शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वाहनांतील विद्यार्थी संख्येवर र्निबध असतानाही त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वडाळा कार्यालयाने कारवाई केली. मंगळवारी या कार्यालयातील पथकाने विविध ठिकाणी केलेल्या अचानक तपासणीत ४२ वाहनांमध्ये नियमापेक्षा जास्त विद्यार्थी नेले जात असल्याचे आढळले. या सर्व वाहनचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी रिक्षा, खासगी वाहने आणि बस अशा विविध पर्यायांचा विचार केला जातो. मात्र या प्रत्येक वाहनातून किती विद्यार्थ्यांची वाहतूक व्हावी, याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने काही नियम केले आहेत. मात्र बऱ्याचदा जादा विद्यार्थी कोंबल्याचे प्रकार होतात. अखेर वडाळा येथील प्रादेशिक परिवहन विभागाने मंगळवारी मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर या परिसरात अचानक तपासणी केली.
या तपासणीदरम्यान १४० वाहने तपासण्यात आली. त्यापैकी ४२ वाहनांमध्ये नियमांपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबल्याचे आढळले. त्यात २४ रिक्षा, सहा खासगी गाडय़ा, पाच स्कूल व्हॅन, चार पर्यटक टॅक्सी आणि तीन स्कूल बस आढळल्या आहेत. या सर्व वाहनचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यानुसारच पुढील कारवाई होईल, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.