दीपेश वेदक viva@expressindia.com

लॉकडाऊन सुरू झाला आणि अनेकांच्या सह्यद्रीमधल्या भटकंतीला ब्रेक लागला. सह्यद्रीमध्ये दर आठवडय़ाला न चुकता ट्रेकला जाणारे सगळेच ट्रेकर तेव्हापासून घरीच बसून होते. आता जिल्हा बंदी उठवल्यावर या मंडळींनी सह्यद्रीच्या वाटा पुन्हा धुंडाळायला सुरुवात केली आहे. अशा वेळी करोनाचा वाढता धोका, मुसळधार पाऊस, आदी गोष्टींपासून वाचत सुरक्षित ट्रेक करायचे असतील तर कोणती काळजी घ्यावी, याचा घेतलेला हा आढावा..

सामाजिक अंतर पाळा

शहरात ज्याप्रमाणे आपण एकमेकांपासून थोडं दूर उभं राहून सामाजिक अंतर पाळतो. तेच सह्यद्रीमध्ये ट्रेक करतानाही पाळणं शक्य आहे. ट्रेक करताना कोणत्याही कारणासाठी गर्दी करण्याची आवश्यकता नसते. एखादा सेल्फी काढायचाच असेल तर मास्क लावून आणि थोडं दूर उभं राहूनसुद्धा तो काढता येईल. मात्र हे करताना आपण धोकादायक ठिकाणी उभे राहात नाही ना हे मात्र पाहाणं गरजेचं असेल.

मास्क हवाच   

लॉकडाऊन संपल्यावर अनेकांची पावलं आता डोंगरदऱ्यांकडे वळू लागली आहेत. पण शहरात कुठेही जाताना आपण मास्क लावून जातो, त्याप्रमाणे सह्यद्रीमध्ये ट्रेक करताना मास्क लावायचा का, हा प्रश्न अनेक जण विचारतात. ट्रेक करताना मास्क नसेल, तर मोकळा श्वास घेता येईल, मास्क असेल तर मात्र अनेकदा दम लागतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. एकमेकांपासून थोडं अंतर ठेवून ट्रेक करत असाल तर मास्क नाही लावला तरी चालतो. मात्र जेव्हा तुम्ही इतरांसोबत गप्पा मारत असाल, चालताना विश्रांती घ्याल, जेवणासाठी एखाद्या ठिकाणी एकत्र थांबावं लागलं, तसेच ट्रेकपूर्वी आणि नंतर प्रवास करताना आपला मास्क व्यवस्थित लावला आहे की नाही हे तपासून घ्या.

लागणाऱ्या सर्व वस्तू स्वत:सोबत ठेवा

ट्रेक करताना पाण्याची बाटली, खाऊ, टॉर्च, ताट, वाटी, चमचा, रेनकोट आदी अनेक गोष्टी आपल्या सहकाऱ्यांना आपण वापरायला देतो. करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन हे प्रत्येक ट्रेकरने टाळायला हवं. ट्रेकला निघताना आपल्याबरोबर आलेल्या सर्वांनी आवश्यक त्या गोष्टी घेतल्या आहेत का, हे आयोजकांनी तपासून पाहणं गरजेचं आहे. घेतल्या नसल्यास त्या कशाप्रकारे उपलब्ध होतील हे पाहावं, मात्र एकमेकांच्या वस्तू वापरू नये.

स्थानिकांच्या घरी जाणं टाळा

अनेकदा ट्रेक सुरू करताना पायथ्याच्या गावातून जावं लागतं. अशा वेळी गावातील घरांमध्ये कोणत्याही कारणाने जाणं टाळा. अनेकदा नाश्ता, जेवणाची, फ्रेश होण्याची सोय पायथ्याशी असलेल्या गावातील स्थानिक मंडळी आपल्याच घरात करून देतात. अशा वेळी त्यांच्या घरी जाण्याशिवाय गत्यंतर नसते. अनेक स्थानिकांनी आता आपल्या घरी सॅनिटायझेशन करायला सुरुवात केली आहे. एखाद्या स्थानिकांच्या घरी जेवणासाठी जाताना त्यांनी सॅनिटायझेशन केलं आहे, हे विचारायला हरकत नाही. अनेक ट्रेक आयोजकांसोबत त्यांची पूर्ण टीम ट्रेकला येते. अशा वेळी आयोजकही स्वत:हून पुढाकार घेऊन जेवणाची, विश्रांतीची जागा सॅनिटाईझ करू शकतात.

बरे वाटत नसल्यास आयोजकांना कळवा

ट्रेकला जाण्यापूर्वी आपली तब्येत व्यवस्थित आहे, हे पाहाणं नेहमीच गरजेचं असतं. तब्येत ठीक वाटत नसल्यास ट्रेकला जाण्यापूर्वी फॅमिली डॉक्टरची भेट घ्या. गरज वाटल्यास खात्री म्हणून आरटीपीसीआर टेस्ट करून घ्या. मात्र तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून ट्रेकला जाऊ नका. घरी राहून पूर्णपणे बरे व्हा आणि त्यानंतर ट्रेकचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडा. आपण आपल्या सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालू शकतो, हे समजून घ्या. ट्रेकनंतर काही दिवसांत तब्येत बिघडल्यास किंवा करोना झाल्याचे टेस्टनंतर सिद्ध झाल्यास ट्रेक आयोजकांना कळवा. जेणेकरून तुमच्यासोबत प्रवास केलेल्या इतर व्यक्ती तात्काळ त्यांची टेस्ट करून घेतील आणि योग्य ते उपचार सुरू करतील.

अस्वच्छ ठिकाणी स्पर्श करू नका

ट्रेकला जाण्यासाठी घरून निघाल्यापासून घरी परतेपर्यंत अनेक ठिकाणी आपला हात अस्वच्छ गोष्टींना लागू शकतो. अशा अस्वच्छ गोष्टींना स्पर्श करावा लागणार असेल, तर ते टाळा. स्पर्श झाल्यास आपल्या हाताने नाक, डोळे, तोंड यांना स्पर्श करण्यापूर्वी तो सॅनिटाईझ करून घ्या. एखादी जागा अस्वच्छ असल्यास ती आयोजकांच्या नजरेस आणून द्या. मुबलक प्रमाणात सॅनिटायझर सोबत घेतल्यास गरज पडल्यास हात सॅनिटाईझ करणं शक्य आहे.

आयोजकांनी कोणती काळजी घ्यावी?

* स्थानिक प्रशासनाने पर्यटनावर कोणते निर्बंध घातलेत हे तपासावे.

* ट्रेकला जाण्यापूर्वी आयोजकांनी ट्रेकर्सना योग्य त्या सूचना द्याव्यात.

* ट्रेकरने गेल्या काही दिवसांत मोठा प्रवास केला आहे का? त्या नंतर खोकला, ताप, सर्दी आहे का, हे विचारावे.

* ट्रेकपूर्वी प्रत्येक सहभागी ट्रेकरची ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान तपासावे.

* पायथ्याच्या गावी जेवणाची, राहण्याची सोय असल्यास त्यांनी योग्य ते सॅनिटायझेशन केलं आहे का हे तपासावे.

* ट्रेकदरम्यान कोणीही विनाकारण स्थानिकांच्या घरी किंवा इतर ग्रुपमध्ये मिसळत नाहीये ना हे पहावे.

* शक्यतो मुक्काम गावाबाहेर, एखाद्या मंदिरात किंवा शाळेत करावा.

* सॅनिटायझेशन केलं नसल्यास ट्रेक आयोजकही ते करू शकतात.

* ट्रेकनंतर ५-६ दिवसांनी ट्रेकरसोबत संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारणा करावी.

* ट्रेकनंतर एखाद्याला लक्षणे दिसून आल्यास, करोना झाल्याचे कळल्यास त्याची माहिती इतरांना देऊन, योग्य ती तपासणी करून घेण्यास सांगावे. लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ट्रेकला नेताना विशेष काळजी घ्या किंवा त्यांना ट्रेकला नेणं टाळा.

* इतर ट्रेक आयोजकांशी संवाद साधून किल्ल्यांवर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. एकाच ठिकाणी ट्रेक लावणं टाळावं.

पावसात ट्रेकला जाताना..

* आयोजक/ट्रेक लीडरने सांगितलेल्या वाटेवरूनच ट्रेक करा. वाट सोडून जंगलात जाऊ नका.

* रेनकोट, विंड चीटरसोबत घ्या. छत्री नेऊ नका. कोरडय़ा कपडय़ांचा जोड, टॉवेल एखाद्या प्लाटिक पिशवीत बांधून घ्या.

* इतर सामानासाठी ड्राय बॅग किंवा प्लास्टिक पिशवीचा वापर करा.

* पावसाळ्यात तहान कमी लागते. ट्रेकच्या वेळी भरपूर पाणी प्या.

* ट्रेकसाठी दुचाकीने प्रवास करताना घाई करू नका, गरज वाटल्यास थांबा.

* पुरेसा सुका खाऊ सोबत घ्या.

* अनेक जण पावसात सॉक्स घालणं टाळतात, सॉक्स हवेच. जादा जोड सोबत ठेवा.

* पावसाळ्यात गवत वाढलेले असते, त्यातून ट्रेक करताना पूर्ण हातापायाचे कपडे घाला.

* कीटक दूर राहण्यासाठी ओडोमास वापरा.

* पावसात भिजल्यास डोके, छाती ओले ठेवू नका, लगेच कोरडे करा.

आयोजक काय म्हणतात

माझा ट्रेक, माझी जबाबदारी

आयोजकांनी ट्रेक सुरू करताना स्थानिक प्रशासनाशी संवाद साधणं गरजेचं आहे. एखाद्या गावात जाताना तिथल्या लोकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही हे पाहायला हवं. आपल्याला उपलब्ध असलेल्या अनेक आरोग्य सुविधा त्यांना उपलब्ध नाहीत. आपल्यामुळे त्यांना कोणताही धोका उद्भवणार नाही ही प्रत्येक ट्रेकरची वैयक्तिक जबाबदारी आहे. लॉकडाऊननंतर ट्रेकला जाऊ की नको, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असला तरी आपण १०० टक्के निरोगी असल्याची खात्री असल्याशिवाय बाहेर पडू नका.

सिद्धेश सावे, सावे टूर्स अ‍ॅण्ड ट्रेक

गर्दी होऊ नये, याकडे लक्ष हवे

पावसाळा सुरू झाला की भटकंतीची आवड असणारे सगळे सह्यद्रीभटके सह्यद्रीत भटकंती करायला बाहेर पडतील. अशा वेळी एकाच किल्ल्यांवर गर्दी होणार नाही याची काळजी ट्रेक आयोजक म्हणून आम्ही घेतो. गर्दीची ठिकाणे टाळून नवनवीन ठिकाणांची पुरेशी माहिती घेत, अभ्यास करत नवीन ठिकाणी ट्रेक आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. ट्रेक करत असताना गावातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून मुक्काम गावापासून बाहेर एखाद्या शाळेत वा मंदिरात ठेवत आहोत.

सागर नलवडे, शिलेदार अ‍ॅडव्हेंचर इंडिया