यूपीए सरकारमधील नेत्यांचा भ्रष्टाचार आणि महागाईला जनता कंटाळल्यामुळे देशभरात होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभांना मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी २०१४च्या निवडणुकीत पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांंनी बुथ पातळीवर कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीची बैठक वाठोडास्थित ललिता पब्लिक शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, संघटन मंत्री राजेश बागडी, प्रवीण दटके, जमाल सिद्दिकी, उपमहापौर जैतुनबी, छोटू भोयर, संदीप जोशी, प्रमोद पेंडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यूपीए सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला असताना भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे जनतेचा काँग्रेसवर विश्वास राहिला नाही. देशभर नरेंद्र मोदी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघता काँग्रेसचे नेते भाजपच्या नेत्यांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असून अपप्रचार करीत आहे. नागपूरमधून नितीन गडकरी यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांंनी कामाला लागले पाहिजे. बुथ पातळीवर संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने कार्यकत्यार्ंनी मेळावे आणि बैठका घेऊन जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, अजय संचेती आणि राजेश बागडी यांची यावेळी भाषणे झाली. बैठकीला संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, भोलानाथ सहारे, रमेश दलाल, विनायक डेहनकर, बंडू राऊत, सुमित्रा लुले, सुधीर सावरकर, रूपा राय, विवेक तरासे आदी उपस्थित होते.