विनय नारकर :
शिरोभूषणांपैकी एकटय़ा पागोटय़ाची महती सांगता सांगता एक भाग पूर्ण झाला. पागोटे होतेच तितके महत्त्वाचे. पागोटय़ाची लांबी आपण पाहिली की पन्नास ते सव्वाशे हातापर्यंत असायची. साहजिकच ते बांधायला कौशल्य अंगी बाणावे लागायचे किंवा परावलंबित्व तरी स्वीकारावे लागायचे. त्याचीच परिणती कदाचित पागोटय़ाची लांबी कमी होऊन शिरोभूषणांचे अन्य प्रकार तयार होण्यात झाली असावी.
पागोटय़ाच्या खालोखाल महत्त्वाचे शिरोभूषण होते, तिवट. हे शिरोभूषण मात्र जवळपास विस्मरणात गेले आहे. जुन्या पत्रव्यवहारांमध्येच बहुदा हे नाव शिल्लक राहिले आहे. तिवट हे प्रौढांपेक्षा तरुणांनी धारण करण्याचे वस्त्र होते. या तिवटाच्या स्वरूपाबद्दल जाणून घेताना काही पत्रव्यवहारांचाच आधार घ्यावा लागतो. माधवराव पेशव्यांनी नाना फडणवीस यांना लिहिलेल्या एका पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे आहे, ‘तिगस्ता तुमचे घरी मेजवानी जाली. ते समई पागोटे रंगिन केले होते. रंग बहुत खूष झाला होता. च्या तऱ्हेची पागोटी दोन तीन कारेगर लाऊन तयार करून पाठवून देणे. व पैठणी हिरव्या रंगाची तिवटे पोशाख लांब पंचेचाळीस हात याप्रमाणे हिरवा रंग चांगला गहरा असे पाच तिवटे पाठवणे म्हणून पेशजी तुम्हास लिहले होते.. पुण्यास असल्यास पाठविणे नाहीतर पैठण्या लिहून लिहल्याप्रमाणे तिवटे चांगली सूत बारीक असी पाठवून देणे. (पेशवे दप्तर ३२ सन १७६९)’. पत्रावरून तिवटाची लांबी साधारण पंचेचाळीस हात (पागोटय़ापेक्षा लहान) असायची हे लक्षात येते. पैठणला ही विणली जात व अगदी तलम सुती असत, अशीही माहिती मिळते.
ऐतिहासिक दस्तऐवजांतील अन्य एका नोंदीनुसार थोरल्या बाजीरावांच्या भगिनी भिऊबाई यांनी, ‘चिरंजीव सदोबाकरिता (सदाशिवराव भाऊ पेशवे) बनोसी तिवट एक व केसरी तिवट एक असे दोन पाठविले’, असा उल्लेख आहे. यांतील ‘बनोसी’ म्हणजे फिका डाळिंबी रंग असा अर्थ आहे. विशेष म्हणजे हा शब्द पागोटे किंवा तिवट याचसाठी वापरला जायचा. नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्येही ‘तिवट खारव्याची’ असा संदर्भ सापडतो. यांतील ‘खारवे’चा शोध घेता, हे गुजरातमधील लाल रंगाचे खादी वस्त्र होते, अशी माहिती मिळाली. म्हणजे या वस्त्राचेही तिवट बनत असत असे समजते. याशिवाय होनाजी बाळाच्या एका लावणीत, ‘शिरीं तिवट पेच गुंतले’, असा उल्लेख सापडतो. तरुणांसाठीच तिवटाशिवाय आणखी एक खास शिरोभूषण असायचे ते म्हणजे, ‘मंदील’. सातारच्या एका भेटीत महाराणी ताराबाईंनी माधवराव व विश्वास सराव यांना मंदील भेट दिले होते. मंदील हे तिवटापेक्षा थोडे लहान शिरोभूषण होते. याची विशेषता म्हणजे यावर जरीच्या काडय़ा व जरीची वेलबुट्टी असायची. तरुणांना मिरवण्यासाठी ही खास योजना असावी. शाहीर प्रभाकर याने कोल्हापूरच्या संभाजीराजांचे असे वर्णन केले आहे..
शिरी मुकुट बांधी मंदील मोत्येचूर ।
ल्याला झगा बारीक बुट्टेदार ॥
मंदील हा शिरोभूषणाचा प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय असावा असे वाटते, कारण लोकसाहित्यात मंदिलावरच सर्वात जास्त रचना आढळून येतात. मंदील हा खास तरुणांसाठी असल्याने असे असू शकते. त्यातही लाल मंदिलाला विशेष पसंती असायची. मंदिलाबद्दलच्या काही ओव्या अशा आहेत.
तांबडय़ा मंदिलाची लालाई रसरशी
सख्याला दृष्ट झाली, सुभेदाराच्या वाडय़ापाशी
गावाला गेला बाई गेला माझा येलदोडा
सपनांत येतो, त्याच्या मंदिलाचा तिढा
तांब्यडय़ा मंदिलाचं, तेज पडलं माझ्या दारी
डोळं दिपलं तुझं नारी
जीवाला माझ्या जड, उसं तुमच्या मांडीवर
तांबडय़ा मंदिलाची छाया पडू द्या तोंडावर
तांबडी मंदील गुंडावा माझ्या लाला
दृष्ट व्हईल, लावू काळं गाला
तांबडी मंदील गुंडीतो तामनांत
माझ्या राघुबाची बैठक बामणांत
तांबडा मंदील बांधतो फुलावाणी
दिसे राजाच्या मुलावाणी
तांबडी मंदील देते फिरकी फिरकीला चांदू
तुला शोभेल तसा बांधू
तांबडय़ा मंदिलाला पैका पडेल त्यवढा देते
लाला गुजरा तुला घेते
शिरी मंदील लेतो, बाळराज देखणा
शहराचा रानार,खेडय़ांत झाकंना
फक्त मंदीलबद्दलच इतक्या ओव्या पाहायला मिळतात. मंदीलच्या लोकप्रियतेचा अंदाज येण्यासाठी या पुरेशा आहेत. मंदिलालाच चिरा किंवा चिला असेही म्हटले जायचे. धोंडीबापूच्या लावणीमध्ये हा शब्द येतो.
डोईस बांधिला चिरा झळकतो हिरा तुऱ्याशेजारी
अमृतारायांच्या कवितेमध्येही ‘शिरीं बांधियेला चिरा। खोंवी मोतियाचा तुरा ।’ असा उल्लेख आला आहे. शिरोभूषणांचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यावर अलंकारांची योजना केली जायची. अगदी पक्ष्यांच्या पिसांपासून, रत्नखचित शिरपेच, मोत्यांचे आपापल्या ऐपतीनुसार शिरोभूषणांवर लावले जायचे. ही फॅशन म्हणून सध्या बरीच लोकप्रिय होते आहे.
नेसण्याच्या पद्धतीत थोडाफार बदल करून निरनिराळी शिरोभूषणं बनत असत. आणखी एक महत्त्वाचे शिरोभूषण होते ‘पटका’. पागोटय़ाच्या बांधणीत थोडा बदल करून ‘पटका’ साधला जात असे. पागोटे एका बाजूला उंच व दुसऱ्या बाजूला कललेले असले की तो झाला पटका, परंतु हे इतकं साधं नव्हतं. त्यावरून माणसाची पारख केली जायची. असा कलता पटका बांधणारा गडी रंगेल समजला जायचा किंवा तो खास ‘मैफिलीला’ निघाला असल्याचे सूचित होत असे. हे पटके अहमदाबाद येथे विणले जात असत.
एका ओवीत असे वर्णन आले आहे,
बादली पटका, गुंडितो बाकावरी
दृष्ट व्हईल नाक्यावरी
त्यानंतर येतो, ‘फेटा’. पटका बांधताना त्याच्या दोन्ही बाजू उंच ठेवल्या आणि मधल्या भागाला खोलगट केले की त्याला म्हणायचं फेटा. फेटय़ाचे एक टोक मध्यभागी खोवले जाई किंवा त्याचा तुरा केला जाई. पटका व फेटा हे ऐटबाज किंवा उच्छृंखल समजले जात असत. फेटय़ाचेही वेगवेगळे प्रकार मिळायचे. या उखाण्यात फेटय़ाच्या एका प्रकाराचा उल्लेख येतो,
कौलारू घर त्याला मुरमाची भर,
अंबीरशाही फेटा, नारळी पदर
..रावांच्या चेहऱ्याकडे पहातांना थांबत नाही नजर
आणखी एक असायचे ‘मुंडासे’. क्षत्रिय मराठे डोक्याला घट्ट असे जे पागोटे बांधत, त्याला मुंडासे म्हटले जात असे. हे तीन चार हात लांबीचे वस्त्र असायचे. हे एक प्रकारचे छोटे पागोटेच असायचे, याची बांधणी जरा साधी असायची. मुंडासे धारण करणाऱ्या मुंडासबंद असेही म्हटले जात असे. शिरोभूषणाचा आणखी एक रूबाबदार प्रकार म्हणजे ‘कोशा’. कोशा म्हणजे डोक्याला बांधायचा रेशमी रुमाल किंवा फेटा..कोल्हापूरचे शाहू महाराजही कोशा परिधान करत असत.
शिरोभूषणाचा सगळ्यात महाग प्रकार म्हणजे, ‘शेमला’. त्याच्यावर बादला काम केलेलं असायचं. हा साधारण पाच वारी असायचा. याचं बांधणं सरळ असायचं, याच्या दोन बाजू एकमेकांना फारसा छेद देत नसत. हा बांधताना वस्त्राला पीळ दिला जात नसे. याचा शेपटा पाठीवर रूळत रहायचा. क्वचित पागोटय़ालाही हा शेपटा सोडला जात असे. त्यालाही ‘शमला’ असे म्हटले जाई. तो ऐटबाज येणे महत्त्वाचे असायचे. तसा नाही आला तर परत परत बांधावा लागायचा. यातच खूप वेळ जात असे. त्यावरून ‘पागोटय़ाचा समला, राजाराम दमला’ अशी म्हण तयार झाली. दिखाऊपणा करणे, नुसतेच भपकेबाज राहणीमान असणे, असा या म्हणीचा मथितार्थ होतो. या शमल्यावर रचलेल्या या दोन ओव्या ऐटबाजी आणि शमल्याचे नाते खूप सुरेख पद्धतीने दाखवून देतात.
नार भाळयेली, पाठीवरच्या शमल्याला
माझ्या कातीव इमल्याला
तांबडय़ा मंदीलाला रूपै दिले साडेआठ
बाळा तुझी शेमल्याजोगी पाठ
इतके सगळे शिरोभूषणांचे वैविध्य पाहिले, पण अगदी मानाची ‘पगडी’ ती राहिलीच की.. आता तिच्यासाठी स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.
viva@expressindia.com