लोकसभा आणि त्यानंतर दोन महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सक्रिय असलेले आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडणुकीत फारसे यश न मिळाल्याने दोन्ही पक्षाचे अस्तित्व गेल्या काही दिवसांपासून दिसेनासे झाले आहे. एरवी सामाजिक, राजकीय विषयासह इतरही समस्यांवर होणारी  निदर्शने आणि आंदोलने थंडावली आहेत. शिवाय, निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली विदर्भातील विविध ६० पेक्षा अधिक कार्यालयेही बंद करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशानंतर गेल्या दीड ते दोन वर्षांत विदर्भासह अन्य जिल्ह्य़ात पक्ष कार्यकर्ते सक्रिय होऊन  त्यांनी संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकसभेत आणि त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला यश मिळाले नाही. त्यामुळे विदर्भातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. भ्रष्टाचार, काळा पैसा व इतर विविध मागण्यांसंदर्भात निवडणुकीच्या काळात सरकारच्या विरोधात लढणाऱ्या आम आदमी पक्षाने अनेक जिल्ह्य़ात पक्षाची कार्यालये सुरू केली. जिल्ह्य़ात संघटन वाढविण्याच्या दृष्टीने सदस्यता मोहीम सुरू केली होती. अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, विविध कारखाने, बाजारपेठांमधील मजूर वर्ग पक्षाकडे यावा, या दृष्टीने त्या त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून संघटन मजबूत केले होते.
एकटय़ा नागपूर शहरात सुमारे २ लाख, तर विदर्भात १० ते १२ लाख सदस्य नोंदणी करण्यात आली होती. मात्र, आज शहरात आणि जिल्ह्य़ातील विविध गावांमध्ये सुरू करण्यात आलेल्या कार्यालयांना कुलुपे लागली आहेत. शहरातील वेगवेगळ्या समस्यांवर करण्यात येणारी निदर्शने आणि आंदोलनेही थंड झाली आहे.
तीच गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. मनसेचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीपर्यंत सक्रिय होते. मात्र, त्यांना विदर्भात यश न मिळाल्याने याही पक्षाचे कार्यकर्ते थंडावले आहेत. मनसे म्हणजे आक्रमकता, अशी ख्याती असताना विदर्भात मात्र गेल्या काही दिवसात फारसे कुठलेही आंदोलन नाही किंवा एखाद्या विषय घेऊन निदर्शनेही नाहीत. निवडणुकीनंतर अनेक कार्यकर्ते विखुरले आहेत. विदर्भातील मनसेचीही अनेक कार्यालये बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.