वैष्णवी वैद्य
उन्हाळय़ाची सुट्टी लहानांपासून ते अगदी मोठय़ांपर्यंत सगळय़ांसाठीच आठवणींचा पेटारा घेऊन येते. शाळेत असताना सुट्टीचे ते दिवस, मामाच्या गावाकडची मज्जा, मेजवानी, गमतीजमती अगदी सगळंच डोळय़ासमोर उभं राहतं आणि प्रत्येकजण त्यात रमून जातो. वय वाढत जातं, तरुणाईच्या मागचे व्याप वाढत जातात, वर्षे सरत जातात तशी उन्हाळय़ाच्या सुट्टीची व्याख्या बदलत जाते. ट्रेकिंग, सोलो ट्रिप्स, वने डे ट्रिप, वीकएन्ड ट्रिप अशा विविध कल्पना तरुणाई आत्मसात करू लागते. हल्ली तर तरुणांच्या ग्रुप्सपासून ते अगदी मोठय़ा टूर कंपन्याही खास तरुणांसाठी व्हेकेशन ट्रिप्स आयोजित करू लागल्या आहेत.
हल्ली नवीन माध्यमांच्या मदतीने म्हणजेच इन्स्टा, व्लॉग्ज अशा माध्यमातून तरुणाई सुट्टी, ट्रिप्स याबाबत अधिकाधिक उत्साही आणि जागृत होऊ लागली आहे. व्लॉग्सच्या माध्यमातून तरुणाई सुट्टीचा आनंद तर घेतेच, पण इतरांपर्यंत वेगवेगळय़ा ठिकाणांची माहितीसुद्धा पोहोचवते आहे. पावसाळा आणि हिवाळय़ाबरोबरच आता उन्हळय़ातली भटकंतीसुद्धा तरुणांना आकर्षित करते आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतात सुद्धा उन्हाळय़ात कुठे कुठे फिरता येईल किंवा कुठली ठिकाणे लोकप्रिय आहेत याविषयीची माहिती या लेखातून घेणार आहोत.
नॉर्थ ईस्ट
आसाम – अरुणाचल प्रदेश, सिक्कीम हा भाग काही वर्षांपूर्वी फक्त नकाशापुरताच आपल्याला माहिती होता, परंतु इतकी वर्षे भारताच्या एका कोपऱ्यात दडून राहिलेला हा भाग सध्या तरुणांचा आवडता व्हेकेशन स्पॉट झाला आहे. उन्हाळय़ात इकडच्या निसर्गाची मज्जा जास्तीत जास्त घेता येईल. ट्रेकिंग, हायकिंग, पिकनिक अशा गोष्टींसाठी मार्च ते जून महिन्यात नॉर्थ ईस्टला जरूर भेट द्या. उन्हाळय़ात काही भाग सोडता इथे स्वच्छ सुंदर आकाश व फुलझाडे, डोंगर-दऱ्या अतिशय सुंदर दिसतात. जे पाहायला फार मजा येते. तसंच मार्च ते जून हे महिने सणावारांचे असतात व ते इथे खूप पद्धतशीर, साग्रसंगीत साजरे केले जातात. भारतीय सणांची वैविध्यता उन्हाळय़ात इथे तुम्हाला पाहायला मिळते. इथलं तापमान साधारण १० डिग्रीपासून ते ३८ डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. तुम्ही किती उंचीच्या ठिकाणावर आहात यावर ते अवलंबून आहे. परंतु जिथे जंगल, पाणी, धबधबे असतात तिथे अर्थातच वातावरण प्रसन्न व शांत असतं.
काश्मीर
हे असं ठिकाण आहे ज्याला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ (हेवन ऑन अर्थ) म्हटलं जातं. हे नकाशावर दाखवल्याप्रमाणे भारताच्या परमोच्च बिंदूवरचं ठिकाण आहे. इथे कायम तापमान कमीत कमी असतं. फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत तुम्ही इथे गेलात तरीही एक अंकी तापमानच असेल. उन्हाळय़ात भरपूर बर्फ पाहता किंवा अनुभवता येणार नाही, पण काश्मीर फक्त बर्फापुरतंच मर्यादित नाही. केशर व सफरचंदाच्या बागा, मुघल गार्डन अशी अतिशय बघण्यासारखी ठिकाणं इथे आहेत, उन्हाळय़ात ती जास्त नीट पाहता येतील. काश्मीरची अत्यंत लोकप्रिय असणारी शिकारा राइडसुद्धा मार्च ते जून महिन्यात जास्त चांगल्या पद्धतीने अनुभवता येते. काश्मीर म्हणताना इथे संपूर्ण उत्तरेकडचे प्रदेश जसं शिमला, मसुरी, हिमाचल प्रदेश इथेही उन्हाळय़ातली भटकंती तुम्ही करू शकता.
कूर्ग
दाक्षिणात्य प्रदेशही उन्हाळय़ात फार सुंदर दिसतात. कूर्ग हे दक्षिण भागातलं छोटंसं राज्य आहे. वेगवेगळय़ा ऋतूंमध्ये वेगवेगळं वातावरण इथे पाहायला मिळतं. इथलं वातावारण साधारण मुंबईच्या समसमान असतं, कारण समुद्र किंवा पाण्याचे प्रवाह अनेक ठिकाणी इथे पाहायला मिळतात. बंगळूरुवरून कूर्ग ४-५ तासांवर आहे. सोलो ट्रिप किंवा मित्रांसोबतच्या ट्रिपसाठी हे परफेक्ट ठिकाण आहे. कोकणातल्या माणसांना हे ठिकाण आवडण्याची शक्यता जास्त आहे, कारण रस्त्यालगत नारळ, सुपारीच्या झाडांच्या रांगा पाहायला मिळतात. इथे चहा- कॉफीच्या बागा अधिक पाहायला मिळतात. शिवाय, कुन्नुर-उदगमंडलमची निलगिरीच्या जंगलांमधून जाणारी टॉय-ट्रेन राइडसुद्धा अनुभवण्यासारखी आहे.
उटी
तमिळनाडूमधलं अतिशय निसर्गरम्य हिल-स्टेशन म्हणजे उटी.. उटी संपूर्णपणे डोंगरावर स्थायिक असल्याने तिथलं तापमान कमीच असतं. उटी हे तसं पूर्ण वर्षभरात कधीही फिरायला जाण्याचं ठिकाण आहे. असं असलं तरी एप्रिल ते जून महिन्यात इथे फिरायला जास्त मज्जा येते. दोडाबेट्टा पिक, उटी लेक, बॉटॅनिकल गार्डन अशी अनेक प्रेक्षणीय व निसर्गरम्य ठिकाणं इथे आहेत. इथेही चहा व कॉफीच्या मळय़ांमधून फिरायला आल्हाददायक वाटते. उटी लेकमधील बोट राइड व तिथून अस्सल साऊथ इंडियन जेवणाची मेजवानी मन अगदी तृप्त करते.
लेह – लडाख
हे आता तरुणाईचं ड्रीम डेस्टिनेशन झालं आहे. इथे पर्यटनासाठी मार्च ते जून हा बेस्ट सीझन मानला जातो. या महिन्यात लेहचं फ्रोझन सौंदर्य, डोंगर, नद्या यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. रोड ट्रिप, ट्रेकिंग अशा बऱ्याच गोष्टी इथे करण्यासारख्या आहेत. ‘कारगिल वॉर मेमोरिअल’ हे इथलं अत्यंत लोकप्रिय व मिस न करण्याचं ठिकाण आहे. शहीद जवानांबद्दलची इथे दिलेली माहिती वाचून, आपला तिरंगा पाहून प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येतो. लेह- मनाली व्हाया रोहतांग पास हा अविस्मरणीय प्रवासही अनुभवायला मजा येते. इथली तिबेटियन संस्कृती लोकांना जास्त आकर्षित करते. परंतु फिट लोकांनी त्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमचे टूर गाइड्स त्याची व्यवस्था करून देतात.
भारताच्या प्रत्येक भागातील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांविषयी सांगण्याचा हा प्रयत्न असला तरी अशी कित्येक पर्यटन स्थळं आपल्याकडे सध्या लोकप्रिय आहेत. साऊथमध्ये केरळ हे निसर्गरम्य ठिकाण आहे. उन्हाळय़ात केरळ फिरताना थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. उत्तरेकडे मनाली, हिमाचल, नैनीताल, मसुरी, धरमशाला अशी अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत.
उन्हाळय़ात महाराष्ट्राचं तापमान कमी जास्त होत असलं तरी इथेही माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, कोकण अशा भागांमध्ये वर्षभर पर्यटकांची मांदियाळी असते. ऋतू बघून कोणत्या भागात फिरायचं हे सगळेजण ठरवत असतात. अनेक तरुण – तरुणींचे ग्रुप्स आज टूर स्टार्टअप्स सुरू करत आहेत किंवा मोठय़ा टूर कंपन्यांमध्ये काम करत आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर हे लक्षात आलं की तरुणाईला आता महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांतही फिरायला आवडतं. छोटय़ा सुट्टीत कोकण व तत्सम भागात लोकांची गर्दी असते तर मोठय़ा प्लॅन्ससाठी तरुणाई कित्येकदा महाराष्ट्राबाहेरची लोकेशन्स निवडताना दिसते, असं ते सांगतात. थोडक्यात काय तर तरुणांची भटकंती वर्षभर वेगवेगळय़ा पद्धतीने सुरूच असते. आता वर्क फ्रॉम होमच्या सोयीमुळे तरुणाई भटकंतीची आवड जपत वर्क फ्रॉम एनीव्हेअर हा ट्रेण्डसुद्धा फॉलो करताना दिसते आहे.