24 September 2020

News Flash

जाहिरात तयार होताना…

एकविसाव्या शतकात अनेक प्रसार माध्यमे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत.

आपल्यासमोर येणारी कमीतकमी शब्दातली किंवा काही सेकंदांची जाहिरात आपल्या मनावर नेमका परिणाम करत असते. प्रत्यक्षात तिचा पडद्यामागचा व्याप खूप मोठा असतो आणि म्हणूनच करिअरसाठी हे क्षेत्र आव्हानात्मक आहे.

एकविसाव्या शतकात अनेक प्रसार माध्यमे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. पण लहानथोरांना जे जवळचे वाटते, आपलेसे वाटते ते प्रसार माध्यम म्हणजे दूरचित्रवाणी अर्थात आपल्या प्रत्येकाच्या घरी असलेला आपला टीव्ही. टीव्हीवरच्या मालिका आपल्याला खिळवून ठेवतात, तसंच मालिकांच्या मध्ये लागणारे कमíशयल ब्रेक, म्हणजेच जाहिराती यादेखील आपले लक्ष वेधून घेतात. जाहिरातींचा मुख्य उद्देश म्हणजे एखादी वस्तू बाजारात आली आहे हे कलात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे. कलात्मक पद्धतीने एखाद्या वस्तूची माहिती दिली की ती लोकांच्या चांगली लक्षात राहते. या जाहिराती वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात म्हणजे काही जाहिराती सेलेब्रिटींना घेऊन केलेल्या असतात तर काही अगदी साध्या पद्धतीने असतात. काही आनंदी तर काही गंभीर, काही विनोदी पद्धतीने केलेल्या असतात. हल्ली जाहिरातींमध्ये कार्टून्स किंवा अ‍ॅनिमेशनचादेखील वापर केला जातो.

या जाहिराती कशा बनवतात, हे जाहिरात क्षेत्र करिअर म्हणून कसं आहे या आणि अशा इतर शंकांचे निरसन केले आहे अभिनय देव यांनी. जाहिरात या क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान आहे.  त्यांनी साडेचारशेहून अधिक जाहिराती केल्या आहेत.

या क्षेत्रात आधीपासूनच यायचं ठरवलं होतं का असं विचारलं असता ते म्हणाले की सुरुवातीपासून माझ्या मनात एकच होतं ते म्हणजे मला लोकांना गोष्टी सांगायच्या आहेत. माझ्या गोष्टी कलात्मकतेने लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. गोष्टी सांगण्याकरता माध्यम कोणतंही असेल. त्यामुळे मी अनेक माध्यमं पडताळून पाहिली. जाहिराती, फीचर फिल्म्स, डॉक्युमेंट्री, म्यूझिक व्हिडीओज असं सगळं करून बघितलं. त्या वेळेला मी विचार करत होतो की आपल्याला या सर्व क्षेत्रांपैकी नक्की कुठल्या क्षेत्रात रस वाटतो आहे? अर्थात चित्रपटांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं. यामुळे मी जाहिरात क्षेत्रात जाण्याचा विचार केला. मी १९९२ साली आर्किटेक्चर पूर्ण केलं. त्यानंतर मला चित्रपटांकरता काहीतरी करण्याची इच्छा होती, पण त्या वेळी मराठी चित्रपटाला फार बरे दिवस नसल्याने मी जाहिरातींकडे वळण्याचा विचार केला. या क्षेत्रात आपली सर्जनशीलता चांगल्या प्रकारे दाखवता येते. अ‍ॅड फिल्म्स दिसतातही खूप छान. जाहिरात क्षेत्र हे करिअर करण्याच्या दृष्टीने चांगलं आहे असं मला वाटलं. मग मी तीन-चार जाहिरात एजन्सीजमध्ये नोकरीसाठी अर्ज केले. मी आर्किटेक्ट असल्याने त्या जाहिरात एजन्सीमधल्या लोकांना प्रश्न पडला होता की हा आर्किटेक्ट असून जाहिरात एजन्सीमध्ये का येतोय? पण मी त्यांना म्हटलं की मला अ‍ॅड फिल्म्स बनवायच्या आहेत. ओ अ‍ॅण्ड एम या अ‍ॅड एजन्सीने मला चित्रपट विभागात नोकरी दिली. अशा रीतीने १ जानेवारी १९९३ पासून माझा जाहिरात क्षेत्रातला प्रवास सुरू झाला.

जाहिरात या क्षेत्रात स्थिरावलेल्या अभिनय देव यांना त्यांच्या संघर्षांच्या काळाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की पहिली तीन-चार र्वष संघर्ष तर होताच. झालं असं की अर्किटेक्चर झाल्यानंतर जाहिरातीकडे वळल्याने क्षेत्र पूर्णपणे बदललेलं होतं. त्यातून या क्षेत्राची तशी फारशी माहिती नव्हती. ज्या क्षेत्रात आपण शिकलेले आहोत त्याच क्षेत्रात करिअर केलं तर तितकं कठीण जात नाही. कमीतकमी आपल्याला त्या क्षेत्राची तरी चांगली माहिती असते. आणि त्यातून मी माझ्या हिमतीवर सगळं करायचं ठरवलं. घरून आर्थिक मदत न घ्यायचं ठरवल्याने थोडं अजून कठीण गेलं. जाहिरात या क्षेत्रात माझ्या आई-बाबांचं नाव किंवा अनुभव काहीच नव्हता त्यामुळे त्यांच्या नावाची अशी मदत मिळालीच नाही. अर्थात बाकी सगळी मदत त्यांनी मला केली. मला त्यामुळे अगदी मुळापासून शिकावं लागलं. मी जेव्हा सुरुवात केली त्या वेळी हे क्षेत्र खूप छोटं होतं. जे काही काम करू त्यात समाधान होतं. पण जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये काम करत असता तेव्हा तिथेच आपण थांबतो. त्याच्या बाहेर पडून स्वतला पुढे जायला उद्युक्त केलं पाहिजे. थोडक्यात आव्हानांना सामोरं गेलं पाहिजे तर आपल्या हाती काही लागू शकतं.

सुरुवातीच्या काळातला जाहिरात एजन्सीमध्ये काम करण्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले की  सुरुवातीचं एक-दीड वर्ष एजन्सीमधल्या लोकांना वाटत होतं की हा आर्किटेक्ट आहे आणि या जाहिरातींच्या क्षेत्रात काय करणार आहे, पण मग माझी काम करण्याची इच्छा आणि मेहनत बघून त्यांना वाटलं की हा काहीतरी करू शकेल. पहिले काही महिने मी मोठय़ा जाडजूड अशा १०० टेप्स घेऊन व्हीटी ते चर्चगेट जात असे. लालू नावाचा एक स्टूडिओ होता तिथे जाऊन एका टेपवरून दुसऱ्या टेपवर जाहिराती ट्रान्सफर करायच्या असायच्या. हे तसं कौशल्याचं काम नसल्याने एजन्सीमधलं दुसरं कोणी करायला तयार होत नव्हतं. मी नवीन होतो, शिकत होतो त्यामुळे मला करावं लागलं. याचा मला मात्र खूप फायदा झाला. एका टेपवरून दुसऱ्या टेपवर जाहिराती ट्रान्सफर करता करता मला इंडस्ट्रीमधल्या जवळजवळ सगळ्या जहिराती सहा महिने बघायला मिळाल्या. यातून जे शिकायला मिळलं ते अमूल्य आहे.

जाहिरात या क्षेत्रात नक्की काम कसं चालतं म्हणजे जाहिरात बनवण्याची प्रक्रिया कशी असते हे विचारलं असता देव म्हणाले एक क्लायंट असतो म्हणजे ज्या वस्तूची जाहिरात बनवायची असेल ती कंपनी, एक जाहिरात एजन्सी असते, ती कंपनी त्या जाहिरात एजन्सीला ब्रिफ देते म्हणजे सांगते की अमुक अमुक एका विषयावर अ‍ॅड फिल्म बनवायची आहे. मग एजन्सीमधले सर्जनशील लोक ढोबळमानाने जाहिरात कशी करता येईल याचा विचार करतात. एका विषयावर दोन-तीन प्रकारे जाहिरात कशी बनवता येईल हे बघतात. त्यानंतर ते माझ्यासारख्या दिग्दर्शकाशी संपर्क साधतात. एजन्सीने तयार केलेली स्क्रिप्ट दिग्दर्शकाला दाखवली जाते. मग एजन्सीचा क्रिएटिव्ह हेड आणि दिग्दर्शक त्या कल्पनेवर अजून थोडं काम करतात. दोन-तीन पर्यायांपैकी नेमका कुठला पर्याय निवडायचा ते ठरवतात. यात काही बदल करावा लागेल का, जाहिरातीच्या दृष्टीने याचासुद्धा विचार केला जातो, कारण ती कल्पना फिल्म, प्रिंट, होर्डिग, आऊट डोअर, पॉइंट ऑफ पर्चेस या सर्वामध्ये चालली पाहिजे. नव्वदच्या दशकात प्रिंट आणि आऊट डोअर याला महत्त्व होतं पण आता फिल्मला महत्त्व असल्याने आधी फिल्मचा विचार केला जातो. त्यानंतर एजन्सी, प्रॉडक्शन हाऊस आणि क्लायंट यांची मीटिंग होते त्याला प्रिप्रॉडक्शन मीटिंग म्हणतात. त्यात आम्ही विचार केलेली कल्पना बारकाव्यांसकट क्लाएंटला समजावतो. मग त्याचं कास्टिंग होतं, त्याचा स्टोरीबोर्ड बनवला जातो. मग क्लाएंटची मान्यता मिळाली की शूटिंग करतो. त्यानंतर त्याला संगीत दिलं जातं, एडिट केलं जातं. क्लाएंट त्या जाहिरातीला मान्यता देतो आणि मग मीडियाकडे जातं. अशा तऱ्हेने जाहिरातीची निर्मिती होते.

ते म्हणाले की, या क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना मी असं सांगेन की जाहिरात क्षेत्र गेल्या दोन दशकांत खूप मोठं झालेलं आहे. आजच्या तारखेला प्रत्येक गोष्ट विकली जाते. सगळ्या गोष्टींकरिता मार्केटिंग लागतं. म्हणजे चित्रपट बनवणं वेगळी गोष्ट आहे पण तो लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता मार्केटिंगच लागतं. त्याला कधी आपण मार्केटिंग म्हणतो, पब्लिसिटी म्हणतो, प्रोमोज म्हणतो पण याला पर्याय नाही. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांमध्ये तुमच्यात कलात्मकता खूप हवी, मेहनत करण्याची तयारी हवी. कलात्मकता तुमच्यात मुळातच असायला हवी, ती तुम्हाला विकत घेता येत नाही. तुमच्यात असलेली कलात्मकता तुम्ही वाढवू शकता. लिखाण, व्हिज्युअल आर्ट, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यात तुम्ही काम करू शकता. या क्षेत्रात पैसाही आहे. आजच्या पिढीला पैसा महत्त्वाचा वाटतो. मी सुरुवात केली तेव्हा मी पैशाचा विचार केला नाही. पण आजची पिढी करते आहे.

कुठल्याही क्षेत्रात संघर्ष तर असतोच. तो कोणालाच चुकलेला नाही. कुणाला कमी असेल तर कोणाला जास्त. पण त्या क्षेत्रात जेव्हा आपण नाव कमावतो त्या वेळी उमेदीच्या काळात केलेल्या श्रमाचं, कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. जाहिरात हे क्षेत्र मोठं आहे, त्यात वावही खूप आहे. ज्यांच्याकडे कलात्मकता आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, त्यांनी या क्षेत्राचा विचार करायला हरकत नाही.
ग्रीष्मा जोग बेहेरे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:19 am

Web Title: while advertisement getting created
Next Stories
1 आवाज की दुनिया..
2 इंग्रजी एफएम
3 एफएम बोले तो…
Just Now!
X