कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही
माझा जन्म पुण्यातला पण माझं सर्व शिक्षण मात्र नागपूरमध्ये झालं. सर्वसाधारणपणे चौकोनी मध्यमवर्गीय असं आमचं कुटुंब. आई लेक्चरर व वडील सनदी सेवेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्कारांचं बाळकडू लहानपणापासून आम्हाला मिळालं होतं. लहानपणी असताना माझ्यावर अत्यंत महत्त्वाचे संस्कार केले, त्यातील एक म्हणजे कुठलाही प्रयत्न करा. पण तो प्रयत्न करताना त्या प्रयत्नाला प्रामाणिकतेची जोड हवी. हे संस्कार आई-वडिलांनी दोघांनी मनावर बिंबवले होते. त्यांनी असं सांगितलेलं की, कोणतंही क्षेत्र निवड पण त्या क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न कर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही नियोजन करतो त्याकरिता कठोर मेहनत घ्यायला हवी. प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनत यांचे डोस घेतच मी वाढले. त्यामुळे एकापरीने अभ्यास आवश्यक आहे हे मनावर बिंबवलेलं होतं. मला आठवतंय आई-बाबा दोघंही सांगायचे आपली काही शेती नाही, आपला काही उद्योगधंदा नाही, जे काही मोठेपणी करायचंय ते केवळ तुला अभ्यासावर करायचं.
साधारण ८०च्या दशकामध्ये मुलगी मेरिटला आली की तिने मेडिकल व मुलगा आला तर त्याने इंजिनीअिरगला जायला हवं. मी मेडिकल कॉलेजला अॅडमिशन घेतली होती. पण त्यानंतर मला असं लक्षात आलं, मला जर प्रशासकीय सेवेत जायचं आहे तर मग इथे मी काय करत्येय. दोन आठवडय़ांनंतर मी लॉच्या एका उपक्रमात भाग घेतला. माझ्या मनात नक्कीच इच्छा होती की मला आयएएस व्हायचं आहे. पण तरी भारतातील कुणी असं ठाम सांगूच शकत नाही की हो तू आयएएस होशील म्हणून. हे माझ्याच नाही तर अनेकांच्या बाबतीत घडतं. तीन लाख जण या परीक्षेला बसतात, त्यातून पन्नास ते साठ हजारांची निवड होते. कुठे तरी नशिबानेही इथे साथ द्यावी लागते. आयएएस नाही होता आलं तर दुसरं करिअर हवं म्हणून मी लॉचा पर्याय निवडला होता.
आयएएस म्हणजे अभ्यास एके अभ्यास..
एकदा माझ्या बाबांचे मित्र घरी आले होते. गप्पा मारताना त्यांना सहजपणे मी सांगितलं होतं, की मी आयएएसच्या परीक्षेला बसतेय. आयएएसचा अभ्यास किती कठीण असतो हे मला माहीत होतं. पण यातील स्पर्धा किती आहे हे माझ्या त्या वेळी लक्षात आलेलं नव्हतं. मी त्यांना अगदी सहजपणे आयएएसच्या परीक्षेला बसतेय असं सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘देअर आर विनर्स अॅण्ड लुझर्स.. देअर आर नो ऑल्सो रॅन्क्स. भारतातील अन्य राज्यांतून या परीक्षेची तयारी होत असते. त्यातून ५० ते ६०मध्ये येणं म्हणजे खूप कठीण आहे. आपण फक्त प्रयत्न करायचे. पुढे काय होईल ते आपण नाही ठरवू शकत. त्यामुळे आता आपल्या हातात केवळ प्रयत्न करणं आहे, हे माझं त्यावेळीच पक्कं झालेलं होतं.
प्रयत्नांची पराकाष्ठा करा
तुम्ही त्यावेळी परीक्षा दिली होती, तो काळ वेगळा होता. आजच्या कालखंडात आयएएसची तयारी कशी करावी, या प्रश्नाला मला नेहमी सामोरं जावं लागतं. यावर मी केवळ इतकंच म्हणेन प्रयत्नांची पराकाष्ठा करा. ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. यामध्ये तीन ते चार लाख जण दरवर्षी बसतात. या कॉम्पिटेशनमध्ये आपल्याला पहिल्या शंभरमध्ये यायचं असेल तर प्रयत्नात सातत्य हवे. केवळ प्रयत्नच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेऊ शकतात.
सांगली माझी कर्मभूमी
माझ्या आत्तापर्यंत पाच ते सहा पोस्टिंग झालेल्या आहेत. सांगली येथे दुष्काळ आणि अतिवृष्टी हे संकट कोसळले, त्या काळात मी सांगलीतच होते. सांगलीत मी जवळपास सव्वातीन वर्षे होते. त्यामुळे बरेच जण मला तुम्ही सांगलीच्या आहात ना, असा प्रश्न विचारतात. मी सांगलीची नसून सांगली ही माझी कर्मभूमी आहे. सांगलीचा महाभयाण दुष्काळ आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्या वेळी तिथे प्रश्न पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा होता. शेतीमध्ये उगवण्यासारखं काही नव्हतं. त्या सर्व बेरोजगार लोकांना काम काय द्यायचं, हा महत्त्वाचा प्रश्न होता. कुठलाही अधिकारी नवीन पोिस्टगला गेल्यावर पोिस्टगची प्राथमिकता लक्षात घेतो. ही प्राथमिकता त्याने लक्षात घेणंही गरजेचंच असतं.
सांगलीचा एक अनुभव मला सांगावासा वाटतो, तो म्हणजे मी जेव्हा ट्रेनिंगला होते तेव्हा कॅबिनेट सेक्रेटरी आमच्याकडे तेव्हा ट्रेनिंगला आले होते. त्यांनी आम्हाला एक सांगितलेलं होतं. तुम्ही जर लोकांच्या दु:खात सहभागी झालात तर लोक तुम्हाला त्यांच्या आनंदात सहभागी करून घेतील. आमच्यासारख्या अनेक लोकांनी त्या वेळी म्हटलेलं ‘क्या भाषण मार रहा है.’ याच विधानाचा अनुभव मला सांगलीत आला.
२००४ या वर्षांतील काही महिने सांगलीत पाऊसच पडला नाही. त्या वेळी आम्ही जलसंधारणेची कामं घेतली होती. त्या वेळी आम्ही पाऊस पडेल तेव्हा पडेल पण तो पडून वाहून जाऊ नये म्हणून तळी, त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी करून ठेवल्या होत्या. पाऊस पडेल तेव्हा मुबलक पाण्याचा साठा मिळेल याकरिता. सांगलीच्या सर्वानी एकत्र येऊन जलसंधारणाचे काम केले.
एक दिवस मी पुण्यामध्ये ट्रेनिंगला गेले असताना मला फोन आला. त्या वेळी नुकतेच लोकांच्या हातात मोबाइल आले होते. पहिल्यांदा मला फोन आला तो गावच्या सरपंचांनी फोन केला. फोन केल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मॅडम पाऊस पडतोय, आमच्या तळ्यात पाणी साठतंय.’’ त्यानंतर जवळपास अर्धा तास असेच पाऊस पडतोय हे सांगायला फोन सुरूच होते. माझ्या बाजूच्या एका सहकारी मैत्रिणीने विचारले, पाऊस पडतोय हे तुला का फोन करतायत, हा प्रश्न त्यांना विचार.
मी हा प्रश्न विचारल्यावर सांगलीच्या सरपंचांनी मला ऐकवले. मॅडम जेव्हा पंधरा महिने पाऊस पडला नाही तेव्हा तुम्ही आमच्या दु:खात सहभागी झाला होता. मग आता आमच्या आनंदातही आम्हाला तुमची साथ हवी. त्या वेळी सर्वानी मिळून जे कष्ट घेतले होते त्याला तोडच नव्हती. ते आमचे कष्टाचे दिवस सार्थकी लागले होते. हा अनुभव खरोखरच कधीच विसरण्याजोगा नव्हता.
संघर्ष रोजच करावा लागतो..
असं म्हणतात की डॉग बाइट्स मॅन तर ती बातमी नसते. पण जर माणूस चावला तर ती बातमी होते. बरेचसे अधिकारी आपल्या रुटीनमध्ये खूप चांगलं आणि उत्तम काम करत असतात. त्यामुळे ती बातमी होत नाही. त्यामुळे आऊट ऑफ द वे काहीतरी केलं तर ती बातमी ठरते. माझा अनुभव असा आहे की, सरकारी अधिकारी म्हटल्यावर त्याच्याबद्दल निगेटिव्ह इमेज सर्वसाधारणपणे असते. पण या सो कॉल्ड निगेटिव्ह खात्यात प्रचंड ऊर्जा असते. हीच ऊर्जा टॅप करता यायला हवी. संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी असतो. त्यामुळे त्या संघर्षांला तोंड देण्यासाठी तयार असायला हवं. मी दीड र्वष अभ्यास करून यूपीएससीची परीक्षा दिली. त्या वेळी अधिकारी झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, मी ज्या क्षेत्रात आलेय त्या क्षेत्रात मला रोजच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे संघर्ष हा करावाच लागतो, तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे.
‘लोकराज्य’चा कायापालट
२००६ मध्ये माहिती खात्याचा कार्यभार घेतला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फक्त एकच सांगितलेलं होतं. यू गो अहेड.. जेव्हा माझी मदत लागेल तेव्हा सांगा. शासन बरेचदा योग्य त्या गोष्टी करत असते. पण त्यातून फक्त निगेटिव्ह गोष्टींना बरीच प्रसिद्धी मिळते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मला एकच सांगितलेलं होतं की, शासन आणि जनता या दोहोंमध्ये संवादाची माध्यमं निर्माण करा. तोपर्यंत शासनाकडे स्वत:चं असं माध्यम नव्हतं. साधी एखादी बातमी द्यायची झाल्यासही कुणाची तरी मदत घ्यावी लागायची.
‘लोकराज्य’ हे मासिक २००६ साली ब्लॅक अॅण्ड व्हाइट अशा स्वरूपात होतं. तिथे रुजू झाल्यावर मला ते मासिक बदलण्याची सूचना दिली होती. त्या वेळी मासिकाचा खप हा दहा हजार इतका होता. शिवाय मासिकही दिसायला आकर्षक नव्हतं. ते स्टॉलवर विकायला असल्यावर हातात तरी घ्यावंसं वाटायला हवं. अजून इथे एक नमूद करावंसं वाटतं मी ज्या ज्या खात्यात काम केलं त्या त्या खात्यात मला प्रचंड ऊर्जा दिसली. मला एक सांगा ज्याला चांगलं काम करायला आवडत नाही अशी व्यक्ती सापडेल का? प्रत्येकाला काही ना काही उत्तम काम करण्याची मनातून इच्छा असते. एखाद्या व्यक्तीला चॉइस दिला तर चांगलं काम करायला नक्की आवडेल. सर्वसाधारण मनुष्याची प्रकृती अशी आहे की त्याला चांगलं काम करायला नक्कीच आवडतं.
आमची पहिली बैठक झाली त्या वेळी ‘लोकराज्य’ मासिकाचं सक्र्युलेशन १० हजार इतकं होतं. त्या खात्याकडे मी एक प्रश्न मांडला याचं सक्र्युलेशन आपण एका वर्षांत एक लाख करूया. हे ऐकल्यावर बऱ्याच जणांनी आढेवेढे घेतले. या संदर्भातील बैठक तब्बल एक दिवस चालली. मॅडम आपण प्रयत्न करू असं म्हटलं गेलं होतं. कधी कधी प्रॉब्लेम असा असतो, आपल्याला क्षमतेची जाणीव नसते. आपल्यात खूप अमाप क्षमता आहे तीच आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपण ठराविक पातळीपर्यंतच यश मिळवतो. आजच्या घडीला याचं सक्र्युलेशन तब्बल चार लाख झालं, एक नवीन पैसा न खर्च करता. तसंच आहे त्या मनुष्यबळामध्ये. हे सर्व आम्ही नवीन उभं केलेलं होतं. इथेच लक्षात आलं की पोटेन्शियल अनटॅप होतं. सुरुवातीला याचं सक्र्युलेशन वाढेल की नाही अशी शंका असणारे आता आपण याचं सक्र्युलेशन पाच लाख करू असे बोलायला लागले. या मासिकासमवेत आकाशवाणीवर आम्ही ‘दिलखुलास’ नावाचा एक कार्यक्रम सुरू केला.
गॉन विथ द विंड..
कोणत्याही क्षेत्रासारखा संघर्ष या क्षेत्रातही आहे. रुसवे-फुगवे अशा अनेक गोष्टींना अगदी आमंत्रण न देता सामोरं जावं लागतं. असे चढ-उतार होत असले तरीही मला एक सांगावंसं वाटतं गॉन विथ द विंड.. आफ्टरऑल टुमारो इज अनदर डे. आजचा दिवस कितीही वाईट असला तरी उद्याचा सूर्य नव्याने उगवणार आहे. आजचा दिवस वाईट गेला ना तर उद्याचा दिवस नक्कीच चांगला जाईल.
स्टाफ हा डिपार्टमेंटचा कणा असतो
असं बरेचदा होतं की माझ्यासारखे अधिकारी एखाद्या क्षेत्रात काही काळ असतात. अधिकारी हे त्यांचं काम करून त्या जागेवरून दुसरीकडे जातात. परंतु वर्षांनुर्वष त्या विभागात जे काम करत असतात त्यांना मात्र काही प्रश्न फार सोपे वाटत असतात. मला वाटतं एखाद्या डिपार्टमेंटचा कणा म्हणजे स्टाफ असतो. अधिकारी बऱ्याचदा स्टाफशी संवाद साधत नाहीत. पण स्टाफला बोलतं केलं की त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपल्याला माहिती होतात. स्टाफकडून डिपार्टमेंटबद्दल खूप माहिती किंवा बारकावे जाणून घेता येतात. त्यामुळे कुठलंही काम करताना स्टाफच्या मदतीने ते करणं अधिक सोप्पं होतं.
मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग
मुंबईत २०१० सालामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त झालेला तो काळ मला आठवतो. त्या वेळी रिसेप्शनमध्ये काही कामानिमित्त गेल्यावरही अनेक लोक अगदी सहज बोलून जात, अहो मॅडम बघा ना आमच्याकडे फारच डास झालेत हो.. त्या वेळी ते आमच्यासमोर खूप मोठ्ठं चॅलेंज होतं. डासांवर प्रतिबंधक उपाय म्हणून २००५ पासून आम्ही काही प्रतिबंधात्मक गोष्टी केल्या होत्या. तर काही गोष्टी करायच्या राहून गेल्या, त्यामुळेच ही स्थिती उद्भवली होती. आजही मुंबईतील मलेरियाचे प्रमाण कमी होईल पण त्याला पाच र्वष लागतील. काम करताना जी ऊर्जा मला माहिती खात्यात दिसली तीच ऊर्जा मला आरोग्य विभागातही दिसली होती. आम्ही एकदा पाचसूत्री कार्यक्रम केला होता. मला सांगायला अभिमान वाटतो, त्या सर्व टीमने झपाटल्यासारखं काम केलं होतं. त्यामुळेच पूर्वीपेक्षा आज हे डासांचं प्रमाण कमी झालं आहे.
मुंबईचं सांगायचं झालं तर मुंबईत साठ टक्केलोक झोपडपट्टीत राहतात. मुंबईच्या झोपडपट्टीसारखा एरिया नाही. प्रॉब्लेम असा आहे की, इथे गरीब लोक राहतात. त्यांच्या आहारात असणाऱ्या घटकांवर त्यांची प्रतिकारक्षमता अवलंबून असते. त्यामुळेच झोपडपट्टीतील आरोग्य हे खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचे चॅलेंज आहे. आज मात्र परिस्थिती नक्कीच वेगळी आहे. मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आम्ही आरोग्य शिबीर घेतलेलं आहे. आमच्या प्रत्येक स्टाफने रविवारची सुट्टी न घेता या शिबिरांसाठी वेळ दिलेला आहे.
भाषेपेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत..
गेल्या काही दिवसांत यूपीएससी परीक्षा आणि भाषा हे वाद अगदी विकोपाला पोहोचले होते. यूपीएससी हे अधिकारी निवडत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना भाषेपेक्षा त्यांच्यावरचे संस्कार हे महत्त्वाचे असतात. त्यांची मूल्यं महत्त्वाची असतात. भारतातील कोणतीही सिस्टीम ही भारतीय भाषांना बाद करू शकत नाही.
तुमची क्षमता ओळखा..
आपल्यामध्ये कुठले गुण आहेत, याची आपल्याला जाण हवी. आपल्या क्षमतेची जाणीव आपल्याला झाली की अनेक गोष्टी सहजसाध्य होतात.
स्त्रियांना डावललं जातं असं तुम्हाला वाटतं का..
गेली वीस र्वष काम करताना हा अनुभव मला आला नाही. एक काळ असा होता की, आयएएसपदावर असणाऱ्या अनेक महिला अधिकाऱ्यांना नैराश्याला सामोरं जावं लागत असे. पण आज मात्र हे चित्र पूर्णपणे बदललेलं दिसून येईल. वीस वर्षांत महाराष्ट्रात काम करताना कुठेही मला अशी वागणूक मिळाली नाही की ज्यामुळे मला नैराश्य यावं. माझ्या कारकिर्दीमध्ये मला अपेक्षित ती पोिस्टग नक्कीच मिळालेली आहे. त्यामुळेच माझी अशी आशा आहे की निवृत्तीच्या शेवटच्या दिवशीही काहीतरी कारणाने डावललं गेलंय, हे वाक्य माझ्या तोंडून येणार नाही.
इथे मी तुम्हाला महिलांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी एक उदाहरण सांगते. ९३ साली बॅलेट पेपरवर व्होटिंग व्हायचं. त्या वेळी मी सांगितलेलं होतं की, चांगल्या कर्मचाऱ्यांची लिस्ट करा. त्या वेळी दोन लिस्ट केल्या. ज्यांना लिस्ट करायला सांगितली होती त्यांनी महिलांची नावं त्यात घेतलीच नव्हती. शिवाय मॅडम त्या लेडीज आहेत असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे त्या काय काम करणार, असाच त्यांचा सूर होता. महिला त्यांच्या बरोबरीच्या कर्मचारी आहेत हे मानायलाही त्या वेळी ते तयार नव्हते. काऊंटरला दोन महिलांची टेबल्स केली होती. त्या वेळी महिलांच्या टेबल्सने काऊंटिंग आधी संपवलं होतं.
मिलिंद इज माय ग्रेटेस्ट स्ट्रेंथ..
दोघंही नवरा-बायको एकाच क्षेत्रात असल्यामुळे तुम्ही घरी आल्यावर जीआर किंवा ऑर्डर अशा गप्पा मारता का.. तर हो नक्कीच. या गप्पा ओघाने का होईना आमच्यात होत असतातच. शिवाय मला आवर्जून असं सांगायचंय की, आपण ‘अभिमान’ चित्रपटाने प्रेरित आहोत. याचंच एक अगदी बोलकं उदाहरण मी सांगते. आमचं नुकतंच लग्न झालेलं होतं. त्या वेळी आमच्या घरी एक अधिकारी जेवायला आले होते. जेवण झाल्यावर ते जाताना म्हणाले, तुमच्या दोघांचं एकच क्षेत्र, हे आहे सर्व छान पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. हे ऐकल्यावर ती संपूर्ण रात्र मला झोपच आली नव्हती. पण आज मात्र मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की, आमच्या लग्नाला १८ र्वष झालीत.
आमच्या दोघांच्या कामामध्ये प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडत असतं. पण हे असं असलं तरी सकाळी एक तास विदाउट फेल आम्ही एकत्र वॉक घेतोच. या वॉकमध्ये माझं काम-त्याचं काम अशा अनेक गोष्टींची चर्चा होते. त्यामुळेच मिलिंद माझी स्ट्रेंथ आहे, असं मी नक्कीच म्हणेन.
वेळेचं नियोजन करा..
आपल्यापैकी प्रत्येक जण तारेवरची कसरत करत असतो. त्यामध्ये वेळेचं नियोजन आणि काम अशा अनेक गोष्टी येतातच. मुंबईत राहणारी प्रत्येक व्यक्ती वेळेचं नियोजन करण्यात पटाईत असते. आजचा क्षण महत्त्वाचा, ही वेळ महत्त्वाची आहे. यामागे काय वाईट घडलं याचा विचार करणं महत्त्वाचं नाही. ऑफिसचं काम करताना घरचा विचार टाळावा. घरी असताना ऑफिसचं काम करू नये. ऑफिस ऑफिसमध्ये ठेवलं आणि घरचं काम घरात ठेवलं तर कुठल्याही गोष्टीमध्ये अडचणी येत नाहीत. सांगलीला पूर आल्यावर तेरा दिवस आम्ही ऑफिसमध्येच होतो. कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचं हे तुम्ही ठरवा म्हणजे अनेक गोष्टी सोप्या होतील.
सेल्फ मोटिव्हेशन..
माझ्या जनरेशनपेक्षा आजच्या जनरेशनला डिस्ट्रॅक्टिंग मीडियम्स खूप आहेत. त्या वेळी केवळ एक दूरदर्शन. आता तर खूप भीतीदायक चित्र आहे. किती चॅनल्स आहेत त्याला अंत नाही. टेलिकम्युनिकेशनचं एक्स्पोजर झालेलं आहे. माझ्या काळात मी दीड र्वष विदाउट पिक्चर राहू शकले. आजकाल डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. सेल्फ मोटिव्हेशनसाठी मी एक डायरी ठेवली होती. काही दिवस असं वाटतं आपण जग जिंकू शकतो. काही दिवस वाटतं साधी प्रीलियम्स पास होऊ शकत नाही. ही आजही मला खूप चांगली प्रतिक्रिया वाटते. आपल्या विचारांना वाट द्यावी. ते विचार उतरवून काढायचे.
चित्रपटात दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांचं आणि वास्तवातील अधिकाऱ्यांचं चित्र खूपच वेगळं आहे. मला वाटतं आपण कोणतीही कला घेतली तर त्यामध्ये रुटीनपेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला दाखवावं लागतं. आपण समाजात पाहिलं तर ग्रे शेड्स दिसतात. चित्रपटात दाखवलेलं पांढरं किंवा काळं हे भडकपणे दाखवलं जातं. माझा वीस वर्षांतला अनुभव असा आहे की तुम्ही जे काम करणार आहात त्या जिल्हय़ाच्या प्राथमिकतेचं काम असेल तर खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतोय हे कम्युनिकेट करता आलं तर ते केव्हाही उत्तम. तर ते काम करताना तुम्हाला साथ नक्कीच मिळते. मी पहिले सेशन अटेण्ड केले. मनीषा मॅडमनी सांगितलेल्या अनुभवातून बरेच काही कळले. जसे एक अधिकारी म्हणून इतरांशी कसे वागायचे, निर्णय कसे घ्यावयाचे, त्या मागे विचार काय करावयाचे तेही समजले. तसेच त्यांनी अभ्यास करण्याबाबत सांगितलेल्या गोष्टी जसे प्रामाणिकपणे अभ्यास करणे, अभ्यास करताना एकाग्रचित्ताने करणे हय़ा दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवल्या आहेत. तसेच कॉम्पिटिशनचा विचार करूनच अभ्यास करावा हे त्यांच्याकडून कळले, याचा नक्कीच फायदा होईल असे वाटते.
– मीनल सावंत
आम्हा विद्यार्थ्यांना शंका विचारायला वेळ कमी पडला. कारण आमच्याबरोबरीनं पालकही प्रश्न विचारत होते. त्या दृष्टीनं पुढल्या कार्यक्रमात वयोमर्यादेचा विचार व्हावा. मुलाखत माहितीपूर्ण आणि चांगली झाली. काही उपयुक्त टिप्सही मिळाल्या.
– रश्मी जाधव
व्हिवा लाऊंजमधली मनीषा म्हैसकर यांची मुलाखत छान झाली. त्यांनी त्यांच्या अभ्यास पद्धतीविषयी आणि प्रेक्षकांनी विचारलेल्या आनुषंगिक प्रश्नांना विस्तृतपणं उत्तरं दिली. या उत्तरांचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नक्कीच होईल. त्यांची पर्सनॅलिटी फ्रेश नि प्लििझग वाटली. त्यांनी सगळ्यांशी सुसंवाद साधला.
– गौरी फणसे
आयएएस बनण्याचे माझे स्वप्न आहे. यूपीएससीकरिता खूप चांगले मार्गदर्शन या कार्यक्रमामुळे मिळाले. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी लक्षात ठेवून अभ्यासाला लागणार आहे.
– स्वाती शेळके
मॅडमनी सांगितलेले अनुभव ऐकायला आवडले. त्यातून खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी ज्या दोन पुस्तकांची नावे सांगितली ती लक्षात ठेवली आहेत व मिळाल्यास वाचेनही. मी एमपीएससी व यूपीएससीची तयारी करते आहे, त्यामुळे कार्यक्रम अटेण्ड केला. कार्यक्रम मस्त होता.
– रुपाली गोरे
कार्यक्रम खूपच छान होता. स्फूर्तिदायक होता. असे कार्यक्रम बघितले की अभ्यास करायला पण हुरूप येतो. मी दहावीनंतर ठरवलेच होते यूपीएससीच्या परीक्षेला बसायचे म्हणून, त्यामुळे परीक्षेबद्दल माहिती होती. पण त्यांच्याकडून अभ्यास कसा करायचा ते कळले. त्यांनी सांगितलेल्या तीन गोष्टी नीट लक्षात ठेवल्या आहेत. एक तर अभ्सासासाठी मेहनत करणे, फोकस्ड अभ्यास करणे व आपण दिवसाच्या कुठल्या वेळेला चांगला अभ्यास करू शकतो ते पाहायचे.
– तेजस्वी साळुंखे
मी एमपीएससीची तयारी करीत आहे म्हणून मॅडमकडून काही मार्गदर्शन मिळेल, या हेतूने कार्यक्रमाला आले. कार्यक्रम फारच छान झाला. त्यांनी सांगितलेली अभ्यासाची पद्धत आणि माझी पद्धत सारखीच आहे, त्यामुळे माझ्या अभ्यासाची पद्धत बरोबर आहे याचा दिलासा मिळाला. कामाच्या गोष्टी घरी आणायच्या नाहीत हे त्यांचे म्हणणे पटले.
– तृप्ती शिंदे
दुसऱ्याच्या दु:खात सहभागी होणे, ह्याबद्दल मॅडम जे म्हणाल्या ते खूपच छान वाटले. मी पण परीक्षा देण्याचा विचार करीत आहे. आजकालची डिस्ट्रॅक्शन खूप आहेत, ती टाळली पाहिजेत असे त्या म्हणाल्या, या गोष्टीवर मी नीट विचार करेन. मनीषा मॅडम म्हणाल्या, की दीड वर्षे मी टीव्ही बघितला नाही हे खरे तर आत्ताच्या काळात कठीण आहे पण तसे केले तरच आपण एकाग्रचित्त होऊ शकतो. सो आय विल डेफिनेटली ट्राय.
– सुरभि भोसले
कार्यक्रम चांगला झाला. मी बारावीत असून यूपीएससीसाठी तयारी करत्येय. त्यामुळं माझ्यासाठी ही मुलाखत खरोखरच प्रोत्साहन आणि प्रेरणादायक ठरली. या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, त्यावर लक्ष कसं केंद्रित करावं, येणाऱ्या आव्हानांना कसं तोंड द्यावं इत्यादी मुद्दय़ांविषयीची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
– तृषाली घाटे
मनीषा म्हैसकर यांची मुलाखत अत्यंत प्रभावी झाली. त्यांनी सांगितलेले अनुभव आमच्या तरुण पिढीस प्रेरणादायी ठरतील. ज्या प्रभावीपणे त्यांनी महाराष्ट्रात आयएएस म्हणून काम केलेलं आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भविष्यात त्यांच्या विचारांचा आम्हांला निश्चितच उपयोग होईल. ‘लोकसत्ता’नं ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल धन्यवाद.
– श्रेया मोरे
खूपच मस्त होता कार्यक्रम. मनीषा मॅडमनी सांगितलेले गुण जसे प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी हे लक्षात ठेवले आहेत. अभ्यास कसा करावा ते कळले व क्वालिटी की क्वान्टिटी यापैकी कशाला महत्त्व द्यायचे ते देखील कळले. एकूणच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला उत्तम दिशा मिळालेली आहे.
– अनुप ठोसर
‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेली ही मुलाखत स्पर्धा परीक्षेच्छुक विद्यार्थ्यांना अतिशय मार्गदर्शक ठरली. ‘प्रामाणिक प्रयत्न’ हा त्यांनी दिलेला मंत्र आणि आमच्या पिढीसमोर एवढा डिस्ट्रॅिक्टग मीडिया असताना त्यातून मार्ग काढून कसा अभ्यास करावा, हे त्यांनी पटवून दिलं. परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी, हे त्या वेळेअभावी सांगू शकल्या नाहीत. पण महिलांनी या क्षेत्रात कशी प्रगती साधावी, हे त्यांनी उत्तमरीत्या सांगितलं. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल ‘लोकसत्ता’ला धन्यवाद. असेच चांगले कार्यक्रम व्हावेत ही अपेक्षा.
– प्राजक्ता सावंत
‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेला ‘व्हिवा लाऊंज’चा कार्यक्रम अतिशय छान होता. मनीषा मॅडमनी सांगितलेले अनुभव नि साधलेला संवाद आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूपच प्रेरणादायी ठरला. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचं नियोजन कसं करावं इत्यादीविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं.
– सुप्रिया पाटील
मनीषा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मी आधी सकाळी उठून अभ्यास करायचो नाही. पण त्यांनी सांगितल्यावर मी स्वत:चा शोध घेतला की माझा अभ्यास जास्त चांगला सकाळीच होतो, त्यामुळे मला खूपच फायदा झाला. त्यांचा संघर्ष ऐकून बरेच शिकायला मिळाले. स्ट्रगल केल्याशिवाय उच्चपदापर्यंत पोहोचता येत नाही हे समजले.
– अभिजीत मोरे
हा कार्यक्रम खूपच प्रेरणादायी झाला. या सुसंवादात मनीषा मॅडमनी सांगितलेले त्यांच्या करिअरमधले अनुभव स्फूर्तिदायी होते. एवढय़ा जबाबदारीच्या पोस्टवर असूनही त्यांच्या सजग सामाजिक जाणिवा, प्रशासन आणि सामान्यांत समन्वय राखण्याची हातोटी सध्याच्या काळात दुर्मिळ असून मन:पूर्वक दाद देण्याजोगी आहे. लोकांच्या दु:खात सहभागी झालात, तर ते तुम्हांला त्यांच्या आनंदात सहभागी करून घेतात, या आशयाचा त्यांचा मुद्दा खरोखर पटला. त्यांनी निभावलेल्या वैविध्यपूर्ण प्रशासकीय जबाबदाऱ्या, मलेरिया निर्मूलन मोहीम, सर्व स्तरांतील लोकांशी वागण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी या सुसंवादादरम्यान जाणवल्या. ‘लोकसत्ता’नं आयोजित केलेल्या या अष्टपलू व्यक्तिमत्त्वाच्या कार्यक्रमाला ऐतिहासिक वन्स मोअर न मिळता तरच नवल.
– किमया नागराणे
संकलन- राधिका कुंटे, ग्रीष्मा जोग-बेहेरे