News Flash

परभणीत ४० घंटागाडय़ांचे लोकार्पण

शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या वतीने ४० घंटागाडय़ांचे लोकार्पण झाले. शहरात आता ६५ घंटागाडय़ा झाल्या असून, प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे शहर स्वच्छतेसाठी या गाडय़ा कार्यान्वित होणार

| July 24, 2013 01:55 am

शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या वतीने ४० घंटागाडय़ांचे लोकार्पण झाले. शहरात आता ६५ घंटागाडय़ा झाल्या असून, प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे शहर स्वच्छतेसाठी या गाडय़ा कार्यान्वित होणार आहेत.
अनेक प्रभागांत घंटागाडय़ा नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. गाडय़ांची संख्या कमी पडत असल्याने सर्व प्रभागांत कचरा उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेने घंटागाडय़ांची संख्या वाढवली. शहराच्या व्यापारपेठेच्या भागात ५ घंटागाडय़ा देण्यात आल्या असून, शहरातल्या बाजारपेठेतील कचरा त्याद्वारे गोळा होईल. नियमित चालणाऱ्या घंटागाडय़ांची वेळ व्यापाऱ्यांसाठी सोयीची नसल्याने त्यांच्या वेळेनुसार या ५ घंटागाडय़ा दिल्या आहेत. या गाडय़ांसोबत कर्मचारीही असल्याचे महापौर प्रताप देशमुख यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेने हा उपक्रम सुरू करून त्यांना शुभेच्छा दिल्याचे ते म्हणाले.
एक घंटागाडी पाचशे घरांमधील कचरा जमा करण्याचे काम दिवसभरात करील, असे सांगून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी कचरा रस्त्यावर न टाकता तो घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन महापौरांनी या वेळी केले. महापालिका झाल्यामुळे पगारीचे सहायक अनुदान व इतर अनुदाने बंद झाली आहेत. स्थानिक संस्था कराची वसुलीही कमी झाली असून केवळ महापालिका कर्मचाऱ्यांच्या पगारावर दीड कोटी रुपयांचा खर्च होत आहे. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्याने हा ताळमेळ जुळवणे ही कसरत असल्याचे ते म्हणाले.
घंटागाडी लोकार्पणास महापौर देशमुख, आयुक्त सुधीर शंभरकर, स्थायीचे सभापती विजय जामकर, गटनेते दिलीप ठाकूर, सभापती महेबूबखान अजीखान, बाळासाहेब बुलबुले, सचिन कांबळे, सचिन देशमुख यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी प्रा. संभाजी झावरे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे उपस्थित होते. झावरे व पाटील यांचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अधीक्षक पाटील यांनी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने लवकरच सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असून मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 1:55 am

Web Title: 40 ghantagadis open for pbblic use in parbhani
टॅग : Parbhani
Next Stories
1 लातुरात ८४ हजारांवर मतदारांची नावे वगळली
2 अनधिकृत गर्भपात केंद्राचा पर्दाफाश
3 आरक्षणाचे नियम गुंडाळून शिक्षकभरती
Just Now!
X