शुक्रवार हा माझ्यासाठी व्हिवाचा-‘सो.कुल’चा वार असतो. आणि अर्थातच रीलीज होणाऱ्या माझ्या प्रत्येक नव्या सिनेमाचा. पण आजच्यापेक्षा काही मोठं कार्य, आनंदाचा उत्सव असूच शकत नाही. म्हणून आजचा हा २४ मेचा शुक्रवार माझ्या, तुमच्या व्हाईटलीलीचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिय मोहन आगाशे ह्य़ांना-

तुम्ही संमेलनाध्यक्ष असताना, तुमच्या सद्दीत माझं नव नाटक येतंय- ह्य़ाबद्दल मला किती आनंद झाला असेल ह्य़ाची कल्पना तरी आहे का तुम्हाला? एकतर तुमच्यासारखा उच्चशिक्षित, अभ्यासू, वेलरेड, मिश्कील, वेल-ट्रॅव्हल्ड, जगाबद्दल अपार माया असणारा, कलावंत, कलंदर, आनंदी आणि बिझी माणूस मी तरी पाहिलेला नाही. प्रवासांनी दमत नाही का हो तुम्ही? आता अमेरिकेहून आला आहात. तुमचा ह्य़ा विश्वात सर्वत्र मुक्त संचार असतो. बोलण्याची हातोटी आणि त्यात सायकिअ‍ॅट्रिस्ट असल्यामुळे तुमच्यात कुणाशीही संवाद साधण्याची कला आहे. तर तुमच्यामार्फत मला कुणाकुणाला निरोप सांगायचे आहेत. त्यासाठी मला जरा मदत कराल प्लीज.?
अहो आमच्या व्हाईटलीलीच्या रंगीत तालमी सुरू होतायत १९ मेला. त्या दिवशी गिरीश कर्नाडांचा वाढदिवस आणि विजय तेंडुलकरांचा स्मृतिदिन. गिरीश अंकलना माझं मी सांगते. पण तेंडुलकरांनी आपला निरोप घेऊन पाच र्वष झाली बघता बघता. त्यांना मात्र माझा निरोप तुम्हीच सांगावा लागेल. नाही नाही, एकदम स्वर्गात फोन लावू नका. माझी खात्री आहे, ते तिथे नसतील. म्हणजे पाच वर्षांपूर्वी १९ मेला त्यांना थेट स्वर्गाचंच ‘पंचतारांकित स्टे’चं तिकीट मिळालं असणार. पण त्यांना त्या ऐषोरामात कुठे चैन पडतीए. तिथून उंचावरून जगातल्या सगळ्या कोलाहलयुक्त घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून चिंतन झाल्यानंतर- स्वत:च्या नोट्सचा लॅपटॉप घेऊन ते  चित्रगुप्त आणि यमाच्या डोक्यावर बसले असणार- पृथ्वीवरून ‘उचललं पाहिजे’ अशा लोकांची शिफारस यादी घेऊन. तुम्ही माझ्या नाटकाचा निरोप सांगितल्यावर ते मान हलवतील आणि म्हणतील, ‘तिला म्हणावं. मी आहे.’ तर त्यांना सांगा, ‘येस- ते आहेतच माझ्याबरोबर. कायम.’
दुसरा निरोप आहे दुबेजींना. अ‍ॅक्चुअली दुबेजींना गेल्यागेल्याच स्वर्गातल्या गोडगोडपणाचा वीट आला असणार. त्यामुळे त्यांनी स्वर्ग आणि नरक ह्य़ांच्यात सीमावादा ची ठिणगी पेटवली असणार. अगदी मुळातल्या गृहीतकांना धक्का बसल्यामुळे सगळे असुर आणि देव गोंधळले असणार. त्यात सगळ्यात पहिला नियम म्हणून त्यांनी सगळ्यांना सुटसुटीत कपडे घालायचं फर्मान सोडलं असणार. टीव्हीवर घालतात तसे रेशमी वस्त्रांमध्ये झळकणारे सगळे देवदानव साध्या जीन्स आणि काळ्या टीशर्टमधे भलतेच अवघडलेले आणि सामान्य दिसत असणार. त्यात नारदाला ‘बंद करो  तुम्हारी नारायण नारायणवाली बकवास! पृथ्वी से मेरे लिए सिगरेट के पाकीट लेके आओ-’ अशी ऑर्डर दिली असणार. सगळ्या अप्सरांना त्यांनी तोंडात पेन्सिली धरून मोठमोठय़ाने बोलण्याचे, उच्चार सुधारायचे एक्सरसाइज दिले असणार. लक्ष जाईल त्या देवदानवाला काखोटीला धरून काखॉशिंग किंवा चारतीनदोनदोनएकतीनदोनचे खास नॅशनल स्कूल ऑफ दुबेजीचे थिएटर एक्सरसाइज करायला लावलं असणार. शिवाय विष्णू आणि लक्ष्मीला एकच सीन भांडून, हसून, रडून आणि प्रेमाने करायला लावून- नाकी नऊ आणले असणार. ते बघताना स्वत:ची आवडती शेषशाही पोझ त्यांनी विष्णूच्या खऱ्या शेषावर घेतली असणार.
मी नाटक करतीए म्हटल्यावर आधी माझ्या डोक्यात हवा जाऊ नये म्हणून. मी कसा मधल्या दरम्यान आळशीपणा केला, रियाझाचा कंटाळा केला- ह्य़ाचा पाढा वाचतील. मग बाळाची नीट काळजी घेतीए ना. घराकडे दुर्लक्ष करून कामात झोकून घेत नाहीए ना. माझा नवरा नीट सपोर्ट करतोय ना- ह्य़ा शंकांचं निरसन झाल्यावर, रिहर्सल नीट झाल्या आहेत ह्य़ाची शाश्वती पटल्यावर. मला कळणार नाही अशा बेतानं खूश होतील. शंकरासारख्या थयथयाट करणाऱ्या, पण भोळ्या माणसाबरोबर- आय मीन देवाबरोबर-चिलमीचे झुरके आणि सोमरसाचे घुटके घेताना माझ्यासाठी उलटा निरोप पाठवतील- की त्यांना पहिल्या प्रयोगाला यायला वेळ नाही. कारण त्याच दिवशी परलोकात
सिधरलेल्या सगळ्या कलाकारांना घेऊन ते ‘संभोग से संन्यास तक’ ह्य़ा नाटकावर आधारित सिनेमाचा मुहूर्त करणार आहेत. ते पंचविसाव्या प्रयोगाला येतील. तर त्यांना म्हणावं ‘आय ट्रस्ट हिम.’
आता फायनल निरोप आहे आमच्या प्रिय प्रिय प्रिय रसिकाला. मला माहितीए भक्तीताईंनी रॉयल इग्नोअर करून जन्माचा कॉम्प्लेक्स दिल्यामुळे नव्‍‌र्हस झालेल्या सर्व देव्यांकडे बघून ती मन:पूर्वक हसत असेल. सगळ्या पॉप्युलर, नॉनपॉप्युलर, सर्वधर्मीय, देव, राक्षस, वाहन असलेले प्राणी- ह्य़ा सर्व लोकांचं तिच्याभोवती भलंमोठं कोंडाळं असेल. ती सगळ्यांना काय काय धमाल किस्से सांगत असेल. तर त्या अत्यंत आनंदी वातावरणात आमच्या ओरिजिनल व्हाईटलीलीला एवढंच सांगा की, अगं २४ मेला पहिला प्रयोग आहे. ह्य़ा नाटकासाठी मी तिची शतश: ऋणी आहे. तिच्या नाइट रायडरनं- मिलिंदनं मला ह्य़ा नाटकासाठी विचारलं तेव्हा माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. मधली सगळी तयारीची प्रोसेस तिच्या कानावर गेलीच असणार. पण हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यातली एक गोष्ट सांगते. मी रसिकासाठी एक स्वस्तिकाचं झाड लावलं होतं दोन वर्षांपूर्वी. सदासर्वकाळ पांढऱ्याशुभ्र प्रसन्न फुलांनी ते डवरलेलं असायचं. पण मिलिंदनी आणि मी तालमींना सुरुवात केली आणि अचानक त्याची एक एक डहाळी सुकायला लागली. मी लक्ष ठेवून पाणी घातलं, औषध घातलं- पण ते जोमच धरेना परत. किती कासावीस झाले मी. कसं सांगू. पण ज्या दिवशी एक सुप्त हळुवार आत्मविश्वास वाटला की जमेल मला हे नाटक. त्या दिवशी संध्याकाळी कुंडीकडे लक्ष गेलं. तर पूर्ण पूर्ण वाळून, वाळलेल्या पानांसकट जागच्या जागी स्तब्ध झालं होतं ते स्वस्तिकाचं रसिकाचं झाड. मला वेगळाच अर्थ दिसला ह्य़ा सगळ्या कवितेत. तू पानाफुलांच्या पलीकडे आलीएस का माझ्यात? तू विश्वास टाकलायस का माझ्यावर? परवापासून हा जो नवा कोंब दिसतोय त्यातून तू कुठेतरी परवानगी देतीएस का मला? किती गं चांगली आहेस तू.
तिसऱ्या बेलच्या आधी मी उंच आकाशाकडे बघत तुला एक फ्लाइंग किस देणार आहे. अढळ असा फार जिवाभावाचा ध्रुवतारा आहेस तू आमचा. जिथे आहेस तिथून नाटक बघ. प्रयोगाच्या आधी तिथूनच. एकदा डोळा मारून मला थम्स अप करशील? मी तर आहेच, पण तुझा गिरीश, मिलिंद, दिनू, बॅकस्टेज टीम आणि तुझे अनगिनत चाहते, प्रेक्षक ह्य़ांना एकदा हात कर. तुझ्या स्पिरीटसाठी शो मस्ट गो ऑन असं नव्या धाडसानं म्हणू बघतोय आम्ही. बिकॉझ, वुई लव्ह यू माय डार्लिग. वुई लव्ह यू व्हेरी व्हेरी मच. सी यू ऑन द स्टेज, फ्रॉम द स्टेज!

मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White lily night rider marathi drama
First published on: 24-05-2013 at 01:08 IST