मृण्मयी पाथरे viva@expressindia.com
‘‘हॅपी वुमन्स डे! आज तुम्ही कोणीच काही काम करायचं नाही. आज तुम्हाला फक्त आराम करायचा आहे! बाबा आणि मी बघू जेवणाचं काय करायचंय ते. अगदी काही जमलं नाहीच, तर सगळे बाहेर जाऊ जेवायला; पण आज तुम्हाला नो काम व्हॉटसोएव्हर!’’ सकाळी उठल्या उठल्या मेघनने त्याच्या ताई, आई आणि आजीला आनंदाने प्लॅन सांगितला.
दोन दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन साजरा केला गेला. त्यामुळे आपल्यापैकी काही जणांनी आपल्या घरातील स्त्रियांना कामापासून एक दिवस सुट्टी घेण्यास सांगितलं, तर काही जणांनी आपल्या आयुष्यात स्त्रियांचं किती महत्त्व आहे हे आपल्या घरातल्या स्त्रियांना एरवी सांगितलं नसलं, तरीही सोशल मीडियावर मात्र आवर्जून पोस्ट्स टाकल्या. एवढंच नव्हे तर काही संस्थांनी आणि राजकीय पक्षांनी महिलांसाठी स्व-संरक्षण कार्यशाळांपासून ते बाइक रॅलीपर्यंत, स्त्रीप्रधान चित्रपटांचं स्क्रीनिंग आयोजित करण्यापासून ते स्त्री कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यापर्यंत अनेक कार्यक्रम राबवले. (खरं तर, स्व-संरक्षण कार्यशाळेत स्त्रियांना स्वत:चा बचाव कसा करता येईल हे शिकवण्यापेक्षा पुरुषांनी त्यांचे सेक्शुअल अर्जेस (sexual urges) समजून घेण्यासाठी आणि लैंगिक वागणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर?) पण महिला दिनाच्या एका दिवसाच्या सेलिब्रेशनमुळे स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबतचे, करिअरच्या संधीबद्दलचे आणि दैनंदिन जीवनातील त्यांच्या सर्वागीण विकासाचे प्रश्न खरंच सुटतील का? एखादी स्त्री काम करण्यासाठी घराबाहेर जाऊ दे, वर्क फ्रॉम होम करू दे किंवा घरातील कामं आटपू दे, ती आजच्या काळात खरंच ‘हॅपी’ आहे का?
लहानपणापासूनच आपण मुलींना वाढवताना त्यांच्या मनावर ‘चांगले संस्कार’ व्हावेत म्हणून अनेक गोष्टी बिंबवतो. त्यांनी कपडे कसे घालावे (आणि कसे घालू नये), कपडय़ांमधून घातलेली ब्रा दिसू नये यासाठी कसे प्रयत्न करावेत, आपल्याकडे इतरांचं लक्ष वेधलं जाऊ नये म्हणून त्यांच्यासमोर कसं बसावं आणि वागावं, जेवण कसं करावं, भांडी कशी घासावी, घर स्वच्छ कसं ठेवावं, अंधार व्हायच्या आत घरी का यावं यांसारख्या कित्येक गोष्टी घरातील वयात येणाऱ्या मुलींनी आणि स्त्रियांनी कराव्यात यासाठी आपल्या आधीची पिढी कित्येकदा जिवापाड धडपड करताना दिसते. आपल्याकडे सणासमारंभाला कोणी पाहुणे आले, तर आधी घरातील इतर वडीलधाऱ्या आणि पुरुष सदस्यांना वाढून मग जेवायला बसणं आणि घरातील शिळं अन्न खाणं हे बहुतेकदा स्त्रियांकडूनच अपेक्षित असतं. लग्न झाल्यावर सौभाग्याचं लक्षण म्हणून गळय़ात मंगळसूत्र, पायात जोडवी घालणं किंवा टिकली लावणं याची अपेक्षाही केवळ स्त्रियांकडूनच केली जाते. त्यात कोणी या गोष्टी करण्यास नकार दिलाच, तर त्यांच्यावर कसे संस्कार झाले आहेत यावर प्रश्नचिन्ह उमटवलं जातं.
मुलींनी आणि स्त्रियांनी त्यांच्या अभ्यास आणि कामासोबतच घरातील इतर मंडळींना हव्या किंवा नको असलेल्या गोष्टींकडे डोळय़ात तेल घालून लक्ष द्यावं हीसुद्धा अलिखित अपेक्षा समाजाकडून कित्येकदा अधोरेखित केली जाते. लग्न ठरल्यावर किंवा झाल्यावर ‘आता तुझ्यासाठी नव्हे, पण निदान तुझ्या जोडीदारासाठी तरी जेवण करायला शिक’ असंही सांगितलं जातं. ‘आम्हीसुद्धा नोकरी केली, पण घराकडे दुर्लक्ष मात्र कधीच केलं नाही’ हे सांगून तुझ्याकडूनही तीच अपेक्षा आहे बरं का हा संदेशही कित्येक स्त्रियांपर्यंत पोहोचवला जातो; पण या अवाजवी अपेक्षांचं ओझं कधी आपण कोणाला पुरुषांवर लादताना पाहिलं आहे का?
काही दिवसांपूर्वीच तिशीतील कार्तिक त्याच्या बायकोला स्वयंपाकघरात मदत करत होता. आणलेल्या भाज्या साफ करून, चिरून, त्या फोडणीला टाकेपर्यंतची सगळी पाककृती त्याने अचूकपणे फॉलो केली. त्याने केलेली भाजी खरंच खमंगही झाली. भाजी शिजेपर्यंत त्याने त्याच्या जोडीदारासोबत पोळय़ा बनवायला घेतल्या. त्याच्या घरात आलेल्या पाहुण्यांना कार्तिकला जेवण करताना पाहून आश्चर्यच वाटलं. जेवताना कार्तिकच्या पाककलेचं सगळय़ांनीच खूप कौतुक केलं. जेवण झाल्यानंतर त्याने भांडीसुद्धा त्याच्या जोडीदारासोबत मिळून घासली. पाहुणे जाता जाता त्याच्यासारखा जेवण करणारा आणि घरकामात मदत करणारा नवरा मिळाला म्हणून कार्तिकची जोडीदार किती भाग्यवान आहे, हे सांगायला मुळीच विसरले नाहीत. पाहुणे गेल्यावर कार्तिकने त्याच्या जोडीदाराला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाला, ‘‘इतर लोक काहीही म्हणो, पण आजचं जेवण रुचकर होण्याचं श्रेय तुलाही तितकंच जातं. आफ्टरऑल, वुई आर पार्टनर्स इन एव्हरीथिंग!’’
काय गंमत आहे, नाही का? आपल्या सभोवताली असलेल्या स्त्रिया जी कामं रोज न चुकता करतात, त्यांचं आपण रोज न सांगता इतकं कौतुक करतो का? ज्या गोष्टी एक स्त्री म्हणून समाजाने ठरवलेल्या अपेक्षांनुसार कामं करते, तिला कित्येकदा गृहीत धरलं जातं. त्यातूनच मनाची होणारी घुसमट, इतरांसाठी दिवसरात्र घाम गाळून, काम करून आणि घर सांभाळूनसुद्धा कोणीच आपले कष्ट अॅक्नॉलेज (acknowledge) आणि अप्रीशिएट (appreciate) केले नाहीत म्हणून आलेलं नैराश्य, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपण कमी पडत आहोत का, हा विचार करून कमी झालेला आत्मविश्वास, काम आणि घर सांभाळताना स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आलेला थकवा, इतरांना हव्या त्या गोष्टी वेळेवर मिळाव्यात म्हणून त्यांच्या शेडय़ुलनुसार आपल्या झोपेच्या आणि खाण्या-पिण्याच्या बदललेल्या वेळा, अशा कित्येक गोष्टी दैनंदिन जीवनातील ताणतणावात भर घालत असतात. समाजाने लादलेल्या या अपेक्षांना आणि बंधनांना झुगारून देणाऱ्या स्त्रियांना कित्येकदा टोमणे, तिरस्कार, राग आणि इतरांच्या चिडचिडेपणाचा सामना करावा लागतो.
बरं, ऑफिसचं काम आणि घर यांत स्त्रियांच्या होणाऱ्या ओढाताणीबद्दल तर आपण बरीच चर्चा करू शकतो. लग्न झाल्यावर स्त्रिया जर शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात किंवा परदेशी गेल्या, तर त्यांच्या नवऱ्याचं आणि सासू-सासऱ्यांचं कसं होणार, त्यांचा संसार कसा टिकणार याबद्दल कित्येक शंका-कुशंका अनेक जणांच्या मनात येतात. एखाद्या व्यक्तीला तिच्या भरभराटीसाठी प्रोत्साहन देण्याचं सोडून तिच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना कसा त्रास होईल, याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. त्यामुळेच कित्येक स्त्रियांमध्ये कसब, जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असूनसुद्धा त्यांना घरच्यांचा पािठबा न मिळाल्यामुळे बाहेरगावी मिळणारे प्रमोशन्स, करिअरला अनुकूल असलेल्या संधी स्वीकारण्याआधी आजूबाजूचे लोक त्यांना कळत-नकळतपणे शंभर वेळा विचार करायला भाग पाडतात. जर प्रमोशन स्वीकारलंच, तर हाताखाली काम करणाऱ्या काही पुरुष मंडळींच्या मनात ‘त्या स्त्रीला हे प्रमोशन कसं मिळालं?’, ‘तिच्याकडे व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक कसब आहे का?’, ‘तिचे निर्णय योग्य आहेत का?’ आणि ‘आता एक स्त्री आपली बॉस झाली, तर कटकट सहन करावी लागेल का?’ असे अनेक स्टीरीओटिपिकल (stereotypical’) प्रश्न येऊ शकतात.आपल्या समाजाचं अजून एक वैशिष्टय (?) आहे – आपण स्त्रियांना नेहमीच कोणाची तरी लेक, बहीण, प्रेयसी, बायको, आई, सासू म्हणून पाहतो. त्यांच्याशिवाय घराला घरपण कसं येत नाही, हे अनेकदा सांगतो; पण हीच स्त्री या साऱ्या नात्यांपलीकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगते आहे, याचा आपण विचार केला तर? तिलाही तिची वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वप्नं आहेत आणि तिला नेमकं तिच्या आयुष्यात काय करायचं आहे, याकडे लक्ष देऊन तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन दिलं तर? कदाचित तेव्हा आपल्या आयुष्यातील वुमन्स खऱ्या अर्थाने हॅपी होतील.