दहावीच्या परीक्षेस आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांंच्या प्रवेशपत्रावरून विदर्भातील अनेक परीक्षा केंद्रांवर गोंधळ झाल्याची माहिती मिळाली. अनेक विद्यार्थ्यांंना वेळेपर्यंत प्रवेशपत्र मिळाले नाही आणि ज्यांना मिळाले त्यात अनेकांची नावे आणि केंद्रांची नावे चुकलेली आढळून आली. मंडळाने मात्र बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी नियंत्रण मिळविले असल्याचा दावा केला आहे.
ज्या विद्यार्थ्यांंना प्रवेशपत्र मिळाले नाही त्यांना कोणत्याही केंद्रावर परीक्षा देता येईल, असे मंडळाने घोषित केले असले तरी अनेक केंद्रांवर केंद्राधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांंजवळ प्रवेशपत्र नसल्यामुळे त्यांना परीक्षेला बसूचच दिले नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांंच्या प्रवेशपत्रावर केंद्रांची नावे चुकलेली आढळून आली. शाळेकडून सांगण्यात आलेले केंद्र आणि प्रवेशपत्रावर असलेले केंद्र वेगळे असल्यामुळे विद्यार्थ्यांंनी नेमके कोणत्या केंद्रावर जावे, असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांंना पडला. या संदर्भात अनेक पालकांनी मंडळाकडे विचारणा केली असता मंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पालकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी केल्या. प्रवेशपत्राच्या घोळामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील काही परीक्षा केंद्रांवर केंद्राधिकाऱ्यांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांंना प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्याची माहिती मिळाली आहे. ज्या विद्याथ्यार्ंचे मराठी माध्यम आहे त्या विद्यार्थ्यांंच्या प्रवेशपत्रावर इंग्रजी आणि उर्दू माध्यम लिहिण्यात आले. शिक्षण मंडळांकडून शाळांना प्रवेशपत्र मिळाल्यानंतर अनेक शाळांनी प्रवेशपत्र न बघताच ते वितरित केल्यामुळे विद्यार्थ्यांंना त्याचा फटका बसला.
नागपूर विभागात मराठीच्या पेपरला पहिल्या दिवशी केवळ ८ विद्यार्थ्यांंना कॉपी करताना पकडण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि अन्य जिल्ह्य़ातील काही गावांमध्ये कॉपी करताना विद्यार्थ्यांंना पकडण्यात आले. मात्र, त्याची वाच्यता करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दहावीच्या परीक्षेत माय मराठीच्या पेपरला ८ कॉपी बहाद्दरांना पकडण्यात आले असून त्यात चंद्रपूरला ४ आणि गडचिरोलीत ४ आहेत. गोंदियात सर्वात जास्त संवेदनशील केंद्रे असताना त्या ठिकाणी मात्र एकही कॉपी बहाद्दर पकडण्यात भरारी पथकाला यश मिळाले नाही. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरला ८३ विद्याथ्यार्ंना पकडण्यात आले होते. मात्र, यावेळी केवळ आठ विद्यार्थी आढळून आल्याने शंका उपस्थित केली जात आहे.
नागपूर आणि अमरावती विभागीय मंडळात कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याचे परीक्षा मंडळाच्या वतीने सांगण्यात आले असले तरी काही केंद्रांवर वेळेवर उत्तरपत्रिका पोहोचले नसून आणि प्रश्नपत्रिका कमी मिळाल्याच्या तक्रारी आहेत, तर काही केंद्रांवर आसन व्यवस्था चुकीची असल्याचे निदर्शनास आले आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी मराठी, उर्दू आणि पाली या विषयांचा पेपर होता. दहावीच्या पहिल्या पेपरसाठी सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती. आपला परीक्षा क्रमांक कोणत्या वर्गात किंवा कोठे आहे, याची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकही धावपळ करताना दिसत होते. ग्रामीण भागातील काटोल, रामटेक आणि कळमेश्वरच्या काही परीक्षा केंद्रांवरील खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांंनी कोठे बसावे, याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांंना २० मिनिटे पेपर उशिरा देण्यात आल्याची माहिती मिळाली. गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्य़ातील काही परीक्षा केंद्रांवर मराठीच्या पेपरला कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहे. प्रवेशपत्राच्या गोंधळाबाबत मंडळाचे सचिव अनिल पारधी यांच्याशी संवाद साधला असला त्यांनी कुठलाही गोंधळ झाला नसल्याचे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांंच्या प्रवेशपत्रावर चुका होत्या त्या दुरुस्त करण्यात आल्या होत्या. मंडळाकडे कुठल्याही पालकांच्या तक्रारी आल्या नाहीत. पहिल्या दिवशी परीक्षा सुरळीत पार पाडली असल्याचे पारधी यांनी स्पष्ट केले.