आगरी युथ फोरम संस्थेमार्फत येत्या ४ ते ११ डिसेंबरदरम्यान आखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात हा महोत्सव रंगणार आहे. लोकरंजनातून लोकशिक्षण हा मुख्य हेतू असलेल्या या महोत्सवातून सामाजिक, शैक्षणिक प्रबोधनाबरोबरच मनोरंजन आणि खाद्यसंस्कृतीचादेखील आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे. गेल्या ११ वर्षांपासून आगरी समाजाचे बदलते स्वरूप दाखवणारा अखिल भारतीय आगरी महोत्सव म्हणजे आबालवृद्धांसाठी आनंदाची पर्वणीच असते. यंदा पारंपरिक खाद्यसंस्कृती जोपासण्यासोबत वैचारिक खाद्यदेखील या महोत्सवातून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी समाजाला भेडसावणाऱ्या ज्वलंत विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे यांची रेलचेल यंदाच्या महोत्सवात असणार आहे. तर महिलांच्या सन्मानासाठी विशेष कार्यक्रमदेखील यंदाच्या महोत्सवाचे वेगळेपण असणार आहेत. कला क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन, बहारदार नृत्यांचा कार्यक्रम, राजकीय, समाजिक, शैक्षणिक, कला-क्रीडा आणि सिनेक्षेत्रातील नामवंतांची उपस्थिती यंदाच्या महोत्सवाची शोभा वाढवणार आहे. आगरी महोत्सव हा ग्राहकांसाठी खरेदीची एक पर्वणीच असून गृहपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी-चारचाकी वाहने, बँका, विमा, प्रॉपर्टी, वैद्यकीय सुविधा, आयुर्वेद, सुकी मासळी, आगरी खाद्यपदार्थाचे स्टॉल्स या महोत्सवाच्या प्रांगणात सजणार आहेत. त्यामुळे या महोत्सवात नागरिकांना मोठय़ा संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८२१६५०२५०, ०२५१-२४४३३४५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.