|| वेदवती चिपळूणकर
नॉर्मल मुलांसारखंच बालपण, शाळा आणि शिक्षण. बी.कॉम.ची डिग्री घेतल्यानंतर तिला स्वत:चा व्यवसाय करायचा होता. मात्र एक वर्ष धडपड करून काहीच साध्य झालं नाही आणि तिने सर्वसामान्य मुलांसारखी नोकरी करायला सुरुवात केली. टेलीकॉलर म्हणून तिने नोकरीला सुरुवात केली. नोकरीतून स्वत:च्या बिझनेससाठी आर्थिक बळ उभं करण्याच्या उद्देशाने तिने सुरुवात केली. पाच वर्ष तिने नोकरी केली. सामान्य मुलींसारखा पार्लर, स्किन केअर, हेअर केअर या सगळ्या गोष्टींशी तिचाही थोडाफार संबंध होताच. तेव्हा स्वत:च्या केअरबद्दल स्वत:च माहिती घ्यावी या हेतूने तिने सहज म्हणून या विषयाच्या खोलात जायला सुरुवात केली. एकदा त्याबद्दल माहिती व्हायला सुरुवात झाल्यावर तिला त्यात इंटरेस्ट वाटायला लागला. हळूहळू यातूनच तिला दिशा मिळाली आणि आज तृणाल शिंदे स्वत:च्या पॅशनला बिझनेसमध्ये रूपांतरित करून स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी आहे.
नोकरी आणि व्यवसाय याबद्दल बोलताना तृणाल म्हणाली, ‘‘शिक्षण झाल्या झाल्याच मला स्वत:चं काहीतरी करायचं होतं. पण सामान्यपणे आमच्या संपूर्ण कुटुंबातही कधीच कोणी व्यवसाय केला नव्हता. त्यामुळे मला सपोर्टही कमी होता आणि नुकतंच शिक्षण झाल्यामुळे व्यवसाय करण्यासाठी किमान भांडवलही नव्हतं. वर्षभर मी काहीतरी करण्यासाठी धडपड केली, मात्र वर्षांच्या शेवटी असं ठरवलं की नोकरी करून पैसे उभे करायचे आणि मग बिझनेस वगैरचा विचार करायचा. त्यामुळे मी नोकरी करायला सुरुवात केली.’’ पाच वर्ष तिने नोकरी केली. नोकरी करत असतानाही माझ्यातला तो बिझनेसचा एलिमेंट मला स्वस्थ बसू देत नव्हता, असं सांगणाऱ्या तृणालने नोकरी करत असतानाही मी डिओ, परफ्युम्स, कॉस्मेटिक्स अशा गोष्टी माझ्या सर्कलमध्ये विकायचे. समजा १०० रुपयांना वस्तू घेतली तर ११० रुपयांना विकायची म्हणजे तेवढाच दहा रुपये माझा फायदा होऊन जायचा, हा अनुभव सांगितला. त्यावेळी मला लक्षात यायला लागलं की यात बऱ्यापैकी फायदा आहे. म्हणून मी नोकरी सोडून रिटेलिंगमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, असं ती सांगते.
पाच वर्ष करत असलेली नोकरी आणि चांगली पोस्ट सोडून एखादं रिटेलिंगचं दुकान सुरू करणं म्हणजे सर्वासाठीच चेष्टेचा विषय ठरला होता. मात्र आईचा मानसिक आधार तृणालला नेहमी मिळाला. स्वत:वरच्या विश्वासाने तिने नोकरी सोडून यात पाऊ ल ठेवलं. नवीन बिझनेसचा अनुभव सांगताना तृणाल म्हणते, ‘‘मी जे आधी अगदी लहानशा प्रमाणावर करत होते तेच आता मोठय़ा प्रमाणावर करायचं होतं. जागा भाडय़ाने घेतली आणि रिटेलिंग सुरू केलं, मात्र हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. खरं तर पहिलाच निर्णय माझा चुकला होता. मला बिझनेस रोलिंगमध्ये ठेवणं जमलं नाही. ही निर्णयाची चूक नाही, खरं तर चूक माझी होती. तो सगळा प्रकार पूर्णत: तोटय़ात गेला आणि मला तो बंद करावा लागला,’’ असं ती मनमोकळेपणाने सांगते. एक मार्ग बंद झाला की दुसराही सापडतो, त्यासाठी तशी शोधक नजर असायला हवी म्हणतात. तृणालचेही तसेच झाले. माझ्या दुकानात मी कॉस्मेटिक्स ठेवत असल्याने त्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली होती. स्वत:च फेसपॅक कसे बनवायचे, फेशियल कसं करायचं, स्किन केअर कशी घ्यायची याबद्दल मी माहिती घेत होते आणि शिकत होते. माझ्या दुकानात येणाऱ्या अनेकांना मी हे सेल्फमेड फेसपॅक बनवण्याचे सल्ले देत असायचे. त्यावेळी अशाच माझ्या एका कस्टमरने मला सुचवलं की तुला एवढं येतं तर स्वत:चं काही सुरू का नाही करत? त्यांचा तो प्रश्न माझ्या डोक्यात घोळत राहिला. रिटेलिंगमध्ये लॉस झाल्यानंतरही त्यांचं ते वाक्य मला सोडत नव्हतं. मग मी त्या दिशेने प्रयत्न करायचं ठरवलं, असं तृणालने सांगितलं.
रिटेलिंगचा बिझनेस तृणालने बंद केला. ९६ चौ. मी. एवढय़ा लहान जागेतून ही सुरुवात झाली. ती जागा पुरेशी पडणार नाही म्हणून तिने त्याच जागेत पोटमाळा तयार केला. तिथे एक बेड आणि एक चेअर मांडून पार्लर सुरू केलं. पार्लर सांभाळायला एक मुलगीदेखील नेमली. त्याच वेळी तिला या सगळ्याचं शिक्षणही घेण्याची इच्छा होती. तृणाल सांगते, ‘‘एका इन्स्टिटय़ूटमध्ये मला हा कोर्स करायचा होता. मात्र त्याची फी माझ्या आवाक्याबाहेर होती. चार वेळा मी चौकशी करून आले होते. एकदा तिथल्या एका सरांनी मला थांबवून विचारलं. मी टाइमपास म्हणून चौकशी करायला येते की मला खरंच शिकायचं आहे हे त्यांनी विचारलं. पैशांची अडचण सांगितल्यावर त्यांनी माझी तिथल्या मॅनेजरशी भेट करून दिली. त्या सरांच्या सांगण्यामुळे आणि मॅनेजरने समजून घेतल्यामुळे माझ्या या कोर्सला मला ई.एम.आय.ची सोय करून देण्यात आली. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ अशी क्लासची वेळ असायची. ११च्या आधी आणि ५नंतर पार्लरमध्ये मी जात होते. दोन्ही सांभाळत मी तो कोर्स पूर्ण केला.’’ माझ्या एका शिक्षकांना मी केलेला हेअरकट इतका आवडला की त्यांनी माझ्या नावासमोर तसा रिमार्क दिला आणि पुढच्या प्रत्येक वेळी माझा हेअरकट करायला तृणालच पाहिजे असं आग्रहाने सांगितलं. तिथे मला खरं मोटिव्हेशन मिळालं. मी यात काहीतरी चांगलं करू शकते आहे हे मला जाणवलं, अशी आठवणही तृणालने सांगितली.
त्यानंतर तृणालने पार्लर बंद करून मोठय़ा जागेत मोठं फॅमिली सॅलोन सुरू करायचं ठरवलं. प्रायव्हेट इन्व्हेस्टर्सच्या माध्यमातून तिने यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र ओळखीच्या काहीजणांच्या सल्लय़ाने तिने इन्व्हेस्टर्सच्या ऐवजी कर्ज घेतलं आणि सॅलोन सुरू केलं. डोक्यावर कर्ज आणि स्वत:हून वाढवलेल्या बिझनेसच्या जबाबदारीबद्दल बोलताना तृणाल म्हणते, ‘‘एक दिवस एका पॉइंटला मला अशी शंका आली की मी एवढं मोठं कर्ज घेऊन हे सुरू केलं आहे खरं, पण मला जमत नाहीये. एवढे पैसे यात पणाला लागले आहेत पण मला जमलं नाही तर काय करणार?, हा प्रश्न मला पडला होता. सॅलोनच्या बाहेर पायऱ्यांवर बसून मी चक्क रडले. माझे मित्र-मैत्रिणी सोबत होते. माझ्या मैत्रिणीने मला समजवायचा प्रयत्नही केला. पण पैशांचं सोंग कोणालाच आणता येत नाही. त्यामुळे तीही फक्त मानसिक आधार देऊ शकत होती. त्या दहा मिनिटांच्या रडण्याने मला सगळी निगेटिव्हिटी झटकून टाकण्याची शक्ती मिळाली आणि त्यानंतर मात्र मी मागे न पाहण्याच्या विचारावर इतकी ठाम झाले की मग कोणत्याच अडचणीला मी घाबरले नाही.’’
आर्थिक स्थिरता, यशस्वी होण्याची एक एक पायरी वर जात केलेला बिझनेस आणि स्वत:वरचा विश्वास या तिन्ही गोष्टींनी तृणालला भविष्य बघण्याची हिंमत दिली आहे. बिझनेस वाढवणं, स्वत:ची अॅकॅडमी सुरू करणं आणि सॅलोनच्या फ्रँचाईजी देणं अशी मोठी ध्येयं डोळ्यांसमोर ठेवून तृणाल आता पुढची वाटचाल करते आहे.
नोकरीतून स्वत:च्या बिझनेससाठी आर्थिक बळ उभं करण्याच्या उद्देशाने तिने सुरुवात केली. सामान्य मुलींसारखा पार्लर, स्किन केअर, हेअर केअर या सगळ्या गोष्टींशी तिचाही थोडाफार संबंध होताच. आज तृणाल शिंदे स्वत:च्या पॅशनला बिझनेसमध्ये रूपांतरित करून स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी आहे.
प्रत्येकात ताकद असते जी आपण विसरूनच जातो. एखादा व्हिडीओ गेम आपण खेळतो तेव्हा त्याच्या शेवटच्या लेव्हलला सगळ्यात जास्त शत्रू आपल्यावर बंदुका रोखून येतात आणि आपण एकटे असतो. त्यावेळी आपण हालचाल केली नाही तर आपण तिथे डेड होतो. मात्र तीच लेव्हल सगळ्यात महत्त्वाची असते जेव्हा आपण जिंकण्याच्या सर्वात जवळ असतो आणि थोडय़ाशा हिमतीने आपण जिंकणारच असतो. तसंच जेव्हा आपण पॅशनने एखादी गोष्ट करतो आणि आपल्या अडचणी सगळ्यात जास्त असतात, तेव्हा आपण जिंकण्याच्या सगळ्यात जवळच्या टप्प्यावर असतो. त्यावेळी जर मागे फिरलो तर पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करायला लागते. त्यामुळे जेव्हा सगळ्या बाजूंनी संकटं एकत्र येतायत असं वाटतं तेव्हा हे समजावं की यश फार दूर नाही, फक्त थोडी हिंमत ठेवली पाहिजे. – तृणाल शिंदे
viva@expressindia.com