विनय नारकर viva@expressindia.com

संत ज्ञानेश्वरांनी ‘घोंगडी’ ही प्रतिमा घेऊन रचलेले अभंग आपण पाहिले, संत तुकारामही याबाबत मागे राहिले नाहीत. त्यांचेही घोंगडीची प्रतिमा वापरलेले बारा अभंग मला सापडले आहेत.

खेळों लागलों सुरकवडी।  माझी घोंगडी हारपली॥

कान्होबा तो मीच दिसे। लाविलें पिसें संवंगडीया।

तो बोलो मी उगाच बैसें। आनारिसें न दिसे॥

तुका म्हणें दिलें सोंग। नेदी व्यंग जाऊं देऊं॥

लोकरीच्या दोन घोंगडय़ा एकत्र शिवल्या जातात, तेव्हा त्यास ‘कांबळी’ म्हटले जाते. म्हणजेच कांबळी ही शिवून केलेली मोठी घोंगडी. ही सहसा काळीच असते, पण यात किमतीला महाग अशी पांढरी घोंगडीही असते. सर्वात महाग घोंगडी ही मेंढीच्या पिल्लाच्या जावळापासून बनवली जाते. ही जावळाची घोंगडी सगळ्यात मऊ असते.

ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत देताना ज्ञानेश्वर म्हणतात,

कैचा लोंवेवीण कांबळा। मातियेवीण मोदळा।

का जळेंवीण कल्लोळा। होणें आहे॥ १८.८१४

‘लोंवे’ म्हणजे लोकर. म्हणजेच, ‘लोकरीशिवाय कांबळे शक्य आहे का..’ अशा अर्थाची ही ओवी आहे.

आठ घोंगडे किंवा चार कांबळी असतील तर त्यास ‘बोद’ असे म्हणतात. जर दोन पट्टय़ांची, लहान व चौरस घोंगडी असेल तर त्यास ‘चवाळें’ म्हटले जाते. ही जरा जाडीभरडी असते. याला लहान उणाख  घोंगडीसुद्धा म्हटलं जातं. तसेच लहान एकेरी घोंगडीस ‘झुगुर’ असेही म्हणतात. जु्न्या एकेरी घोंगडीस पटकूर किंवा फटकूर किंवा कंबळी असेही म्हटले जाते. ‘काळी कंबळी गुंतून बुंथी’ अशी ओळ ‘नवनाथ भक्तिसारा’मध्ये येते. ‘टाकलें पटकूर निजलें बटकूर’ अशी एक तुच्छतादर्शक म्हणही आहे.

घोंगडी, कांबळे अंगावरून, डोक्यावरून घेतले जाते, तसेच ते गळ्यातून आणि काखेखालून आणून, तिची खोळ करूनही बांधली जाते. अशा नेसण्यास ‘गळ्हांगती’ म्हटले जाते. घोंगडी किंवा कांबळी याच्या रुंदीच्या बाजूने दुमडून एका बाजूस शिवले जाते. अशी खोळ किंवा कुंची बनवून याचा पावसापासून रक्षण करण्यासाठी वापर केला जातो. याला ‘घोंगता’ किंवा ‘घोंगडगुंची’ म्हणतात, सामान ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. लहान मुलांसाठीही याची कुंची बनवली जाते, त्याला ‘घोंगशी’ म्हणतात. या वस्त्रांचे इतरही उपयोग केले जातात. कांबळे किंवा घोंगडींवर मुरडून,  टाके घालून थैली बनवली जाते, त्यास ‘गलंगती’ म्हटले जाते. घोंगडे शुद्ध मानले गेल्यामुळे पूजेतही याचा वापर होतो. काही ठिकाणी तर चवाळ्यावरच पूजा मांडली जाते. लोकरीच्या वस्त्रांच्या या सोवळेपणाबद्दल आणि याबाबतच्या सुती आणि लोकरीच्या वस्त्रांमधील भेदाभेदाबद्दल आगरकरांनी आक्षेप घेत यावर टीका करणारा लेखही लिहिला होता.

घोंगडीचा आणखीही एक मजेशीर वापर होत असे. तो होता खास प्राणी माणसाळवण्याच्या एका क्रियेत. एखादे जनावर माणसाळावयाचे असेल तर चार-पाच माणसे साधारण पन्नास फुटांवरून, घोंगडी पांघरून, एकदम ओरडत येऊन जनावराच्या पायाजवळ येऊन, पडून लोळत असत. या पद्धतीला ‘चोरकाठी’ असे म्हटले जाई. तर या चोरकाठीमध्ये घोंगडीचे विशेष महत्व होते.

कांबळे, घोंगडे या वस्त्रांच्या नावावरून, वापरावरून काही म्हणी व वाक्प्रचारांची भर मराठी भाषेत पडली आहे. ‘भिजत कांबळें जड होणें’ याचा अर्थ एखाद्या संकटाची उपेक्षा केल्याने ते जास्तच वाढत जाते किंवा  एखादे काम लांबणीवर पडत जाणे. एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर असता, तिला गादीवरून काढून घोंगडय़ावर ठेवले जाते यावरून ‘कांबळ्यावर काढणे’ असा वाक्प्रचार तयार झाला. ज्याचा अर्थ शेवटची घटका येणे असा होतो. एखाद्याची दुर्दशा किंवा फजित करणे याला ‘एखाद्याचे घोंगडे करणे’ असे म्हटले जाते. एखादे लचांड मागे लागणे याला ‘घोंगडे गळ्यात पडणे’ आणि ‘एखाद्याच्या गळ्यांत घोंगडं घालणे म्हणजे एखाद्याला काही उपद्रवकारक काम सांगणें. ‘गरिबाचे गेले घोंगडे गरीब पडले उघडे’ अशी म्हणही आहे. एखाद्याला अपमानास्पद वागणूक देणे याला ‘फेरघोंगडे करणे’ असे म्हणतात.

खंडेराय हे महाराष्ट्राचे कुलदैवत समजले जाते. खंडेरायाने जेव्हा धनगरकन्या बानूसाठी धनगरवेश धारण केला, त्या प्रसंगाचे व खंडेरायाचे वर्णन करताना, लोकगीतातून अशी शब्दचित्रे साकारली गेली आहेत,

तुझ्या खांद्यावर घोंगडी रे देव मल्हारी काना

तुझ्या डोक्याला पागोटी रे देव मल्हारी काना

हे एक अहीराणी भाषेतील लोकगीत आहे. वेंकोना (एकोणिसावे शतक) कवीचे गद्य-पद्यमिश्रित अशा ‘भानसेचे वऱ्हाड’ या कलाकृतीत खंडेरायाच्या दुसऱ्या लग्नाचे कथन आहे. यातही घोंगडीबाबत काही रोचक वर्णन आले आहे.

सख्यांनो कौलाच्या पेठेच्या हाटास जाऊ।

जाडी घोंगडी घेतली॥ भानु दुकानी बैसली॥

पुढें घोंगडी टाकली॥ देव येवूनी काय बोले बोली॥

घोंगडीचा मोल काय॥ सव्वा लाख सोनटक्का॥

ऐसे घेणार गिरायीक कोण॥ ——चा कानोबा॥

द्वारकेचा कृष्णनाथ॥ —— चा नरसिंह॥

चौथे तुम्ही आलां आहां॥

निरनिराळ्या देवांनी घोंगडीचे मोल लाखांत केले अशा अर्थाचा हा उल्लेख आहे. एकप्रकारे सामान्य शेतकरी किंवा कामकरी यांच्यासाठी ही बहुपयोगी, टिकाऊ घोंगडी लाखमोलाचीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात घोंगडी नजर करण्याचा रिवाज होता.

अशी ही सर्वसामान्यांची घोंगडी विणली जाते सहसा धनगर समाजाकडून. धनगर समाजात प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक असतात जे नेहमी आपल्या मेंढय़ांसोबत फिरणारे, भटके, त्यांना ‘हटकर’ म्हटले जाते. दुसरे असतात ‘खुटेगर’. ‘खुटा’ म्हणजे माग. ज्यांच्या घरात खुटा म्हणजे हातमाग आहे ते खुटेगर. हे खुटेगर आपल्या हातमागावर घोंगडी विणतात.

माणदेश भागातही घोंगडी बऱ्याच प्रमाणात बनत असे. सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला तालुक्यातील बलवडी या गावी घोंगडी विणण्याचे काम बऱ्याच घरांतून चालत असे. या महामारीपूर्वी या गावातील ५०-६० घरांमधून चालणारे हे काम आज तीन घरांपर्यंत आले आहे. या लेखासाठी माहिती घेण्यासाठी गेल्या आठवडय़ात आम्ही या गावी भेट दिली. या भागात ‘सणगर’ या समाजाचे लोक घोंगडी विणण्याचे परंपरागत काम करतात. या महामारीने मात्र त्यांच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे.

ही सणगर मंडळी पिढय़ान्पिढय़ा घोंगडी बनवायच्या कामात रत आहेत, हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. एक मोठी घोंगडी ते साधारण दीड हजार रुपयांना विकतात. एका महिन्यात साधारण १२-१३ घोंगडी ते विणतात. त्यातून त्यांची प्राप्ती महिना जेमतेम सात ते आठ हजार रुपये होते. घोंगडीच्या निम्म्या आकाराचे चवाळेंही इथे बनवले जाते. ६०० रुपये त्याची किंमत आहे. घराच्या आधुनिक अंतर्गत सजावटीमध्येही हे चवाळें खूप शोभून दिसू शकते.

त्याशिवाय ही मंडळी ‘जेन’ हा जाजमाचा एक प्रकार लोकरीमध्ये बनवतात. मागच्या लेखात सांगितलेल्या बुरणूसच्याच पद्धतीने जेन ही लोकरीला खळ लावून, या लाटून व नंतर दबाव देऊन बनवल्या जातात. यांवर रांगोळी काढल्यासारखी नक्षी असते. दिवाणखान्यात जाजम म्हणून किंवा झोपण्यासाठीही याचा उत्तम वापर होतो. हे खूप उबदार व टिकाऊ असते. याची किंमत ९०० रुपये इतकी आहे. हे सांगण्याचा मुख्य उद्देश हा की आधुनिक सजावटींच्या घरांमध्येही या पारंपरिक कारागिरीचा आपण सुरेख वापर करू शकतो. तोही इतक्या कमी किमतींत. त्याशिवाय ही कौशल्ये काही तग धरू शकणार नाहीत. यांना महत्त्वाचा धोका निर्माण झाला आहे तो पानिपत इथल्या यंत्रांवर बनणाऱ्या भेसळयुक्त घोंगडय़ांपासून. यात शुद्ध लोकर वापरली जात नाही तर कृत्रिम धाग्यांचा वापर केला जातो. या दोन्ही गोष्टींमुळे हे स्वस्त विकले जातात, पण हे असेच चालत राहिले तर आपल्या पारंपरिक घोंगडय़ांचे निश्चित ‘पानिपत’ होईल.

तरीही इतकी शतके टिकून राहाणे, तेही मूळ स्वरूपात, हे घोंगडी या वस्त्रालाच जमले आहे. शेला किंवा इतर बहुमोल वस्त्रे काळाच्या ओघात नष्ट झाली किंवा त्यातील कारागिरीचा दर्जा खालावला, पण घोंगडी मात्र जशीच्या तशी टिकून राहिली आहे. म्हणतात ना, ‘महापूरे झाडे जाती तेथ लवाळे वाचती’.

तुझें घोंगडे येकचि चोख।

दुजेपणाच वोळख अमंगळ॥

दे धडुत न घोंगडे मोठें।

खिरपटें जळों देवा॥

रखुमादेविवरू उदार जाला।

धडौता केला ज्ञानदेवो॥