटोशूट आणि व्हिडीओ बनवणे असे खूळ तरुण मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. यामधून सर्पदंश अपघात होऊन अनेक जणांना मृत्यू आलेला आहे, अशी माहिती देत वन्यजीव कायद्यनुसार साप विनाकारण हाताळणे, स्टंट करणे आणि शोबाजी करणे गुन्हा असल्याचे त्याने सांगितले. सध्या राज्यपातळीवर आणि देशपातळीवर काही सामाजिक संस्थांबरोबर जनजागृतीचे काम करण्याची संधी विवेकला मिळते आहे. सुरक्षित पद्धतीने साप कसे रेस्क्यू करायचे, तसेच साप सोडताना त्याचा अधिवास कसा जपायचा या गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून सर्पदंश मृत्यू कसे रोखता येतील यावरही जनजागृतीचे कार्य सुरू आहे, असे विवेकने सांगितले.

मुंबईतही अनेक सर्पमित्र कार्यरत आहेत. त्यामध्ये विशेष नाव घ्यावंसं वाटतं ते चिन्मय जोशी या तरुणाचं. लहानपणी जत्रेमध्ये खेळणी किंवा गाडय़ा, घोडे घेण्यापेक्षा त्याने लाकडी साप घ्यायचा हट्ट केला. चिन्मयने पहिला साप पकडला तो सातवीत. मुलुंड,भांडुप हा भाग संजय गांधी रा।ष्ट्रीय उद्यानाच्या जवळ येत असल्याने सापांचा सुळसुळाट येथे अधिक पाहायला मिळतो. असंच एकदा खेळत असताना वॉचमनला साप दिसला व चिन्मयने तो काठीने उचलला. तेव्हा त्याला त्याची जात, विषारी – बिनविषारी हे काहीच उमगलं नाही. त्यानंतर त्याने पुस्तक चाळली व सापांवर अभ्यास करायला सुरुवात केली. नववीत असताना त्याने विषारी नागसुद्धा पकडला. तेव्हापासून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली व पूर्णवेळ या क्षेत्रात वळण्याचा त्याने निर्णय घेतला. अनेक नामांकित सर्पमित्रांच्या हाताखाली काम करून अनुभवाचं गाठोडं त्याने पक्कं करून घेतलं. आता तो मानवी वस्तीत आलेल्या अनेक विषारी-बिनविषारी सापांसोबतच,मगर, वाघीण, बिबटय़ा, हरण यांना शास्त्रीय पद्धतीने पकडून त्यांच्यावर आवश्यक मेडिकल उपचार करून त्यांना जंगलात सोडण्याचं काम वन खात्याच्या जोडीने करतो आहे. एकदा एका बैठय़ा चाळीत छोटय़ाशा खोलीमध्ये नऊ  महिन्यांचं बाळ पाळण्यात झोपलं होतं. आणि त्याच्या पाळण्याच्या बरोबर मागे विषारी नागोबा फणा काढून बसला होता. अशा परिस्थितीत त्या परिवाराला शांत करून नागाला पकडण्याचं आव्हान समोर होतं. थोडी जरी गडबड झाली असती तरी मोठा अनर्थ होणार होता. त्याही परिस्थितीत नागाची सुखरूप सुटका चिन्मयने केली. या क्षेत्रात यायचं असेल तर मुलांमध्ये एकाग्रता, नम्रता आणि संयम हवा, असं चिन्मय म्हणतो. सध्या तोही सापांवर संशोधन करतो आहे.

चिन्मय जोशी व पवन शर्मा या दोन तरुणांनी एकत्र येत ‘रॉ’ ही एनजीओ सुरू केली असून मुलुंड ते विक्रोळी या शहरी भागात येणाऱ्या वन्य व सरपटणाऱ्या प्राण्यांची सुटका करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. ६० ते ७० जणांचा चमू आपापलं शिक्षण व नोकरी सांभाळून या एनजीओ मध्ये हातभार लावत आहेत. पवन सांगतो, आम्ही वन खात्याबरोबरही काम करतो. वर्षांला ६०० साप आम्ही मानवी वस्तीतून काढतो. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना जंगलात सोडतो. बऱ्याचदा पिशवीत पकडलेला साप हा जंगलात सोडायला बारा तासांचा कालावधी जातो. या कालावधीत साप अंडीही घालतात. अंडी जंगलात सोडणं धोक्याचं असल्याने आम्ही अशा वेळी वन खात्याच्या परवानगीने ती अंडी योग्य त्या तापमानात सेट करून पिल्लांना जन्मही देतो, अशी माहिती त्याने दिली. सर्वात भीतिदायक म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या सापांचा अभ्यास करत, त्यांना वाचवत खऱ्या अर्थाने ही तरूणाई नागपंचमी साजरी करते आहे!

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snake naga panchami rishi panchami amol jadhav mpg
First published on: 02-08-2019 at 00:10 IST