सौरभ करंदीकर viva@expressindia.com

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे गेल्या शतकात आपण विविध प्रकारचा कचरा आपल्या भूतलावर निर्माण केलेला आहे. त्यापैकी किरणोत्सर्गी पदार्थाचा कचरा, पर्यावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचा कचरा आणि पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या कोटय़वधी धातूच्या तुकडय़ांचा (स्पेस जंक) कचरा. या साऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची जबाबदारी भावी पिढीच्या खांद्यावर टाकून आपण आपले हात झटकलेले आहेत. निदान त्यांच्यासाठी तरी आपण या साऱ्याबाबत काही तरी करणं आवश्यक आहे.

अणुऊर्जेच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारा कचरा काही हजार वर्ष आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो हे आपण पाहिलं. किरणोत्सर्गी कचऱ्याला त्याच्यातील उष्णता नाहीशी होईपर्यंत पाण्यात (काही वर्ष तरी) बुडवून ठेवावं लागतं. त्यानंतर त्याला विशेष आवरणात पुरून ठेवता येतं. या बाबतीत फिनलंड या देशाने विशेष पुढाकार घेतला आहे. १९७७ सालापासून फिनलंड अणुऊर्जेचं उत्पादन करत आहे. २००५ पासून फिनलंडमधील ओकिलोटो येथे युरोपातील सर्वात मोठं अणुशक्ती केंद्र उभारायला सुरुवात झाली. त्याबरोबरच त्या केंद्रातून निर्माण होणाऱ्या किरणोत्सर्गी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणादेखील उभारण्यात येत आहे. ७५ अब्ज रुपये (१०० कोटी डॉलर्स) खर्च करून भूगर्भात सुमारे अर्धा किलोमीटर खोलवर भुयारांची एक मालिका खणण्यात येत आहे. ओकिलोटोमधून बाहेर पडणारा किरणोत्सर्गी कचरा बोरॉन स्टीलच्या सिलेंडर्समध्ये बंद करून त्या सिलेंडर्सना न गंजणाऱ्या तांब्याचा मुलामा देऊन या भुयारांमध्ये ठेवण्यात येईल. फिनलंडमध्ये आजपर्यंत तयार झालेला असा कचरा तसेच नव्याने तयार होणारा कचरा या भुयारांमध्ये २१२० सालापर्यंत साठवायची सोय केली गेली आहे. शंभर वर्षांनी मात्र हे केंद्र बंद करून त्या भुयारांना कायमचं सील ठोकण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पुढच्या शंभर वर्षांत तरी ऊर्जानिर्मितीचं हे धोकादायक तंत्र कालबा होईल असा अंदाज आहे.

भुयारांमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ ठेवणं भूजलास प्रदूषित करू शकेल आणि पर्यायाने धोकादायक ठरेल असं पर्यावरणवादी मंडळींचं म्हणणं आहे, परंतु सध्या तरी हाच उपाय त्यातल्या त्यात बरोबर वाटतो. पृथ्वीवरचा किरणोत्सर्गी कचरा रॉकेटच्या साहाय्याने प्रक्षेपित करून थेट सूर्याच्या दिशेने सोडलं तर नाही का चालणार? अशीही एक भंपक कल्पना आहे. परंतु सध्या तरी ते अशक्य वाटतं. एक तर अशा कचऱ्याचा आकार आजपर्यंत २४,००० टनांवर पोहोचला आहे. एवढा कचरा अंतराळात नेण्यासाठी २,५०० रॉकेट प्रक्षेपित करायला लागतील. शिवाय यातल्या एका जरी रॉकेटचा पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडण्यापूर्वीच स्फोट झाला, तर सध्या मोठय़ा परिश्रमाने सांभाळलेला किरणोत्सर्ग आपल्या वातावरणात पसरण्याचा धोका आहेच. अशा रॉकेट प्रक्षेपणातून किती कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात सोडला जाईल? म्हणजे एका कचऱ्याला नेताना दुसरा कचरा वाढणार!

पर्यावरणातला कार्बन डाय ऑक्साईडचा कचरा हा दुसरा गंभीर प्रश्न. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ आपण भूगर्भातील खनिज तेल आणि वायू यांचा इंधन म्हणून उपयोग करत आलो आहोत. इंधन वापरातून कार्बन आणि इतर अनेक वायू तयार होतात आणि आपल्या वातावरणात घर करून राहतात. आपला निसर्ग झाडांच्या, समुद्रांच्या आणि काही विशिष्ट दगडांच्या माध्यमातून स्वत: हा कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याचं कार्य सतत करतच असतो. परंतु नैसर्गिक कार्बन-शोषण हे कार्बन उत्पादनाच्या कधीच मागे पडलं आहे. वातावरणातला वाढता कार्बन पृथ्वीचं तापमान वाढायला कारणीभूत ठरत आहे. वाढत्या तापमानामुळे ध्रुव प्रदेशातील हिमनग वितळून समुद्राची पातळी वाढेल आणि पर्यायाने पृथ्वीवरील भूभाग आक्रसतील असं भाकीत शास्त्रज्ञांनी (इतर अनेक दुष्परिणामांसकट) आजवर अनेकदा केलं आहे. परंतु हे बदल सूक्ष्म असल्याने ‘माझ्या हयातीत तर काही होणार नाही, मग मी याची काळजी का करू?’ अशी बेफिकिरी दिसून येते आहे. ‘माझ्या देशातील कार्बन उत्पादन इतर प्रगत देशांपेक्षा किती तरी कमी आहे, मग माझ्या देशाने त्याविरुद्ध उपाययोजना करायचा मक्ता का घ्यावा?’ असेही प्रश्न विचारले जात आहेत. पृथ्वीच्या वातावरणाला देशांच्या सीमारेषा माहीत नसतात, याकडे मात्र अशा वेळी डोळेझाक केली जाते.

२१ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क, यांनी पर्यावरणातील कार्बन शोषून घेणारी यंत्रणा जो शोधून काढेल त्याला मी १० कोटी डॉलर्स (साडेसात अब्ज रुपये) बक्षीस देईन अशी घोषणा केली. कार्बन शोषण तंत्रज्ञान शोधून काढण्याच्या स्पर्धेची (कार्बन एक्स प्राईझ) घोषणा याआधीच झालेली आहे. अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यावर काम करत आहेत. ‘त्यापेक्षा झाडं लावा की! कार्बन शोषण्याचा उत्तम उपाय’ अशा शब्दांत अनेकांनी या प्रयत्नांची चेष्टा केली आहे. परंतु झाडं लावणं, वृक्षतोड थांबवणं हे आता पुरेसं राहिलेलं नाही.

बीटीएम, झुरिक, स्वित्र्झलड येथील जॉन फ्रांस्वा बॅस्टीन याने २०१९ साली उपग्रहांच्या माध्यमातून एक सर्वेक्षण केलं. पृथ्वीच्या भूभागावर किती झाडं लावता येतील याचा त्याने अंदाज घेतला. अमेरिकेच्या आकाराएवढय़ा भूभागावर सुमारे एक लाख कोटी झाडं अजूनही लावता येतील आणि ती वातावरणातील २५% कार्बन शोषून घेऊ शकतील असा अंदाज त्याने प्रकाशित केला. इतकी झाडं लावायलाच एक ते दोन हजार वर्ष लागतील. या कालावधीत आणि ती झाडं मोठी होऊन कार्बन शोषू लागेपर्यंत तयार होणाऱ्या कार्बनचं काय, असा सवाल काही शास्त्रज्ञांनी केला आहे. झाडं लावलीच पाहिजेत, वृक्षतोड थांबलीच पाहिजे, परंतु कार्बन प्रदूषण त्यापूर्वी पूर्णत: रोखलं पाहिजे. आणि ते आत्ता तरी शक्य नाही. त्यामुळे कार्बन शोषण तंत्रज्ञान हेच खरं उत्तर होय. या तंत्रज्ञानाबद्दल आणि पृथ्वीभोवतीच्या स्पेस-जंकबद्दल पुढील लेखात जाणून घेऊ.