वर्षभरात १७  वाघांचा मृत्यू होऊनही प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.डब्ल्यू.एच. नकवी यांच्या नेतृत्वाखालील वन्यजीव विभागाचे वाघांच्या सुरक्षेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी ताडोबात रेस्क्यु सेंटर, तसेच विविध उपाययोजना करण्याची गरज असताना वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी निद्रावस्थेत आहेत.
 राज्यात मेळघाट, ताडोबा व पेंच असे तीन व्याघ्र प्रकल्प मिळून अंदाजित अडीचशे वाघ तर एकटय़ा चंद्रपूर जिल्हय़ातील जंगलांत जवळपास शंभर वाघ आहेत. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक वाघ एकटय़ा या जिल्हय़ात असतानाच वाघांच्या सुरक्षेकडे वन्यजीव विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे वर्षभरातील घटनांमधून दिसून येत आहे. २०१२ या वर्षांचा विचार केला तर सर्वाधिक १७ वाघ या एकाच वर्षांत मृत्यूमुखी पडले आहेत. केवळ नैसर्गिक मृत्यू नाही तर वाघांच्या शिकारीची सर्वाधिक प्रकरणे या वर्षभरात उघडकीस आलेली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या पानवठय़ावर तर वन खात्याच्या सुरक्षा रक्षकांनीच वाघाचा बळी घेतल्याचे तपासात उघडकीस आले. एवढेच नाही तर बोर्डाच्या जंगलात वाघाच्या शरीराचे अकरा तुकडे करून फेकून दिल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले. त्याच बरोबर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही वाघांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले. यासोबतच बल्लारपूर वनपरिक्षेत्रात एका वाघाचा मृत्यू झाला तर लोहारा येथील रोप वाटिकेत वाघाचा शॉक लागून मृत्यू झाला. सावली तालुक्यातही कृषी पंपाच्या मदतीने वाघाची शॉक देऊन शिकार करण्यात आली तर गोंडपिंपरी तालुक्यातही अशाच पध्दतीने वाघाला ठार करण्यात आले.
जुनोनाच्या जंगलात तसेच भद्रावती तालुक्यात अशाच पध्दतीने वाघाचा बळी घेण्यात आला. एका पाठोपाठ एक सतरा वाघांचा मृत्यू झाल्यानंतर वन्यजीव विभागाने वाघांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलने गरजेचे असतांना वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी यांचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. ताडोबातील वाघ पाण्याच्या शोधात गावात भटकंती करीत आहेत. त्यामुळे मानव व वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. ताडोबात वाघांसाठी रेस्क्यु सेंटर उभारण्याची घोषणा करून कितीतरी वर्षांचा कालावधी लोटला मात्र नकवी यांचे वाघांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आखण्याकडे कायम दुर्लक्ष होत आहे.
नकवींचे निष्फळ दौरे
वाघांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर घेण्याऐवजी प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.डब्ल्यू.एच. नकवी बैठकीच्या निमित्ताने चंद्रपूरला ताफ्यासह येतात आणि एकदोन अधिकारी, एनजीओंना भेटून सुरक्षेवर चर्चा न करताच निघून जातात. एका वनाधिकाऱ्याने तर नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर नकवी यांनी, वन्यजीव खात्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून वाघांच्या सर्वाधिक शिकारी झाल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यकाळात शिकारीचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असतांनाही वन खात्याचे याकडे दुर्लक्ष झाल्याची ओरड आता स्थानिक वन्यजीव प्रेमींनीही सुरू केलेली आहे. वाघांची सुरक्षा हा गंभीर प्रश्न होत असतानाच त्याकडे अशा पध्दतीने दुर्लक्ष करणे म्हणजे शिकाऱ्यांना रान मोकळे करून देणे आहे. दरम्यान यासंदर्भात नकवी यांच्याशी संपर्क केला असता सुरूवातीला तर त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर ‘आपको जो छापना है छापो’, असे म्हणून फोन ठेवून दिला.