स्पा थेरपीचा एक भाग म्हणजेच स्टोन थेरपी. निसर्गाने आपल्याला बरेच काही दिले आहे. आधुनिक युगात नवीन साधने, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन पद्धतीच्या साहाय्याने आपण सौंदर्य आणि आरोग्यविषयक अत्याधुनिक उपचार करू शकतो. मात्र सौंदर्याचे मूळ नैतर्गिक ऊर्जेत आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. पृथ्वीच्या पोटात अनेक प्रकारचे धातू उत्पन्न होतात. धातूंचा उपयोग करणाऱ्या अनेक सौंदर्योपचार पद्धती आहेत. अनेक प्रकारच्या, अनेक रंगांच्या दगडांचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग केला जातो. यालाच ‘क्रिस्टल थेरपी’ असेही म्हणतात. खरेतर स्टोन थेरपी हा एक नैसर्गिक उपचार आहे. ज्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. शारीरिक ऊर्जेसाठी हा एक उपचार आहे. आधुनिक युगात धावपळीमुळे मनुष्याचे राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्यामुळे स्वत:शीच तो झुंज देत असतो आणि त्याचा परिणाम त्याच्या शारीरिक आरोग्यावर होऊन नैसर्गिक निरोगी आरोग्य तो गमावून बसला आहे. त्यातून मानसिक तणाव, शारीरिक थकवा आणि कितीतरी रोगांना तो बळी पडला आहे. खासकरून पस्तीशीनंतर महिला मानसिक ताणामुळे येणाऱ्या आजारांना बळी पडतात, हे स्पष्ट झाले आहे.
खरेतर स्टोन थेरेपी हा असा उपचार आहे जो संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त आहे. या उपचारासाठी विशिष्ट स्टोन वापरले जातात. ते पृथ्वीच्या पोटातून निघालेल्या ज्वालामुखीच्या लाव्ह्याने बनलेले असतात. काही समुद्राच्या भूगर्भात सापडले जातात. या स्टोनमध्ये वेगळी शक्ती असते, असे म्हणतात. यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. पृथ्वी आणि नैसर्गिक चमत्कारांनी बनलेली सर्वोत्तम सकारात्मक उपचारपद्धती म्हणजेच ‘स्टोन थेरपी.’
स्टोन थेरेपी यामध्ये जे दगड वापरले जातात, ते दगड वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या आकाराचे असतात. ते शरीराच्या वेगवेगळ्या भागावर ठेवले जातात. शरीराच्या सात चक्रांवर पुढे-मागे ठेवले जातात.
या स्टोनमुळे शरीरातील टिश्यू आणि स्नायू यांना हलका, मध्यम डिप टिश्यू मसाज दिला जातो. व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार, त्याच्या शारीरिक व्याधीनुसार किंवा त्याच्या तक्रारीनुसार त्याचा उपयोग केला जातो. स्टोन थेरपी देण्याआधी काऊंन्सिलिंग केले जाते. त्यानंतर स्टोन गरम करून मग त्याचा वापर केला जातो. हे स्टोन जास्तीत जास्त ६० टक्के व कमीतकमी ४० टक्के डिग्रीला गरम केले जाते. त्यामध्ये अरोमा तेल वापरतात. स्टोनने मसाज दिला जातो. याला वेगवेगळे नाव असते. जसे- कोल्ड मदर स्टोन, ग्रॅण्ड फादर स्टोन.
ग्रॅण्ड फादर स्टोन हा नेहमी शरीराच्या पुढच्या म्हणजे वरच्या साईडला पोटावर ठेवला जातो. या स्टोनचा आकार सर्व स्टोनच्या आकाराने मोठा असतो. ग्रॅण्ड मदर हा कमरेच्या खाली ठेवला जातो. त्यापेक्षा लहान-लहान स्टोन सात चक्रांवर ठेवले जातात. पायाच्या व हाताच्या पॉईन्ट्समध्ये अतिशय लहान-लहान स्टोन ठेवले जातात. शरीराला झेपेल तेवढेच गरम स्टोन शरीराच्या भागावर जेव्हा ठेवले जातात तेव्हा त्या स्टोनपासून मिळालेली ऊर्जा ही अतिशय आल्हाददायक व सकारात्मक वाटते. त्यामुळे स्नायू रिलॅक्स तर होतात व मानसिक संतुलनही चांगले होते. रक्तप्रवाह व रक्ताभिसरण वाढून स्फूर्ती वाढते. ही जास्तीत जास्त दीड तासाची थेरेपी आहे. या स्टोनमध्ये इतकी ऊर्जा असते की, ते तासभर गरम राहते. परंतु स्टोन थेरेपीमध्ये वापरण्यात आलेले स्टोन हे ओरिजनल असले तरच ते जास्त फायदेशीर असतात.
यापासून मिळणारे फायदे-
१) सकारात्मक ऊर्जा मिळते, २) रोगांवर मात करतो, ३) रक्ताभिसरण सुरळीत राहते, ४) स्फूर्ती वाढते, ५) एनर्जी लेव्हल वाढते, ६) शरीराच्या विषद्रव्याचा नाश करते, ७) पोटाचे दुखणे घालवते.
या उपचाराने मनावर नियंत्रण राहते. शरीर, मन, आत्मा या तिन्हीवर ही थेरेपी उपचार देते. या थेरेपीला लागणारा खर्च १००० ते ३००० रुपयांपर्यंत येतो. स्पामध्ये अतिशय वेगळी असलेली ही थेरेपी आहे. मात्र ती तज्ज्ञ लोकांकडूनच घेण्याची गरज आहे. स्टोन थेरेपी हा एक अभ्यास आहे व निसर्गाने दिलेला चमत्कार आहे. आजकालच्या युगात चांगल्या राहणीमानासाठी व मानसिक तणावावर अतिशय फायदेशीर व हवाहवासा वाटणारा अनमोल उपचार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2013 रोजी प्रकाशित
सुंदर मी : स्टोन थेरपी सकारात्मक उपचार
स्पा थेरपीचा एक भाग म्हणजेच स्टोन थेरपी. निसर्गाने आपल्याला बरेच काही दिले आहे. आधुनिक युगात नवीन साधने, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन पद्धतीच्या साहाय्याने आपण सौंदर्य आणि आरोग्यविषयक...
First published on: 08-11-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stone theropy