|| प्रथमेश दीक्षित

भारतीय क्रीडा क्षेत्राचा विचार केला असता, दुर्दैवाने क्रिकेटचा अपवाद वगळता महासत्ता बनण्याची गोष्ट म्हणजे एक दिवास्वप्नच होऊन बसलं आहे. गेल्या दशकभरातला क्रीडा क्षेत्राचा प्रवास हा म्हणावा तितका चांगला राहिलेला नाही.

महासत्ता हा माझ्यासाठी एका अर्थाने खूप गोंडस शब्द आहे. एखादा देश जेव्हा महासत्ता होईल अशी अपेक्षा केली जाते, तेव्हा प्रत्येक बाबतीत तो देश प्रगतिपथावर असतो. भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांनी बघितलं होतं. २०२० सालापर्यंत भारत महासत्ता बनेल, असं अब्दुल कलाम अनेकदा आपल्या भाषणांमध्ये म्हणाले आहेत. २०१५ साली अब्दुल कलाम यांचं निधन झालं. यानंतर बराच काळ उलटला. २०१९ साल उजाडून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने दुसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. मात्र अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं स्वप्न आपण खरंच पूर्ण करणार आहोत का किंवा निदान आपण त्या मार्गावर तरी आहोत का? भारतीय क्रीडा क्षेत्राचा विचार केला असता, दुर्दैवाने क्रिकेटचा अपवाद वगळता महासत्ता बनण्याची गोष्ट म्हणजे एक दिवास्वप्नच होऊन बसलं आहे. गेल्या दशकभरातला क्रीडा क्षेत्राचा प्रवास हा म्हणावा तितका चांगला राहिलेला नाही.

क्रिकेट हा काही भारतातला मूळ खेळ नाही. ब्रिटिशांनी जगभरासह भारतामध्ये हा खेळ रुजवला. यानंतर भारतीयांनी या खेळाला धर्माचं स्वरूप दिलं. आज देशातल्या कोणत्याही घरात जाऊन पाहिलं तर क्रिकेटशी संबंधित एक तरी वस्तू आपल्याला पाहायला मिळते. माझ्या मते हा खेळ आपण नसानसांमध्ये भिनवून घेतल्याचं हे उदाहरण आहे. एका खेळात एक देश जेव्हा अव्वल स्थानावर पोहोचतो तेव्हा त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. ग्रामीण पातळीवर झालेला खेळाचा प्रसार, संघटनेची आश्वासक धोरणं आणि स्थानिक स्पर्धामधून खेळाडूंना मिळणारी संधी.. अशी अनेक कारणं देता येतील. भारतीय क्रिकेटचा कारभार हाकणाऱ्या बीसीसीआयने या सर्व बाबतींमध्ये उल्लेखनीय काम केल्याचं पाहायला मिळतंय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालचा भारतीय संघ आज जवळपास तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये (कसोटी, वन डे आणि टी-२०) अव्वल आहे. यापाठीमागचं कारण ठरलंय संघात असलेला तरुण आणि उमद्या खेळाडूंचा भरणा. क्रिकेट खेळणाऱ्या भारतातील बहुतांश राज्यांतले खेळाडू आज भारतीय संघात आहेत. प्रत्येक वर्षी आयपीएल, रणजी क्रिकेट यांसारख्या स्पर्धामधून नवीन नावं आपल्यासमोर येतात. आज भारतीय संघात खेळणाऱ्या प्रत्येक तरुणाला एक पर्यायी खेळाडू हजर आहे.

या गोष्टी तेव्हाच शक्य होतात जेव्हा तुमच्या संघटनेचा पाया भक्कम असतो. प्रसारमाध्यमांमधून आपल्या स्पर्धाचं वार्ताकन होणं, रणजी-विजय हजारे-सय्यद मुश्ताक अली यांसारख्या स्थानिक स्पर्धाच्या थेट प्रक्षेपणामुळे क्रिकेटने सामान्य भारतीयांशी आपली नाळ जोडली आहे. टी-२०चा अपवाद वगळता आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ सध्या अव्वल ३ संघांमध्ये गणला जातो. संघटनात्मक पातळीवर आयसीसीवर दबाव टाकण्याची गोष्ट असो किंवा आशियाई क्रिकेट परिषदेमध्ये आपली भक्कम बाजू मांडणं असो.. बीसीसीआयने आपल्या आर्थिक प्राबल्याच्या जोरावर नेहमी बाजी मारली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भारत किमान क्रिकेटमध्ये महासत्ता बनलाय, असं म्हणायला वाव आहे. दुर्दैवाने इतर खेळांमध्ये मात्र अशी परिस्थिती नाही.

ऑलिम्पिक पातळीवर भारताला सर्वाधिक यश मिळवून देणारा खेळ म्हणजे हॉकी. मेजर ध्यानचंद यांच्या काळात सुवर्णयुग अनुभवलेला भारतीय हॉकी संघ सध्या संघटनात्मक राजकारणाचा बळी ठरला आहे. काळानुरूप हॉकीने कात टाकली, नियमांमध्ये अनेक बदल झाले, खेळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला. मात्र या तुलनेमध्ये भारतीय हॉकी कायम एक पाऊल मागेच राहिली आहे. ७ सुवर्णपदकांचा मानकरी ठरलेल्या भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी आता मारामार करावी लागत आहे. पूर्वी आशिया खंडात पाकिस्तानचा अपवाद वगळता भारतीय संघाला तुल्यबळ प्रतिस्पर्धी नव्हता. मात्र कालानुरूप आशिया खंडात भारताला आव्हान निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. मलेशिया, जपानसारखे देश आता भारताला पराभूत करण्याची क्षमता ठेवत आहेत. भारतीय हॉकीची अचानक इतकी दुर्दशा होण्यामागचं कारण संघटनेवर एका व्यक्तीचा असणारा अंमल हे आहे.

आजही हॉकी इंडिया संघटनेवर, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांच्या गटाचं वर्चस्व आहे. २००७ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ पात्र ठरू शकला नाही. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या हॉकी इंडिया संघटनेने पावलं उचलायला सुरुवात केली. मात्र संघाच्या निर्णयांमध्ये अनावश्यक हस्तक्षेपामुळे भारतीय संघाची घडी बसूच शकली नाही. मध्यंतरीच्या काळात रोलंट ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानावर असलेला भारतीय संघ सहाव्या आणि मग पाचव्या स्थानावर आला. मात्र एका स्पर्धेतील खराब कामगिरीचं कारण देऊन ओल्टमन्स यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय हॉकी अशाच नको असलेल्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. आशियाई खेळांमध्ये भारत आतापर्यंत आपलं वर्चस्व राखून होता, मात्र तिकडे जपानने भारताच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. त्यामुळे एक काळ आंतरराष्ट्रीय हॉकीवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय संघाला आता ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरी खेळण्याची नामुष्की आली आहे. संघनिवड, धोरणात्मक निर्णय या सर्व बाबतीत आजही हॉकी इंडियाचा कारभार हा दिशाहीनच आहे. त्यामुळे येत्या काळात हॉकी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देईल ही आशा बाळगणं थोडं धाडसाचं ठरणार आहे.

एकंदरीत भारतामधील सर्व खेळांचा विचार केला तर संघटनात्मक राजकारणामुळे प्रत्येक खेळाची प्रगती खुंटल्याचं उदाहरण आपल्याला दिसून येईल. लिएँडर पेस आणि महेश भूपती ही भारतीय टेनिसमधली नावाजलेली नावं. मात्र दोघांमधल्या वादानंतर, आंतरराष्ट्रीय टेनिस जगतात सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा भारताचा ओघ आटला आहे. गेल्या दशकभरातील भारतीय बॅडमिंटनपटूंनी केलेली कामगिरी ही आश्वासक आहे, मात्र आशिया खंडातच चीन, जपान, मलेशिया, चीन तैपेई यांसारख्या देशांची मक्तेदारी मोडून काढणं आपल्याला जमलं नाही. सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांचं नाव सोडलं तर एकेरी प्रकारात पदक मिळवून देईल अशी खेळाडू भारताकडे नाही. पुरुषांमध्येही श्रीकांत, एच.एस. प्रणॉय यांसारख्या खेळाडूंवर येऊ न हे प्रकरण थांबतं. नुकतंच सिंधू आणि प्रशिक्षक गोपीचंद यांच्यात बेबनाव झाल्याची बातमी समोर आली होती. गोपीचंद यांच्या अकादमीतले बहुतांश खेळाडू भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करतात ही बाब खरी आहे, पण वाद आणि अंतर्गत धुसफुशींमुळे भारतीय बॅडमिंटनच्या प्रगतीचा आलेख हा सायना आणि सिंधूपुढे कधी जाऊच शकला नाही.

कुस्ती आणि कबड्डी हे भारताचे हक्काचे खेळ मानले जातात. मात्र हे खेळदेखील राजकारणाच्या तावडीतून सुटले नाहीत. गुणवान खेळाडूंना डावलून उत्तर भारतातील खेळाडूंना झुकतं माप देण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघ आणि त्याची निवड समिती नेहमीच चर्चेत राहिली आहे. महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे याच्या निवडीदरम्यान झालेलं राजकारण हे सर्वाना परिचित आहे. त्यामुळे स्थानिक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करणारे मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन, जपान, रोमानिया, मंगोलिया यांसारख्या देशांच्या मल्लांपुढे उघडे पडतात. खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्तीमध्ये पहिलं पदक मिळवून दिलं होतं. आजही त्या कांस्यपदकावरून भारतीय मल्लांना सुवर्णपदकावर उडी मारणं जमलं नाही आहे. ही गोष्ट आपण किती प्रगती केली आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहे.

प्रो-कबड्डी या खासगी स्पर्धेने कबड्डीला सातासमुद्रापार पोहोचवलं. मात्र गेल्या आशियाई खेळांमध्ये इराणने भारताला दिलेला धोबीपछाड हा सर्वाची झोप उडवणारा होता. कबड्डी हा खेळ भारताने सर्व जगाला शिकवला, आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार म्हणून भारताकडे पाहिलं जातं. मात्र पुन्हा एकदा नियोजनशून्य कारभार हा गेल्या आशियाई खेळांमध्ये भारतीय कबड्डीच्या मुळावर उठला. जनार्दनसिंह गेहलोत यांच्या घराणेशाहीला तडा देत कबड्डी महासंघावर प्रशासक नेमला जाणं, अंतिम संघनिवडीवर उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका, एका संघासोबत ३ प्रशिक्षकांची फौज यांसारख्या अगम्य गोष्टी भारतीय कबड्डी संघासोबत घडत गेल्या, ज्याचा फटका संघाला बसला. सुदैवाने कबड्डीमध्ये भारत आपली सत्ता अजूनही कायम टिकवून आहे. मात्र गेल्या काही वर्षांत इराण, दक्षिण कोरिया, जपान, पोलंड यांसारख्या देशांनी कबड्डीत जी प्रगती केली आहे ती पाहता, आगामी काळ भारतासाठी सोपा ठरणार नाही हे मात्र नक्की..

याव्यतिरिक्त तिरंदाजी, नेमबाजी, बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्स या प्रकारात भारताची प्रगती उल्लेखनीय आहे. नेमबाजीत मनू भाकेर, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा यांसारखं नवं आणि उमदं टॅलेंट भारताला गवसलं आहे. यामध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धाचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवलं आहे. मात्र या खेळाडूंची खरी परीक्षा ही ऑलिम्पिकला असेल. बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने टोकियो ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. तिच्यानंतर भारतीय बॉक्सिंगची धुरा कोण खांद्यावर घेणार, हा मोठा प्रश्न आहे. पुरुषांच्या गटातही विकास कृष्णनसारखे काही गुणवान खेळाडू भारताकडे आहेत, मात्र अव्वल बनण्यासाठी त्यांना अजून मोठा प्रवास करायचा आहे.

खेळामध्ये भारत महासत्ता बनला का? हा  प्रश्न विचारणं खरं तर खूप सोपं आहे. मात्र महासत्ता बनणं ही काही सोपी गोष्ट नक्कीच नाही, त्यासाठीची प्रक्रिया मोठी आहे. कित्येक वर्षांच्या मेहनतीतून ही गोष्ट घडते. खेळाडूंना मिळणाऱ्या सोयीसुविधा, मातब्बर प्रशिक्षक, क्रीडा संघटनांनी संघामध्ये अवास्तव हस्तक्षेप टाळणं, संघासाठी प्रायोजक आणि पैसा उभा करणं आणि सरावासाठी योग्य मैदानं ही यंत्रणा जेव्हा संपूर्ण देशभरात उभी राहील तेव्हा भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू करेल. तोपर्यंत काय, स्वप्न आपण पाहूच शकतो!

भारतामधील सर्व खेळांचा विचार केला तर संघटनात्मक राजकारणामुळे प्रत्येक खेळाची प्रगती खुंटल्याचं दिसून येईल. लिएँडर पेस-महेश भूपती ही भारतीय टेनिसमधली नावाजलेली नावं. मात्र दोघांमधल्या वादानंतर, आंतरराष्ट्रीय टेनिस जगतात सातत्याने चांगल्या कामगिरीचा ओघ आटला आहे.

तिरंदाजी, नेमबाजी, बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्स या प्रकारात भारताची प्रगती उल्लेखनीय आहे. नेमबाजीत मनू भाकेर, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा यांसारखं नवं आणि उमदं टॅलेंट भारताला गवसलं आहे. यामध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धाचा मोठा वाटा आहे.

viva@expressindia.com